23 November 2020

News Flash

कर बोध : प्राप्तिकर कायद्यातील वजावटी

करदात्यांना प्राप्तिकर कायद्यांतर्गत मिळणाऱ्या वजावटीचे आकर्षण असते

(संग्रहित छायाचित्र)

प्रवीण देशपांडे

करदात्यांना प्राप्तिकर कायद्यांतर्गत मिळणाऱ्या वजावटीचे आकर्षण असते. या वजावटीमुळे करदात्यांना कर वाचविण्यासाठी मदत होते. अशा वजावटी कोणाला घेता येतात आणि कोणत्या उत्पन्नातून घेता येतात याची माहिती करदात्याला असणे आवश्यक आहे. करदात्यांना अशा वजावटीची माहिती नसल्यास त्याला जास्त कर भरावा लागू शकतो किंवा चुकीची वजावट घेतल्यास आगामी काळात व्याज आणि दंड भरावा लागू शकतो. अशा वजावटींची या लेखातून थोडक्यात माहिती घेऊ या.

प्राप्तिकर कायद्यात काही अशा वजावटी आहेत त्या कोणताही खर्च किंवा गुंतवणूक केल्याशिवाय मिळतात तर काही वजावटी ठरावीक खर्च किंवा गुंतवणूक केल्यासच मिळतात.

वेतनाच्या उत्पन्नातून वजावटी :

१. ज्या करदात्यांना वेतन किंवा निवृत्तिवेतन मिळते त्याना ५०,००० रुपयांपर्यंतची प्रमाणित वजावट मिळते. ही वजावट घेण्यासाठी करदात्याला कोणताही खर्च करावा लागत नाही. पूर्वी नोकरदारांना मिळणारा प्रवास भत्ता आणि वैद्यकीय भत्ता यांची वजावट मिळत होती. वैद्यकीय भत्त्याची उत्पन्नातून सवलत घेण्यासाठी करादात्याला खर्चाच्या पावत्या सादर कराव्या लागत होत्या. या दोन्ही वजावटी रद्द करून दोन वर्षांपूर्वी सरसकट ४०,००० रुपयांची प्रमाणित वजावट वेतनधारक आणि निवृत्तिवेतनधारक यांना देण्यात आली, यासाठी करदात्याला कोणताही पुरावा सादर करावा लागत नाही. ही मर्यादा मागील वर्षांपासून ५०,००० रुपये इतकी करण्यात आलेली आहे. ही वजावट कुटुंब-पेन्शन उत्पन्न (फॅमिली पेन्शन) असणाऱ्यांसाठी मिळत नाही.

२. ज्या करदात्यांना करमणूक भत्ता मिळतो त्यांना ५,००० रुपयांपर्यंतची वजावट घेता येते. ही वजावट फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाच घेता येते.

३. महाराष्ट्रात महिला कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन १०,००० पेक्षा जास्त असेल किंवा पुरुष कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन ७,५०० पेक्षा जास्त असेल तर त्यांच्या वेतनातून वार्षिक २,५०० रुपये व्यवसाय कर कापून सरकारकडे जमा केला जातो. या कराची वजावट करदात्याला वेतनाच्या उत्पन्नातून घेता येते.

घरभाडय़ाच्या उत्पनातून वजावटी :

१. मालमत्ता कर : करदात्याने स्थानिक संस्थेकडे भरलेल्या मालमत्ता कराची वजावट घरभाडे उत्पन्नातून घेता येते. ही वजावट रक्कम प्रत्यक्ष भरली असेल तरच घेता येते. घरभाडे उत्पन्न शून्य असेल तर ही वजावट घेता येत नाही.

२. प्रमाणित वजावट : घरभाडे उत्पन्न किंवा एकूण वार्षिक मूल्य यामधून मालमत्ता कर वजा केल्यानंतर जी रक्कम उरते त्या रकमेच्या ३० टक्के इतकी प्रमाणित वजावट करदात्याला घेता येते. यासाठी कोणता खर्च केला असला पहिजे अशी अट नाही.

३. गृहकर्जावरील व्याज : मालमत्ता जर कर्जाद्वारे खरेदी केली असेल किंवा बांधली असेल तर त्या कर्जावरील व्याजाची वजावट घरभाडे उत्पन्नातून घेता येते. ही कर्जावरील व्याजाची वजावट घराचा ताबा घेतल्यानंतर किंवा घर बांधून झाल्यानंतरच मिळते. जर करदात्याकडे दोन घरे असतील आणि ती भाडय़ाने दिलेली नसतील (मागील वर्षांपर्यंत एक घर) तर त्यांचे घरभाडे उत्पन्न शून्य समजले जाते आणि त्या उत्पन्नातून गृहकर्जावर भरलेल्या व्याजाची पुढीलप्रमाणे वजावट मिळते. जर घर १ एप्रिल १९९९ नंतर खरेदी केले असेल किंवा गृहकर्ज घेतलेल्या वर्षांपासून तीन वर्षांत बांधले असेल तर व्याजाची २ लाख रुपयांपर्यंत वजावट मिळते. १ एप्रिल १९९९ पूर्वी खरेदी केले असेल किंवा घरदुरुस्तीच्या खर्चासाठी कर्ज घेतले असेल तर ही वजावट ३०,००० रुपयांपर्यंतच मिळते. जर घरभाडे उत्पन्न दाखविले असेल तर गृहकर्जाच्या व्याजाच्या वजावटीला २ लाख रुपयांची मर्यादा नाही. या व्याजामुळे झालेला घरभाडे उत्पन्नाचा ‘तोटा’ फक्त २,००,००० रुपये इतकाच इतर उत्पन्नातून वजा करता येईल. जो बाकी राहिलेला तोटा पुढील आठ वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येईल.

भांडवली नफ्याच्या उत्पन्नातून वजावटी :

भांडवली संपत्तीची विक्री किंवा हस्तांतरण केल्यानंतर होणारा नफा/तोटा हा ‘भांडवली नफा’ या उत्पन्नाच्या स्रोतात गणला जातो.

१. केवळ आणि पूर्णपणे भांडवली संपत्तीची विक्री किंवा हस्तांतरण करण्यासाठी केलेल्या खर्चाची वजावट भांडवली नफ्यातून घेता येते. या व्यतिरिक्त केलेल्या खर्चाची वजावट घेता येत नाही.

२. संपत्ती खरेदी करण्यासाठी आणि सुधारणेसाठी केलेल्या खर्चाची वजावट करदात्याला घेता येते. ही संपत्ती दीर्घ मुदतीसाठी धारण केली असेल तर या खर्चावर महागाई निर्देशांकाचा फायदासुद्धा घेता येतो. स्थावर मालमत्तेसाठी आणि शेअर बाजारात सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांसाठी किंवा खासगी कंपन्यांच्या शेअर्ससाठी धारण काळ २४ महिने आणि इतर संपत्ती ३६ महिन्यांसाठी धारण केलेली असल्यास ती संपत्ती दीर्घ मुदतीची असते. शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांसाठी हा कालावधी १२ महिन्यांचा आहे. संपत्ती खरेदी करण्यासाठी खर्च केलेला नसल्यास उदा. पागडी तत्त्वावरील जागा किंवा घर यासाठी कोणतीही किंमत दिलेली नसल्यास त्याची वजावट मिळत नाही.

३. एका घराची विक्री करून झालेला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा दुसऱ्या नवीन घरात गुंतवणूक करून कलम ५४ नुसार वाचविता येतो. यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. या कलमानुसार दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याएवढी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम नवीन घरात गुंतविल्यास करदात्याला अशा भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही. नवीन घरातील गुंतवणूक भांडवली नफ्यापेक्षा कमी असल्यास त्यामधील फरकाएवढी रक्कम करपात्र भांडवली नफा होतो. ही वजावट फक्त वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब करदाते यांनाच घेता येते.

४. करदात्याने शेतजमिनीची विक्री केल्यानंतर काही अटींची पूर्तता केल्यास ही रक्कम नवीन शेतजमिनीत गुंतविल्यास कलम ५४बी नुसार वजावट घेता येते. ही वजावट फक्त वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब करदाते यांनाच घेता येते.

५. घराव्यतिरिक्त संपत्तीची विक्री करून झालेला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा नवीन घरात गुंतवणूक करून कलम ५४एफ नुसार वाचविता येतो. यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. या कलमानुसार पूर्ण विक्री रक्कम (विक्री खर्च वजा जाता) किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम नवीन घरात गुंतविल्यास करदात्याला दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही. नवीन घरातील गुंतवणूक विक्री रकमेपेक्षा कमी असल्यास विक्री रक्कम (खर्च वजा जाता), भांडवली नफा आणि नवीन घरातील गुंतवणूक याच्या प्रमाणात वजावट मिळते. ही वजावट फक्त वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब करदाते यांनाच घेता येते.

६. जमीन, इमारत किंवा दोन्ही संपत्तीची विक्री करून झालेला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कलम ५४ईसी नुसार ठरावीक बाँडमध्ये गुंतविल्यास त्याची वजावट भांडवली नफ्यातून घेता येते. ही गुंतवणूक ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची करता येत नाही. ही गुंतवणूक संपत्ती विक्री केल्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत करावी लागते आणि हे बाँड किमान पाच वर्षांसाठी धारण करावे लागतात. हा कालावधी पूर्वी तीन वर्षे इतका होता. यावर मिळणारे व्याज करपात्र आहे. ही वजावट सर्व प्रकारच्या करदात्यांना घेता येते.

