प्रकर्ष गगदानी

करोना विषाणूने जगभर सर्वत्र हाहा:कार माजवलेला असल्याने जगातील ठिकठिकाणचे बाजार जणू पत्त्यासारखे कोसळत आहेत. काही आठवडय़ांपूर्वी पडझडीला सुरुवात झाली असून, जागतिक आरोग्य संघटनेने करोनाला जागतिक साथ असे जाहीर केल्याने सर्वत्र चिंता निर्माण झाली आहे आणि लक्षणीय प्रमाणात विक्रीला उत्तेजन मिळाले आहे.

बाजारात इतक्या तुफान स्वरूपाची विक्री २००८ सालातील जागतिक आर्थिक संकटाच्या दरम्यान झाली होती. सध्या सुरू असलेली विक्री ही अनिश्चित स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे होत आहे. विशिष्ट घटनांमुळे बाजारात मंदी आहे, हे गुंतवणूकदारांनी समजून घ्यायला हवे. आर्थिक साधने आणि आर्थिक संकेत यांचे विश्लेषण करता येऊ शकते. इतक्या भव्य स्वरूपाचे आरोग्याचे संकट मात्र आपणा सर्वासाठीच अनोळखी आहे. भारतासह जगभरातील निरनिराळ्या देशांच्या सरकारांनी सध्याच्या परिस्थितीत दिलासा देण्यासाठी मदत जाहीर केली आहे व यामुळे बाजाराला सावरण्यासाठी आधार मिळू शकतो. परंतु, करोना विषाणूचे संकट दररोज वाढत असल्याची वृत्त येत असल्याने बाजार कशा प्रकारे सावरू शकतील, याचा अंदाज घेणे अत्यंत अवघड आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाचा परिणाम कमी होण्यासाठी कदाचित काही आठवडे किंवा काही महिने लागू शकतात. तोपर्यंत गुंतवणूकदारांना त्यांच्या सध्याच्या गुंतवणुकीबद्दल व भविष्यातील गुंतवणूक नियोजनाबद्दल अनेक प्रश्न पडलेले असू शकतात.

अलीकडच्या काळामध्ये, बहुतेक गुंतवणूकदार आणि अगदी सरावलेल्या गुंतवणूकदारांनाही त्यांनी गुंतवलेल्या रकमेत घट किंवा नुकसान सोसावे लागलेले असू शकते. अशा समयी त्यांनी शांत राहावे आणि गुंतवणुकीबद्दल कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तार्किकपणे विचार करावा, असाच सल्ला द्यावासा वाटतो.

या दृष्टीने पहिला दृष्टिकोन म्हणजे, पोर्टफोलिओचा आढावा घ्यावा आणि गरजेनुसार पोर्टफोलिओ संतुलित करण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावेत. गुंतवणूकदारांनी रोखेसंलग्न मालमत्ता आणि सोन्याशी निगडित असणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा विचार करावा. कारण हे दोन्ही पर्याय तुलनेने सुरक्षित आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये, छोटय़ा गुंतवणूकदारांनी समभाग गुंतवणूक ५५ टक्क्य़ांपर्यंत मर्यादित ठेवावी, तसेच रोख्यांमध्ये ३५-४० टक्के गुंतवणूक करावी आणि उर्वरित सुमारे ५ ते १० टक्क्य़ांपर्यंत गुंतवणूक सोन्यामध्ये करावी. रिटेल गुंतवणूकदांनी पुरेसे संशोधन केल्याशिवाय थेट समभागांत गुंतवणूक करणे टाळावे, तसेच त्यांच्या गुंतवणुकीवर होणारा तेजी-मंदीचा परिणाम टाळण्यासाठी सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी) या पर्यायाचा विचार करावा.

काही गुंतवणूकदारांच्या मते, व्यवसायाची क्षमता व उत्तम व्यवस्थापन विचारात घेता, अनेक चांगल्या कंपन्यांचे समभाग किफायतशीर दरामध्ये उपलब्ध आहेत. असे असले तरीही नियमितपणे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी आणि समभागाच्या किमती यापुढे आणखी घसरतील, याची वाट पाहणे टाळावे. तर प्रत्येक पडझडीत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. जगभरातून येणाऱ्या वृत्तांमुळे आणखी किती प्रमाणात विक्री केली जाणार आहे, हे आपल्याला अद्याप माहीत नाही.

प्राण कंठाशी आणणारे चढ-उतार होत असले तरी एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे थांबविली जाऊ नये. एखाद्या गुंतवणूकदाराने आणखी काही दिवस वाट पाहिली आणि सध्या सुरू असलेली परिस्थिती निवळली तर आकर्षक संधी गमावल्यासारखे ते ठरेल.

बहुतांश निधी व्यवस्थापकांची पसंती ग्राहकोपयोगी उत्पादनांतील एफएमसीजी कंपन्यांना असू शकते. तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये, गुंतवणूकदारांना भांडवली बाजाराच्या कलाचा अंदाज येऊ शकतो. परंतु, गुंतवणूकदारांनी न डगमगता ‘एसआयपी’मधील गुंतवणूक कायम ठेवावी, कारण भाव घसरलेले असताना त्यांना म्युच्युअल फंडांची अधिक युनिट्स मिळू शकतील आणि बाजारात तेजी परतेल तेव्हा त्यांना फायदा होईल. नव्याने हाती आलेल्या माहितीनुसार, बाजारात तेजी व मंदीच्या लाटा येत असल्या तरीही रिटेल गुंतवणूकदारांनी अद्याप एसआयपीमधील गुंतवणूक कमी केलेली नाही. दीर्घ कालावधीमध्ये, संपत्ती संचयित करण्याच्या दृष्टीने ‘एसआयपी’ हाच उत्तम पर्याय ठरणार आहे.

(लेखक ५ पैसा डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी)