निलंगा शहरात राहणाऱ्या कुटुंबाने मुलाच्या शिक्षणासाठी जिल्ह्य़ातील लातूर हे विकसित होणारे शहर आहे म्हणून तेथे बस्तान हलविले. १९७९ साली या निर्णयाप्रत संपूर्ण कुटुंब नव्या ठिकाणी हलले. उपजीविकेसाठी गाठीशी असलेल्या पैशातून लातूर एमआयडीसीत एक एकर जागा घेतली. श्याम दाल मिल या नावाने दररोज २५ क्विंटल डाळ तयार करण्याचा कारखाना सुरू केला. गेल्या ४१ वर्षांत दाल मिलच्या पुढे ऑईल मिल, मका-पोहे व बेसन तयार करण्याचे विविध कारखाने सुरू झाले आहेत. महाराष्ट्राबरोबर दक्षिण भारतातील अनेक प्रांतात विक्रीचे जाळे उभारत बाजारपेठेत स्वत:ची पत निर्माण करत एक वेगळा दबदबा धूत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने निर्माण केला आहे.

निलंगा येथे दिवंगत श्रीरंग धूत, बजरंगलाल धूत, विष्णुदास धूत, जवाहरलाल धूत हे चार भाऊ  एकत्र राहात होते. तेथे आडत व्यवसाय होता. गाव छोटे आणि कुटुंब मात्र मोठे. त्यामुळे मोठय़ा शहरात व्यवसाय सुरू करण्याची गरज आणि मुलाच्या शिक्षणाची सोयही होईल, यासाठी धूत बंधूंनी लातूरची वाट धरली. तेथे श्रीरंग धूत यांनी लातूर एमआयडीसीत एक एकर जागा खरेदी केली. नव्याने व्यवसाय सुरू केला. एमएसएफसीच्या सहकार्याने श्याम दाल मिल या नावाने चार कामगारांच्या सोबत व्यवसायाचा प्रारंभ झाला.

त्यांच्या समवेत जवाहरलाल धूत लक्ष घालू लागले. श्रीरंग धूत यांचे निधन झाल्यानंतर त्यांनीच व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. शिक्षण केवळ दहावी, मात्र व्यवसायातील बारीकसारीक खाचखळग्यांचा त्यांचा अभ्यास दांडगा. व्यवसायात पुढे जायचे असेल तर बाजारपेठेत घेतलेले कर्ज ते खाजगी असो अथवा शासकीय ते फेडल्यानंतरच दुसरे कर्ज घ्यायचे हे सूत्र त्यांनी ठरविले. त्यांच्या समवेत भाऊ, पुतणे, नातू असा मोठा लवाजमा आज या व्यवसायात आहे. तब्बल ५० जणांचे एकत्रित धूत कुटुंब आणि त्यातील १५ जण व्यवसायात लक्ष घालत आहेत. यातील चौघे सनदी लेखापाल अर्थात सीए झालेले आहेत. एकाने तर आयआयएम – अहमदाबादमधून व्यवस्थापनात पदवीही मिळविली आहे.

श्याम दाल मिल १९७९ साली सुरू झाली आणि व्यवसायात जम बसवत १९९१ साली धूत अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या नावाने ऑईल मिल सुरू करण्यात आली. रोज दहा टनावर प्रक्रिया करण्याची या मिलची क्षमता होती. २० लाखाच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू झाला. याला लागणारा कच्चामाल सूर्यफूल या भागात तेव्हा उपलब्ध होता. गरजेनुसार जेथे माल उपलब्ध होईल तेथून तो खरेदी करणे सुरू केले. १९९५ साली कृष्णा अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या नावाने मकापोहे तयार करणारा कारखाना जुन्या एमआयडीसीतच सुरू करण्यात आला. १५ लाखाच्या गुंतवणुकीत दररोज ५० क्विंटल मक्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला हा कारखाना सुरू झाला. त्यानंतर २००० साली विजयालक्ष्मी इंडस्ट्रीज या नावाने चौथा कारखाना सुरू झाला. यात बाजारपेठेत उपलब्ध होणारी ज्वारी, गहू हे स्वच्छ करणारा हा कारखाना होता. दहा टन मालावर प्रक्रिया करण्याची क्षमता या कारखान्याची आहे. या कारखान्यासाठीही १५ लाखाचे स्वत:चे भागभांडवल लागले. मकापोहे याला चांगली बाजरापेठ मिळू लागली. लातूरव्यतिरिक्त गुलबर्गा, विजापूर, सोलापूर, नांदेड, आंध्र प्रदेश या भागात माल विकला जाऊ  लागला. ज्वारी व गहू स्वच्छ करून बाजारपेठेत विकले जात असल्याने त्या मालाचीही मागणी वाढू लागली. २००६ साली आदित्य इंडस्ट्रीज या नावाने दररोज २० टनावर प्रक्रिया करता येणारी दाल मिल सुरू झाली. त्यासाठी २५ लाख रुपये गुंतवण्यात आले.

