वसंत माधव कुळकर्णी

लोकांतात राहण्याची सवय असलेल्यांना एकांत खायला उठतो. तर एकांतप्रिय असलेल्यांना गर्दीचा त्रास होतो. जागतिक संकटाच्या भयाने सर्वानाच मर्यादित एकांतात राहावे लागले आहे. या एकांताचा उपयोग आपल्या गुंतवणुकीचा माग घेण्यासाठी करू या. त्यातून कदाचित आपल्याच चुका आपल्याला दिसून येतील. घसरलेला बाजार मालमत्ता विभाजनाचे महत्त्व नक्कीच पटवणारा आहे. मालमता विभाजनात फारच कमी लोकांना गुंतवणुकीत रोखेसंलग्न फंड राखण्याचे महत्त्व पटते. रोखे फंड ही सुरक्षित गुंतवणूक आहे, या कल्पनेला सप्टेंबर २०१८ मध्ये आयएल अ‍ॅण्ड एफएस प्रकरणानंतर तडा गेला. दरम्यानच्या काळात रोखे बाजारात अनियमिततेची संकटे अद्याप सरलेली नाहीत. त्यामुळे रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांची गुंतवणुकीसाठी निवड करताना कोणते निकष असावेत हा मुद्दा प्रकर्षांने पुढे आला आहे. परताव्यापेक्षा जोखीम व्यवस्थापन, आणि रोकड सुलभतेला प्राधान्य दिले पाहिजे. इतर रोखे गुंतवणूक पूर्णपणे परताव्याच्या कामगिरीवर (एनएव्ही) वर आधारित असू नयेत. रोखे गुंतवणुकीसाठी फंड निवडताना पोर्टफोलिओ-आधारित निकष, जोखीम-समायोजित परतावा, गुंतवणुकीचे ध्रुवीकरण रोख्यांची गुणवत्ता (रेटिंग) गुंतवणूक केलेल्या रोख्यांची उर्वरित मुदत यासारख्या प्रमुख बाबींचा विचार करून म्युच्युअल फंडांची निवड केली जाते. सेबीने कोणत्या फंड गटात रोख्यांची किती मुदत असावी या बाबतीत स्पष्टपणे नमूद केले आहे. सेबीच्या म्युच्युअल फंड वर्गीकरणापश्चात रोख्यांची उर्वरित मुदत या निकषाला साहजिक कमी महत्त्व प्राप्त झाले आहे.

रोखे गुंतवणूक हे संपत्ती निर्मितीचे साधन नसून भांडवलाची सुरक्षितता आणि नियमित उत्पन्न देणारे साधन आहे. साहजिकच साधनातून कमाईच्या उद्देशाने बघणे चुकीचे आहे. रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांकडून बँकेच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजा इतके परंतु व्याजापेक्षा कर कार्यक्षम उत्पन्न मिळविणे हा उद्देश असायला हवा. मालमत्ता विभाजनाच्या शंभर वजा वय या सूत्रानुसार आपल्या वयाइतकी गुंतवणूक निश्चित उत्पन्न रूपात हवी.

बँकेचे बचत खाते, मुदत ठेवी, पीएफ,(कर वजावट वगळून), एन्डोमेंट पॉलिसी.. या सर्व निश्चित उत्पन्न गुंतवणूक साधनांना, म्युच्युअल फंडातील विविध फंड प्रकार पर्याय आहेत. रोखे गुंतवणूक करणारे फंड हे बँकेची मुदत ठेव नव्हे, रोखे गुंतवणूक करणारे फंड हे परताव्याची हमी असलेले उत्पन्न साधन नव्हे. रोखे गुंतवणुकदाराला बाजाराशी निगडित (व्याज दराशी) संबिंधत जोखीम, रोख्यांच्या गुणवत्तेशी निगडित (रेटिंग) जोखीम, फंडाने गुंतवणूक केलेल्या रोख्याच्या मुदतपूर्तीनंतर मुद्दल परत न मिळण्याची (डिफॉल्ट) जोखीम, एखाद्या विशिष्ट कंपनीचे रोखे विकले न जाण्याचा धोका, रोकडसुलभता आटण्याची (खरेदीदार न मिळणे जसे की येस बँकेचे रोखे खरेदी करावयास कोणी तयार नसणे) जोखीम, या जोखीमांशी रोखे गुंतवणूकदाराला सामना करावा लागतो.

रोखे गुंतवणुक करणाऱ्या म्युच्युअल फंडाची शिफारस करत असताना एखाद्या विशिष्ट कंपनीच्या रोख्यांच्या गुंतवणुकांचे ध्रुवीकरण किती आहे हेसुद्धा महत्त्वाचे. एका फंडाच्या शॉर्टटर्म डेट फंडात त्याच उद्योग समूहाने प्रवर्तित केलेल्या वीज निर्मिती, गैर बँकिंग वित्तीय कंपनी, आणि गृहवित्त पुरवठा कंपनीचे मिळून १५ टक्कय़ांहून अधिक गुंतवणूक होती. वर वर पाहता फंडाच्या गुंतवणुकीत वैविध्य दिसले तरी भिंगातून पाहिल्यास एकाच उद्योग समूहाच्या रोख्यांत ध्रुवीकरण झालेले दिसले. असे वेगवेगळे निकष लावून निवडलेल्या फंडाच्या या यादीचा मालमत्ता विभाजनासाठी वाचक उपयोग करतील अशी आशा वाटते. ज्यांनी गुंतवणुकीत रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांना मालमत्ता विभाजन तत्वानुसार योग्य स्थान दिले त्यांना त्याची प्रचीती येत असेल याबद्दल शंका बाळगण्यास वाव नाही. म्हणून रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंड पोर्टफोलिओत असायलाच हवीत.

shreeyachebaba@gmail.com

* म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर