14 August 2020

News Flash

थेंबे थेंबे तळे साचे : आर्थिक नियोजन उद्योगांसाठी

संपूर्ण कुटुंब एकाच व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांनी दूरदृष्टीने आर्थिक नियोजन करणे म्हणूनच अतीव महत्त्वाचे..

संग्रहित छायाचित्र

तृप्ती राणे

सध्यासारखी विपरीत परिस्थिती अनेक प्रस्थापित बडय़ा उद्योगांचीही परीक्षा घेणारी. तर आधी नोकरी करत होते आणि नुकतेच कुठे स्वत:च्या व्यवसायात स्थिरावू पाहणाऱ्यांची गत तर विचारूच नका..  संपूर्ण कुटुंब एकाच व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांनी दूरदृष्टीने आर्थिक नियोजन करणे म्हणूनच अतीव महत्त्वाचे..

काही वर्षांपूर्वी एक गृहस्थ माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आले होते. आधी नोकरी करत होते, परंतु नंतर स्वत:चा व्यवसाय सुरू केला आणि त्यात बऱ्यापैकी यश मिळवलं. स्थैर्य येईस्तोवर साधारणपणे वयाची चाळिशी उलटली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की, आपण फक्त व्यवसायाकडेच लक्ष दिलं आणि वैयक्तिक आर्थिक परिस्थितीचा विचार नाही केला. लागेल तसे पैसे व्यवसायात घातले आणि घरी जेव्हा लागतील, जसे लागतील तसे काढले. इतर कुठेही गुंतवणूक केली नाही. कधी हेही तपासलं नाही की, आपल्याला पुढे काय लागणार, त्यासाठी काय करायला हवं, मुलीचं शिक्षण व लग्न, स्वत:साठी निवृत्तिपश्चात आर्थिक सोय, अडीनडीसाठी लागणारा पैसा, हौस-मौज वगैरे वगैरे. शिवाय, उद्योगावर पूर्णपणे नियंत्रण त्यांचंच असल्याने, सगळं त्यांनाच बघावं लागत होतं. आयुष्यात पुढे जर विपरीत परिस्थिती आली तर त्यांच्याकडे कोणताच प्लॅन बी नव्हता. हा विचार जेव्हा त्यांच्या मनात आला तेव्हा ते अतिशय अस्वस्थ झाले आणि मग त्यांनी स्वत:चं आर्थिक नियोजन करायचं ठरवलं. असे अनेक व्यावसायिक आज आपल्याकडे आहेत ज्यांचं संपूर्ण कुटुंब एकाच व्यवसायावर अवलंबून आहेत आणि सद्य प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात आहेत. म्हणून आजचा लेख खास अशा उद्योगकर्मीसाठी.

उद्योग आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळायची म्हणजे तारेवरची कसरत. कुठल्याही एका बाजूला जास्त झुकलं तर दुसरी बाजू लुळी पडेल. म्हणून अशा व्यावसायिकांनी आर्थिक नियोजन करताना उद्योग आणि कुटुंबाच्या गरजांना वेगवेगळं करून दोन आर्थिक आराखडे मांडायचे आहेत. असे आराखडे तयार करताना खालील टिप्स नक्कीच उपयोगी पडतील.

आर्थिक आराखडा आणि त्याच्या पायऱ्या

१ व्यवसाय आणि वैयक्तिक आर्थिक ध्येयं वेगळी ठेवायला हवीत. जेवढा व्यवसाय वाढवणं गरजेचं आहे, तेवढंच गरजेचं आहे तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवणं. जर कुटुंबासाठी हवे तेव्हा आणि लागतील तेवढे पैसे नाही पुरवता आले तर त्या व्यवसायातून नक्की काय साध्य होणार, हे नेहमीच लक्षात असू द्यावे.

२ प्रत्येक वेळी गरज लागली की आपण घरचे पैसे उचलतो आणि उद्योगामध्ये घालतो; परंतु असे करताना कुठे तरी आपली वैयक्तिक आर्थिक परिस्थिती कमकुवत होतेय का- याबाबत जागरूक राहाणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणायला जरी सोपं वाटलं तरी पाळायला हे फार कठीण आहे. कारण उद्योगामध्ये बुडालेल्यांना दुसरं काही दिसत नसतं. शिवाय एक अजून गोष्ट इथे लक्षात घेणं आहे की, उद्योग हासुद्धा स्वत:च्या पायांवर उभा राहिला पाहिजे. त्याला जर सतत घरातले पैसे लागत असतील, तर काही तरी नक्की चुकतंय आणि ती चूक लवकर सुधारली पाहिजे.

३ उद्योगातून मिळणारा परतावा यावर नेहमीच लक्ष ठेवणं गरजेचं आहे. काही उद्योग भरपूर उलाढाल करतात, परंतु प्रत्यक्ष फायदा मात्र छोटा असतो, तर काही ठिकाणी उलाढाल कमी, पण फायदा जास्त असतो. काही उद्योग सदाबहार असतात तर काहींमध्ये सतत बदल करावे लागतात. काही मोसमी असतात, तर काही बारमाही. काहींना भरपूर भांडवल लागतं, तर काहींना कमी. तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करून कधी, किती आणि कसे परतावे सुरक्षित करता येतील यावर नक्की विचार केला पाहिजे. जर उद्योगातील परतावे कमी व्हायला लागले तर लवकरच नुकसान व्हायला लागेल आणि असं झाल्यास त्याचा परिणाम कुटुंबाच्या आर्थिक नियोजनावरसुद्धा होईल.