जवाहरलाल धूत यांच्यासमवेत कीर्ती, श्याम, कृष्णा, भारत, राजगोपाल, सुनील अशी नवी टीम व्यवसायात दाखल झाली. प्रत्येक जण आपल्याला मिळालेले काम निष्ठेने, जोमाने, प्रामाणिकपणे करू लागले. त्यातून नवे करण्याची जिद्द निर्माण झाली. २००७ साली कृष्णा उद्योग ऑइल मिल सुरू झाली. २० टन क्षमतेचे मकापोहे तयार करणारा कृष्णा फूड्स हा कारखानाही सुरू झाला. सात एकर जागेत दीड कोटी रुपये गुंतवणुकीत हा कारखाना उभारला गेला. २०१४ साली पुन्हा तीन एकर जागेत कृष्णा फूड्स या नावाने अत्याधुनिक स्वयंचलित दाल मिल दीड कोटी रुपये गुंतवणुकीत सुरू झाली. कमी कामगारांवर हा कारखाना चालवला जाऊ लागला. दररोज २५ टन डाळीवर प्रक्रिया होऊ लागली.

मार्च २०२० मध्ये आदित्य अ‍ॅग्रोटेक या नावाने बेसन पीठ तयार करण्याचा नवा कारखाना सुरू करण्यात आला आहे. यासाठीही अडीच कोटीची गुंतवणूक करण्यात आली आहे. ३० टन क्षमतेचा हा कारखाना आहे. सर्व यंत्रसामग्री जर्मनीहून आणण्यात आली आहे. केवळ पाच लोक हा कारखाना चालवतात. औशाच्या एमआयडीसीत कृष्णा प्रोटिन्स नावाने एक वेअरहाऊसही उभारण्यात आले आहे. सध्या लातुरात सुमारे २० एकरवर या कंपन्या कार्यरत असून १०० कामगार यात काम करत आहेत.

बाजारपेठेत आपली पत निर्माण करण्यासाठी पडेल ती किंमत देण्याची तयारी ठेवली पाहिजे. उंच भरारी नक्की घेतली पाहिजे मात्र पाय जमिनीवर असले पाहिजेत याचे भान सर्वानी ठेवले पाहिजे. याचबरोबर व्यवसाय उभारणीसाठी घेतलेली कर्जाऊ  रक्कम परतफेड झाल्यानंतरच दुसऱ्या व्यवसायाला हात घालायचा, या सूत्रावर ७३ वर्षीय जवाहरलाल धूत आजही ठाम असून त्याला त्यांचे भाऊ, पुतणे, नातू सर्व जण उत्तम साथही देतात. एकत्र राहण्यातून कुटुंबाचा सर्वार्थाने विकास होतो. सोयीसाठी प्रोप्रायटरी फर्म केल्या असल्या तरी नफा-नुकसान हे सर्वाचे एकत्र असते. दररोज सर्वाच्या व्यवसायासंबंधी एकत्र बसून चर्चा केली जाते व त्यानुसार निर्णय घेतले जातात. पुणे, बेंगळूरु, चेन्नई अशा मोठय़ा शहरांत धूत यांच्या उत्पादनांची नाममुद्रा पोहोचली आहे.

तूर व हरभरा डाळीबरोबर आगामी काळात मूग व उडीद डाळही एक किलोच्या पॅकमध्ये बाजारपेठेत विकण्याचा धूत समूहाचा मानस आहे. भविष्यात बेसनाबरोबर रवा व मैदा तयार करून विक्री करण्याची कल्पना आहे. प्रक्रिया उद्योगाबरोबरच ट्रेडिंग व्यवसायातही धूत समूह गुंतलेला असून देशभर या क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत धूत यांच्या कंपन्यांनी आजपर्यंत उत्कृष्टतेची पारितोषिके मिळविली आहेत.

जवाहरलाल सांगतात, ‘‘तीन पिढय़ा एकत्र व्यवसायात गुंतलेल्या आहेत. रक्ताचे नाते असल्याने परस्पर विश्वासही आहेच. सर्वाच्या विचारांचा माग घेत, मान राखत निर्णय घेतले जातात. २० वर्षांचा तरुण नव्याने व्यवसायात दाखल झाला तरी त्याच्या मतालाही तेवढीच किंमत दिली जाते. गेल्या ४० वर्षांच्या व्यवसायातील अनुभवाचा पुढच्या पिढीला लाभ होतो. हा नव्या-जुन्यांचा मेळ वाटचाल योग्य दिशेने राहील याची खात्री देणारा ठरतो.’’

– प्रदीप नणंदकर

जवाहर धूत, कीर्ती धूत

धूत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, लातूर

* व्यवसाय : दाल मिल, तेलगिरणी, मकापोहे आणि बेसन उत्पादन

* कार्यान्वयन : १९७९ साली

* मूळ गुंतवणूक : २ लाख रुपये (स्व-भांडवल)

* सध्याची उलाढाल : वार्षिक २०० कोटी रुपये

* रोजगार : १०० कामगार-कर्मचारी थेट सेवेत

pradeepnanandkar@gmail.com

*  लेखक ‘लोकसत्ता’चे लातूर जिल्हा प्रतिनिधी

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस ई-मेल: arthmanas@expressindia.com वर करता येईल.