एक गंमतीशीर अनुभव असा की, कोणताही काळ घ्या बाजारावर प्रतिकूल घडामोडींचा पगडा कायमच राहत आल्याचे दिसले आहे. त्यामुळे आजही विद्यमान व नजीकच्या भविष्यात होऊ घातलेल्या घटना बाजाराच्या दृष्टीने फारशा चांगल्या नाहीत, असाच निष्कर्ष पुढे येईल. पण त्याकडे अलिप्तता राखून गुंतवणूकदारांना पाहिल्यास, हाच काळ बाजारात दीर्घावधीतील गुंतवणुकीसाठी सर्वाधिक लाभदायी काळही ठरत आल्याचे दिसून येईल.

विद्यमान स्थितीत बाजाराला खूप साऱ्या अनिश्चित गोष्टींचा वेढा पडलेला दिसतो. बाहय़ जगतात कधी अमेरिका तर कधी चीनमधील अर्थस्थितीतून बाजारातील वातावरण नरम-गरम होते. देशांतर्गत कंपन्यांचे तिमाही निकाल आणि महत्त्वाच्या अर्थसुधारणांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह या घडामोडी बाजाराचा मूडपालट करीत असतात. अल्पावधीत वेगवेगळ्या घटनाक्रमांचे असे पडसाद उमटून बाजार वर-खाली होणे अपरिहार्यच आहे. तथापि एक सामान्य गुंतवणूकदार मात्र यातून कावराबावरा होतो आणि वादळी वध-घटीने भयभीत होऊन बाजारापासून दूर पळतो.

छोटय़ा व्यक्तिगत गुंतवणूकदाराचे बाजाराकडील वळण हे बव्हंशी बाजाराच्या एकमार्गी म्हणजे वरच्या दिशेने वाटचाल सुरू असते त्या समयीच होत असते. बाजारातील तेजीचे वातावरण त्याला भावते आणि आकर्षित करते. परताव्याचे दमदार आकडे पाहून गुंतवणूकदारांच्या तोंडाला पाणी सुटते आणि अशा समयीच त्याच्या गुंतवणुकीची मात्राही उंचावलेली दिसते.

पण बाजार असा उंचीवर पोहोचला असताना गुंतवणुकीचा निर्णय हा बऱ्याचदा चुकीचा ठरतो आणि अनेक गुंतवणूकदारांनी त्यापायी नुकसान ओढवून घेतल्याचाही अनुभव आहे. खरे तर बाजाराला प्रभावित करणाऱ्या दैनंदिन बातम्या-घडामोडी आणि लांब पल्ल्याचे नियोजन करून गुंतवणूक करू इच्छिणारांचे काही घेणे-देणे असूच नये. त्यामुळे या बातम्यांच्या परिणामी बाजारात उमटणाऱ्या वध-घटीच्या पडसादांनी अर्थातच त्यांच्या हृदयाची ठोके वाढण्याचेही काही कारण नाही.

एक गंमतीशीर अनुभव असा की, कोणताही काळ घ्या बाजारावर प्रतिकूल घडामोडींचा पगडा कायमच राहत आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आजही विद्यमान व नजीकच्या भविष्यात होऊ घातलेल्या घटना बाजाराच्या दृष्टीने फारशा चांगल्या नाहीत, असाच निष्कर्ष पुढे येईल. पण त्यापासून अलिप्तता राखून गुंतवणूकदारांना याकडे पाहिल्यास, हाच काळ बाजारात दीर्घावधीसाठी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक फलदायी काळही ठरत असतो.

काही मूलभूत अंगांनी बाजाराचा वेध घेतल्यास दिसून येते की, सेन्सेक्सचे वर्तमान किंमत/उत्पन्न गुणोत्तर (पी/ई) हे दीर्घावधीतील बाजार मूल्यांकनाच्या आसपास आहे. म्हणजे बाजाराला खरेदीयोग्य मूल्यांकनाची स्थिती आली आहे. पूर्वानुभव असा आहे की, अशा पी/ई गुणोत्तराच्या वेळी बाजारातील गुंतवणूक नेहमीच फलदायी ठरत आली आहे. तीन ते पाच वर्षांत सरस परतावा देणारी ती गुंतवणूक ठरते.