४ कुठलाही उद्योग फक्त चांगला नफा कमावतो म्हणून यशस्वी आहे, असं म्हणता येत नाही. त्या नफ्यामुळे जर वैयक्तिक परिस्थिती सुधारली आणि बँक बॅलन्स वाढला तरच एवढे खटाटोप केल्याचं चीज झालं असं म्हणता येईल. नाही तर फायदा तर दिसतोय, पण हाताळायला पैसा नाही! असे उद्योग सतत कर्जाच्या डोंगराखाली राहतात किंवा घरच्यासाठी काही नीट देत नाही.

५ स्वत:चं निवृत्ती नियोजन करताना आपल्या व्यवसायाचं स्वरूप ध्यानात असणं महत्त्वाचं आहे. काही व्यवसाय वयाच्या मर्यादा पाळत नाही, परंतु काही वेळा एखाद्या विशिष्ट वयानंतर व्यवसाय करणं झेपत नाही. म्हणून जशी नोकरीच्या ठिकाणी वयोमर्यादा असते, तसंच निवृत्तीचं टार्गेट ठेवायला हरकत नाही.

६ एका ठरावीक कालावधीनंतर व्यवसाय आणि वैयक्तिक व्यवहार पूर्णपणे वेगळे करून घ्यायला हवे. जसा नोकरीतून पगार  मिळतो आणि त्यातून घरच्या गरजा भागवल्या जातात, त्याचप्रमाणे व्यवसायातूनसुद्धा नियमित पैसे बाजूला काढून वैयक्तिक गुंतवणूक झाली पाहिजे.

७ एकाच प्रकारच्या व्यवसायावरची मदार कमी कशी होईल यावर वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे. म्हणून वैयक्तिक आर्थिक नियोजन तर व्हायलाच हवं, पण त्याही पुढे, इतर उद्योग पर्यायसुद्धा लक्षात घेता आले तर त्याचा फायदा नक्की होईल.

८ व्यवसायाची देणी ही शक्यतो वैयक्तिक पैशातून देण्याची वेळ येऊ नये. अर्थात अडीनडीसाठी असं करणं ठीक आहे, परंतु हे जर वारंवार होत असेल तर पुन्हा एकदा व्यवसायाकडे टीकाकाराच्या दृष्टीने बघणं अत्यंत गरजेचं आहे.

९ कुठलाही व्यवसाय म्हटलं की जोखीम ही आलीच; परंतु या जोखमीचा तुमच्या संपूर्ण आर्थिक स्थितीवर काय आणि किती परिणाम होणार याची तरतूद आर्थिक नियोजनातून करता येऊ शकते.

१० आपल्यानंतर आपला व्यवसाय पुढे कसा जाणार, कोण नेणार, कुटुंबावर त्याची काय जबाबदारी पडेल, या सर्व प्रश्नांची यादी करून त्यावर सखोल विचार करून तोडगा शोधायला हवा. कारण वेळ सांगून येत नाही. असं व्हायला नको की, तुम्ही मेहनतीने उभा केलेला व्यवसाय तुमच्या पश्चात कुटुंबासाठी डोकेदुखी ठरेल.

११ जसं वैयक्तिक आर्थिक नियोजनामध्ये वारसा हक्क नियोजन करणं महत्त्वाचं आहे तसंच ते उद्योगाच्या बाबतीतही महत्त्वाचं आहे. तेव्हा योग्य सल्ला घेऊन याबाबतचे निर्णय वेळेवर घ्या.

१२ नोकरीमधून नियमित मिळकत वगळता इतर फायदेही असतात- निर्वाह निधी, आयुर्विमा, आरोग्य विमा, राहण्याची सोय, इमर्जन्सी कर्ज इत्यादी. परंतु व्यावसायिकांना हे मिळत नाही; परंतु या सर्वाची सोय त्यांनाच करावी लागते. तेव्हा एक लाखाचा पगार आणि एक लाखाचा फायदा तुलनात्मक नाही हे ध्यानात ठेवा.

१३ व्यवसाय ही २४ तासांची आणि ३६५ दिवसांची नोकरी आहे आणि म्हणून त्यातून फायदा हा नोकरीपेक्षा जास्त झालाच पाहिजे. वेळोवेळी आपला व्यवसाय हवा तेवढा फायदा देतोय की नाही हे तपासा आणि योग्य वेळी बदल करा. नोकरी असो की व्यवसाय, आर्थिक नियोजन हे आलंच. तेव्हा वेळीच योग्य दिशेने पाऊल उचला आणि आपल्या आयुष्यामध्ये दोन्ही बाजूने भरभराटीचा अनुभव घ्या.

* लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.

trupti_vrane@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 1:00 am

Web Title: article on financial planning industries abn 97
Next Stories
1 बंदा रुपया : यशाचे ‘घरकुल’!
2 माझा पोर्टफोलियो : माफक १५ टक्क्य़ांचा परतावाही सध्या समाधानकारकच!
3 नावात काय : कॅपिटल फ्लाइट
Just Now!
X