भालचंद्र यशवंत जोशी

करोना साथीच्या रोगाच्या जगभर पसरलेल्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत भारतीय शेअर बाजारामध्ये अस्थिरतेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) या योजनेमध्ये नियमितपणे म्युच्युअल फंड योजनेत ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक करु शकतो. म्युच्युअल फंडाच्या वेगवेगळ्या मत्तांमध्ये एसआयपीमधील गुंतवणुकीची जोखीम बदलते. एसआयपीमार्फत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे (इक्विटी, कर्ज आणि संतुलित म्युच्युअल फंडामध्ये) म्हणजेच त्यासंबंधी असलेली ही जोखीम बाजारपेठेमध्ये होणाऱ्या बदलांवर अवलंबून असते.

भांडवली बाजारामध्ये मोठी पडझड होते तेव्हा बरेच गुंतवणूकदार गोंधळून जाऊन त्यांची एसआयपी थांबवण्याचा आणि म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात. अनिश्चित पडझडीमुळे आर्थिक उत्पन्नांच्या पर्यायांमध्ये अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे गुंतवणूकदार एसआयपी थांबविण्याचा निर्णय घेतात. सध्याच्या बाजाराच्या बदलांमुळे न डगमगता एखाद्या गुंतवणुकीच्या योजनेत कायम राहण्याच्या दृष्टीने गुंतवणूकीसह आर्थिक उद्दीष्टे साध्य करण्यास एसआयपी मदत करते. अनिश्चिततेत आर्थिक सल्लागराच्या मदतीने गुंतवणुकीचा आढावा घेऊन योग्य ते मार्गदर्शन घ्यावे.

अनिश्चिततेत गोंधळून न जाता या परिस्थितीकडे एक गुंतवणूक संधी समजून यशस्वी गुंतवणूकदार या दरम्यान इतर खर्च कमी करून त्या निधीचा वापर दीर्घकालीन एसआयपीमध्ये गुंतवणुकीसाठी करू शकतात. पडझडीच्या काळात एनएव्ही कमी झाल्यामुळे ठराविक गुंतवणूकीतून अधिक युनिट्स विकत मिळतात. एसआयपी गुंतवणूक योजना रद्द करण्याऐवजी जास्त परतावा मिळण्याची संधीदेखील निर्माण होऊ  शकते. दीर्घकालीन कालावधीसाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्याने बाजारातील जोखीम आणि अस्थिरता कमी होते.

इक्विटी एमएफमधील गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळण्यासाठी एसआयपी कधीही थांबवू नये आणि शक्य असल्यास परतावा अधिक मिळण्यासाठी आणखी युनिट्स घेण्यासाठी काही अतिरिक्त गुंतवणूक एसआयपीमध्ये करावी. एसआयपीमधील गुंतवणुकीची जोखीम ही गुंतवणूकदाराच्या जोखीम पत्करायची क्षमता लक्षात घेऊन त्याप्रमाणे योग्य म्युच्युअल फंडांची निवड आर्थिक सल्लागराच्या मदतीने करू शकतात. सद्य स्थितीत एसआयपी सुरू ठेवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्यास एसआयपी बंद करण्यापेक्षा एसआयपीला तात्पुरता विराम देऊन (SIP PAUSE), किंवा एसआयपीमधील गुंतवणुकीत बदल (SIP MODIFICATION) करू शकता.

एसआयपीला तात्पुरता विराम देणे म्हणजे एसआयपीला कायमचे थांबविणे नव्हे. एसआयपीच्या तात्पुरत्या विरामाचा कालावधी संपल्यावर ती एसआयपी आपोआप सुरू होते. फंड हाऊसला सूचना देऊन या सुविधेचा लाभ घेता येतो. गुंतवणूकदारांना एसआयपीच्या हप्त्याची रक्कम कमी/जास्त किंवा एसआयपीच्या कालावधीत फेरबदल करण्याचा पर्याय दिला जातो. त्यामुळे आर्थिक उद्दीष्टे साध्य करण्यास हा पर्याय अतिशय उपयुक्त आहे. एसआयपीच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे. एसआयपीद्वारे केलेली गुंतवणूक आर्थिक उद्दीष्टे साध्य करण्यास मदतशीर ठरते. म्हणूनच सद्यस्थितीत दीर्घ कालावधीसाठी एसआयपी मार्गाने इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे.

(लेखक निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदार सेवा व परिचालन विभागाचे प्रमुख आहेत.)