वसंत कुलकर्णी

येत्या शुक्रवारी आमच्या गावात पुलंच्या जन्मशताब्दी वर्षांचा सांगता समारंभ होणार आहे. या समारंभाच्या सोहळ्यासाठी ‘पुलं’च्या व्यक्ती आणि वल्ली, गणगोत आणि गुण गाईन आवडी, या पुस्तकांतून ज्यांची शब्दचित्रे रेखाटली आहेत अशांच्या हयात वारसदारांना आमंत्रित करण्यात आले आहे. या समारंभाच्या पूर्वतयारीसाठी काल सकाळी ‘टिळक मंदिरा’त आयोजन समितीची बठक होती. अश्विनी या समितीची सदस्य आहे. ज्यांचे वर्णन बऱ्याच दिवसांनी ’गृ’संस्कार’ या सदरात, प्रेमळ, सात्विक, धर्मपरायण इत्यादी सूतकी शब्दांची माळ घालून आले त्या आमच्या हरीतात्यांचे नांव वर्तमानपत्रात आले. भूतकाळात जिवंतपणे वावरलेल्या आमच्या या वृद्ध बालमित्राचा ‘वर्तमान’काळाशी आलेला हा पहिला आणि शेवटचा संबंध! हरीतात्या नांवाचे कोणी होते असे पुराव्याने शाबित करण्यापलिकडे त्या गृ’संस्कारात दुसरे काही नव्हते! त्या हरितात्यांची अश्विनी ही नात. या नातीची आणि माझी काल सहजच गाठ पडली.

हरितात्यांच्या ईस्ट आफ्रिकेत व्यापारी कंपनीत असलेल्या मुलाची मुलगी. ही अश्विनी तिच्या आजोबांसारखी वर्तमानांत जगायला नाकबुल असलेली आणि पुराव्याने शाबित करण्याचा सोस असलेल्या या नातीने आजोबांचे हे गुण मात्र जसेच्या तसे उचले आहेत. अश्विनी माझ्या निम्म्या वयाची. मी पंचविशीत असतांना आमच्या मित्राला अश्विनीच्या रूपात कन्या रत्नाचा लाभ झाला. आणि मी पन्नाशीच्या उंबरठा ओलांडला आणि अश्विनी गुंतवणूक सल्लागाराच्या व्यवसायात आली. सध्या ती तिच्या नवऱ्याबरोबर पाल्र्यात स्वत:चे कार्यालय सांभाळते. माझ्या कुटुंबाला काही रक्कम एकरकमी गुंतवायची होती. अश्विनीच्या भेटीची वेळ निश्चित करून मी आणि माझे कुटुंब अश्विनीला भेटायला गेलो.

‘अश्विनी! काकूंची काही रक्कम म्युच्युअल फंडात टाकायची आहे. तू एखादा फंड सुचवशील काय?’

‘काका! फंड सुचविण्याआधी मी तुम्हाला फंडाची एक गंमत सांगते. प्रत्येक काळामध्ये मुलांमुलींची काही नांवे लोकप्रिय असतात. प्रसिद्ध वलयांकित व्यक्ती, देशभक्त खेळाडू यांची नांवे अनेक पालक आपल्या पाल्यांना ठेवतात. साधारण गेल्या शतकाच्या मध्यास जन्मलेल्या व्यक्तींची नांवे सुभाष, जवाहर तर शतकाने कूस बदलली त्या जन्मलेल्या मुलांची नांवे, सचिन, सौरभ, राहुल तर मुलींची नांवे करीना, करिष्मा अशी ठेवलेली आढळतात. कोणी कोणत्या गोष्टीपासून प्रेरणा घ्यावी हा ज्याच्या त्याच्या, ‘प्रेरणे’चा प्रश्न आहे. स्वीडनमध्ये राहणाऱ्या भारतीय जोडप्याने आपल्या नवजात मुलीचे नांव एका म्युच्युअल फंडाच्या नावावरून ठेवले आहे. विशाल आणि धनिष्ठा खापर्डे या वैदर्भीय जोडप्याने आपल्या मुलीचे नाव ‘मिरॅ’ ठेवले असून या कोरियन नावाचा अर्थ उज्ज्वल भविष्य असणारी असा होतो. विशाल आणि धनिष्ठा खापर्डे हे जोडपे मिरॅ अ‍ॅसेट लार्ज कॅप फंडाचे गुंतवणूकदार. या परताव्याने राखलेल्या सातत्याने या कुटुंबाने प्रेरित होऊन आपल्या मुलीचे नांव मिरॅ ठेवण्याचे त्यांनी ठरविले.’