शिवाय, कंपन्यांची नफाक्षम कामगिरी उंचावली तर बाजाराचा पी/ई म्हणजे आपल्या गुंतवणुकीवरील परतावा वाढणे क्रमप्राप्तच ठरेल. मग कंपन्यांच्या नफाक्षमतेला अनुरूप बळ देणारे घटक कोणते ते पाहू.

१. चलनवाढीचा दर आटोक्यात आल्याचे व नजीकच्या काळात तो पूर्वीसारखा नियंत्रणाबाहेर जाणार नाही या शक्यतेचा कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीवर सुपरिणाम निश्चित दिसेल. ताबडतोबीने नाही तरी पुढील सहा महिने, वर्षभरात चित्र लक्षणीय पालटलेले दिसेल.

२. जागतिक स्तरावर अनेक महत्त्वाच्या जिनसांचे दर ओसरले आहेत, याचा थेट फायदा कंपन्यांना कच्चा मालासाठी होणाऱ्या खर्चात कपात करणारा ठरेल. यातून कंपन्यांचे नफ्याचे मार्जिन वाढेल, प्रत्यक्ष नफाही वाढेल.

३. स्थावर मालमत्ता क्षेत्रात मंदीचा मुक्काम अपरिहार्य दिसत आहे. जागेच्या किंमती घसरणे याचा कंपन्यांना व तिच्या कर्मचाऱ्यांना थेट लाभ मिळेल. भाडय़ाच्या दरातील घसरणीचा दिलासा सुखकारकच ठरेल.

४. सध्या अर्थव्यवस्थेतील उभारीची कासवगती पाहता, कर्मचारी, पगारदारांना वेतनमानात मोठय़ा फेरबदलाची फारशा अपेक्षा नाहीत. त्यामुळे वेतनमानावरील कंपन्यांच्या खर्चातही नजीकच्या काळात मोठी वाढ संभवत नाही.

५. सध्या मागणीच्या अभावी कंपन्यांचे पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू असल्याचे अभावानेच दिसते. अनेक ठिकाणी क्षमतेचा ६० ते ८० टक्केच वापर करून उत्पादन सुरू आहे. आधीच्या तुलनेत त्यात सुधार दिसत असला, तरी पुढील सहा महिन्यांत कमालतम क्षमतेने उत्पादन सुरू होण्याची चिन्हे जरूर दिसत आहेत.

सध्याचा बाजाराचा तसेच अर्थव्यवस्थेसाठी न टाळता येणारा व खडतर असा संक्रमण काळ सुरू आहे. ही अवस्था लवकरच संपेल, किंबहुना तिने तिचे शेवटचे टोक गाठल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विद्यमान सर्व आकडे आणि संकेत हेच सूचित करतात की, यापुढे कंपन्यांच्या कामगिरीत सुधारणेचाच  संभव आहे. हीच बाजारालाही कलाटणी देणारी बाब ठरेल. जर कंपन्यांची उत्पादन क्षमता, नफ्याचे मार्जिन आणि विक्रीचे प्रमाण यात एक टक्क्य़ाने जरी वाढ झाली तरी त्या परिणामी त्यांचा नक्त नफा ३ ते ५ टक्क्य़ांनी वाढतो, असे आढळून आले आहे.

त्यामुळे सर्वागाने विचार केल्यास, बाजारातील हा नरमाईचा काळ गुंतवणुकीसाठी सर्वश्रेष्ठ काळ ठरावा. म्हणूनच तेजीची नव्हे तर मोठय़ा पडझडीची प्रतीक्षा गुंतवणूकदारांनी करावी. ती चालून आलेली सुवर्णसंधी समजावी आणि गुंतवणुकीसाठी चांगले समभाग हेरण्याचा मौका साधला जावा.

– विजय मंत्री
(लेखक हे निर्मल बंग सिक्युरिटीज या गुंतवणूक पेढीचे सल्लागार आहेत)
‘अर्थ वृत्तान्त’संबंधी अभिप्राय/प्रतिक्रिया कळवा:arthmanas@expressindia.com