13 August 2020

News Flash

बंदा रुपया : ताणा-बाणा धाग्यांची गुंफण

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर..

संग्रहित छायाचित्र

सुमारे ३९ वर्षांपूर्वी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीची हमी असतानाही वडिलांच्या आग्रहाखातर व्यवसायाची सुरुवात केली. सुमारे १० वर्षे व्यवसायात जम बसायला लागला. तर आज संपूर्ण राज्यातील धाग्यापासून सर्व प्रकारच्या प्रक्रिया करत होजिअरीचे उत्पादन करणारा एकमेव कारखाना अशी ओळख निर्माण करणारा बगीरा उद्योग लातूरच्या बलदवा बंधूंनी उभा केला.

नंदकिशोर बलदवा व चंदुलाल बलदवा आज वयाने अनुक्रमे ६५-६२ वर्षांचे आहेत. दोघांनी अभियांत्रिकीची पदवी मिळविली. ऐंशी साली नंदकिशोर हे इलेक्ट्रिकल इंजिनीअरची पदवी घेऊन एमएसईबीत नोकरीला लागले. छोटे भाऊ चंदुलाल तोवर केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होते. वडील बाळकृष्ण बलदवा हे लातुरातील जमीनदार, उद्योजक व पहिले बी.एस्सी. पदवीधारक. त्यांची लातुरातील ओळख ही बी.एस्सी. बलदवा अशीच होती. ६० वर्षांपूर्वी लातूर शहरात जेव्हा वीज नव्हती तेव्हा डिझेल इंजिनवर विजेची निर्मिती करून बाजारपेठेतील दुकानदारांना ते वीज विकत असत. लातूर शहरातील पहिली बाळकृष्ण प्रिटिंग प्रेस त्यांनीच सुरुवात केली. अनेक व्यवसायांतील यशापयशानंतर संस्कृत व विविध विषयांचा त्यांनी अभ्यास सुरू केला. परिसरातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली.

शिक्षण घेतल्यानंतर आपल्या मुलांनी नोकरी न करता व्यवसाय करायला हवा हे त्यांच्या मनात होते. होजिअरीचा व्यवसाय लातुरात सुरू करावा असा त्यांचा आग्रह होता. वडिलांचा दरारा मोठा. त्यांना प्रतिप्रश्न करण्याची धमक नव्हती. जे सांगितले ते निमूटपणे करायचे म्हणून दोन्ही भावांनी त्यांच्या शिक्षणाच्या विपरीत आणि ग, म, भ देखील माहिती नसताना होजिअरीचा व्यवसाय करायचे ठरविले.

लातूरच्या एमआयडीसीत १० हजार रुपयांत एक एकर जागा मिळविली. लागणारी यंत्रसामग्री लुधियानातून खरेदी केली. कच्चामाल तमिळनाडूमधील तिरपूर येथून आणि त्याला लागणारे प्रशिक्षित कामगारही तेथूनच लातुरात आणले. त्याकाळी तिरपूर ही होजिअरी मालातील जागतिक बाजारपेठ होती. संपूर्ण जगभरातील मोठय़ा कंपन्यांचे उत्पादन तिरपूरमध्ये होत असे. बनियन, अंडरवेअर, टीशर्ट याचे उत्पादन करायचे ठरविले. तिरपूरमधील प्रशिक्षित कामगारांना मदतनीस म्हणून स्थानिक लोक घ्यायचे व स्थानिक लोकांना ते काम शिकवत व्यवसाय चालवायचा. मात्र प्रारंभी व्यवसायात अनेक अडचणी निर्माण झाल्या.