‘मिरॅ अ‍ॅसेट लार्ज कॅप फंडाचे आधीचे नाव ‘मिरॅ अ‍ॅसेट इंडिया इक्विटी अपॉर्च्युनिटी फंड’ असे होते. मल्टिकॅप गटातील या फंडाचे ‘सेबी’च्या फंड प्रमाणीकरणानंतर नाव ‘मिरॅ अ‍ॅसेट इंडिया इक्विटी फंड’ असे झाले. सध्याचे या फंडाचे नाव ‘मिरॅ अ‍ॅसेट लार्जकॅप फंड’ असे आहे. हा फंड लार्ज कॅप फंड गटात कमी अस्थिरता असलेला फंड असून या फंडाला १२ वर्षांचा इतिहास आहे. या फंडाच्या सुरुवातीपासून फंडाने कोणत्याही तीन वर्षांच्या कालावधीत ‘निफ्टी ५०० टीआरआय’ या मानदंडापेक्षा अधिक परतावा दिला आहे. या फंडाचा तीन वर्षांचा सरासरी परतावा १८.१ टक्का असून याच कालावधीत ‘निफ्टी ५०० टीआरआय’ या मानदंडाने १२.४ टक्के परतावा दिला आहे. मानदंडाच्या तीन वर्षांच्या चलत सरासरीने किमान पाच वेळा तोटा नोंदविला असला तरी फंडाने एकदाही कोणत्याही तीन वर्षांत गुंतवणूकदाराला तोटा झालेला नाही. अगोदर मल्टिकॅप गटात असलेल्या या फंडाचे वर्गीकरण मागील १ मे पासून लार्जकॅपमध्ये करण्याचा फंड घराण्याने निर्णय घेतला. मध्यम जोखीम आणि तुलनेने स्थिर असलेला हा फंड अनेक जाणत्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचा भाग आहे.’

‘काका पुरावा आहे. मी उगाचच कोणाची स्तुती करत नाही.’

‘पण काका, मी तुम्हाला ज्या फंडाची शिफारस करणार आहे तो फंड याच फंड घराण्याचा फोकस्ड फंडाची शिफारस करणारा आहे. मिरॅ अ‍ॅसेट फोकस्ड फंड हा मिरॅ अ‍ॅसेट लार्जकॅप फंडाचा गणितात असतो तसा उपसंच (सब सेट) आहे. म्हणजे मिरॅ अ‍ॅसेट लार्जकॅप फंडाच्या गुंतवणुकीच्या परिघात जे समभाग असतील त्यापैकी सर्वोत्तम ३० समभाग हे फोकस्ड फंडाच्या गुंतवणुकीत निवडले जातात. या फंडाची प्राथमिक विक्री (एनएफओ) २३ एप्रिल ते ७ मे दरम्यान झाली. लोकसभेची निवडणूक होण्याआधीच्या अस्थिर वातावरणात या फंडाने प्राथमिक विक्रीत ७५२ कोटी रुपयांचे संकलन केले. गुंतवणूकदारांच्या विश्वासाला पात्र असल्याशिवाय हे घडले नसते. एखाद्या ‘एनएफओ’मध्ये इतकी रक्कम जमा होणे ही निश्चितच दखल घेण्याजोगी गोष्ट आहे. या फंडाचा ‘निफ्टी २०० टीआरआय’ हा मानदंड आहे. तसे पहिले तर या फंडाला जेमतेम सहा महिन्यांचा इतिहास सुद्धा नाही. तरी मी तुम्हाला या फंडाची शिफारस करीत आहे.’