इतर उत्पन्नातून वजावटी :

१. कुटुंब निवृत्तिवेतन : कर्मचाऱ्याला मिळालेले निवृत्तिवेतन हे पगाराचे उत्पन्न म्हणून गणले जाते. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मिळालेले निवृत्तिवेतन हे ‘इतर उत्पन्न’ या स्रोतात गणले जाते. या उत्पन्नावर निवृत्तिवेतनाच्या १/३ इतकी रक्कम किंवा १५,००० रुपये, यापैकी जी कमी आहे अशा रकमेची वजावट म्हणून घेता येते.

२. ‘इतर उत्पन्न’ या स्रोतातील उत्पन्न मिळविण्यासाठी केलेल्या खर्चाची वजावट करदात्याला त्या उत्पन्नातून घेता येते. हा खर्च केवळ आणि पूर्णपणे हे उत्पन्न मिळविण्यासाठीच झाला असला पाहिजे.

काही परिचित वजावटी :

प्राप्तिकर कायदा प्रकरण (६अ) (म्हणजे कलम ८०क वगैरे) कलमानुसार मिळणाऱ्या वजावटी : प्रत्येक कलमामध्ये वजावट घेण्यासाठी वेगवेगळ्या अटी आहेत. जागेअभावी याची पूर्ण माहिती या लेखात देणे शक्य नाही आणि ती वेळोवेळी वाचकांना आगामी लेखातून दिली जाईल. काही महत्त्वाच्या वजावटीची माहिती खाली थोडक्यात दिली आहे.

१. कलम ८०सी, ८०सीसीसी, ८०सीसीडी (१) : या तिन्ही कलमानुसार करदात्याला दीड लाख रुपयांची वजावट मिळते. यामध्ये जीवन विमा, भविष्य निर्वाह निधी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, मुलांचे शैक्षणिक शुल्क, गृह कर्ज मुद्दल परतफेड, पेन्शन योजना वगैरेंचा समावेश आहे.

२. कलम ८०सीसीडी (१) : या कलमानुसार करदात्याने राष्ट्रीय पेन्शन योजनेत किंवा अटल पेन्शन योजनेत पैसे भरले असतील तर अतिरिक्त ५०,००० रुपयांपर्यंतची वजावट उत्पन्नातून घेता येते.

३. कलम ८०सीसीडी (२) : यामध्ये नोकरदारांच्या मालकाने कर्मचाऱ्याच्या पेन्शन खात्यात जमा केलेल्या रकमेची वजावट मिळते. ही वजावट पगाराच्या १० टक्के इतकी मिळू शकते. याला रकमेची वेगळी मर्यादा नाही.

४. कलम ८०डी : मेडिक्लेम (आरोग्य विमा), वैद्यकीय खर्च (ज्येष्ठ नागरिकांसाठी), प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी वगैरे खर्चाची वजावट करदाता या कलमानुसार घेऊ शकतो.

५. कलम ८०डीडी : दिव्यांग व्यक्तीसाठी केलेल्या वैद्यकीय खर्चाची वजावट या कलमानुसार फक्त निवासी भारतीय वैयक्तिक आणि एचयूएफ करदाते घेऊ शकतात.

६. कलम ८०डीडीबी : स्वत:च्या किंवा अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या ठरावीक आजारावर केलेल्या वैद्यकीय खर्चाची वजावट या कलमानुसार फक्त निवासी भारतीय वैयक्तिक आणि एचयूएफ करदाते घेऊ शकतात.

७. कलम ८०जी : करदात्याने विविध निधी, धर्मादाय संस्था, वगैरेंना दिलेल्या देणग्यांची वजावट या कलमानुसार करदात्याला घेता येते. ही वजावट सर्व प्रकारच्या करदात्यांना घेता येते.

८. कलम ८०टीटीए आणि ८०टीटीबी : ८०टीटीए या कलमानुसार करदात्याला मिळणाऱ्या बचत खात्याच्या व्याजावर १०,००० रुपयांपर्यंत (ज्येष्ठ नागरिक वगळून) वजावट मिळते आणि ८०टीटीबी या कलमानुसार ज्येष्ठ नागरिकांना बँक आणि पोस्ट ऑफिसच्या सर्व व्याजावर ५०,००० रुपयांपर्यंत वजावट मिळते.

* लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार

pravin3966@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 12:33 am

Web Title: article on deductions from income tax act abn 97
Next Stories
1 निफ्टी निर्देशांकाची स्थितप्रज्ञता
2 माझा पोर्टफोलियो : सद्य:कालीन फायद्याचे गुंतवणूक रसायन
3 क.. कमॉडिटीचा : ‘आधी विका, मग पिकवा’चे ऑप्शन
Just Now!
X