03 August 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : ‘दिल है के मानता नहीं’

गेल्या महिन्याभरापासून बरोबर शुक्रवारी मंदी अवतरते, सर्व जण मंदीत येतात, इथेच गुगली पडते

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

सकल राष्ट्रीय उत्पादनाची (जीडीपी)ची मनाला अस्वस्थ, उदास करणारी ४.५ टक्क्यांची आकडेवारी, तर त्याच्या उलट महागाईचे चढे दर, हे लक्षात घेता रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यातून चालू वर्षांत प्रथमच कर्जावरील व्याजदराबाबत हात आखडता घेतला गेला. सर्व निराशाजनक गोष्टी समजत-उमजत असतानादेखील, त्या मनावर न घेता, त्याकडे साफ दुर्लक्ष करून, त्या निराशाजनक बातम्यांबाबत बाजाराचे वर्तन हे ‘दिल है के मानता नहीं’ अशा स्वरूपाचे आहे आणि बाजारात धुवाधार तेजी चालू आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स – ४०,४४५.१५ / निफ्टी : ११,९२१.५०

गेल्या महिन्याभरापासून बरोबर शुक्रवारी मंदी अवतरते, सर्व जण मंदीत येतात, इथेच गुगली पडते. पुन्हा पुढल्या आठवडय़ात मंदीचा मागमूसही नाही असे हे निर्देशांकाच वर्तन, सर्व गुंतवणूकदारांना संभ्रमात पाडते. याचा आज आपण विस्तृतपणे आढावा घेऊ.

गेल्या महिनाभरातील प्रत्येक लेखात एक ‘अधोरेखित वाक्य’ असायचे, ते म्हणजे – ‘तेजीच्या वातावरणात आपण एक क्षीण स्वरूपाची घसरण अपेक्षित आहे.’ ही क्षीण स्वरूपाची घसरण दर  शुक्रवारी येऊन जायची. याची अनुभूती आपण सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारीदेखील घेतली. त्यामुळे या सप्ताहातही तेजी कायमच राहणार असा निष्कर्ष असणे स्वाभाविक. ही तेजी कायम राहण्यासाठी निर्देशांकावरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर हा सेन्सेक्सवर ४०,६०० आणि निफ्टीवर १२,००० असेल. या सप्ताहात हा स्तर निर्देशांक पार करण्यात अपयशी ठरल्यास पुन्हा एक घसरण अपेक्षित असून तिचे प्रथम खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४०,२०० ते ३९,५०० आणि निफ्टीवर ११,८५० ते ११,७५० असे असेल. येथे पायाभरणी होऊन नवीन उच्चांक सेन्सेक्सवर ४१,८००  ते ४२,५०० आणि निफ्टीवर १२,३०० ते १२,५०० चा स्तर दृष्टिपथात येईल. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे ‘दिल है के मानता नहीं’ असेल पण तांत्रिक विश्लेषणशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे शक्य आहे एवढेच या घडीला म्हणू शकतो.

जाहीर झालेले कंपन्यांचे वित्तीय निकाल आणि त्यांचे विश्लेषण..

एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड :

या स्तंभातील २१ ऑक्टोबरच्या लेखातील समभाग होता एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड. तिमाही निकालाची नियोजित तारीख ही २५ ऑक्टोबर होती आणि १८ ऑक्टोबरचा समभागाचा बंद भाव २,८८२ रुपये होता. निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर २,७०० रुपये होता. गुंतवणूकदारांच्या मानसिक तयारीसाठी तिमाही निकालाअगोदर चार दिवसांचा कालावधी होता. तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रिबदू स्तरावर टिकला, तर तिमाही निकाल चांगला, अन्यथा वाईट.

लेखात म्हटल्याप्रमाणे जर निकाल उत्कृष्ट असेल तर २,७०० रुपयांचा स्तर राखत, ३,१०० रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा प्रत्यक्ष निकाल हा उत्कृष्ट होता. २,७०० रुपयांचा स्तर राखत २२ नोव्हेंबरला ३,८४४ रुपयांचा उच्चांक नोंदवला. ज्या वाचकांकडे एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा समभाग दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेअंतर्गत आहेत त्यांनी ते राखून ठेवले, व अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत सात टक्क्यांचा परतावा मिळविला. आजही एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा समभाग २,७०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखत ६ डिसेंबरचा बंद भाव हा ३,१८२ रुपये आहे.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2019 4:13 am

Web Title: article on gdp figures depressing at 4 5 abn 97
Next Stories
1 नियोजन भान : सुरक्षित सेवानिवृत्तीसाठी   
2 थेंबे थेंबे तळे साचे : पैसा सांभाळून वापरण्याचे काळ खुणावतोय!
3 नावात काय? : जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पादन)
Just Now!
X