मुळात व्यवसायात रस नव्हता. ‘जुलमाचा रामराम’ म्हणून व्यवसायातील प्रवेश व त्यात अडचणीचा डोंगर. धागा आणल्यानंतर कपडा तयार करणे, त्याची धुलाई व नंतर शिलाई व त्यानंतर पॅकिंग करून विक्री. मुळात कच्च्या मालापासून पक्का माल बनवताना नाकीनऊ येण्याची ही प्रक्रिया होती. दोन-चार महिने काम केल्यानंतर कामगार गावाकडे पळून जात असत. पुन्हा त्यांना शोधण्यासाठी तिरपूरला जावे लागे. तेच कामगार सापडण्याची शक्यता कमी असायची. त्यानंतर पुन्हा नवीन मंडळींना घेऊन नव्याने काम सुरू करावे लागत असे. व्यवसाय नवीन, शिवाय छोटय़ा स्वरूपाचा. कापड तयार करण्यासाठी मशीनला एका वेळी पाच हजार सुया लागत असत. एकादी सुई मोडली तरी शिलाईचे काम बंद पडे. पाच रुपयाची सुई नाही म्हणून दोन, तीन दिवस कारखाना बंद राहात असे. मुंबईतील व्यापारी सुईसुद्धा सहजासहजी द्यायला तयार नसत. तेवढय़ासाठी ओळखी काढून, बाबापुता करून सुयांचा स्टॉक ठेवावा लागत असे. उत्पादित केलेला माल विकण्यासाठी प्रचंड मेहनत प्रारंभीच्या काळात घ्यावी लागली. त्याकाळी बाजारपेठेत होजिअरी इंडस्ट्रीमध्ये तिरपूरच्या एजंटचा दबदबा होता. त्यांचाच माल दुकानात ठेवायला हवा. दुसऱ्याचा माल दिसला तर ते त्या दुकानदारास मालच देत नसत. त्यामुळे शहरी भागात एकाही दुकानात मालच ठेवून घेत नसत. सुरुवातीची १० वर्षे गावोगावच्या आठवडी बाजारपेठेत सतरंजी टाकून माल विकावा लागला.

त्याकाळची लोकांची गरज ही बनियनला खिसा हवा अशी होती. असे बनियन खास शिवूनच घेतले जात असत. लोकांची गरज लक्षात घेऊन बगीराने खिसा असलेले बनियन उत्पादित करणे सुरू केले. ग्रामीण भागात याची चांगली विक्री होऊ लागली व ग्रामीण भागातील लोक पुन्हा शहरातील दुकानात खिसा असलेली बगीराची बनियन द्या अशी मागणी करू लागले. ग्राहकांची मागणी येऊ लागल्याने मग शहरातील दुकानदार आमच्या दुकानात माल ठेवा असे सांगू लागले.

त्यानंतर काही काही शहरांत माल ठेवण्यास सुरुवात झाली. आजही खिसा असलेल्या बनियनला मागणी असून प्रवासाला जाताना उपयोगी म्हणून अनेक जण हे बनियन घरी ठेवतात. अगदी विदेशात जाणारी मंडळीही महत्त्वाची कागदपत्रे हरवू नयेत म्हणून आपल्या बनियनचा वापर करतात हे बलदवा आवर्जून सांगतात.

लातूरव्यतिरिक्त पुणे, मुंबई, कोल्हापूर, हैदराबाद अशा ठिकाणी माल विकला जाऊ  लागला. १९९५च्या दरम्यान व्यवसायात चांगला जम बसला. त्यानंतर व्यवसाय हा उधारीचा न करता रोखीचा करायचा, भले व्यवसाय कमी झाला तरी चालेल असा निर्णय करत त्यांनी बाजारपेठेत रोखीने व्यवहाराची सवय सुरू केली ती आजतागायत टिकून आहे. १० कोटींच्या उलाढालीत बाजारपेठेत एकही रुपयांची उधारी असत नाही. १५ वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर तिरपूरवरून कामगार आणण्याची गरज न लागता स्थानिक कामगारच उत्पादनांत तरबेज बनले. त्यातही ८० टक्क्यांपेक्षा अधिक कामे महिला करू लागल्या. कोणतेही काम महिला पुरुषांपेक्षा अधिक क्षमतेने करतात. भले कमी शिकलेल्या पण उत्तम दर्जाचे व कौशल्याचे काम त्या करीत असल्याचे बलदवा सांगतात.

महिलांच्या क्षमतांवर चालणारा कारखाना अशी बगीराची प्रतिमा आहे. आपल्या क्षमतांना संधी मिळते याचा महिलांनाही आनंद आहे. अर्थात त्यांना आर्थिक मोबदलाही चांगला दिला जातो. त्यांच्या अडीअडचणीत लक्ष दिले जाते. महिन्यात दोन वेळा- ५ आणि २० ही पगाराची तारीख ठरलेली असते. ती कधीच चुकत नाही.