‘जेमतेम सहा महिन्यांचा इतिहास असलेल्या फंडाची मी शिफारस करण्यामागे काही करणे आहेत नवीन फंडात गुंतवणूक करताना एखाद्याने फंड घराण्याचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ नेहमीच तपासला पाहिजे. कारण नव्या फंडाला स्वतचा कोणताही इतिहास नसतो. या संदर्भात, मिरॅ फंड घराण्याचे संख्यात्मक आणि गुणात्मक विश्लेषण केल्यास या फंड कुळाचे तीनही फंड जसे की, मिरॅ अ‍ॅसेट लार्जकॅप फंड, मिरॅ अ‍ॅसेट इमìजग ब्लूचिप आणि मिरॅ अ‍ॅसेट टॅक्स सेव्हर यांची कारकीर्द प्रशंसनीय आहे. या फंडांनी दीर्घकाळ आणि सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. काका, तुम्ही तर ‘लोकसत्ता अर्थ वृत्तांत’चे वाचक आहात आणि ‘अर्थ वृत्तांत’ने नेहमीच मिरॅ अ‍ॅसेट लार्जकॅप फंड, मिरॅ अ‍ॅसेट इमìजग ब्लूचिप या फंडाची शिफारस केली आहे. पण माझ्या सांगण्यावरून तुम्हाला मिरॅ अ‍ॅसेट फोकस्ड फंडात गुंतवणूक करण्याची इच्छा झाली तरी अशा प्रकारच्या फंडातील गुंतवणुकीतील जोखीम समजावून घ्यायला हवी. फोकस्ड फंडामध्ये कमाल ३० समभागांत गुंतवणूक करता येते.

यामुळे समभागकेंद्रित असल्याने या फंडात अस्थिरता अधिक असते आणि नफादेखील अधिक असतो. हा फंड जोखीमप्रिय गुंतवणूकदारांसाठी अधिक उपयुक्त आहे. या फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी त्यांच्या जोखीमांकाचे पुन्हा एकदा विश्लेषण करून त्यांचे स्वत:ची सहनशीलता तपासून घेतील तरच या फंडाचे अधिक फायदे मिळतील. साधारणत: गुंतवणूकदारांनी नवखे फंड टाळावेत असा प्रघात आहे. विशेषत: जेव्हा अन्य उपलब्ध फंड समाधानकारक परतावा देत असतांना नवख्या फंडात गुंतवणूक करण्याचे साहस टाळलेले बरे. परंतु या फंड कुळाची वंशावळ या फंडाची निवड करण्याचे संकेत देत आहेत. अल्पावधीत या फंडाच्या मालमत्तेने १,३०० कोटींचा टप्पा पार केला आहे.’

‘पुराव्याशिवाय मी तुम्हाला नवख्या फंडाची शिफारस करणार नाही,’ असे अश्विनी म्हणाली. कालच मला माझ्या ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागाराचा मेसेज आला. नवीन फंड टाळणाऱ्या हा साठीच्या उंबरठय़ावरील हा सल्लागार. त्याच्या व्यवसायाला ३० वर्षे पूर्ण झाल्याचे सांगणारा हा मेसेज होता. विमा विक्रेता म्हणून कारकिर्दीला सुरवात करणारा हा सल्लागार मागील ३० वर्षांत ‘स्टार रेटिंग’ आणि मागील परतावा या पारंपारिक निकषांवर फंड निवड करत आला आहे. ‘एनएफओ’ करू नका असा दुराग्रह धरणाऱ्या या  गुंतवणूक सल्लागाराला वयोमानानुसार शरीराप्रमाणे बुद्धीला सुद्धा बाक आल्याचे मला जाणवले. त्या उलट इतिहास तपासायची सोय नसलेल्या फंडाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगणाऱ्या अश्विनीचे भविष्य मात्र  माझ्या जुन्या गुंतवणूक सल्लागारापेक्षा नक्कीच उज्ज्वल असल्याची मनाने नोंद केली.

shreeyachebaba @gmail.com