सध्या बनियन, अंडरवेअर शिवाय टीशर्ट, बाथगाऊन यांचे उत्तम दर्जाचे उत्पादन बगीरामध्ये होते. गुणवत्तेत तडजोड न करणारा ब्रॅण्ड म्हणून बगीराकडे पाहिले जाते. धाग्यापासून सर्व प्रक्रिया करून होजिअरी व्यवसाय महाराष्ट्रात केवळ लातूरच्या बगीरामध्येच चालतो. बाजारपेठेत स्वत:ची वेगळी ओळख बगीराने निर्माण केली आहे. पुण्या-मुंबईत दहीहंडीच्या वेळेस जे बनियन वापरले जातात त्यातील ४० टक्क्यांपेक्षा अधिक बनियन बगीराचे असतात.

आपल्या भागातील लोकांमध्ये चांगले कौशल्य आहे. त्यांना संधी मात्र दिली पाहिजे असे बलदवा सांगतात. ‘‘उद्योग उभा करताना गवंडय़ाच्या हाताखाली मजुरीचे काम करणारा एक माणूस कारखाना सुरू झाल्यानंतर मला तुमच्या मालाची विक्री करण्यासाठी संधी द्या म्हणून काम मागण्यासाठी आला. त्याला आम्ही तुला कामाचा कसला अनुभव आहे असे विचारले तेव्हा तुमचाही धंदा नवा आहे व मीही नवा आहे. मला संधी देऊन बघा अशी त्यांनी विनंती केली. त्याकाळात त्याने माल विकण्यासाठी वेगवेगळ्या कल्पनांचा वापर केला. सुमारे १५ वर्षे त्याने हे काम केले. आमचा व्यवसाय वाढवण्यात त्याचे योगदानही मोठे,’’ बलदवा म्हणाले.

गुंड म्हणून ओळखत असणारा असाच एक व्यक्ती काम मागण्यासाठी आला. त्याला काम दिल्यानंतर अनेकांनी तुमचा धंदा चौपट होईल अशी भीती घातली. मात्र त्या माणसाने मी प्रामाणिकपणे व्यवसाय करेन असे सांगत दहा वर्षे व्यवसायाला साथ दिली. समोरच्या व्यक्तीतील कौशल्य लक्षात घेऊन ते प्रतिभेत विकसित करता यायला हवे. स्थानिक मंडळींना संधी दिली तर ते त्याचे सोने करतात हा अनुभव बलदवा यांना अनेकांबाबत आला. सध्या टाळेबंदीनंतर अनेक उद्योगात कुशल कामगार नाहीत किंवा परप्रांतीय असल्याने गावी गेले आहेत. टाळेबंदी उठली तरी व्यवसाय सुरू करता येत नाही. मात्र आम्ही स्थानिकांना संधी दिली, त्यांना शिकवले. त्यामुळे आता पहिल्या दिवसापासून आमचा व्यवसाय सुरळीत सुरू होऊन रुळावर आला. स्थानिक कामगार काम करत नाहीत. त्यांची श्रम करण्याची तयारी नसते यावर आपला विश्वास नसल्याचेही ते म्हणाले.

वयाची साठी उलटल्यानंतरही अतिशय उत्साहाने हे दोघेही बंधू व्यवसायात मग्न आहेत. चंदूलाल बलदवा हे लातूर जिल्हा उद्योग समूहाचे अध्यक्षही आहेत. त्यांची पुढची पिढी मात्र उच्चशिक्षणानंतर विदेशात स्थायिक झाली आहे. त्यामुळे व्यवसायाचे भवितव्य काय हे माहिती नाही. मात्र आपण असेपर्यंत चांगल्या क्षमतेने व्यवसाय चालविला पाहिजे अशी दोन्ही भावांत जिद्द आहे.

– प्रदीप नणंदकर

नंदकिशोर बलदवा / चंदुलाल बलदवा  बगीरा इंडस्ट्रीज, लातूर

* व्यवसाय – बनियन, अंडरवेअर, टीशर्ट

* कार्यान्वयन : सन १९८१

* मूळ गुंतवणूक : १५ लाख,  उलाढाल १० लाख

* सध्याची उलाढाल : सुमारे १० कोटी रुपये

* रोजगारनिर्मिती : ६५ कामगार

लेखक ‘लोकसत्ता’चे लातूरचे प्रतिनिधी pradeepnanandkar@gmail.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 12:14 am

Web Title: article on hosiery only factory that produces nandkishore baldava and chandulal baldava abn 97
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : विषाणू बाधारहित नवपिढीचा व्यवसाय
2 कर बोध : विवरणपत्र कोणी-कोणता फॉर्म भरावा?
3 बाजाराचा तंत्र कल : तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी!
Just Now!
X