22 February 2020

News Flash

करबोध : अर्थसंकल्पातील प्राप्तिकर तरतुदींकडे कसे पाहाल?

अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात करपद्धती सामान्य करदात्यांसाठी अधिक सोपी आणि सुगम करण्याचे सूतोवाच केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रवीण देशपांडे

अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात करपद्धती सामान्य करदात्यांसाठी अधिक सोपी आणि सुगम करण्याचे सूतोवाच केले आहे. प्राप्तिकर कायद्यात १०० पेक्षा जास्त सवलती आणि वजावटी आहेत. या सवलती आणि वजावटींमुळे कायदा क्लिष्ट झाला आहे. कोणती सवलत कोणत्या करदात्यांसाठी आहे, कोणता खर्च कोणत्या वजावटीस पात्र आहे याबाबत करदात्यांच्या मनात अनेक शंका असतात. कित्येक वेळेला अपुऱ्या माहितीपोटी वजावटी घेतल्या जात नाहीत किंवा जास्त घेतल्या जातात. काही सवलतींच्या तरतुदींबाबत अस्पष्टता वाटल्यास, प्राप्तिकर खात्याबरोबरील भविष्यातील वाद टाळण्यासाठीसुद्धा सवलती किंवा वजावटी कमी घेतल्या जातात.

या अर्थसंकल्पात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. यात करदात्याला वजावट न घेता करपात्र उत्पन्नावर कमी दराने कर भरण्याचा पर्याय दिला आणि लाभांशावर कर भरण्याची जबाबदारी करदात्यावर टाकण्यात आली.

*   कराचा नवीन पर्याय :

या वर्षीच्या अर्थसंकल्पात प्रथमच करदात्याला (वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब) कररचनेच्या नवीन पद्धतीचा पर्याय देण्यात आला. कररचनेच्या नवीन पर्यायामुळे करदात्यांचा संभ्रम वाढला आहे. या नवीन पद्धतीचा लाभ नेमका कोणाला होतो? नवीन कराच्या पद्धतीमध्ये काही सवलती आणि वजावटी न घेता आपले करदायित्व कमी होईल? का सवलती आणि वजावटी घेऊन जुन्या पद्धतीने मला लाभ होईल? मी या वर्षी कोणत्याही वजावटी न घेता नवीन पद्धतीने कर भरला आणि पुढील वर्षी मी गृहकर्ज घेतले तर मी पुढील वर्षी वजावटी घेऊन परत जुन्या पद्धतीने कर भरू शकतो का? मी ज्येष्ठ नागरिक आहे, मला या नवीन रचनेचा फायदा मिळेल का? कंपनी माझा उद्गम कर (टीडीएस) कापताना कोणती पद्धत विचारात घेईल? असे अनेक प्रश्न करदात्यांच्या मनात आहेत. या लेखात करदात्यांच्या या प्रश्नांसंबंधाने अर्थसंकल्पात काय सांगितले आहे ते बघू या.

ही करपद्धती पर्यायी असल्यामुळे करदात्याने आपल्या करदायित्वानुसार ठरवावे की कोणत्या पद्धतीने कर भरावा, हे त्याने विवरणपत्र भरण्यासाठीच्या मुदतीपूर्वी ठरवावे. म्हणजेच दोन्ही पद्धतीने करदायित्व किती आहे हे गणणे ओघाने आलेच.

हा पर्याय करदात्याने विवरणपत्र भरण्यापूर्वी निवडावयाचा आहे. जे करदाते पगारदार आहेत (किंवा ज्याच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नाही) त्यांना प्रत्येक वर्षी हा पर्याय बदलण्याची मुभा आहे.

ज्या करदात्यांचे धंदा-व्यवसायाचे उत्पन्न आहे अशांनी हा पर्याय निवडल्यास त्यातून एकदा बाहेर येण्याची मुभा आहे. परंतु एकदा या पर्यायातून बाहेर आल्यास परत पुढील कोणत्याही वर्षांत हा पर्याय निवडता येणार नाही. जर पुढील कोणत्याही वर्षांत अशा करदात्यांचे धंदा-व्यवसायाचे उत्पन्न नसेल तर त्याला पुन्हा दरवर्षी हा नवीन पर्याय निवडता येईल.

या नवीन करपद्धतीचा अवलंब केला तर पगारदारांना काही सवलती आणि वजावटी न घेता करपात्र उत्पन्न गणावे लागेल. प्रवासी भत्ता, घरभाडे भत्ता, विशेष भत्ते (कलम १०(१४) प्रमाणे काही विहित वजावटी सोडून), संसद सभासदांना मिळणारा दैनंदिन भत्ता, अजाण मुलाच्या उत्पन्नावर मिळणारी दीड हजार रुपयांपर्यंतची सवलत, ५०,००० रुपयांची प्रमाणित वजावट, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा करमणूक भत्ता, व्यवसाय कर, फॅमिली पेन्शनवर मिळणारी १५,००० रुपयांपर्यंतची वजावट, राहत्या घराच्या गृहकर्जावरील व्याजावर मिळणारी दोन लाख रुपयांपर्यंतची वजावट, कलम ८०सी (पीएफ, पीपीएफ, जीवन विमा हफ्ता, गृहकर्जावरील मुद्दल परतफेड वगैरे मिळणारी दीड लाख रुपयांपर्यंत मिळणारी वजावट), कलम ८० सीसीडी (नॅशनल पेन्शन स्कीमची ५०,००० रुपयांची वजावट), कलम ८०डी (मेडिक्लेम), वैद्यकीय उपचार खर्चासंबंधीच्या वजावटी, मागील वर्षी सुरू केलेली गृहकर्जावरील व्याजाची अतिरिक्त वजावट, शैक्षणिक कर्जावरील व्याजाची वजावट, देणग्यांवर कलम ८०जी अंतर्गत मिळणारी वजावट आणि कलम ८०च्या अंतर्गत मिळणाऱ्या इतर वजावटी करदात्याला घेता येणार नाहीत.

या नवीन पद्धतीत पगारदार काही सवलती आणि वजावटी मात्र घेऊ शकतो. यामध्ये पगार देणाऱ्याने नॅशनल पेन्शन स्कीममध्ये भरलेले योगदान कलम ८० सीसीडी (२) प्रमाणे, राहत्या घराव्यतिरिक्त घरांवरील गृहकर्जाच्या व्याजाची वजावट, कलम ८७ए नुसार मिळणारी करसवलत (ज्या करदात्यांचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशांना) याचा समावेश आहे.

या नवीन कलमानुसार कराधान टप्पा (स्लॅब) खालीलप्रमाणे (हा फक्त वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब यांना लागू) :

खालील उदाहरणात नवीन पद्धतीने आणि जुन्या पद्धतीने करदात्याने करबचतीची गुंतवणूक केलेली असल्यास आणि गुंतवणूक केलेली नसल्यास करदायित्व किती आहे हे तुलनात्मक तक्त्यात दर्शविले आहे :

वरील उदाहरणात असे दिसते की करदात्याने करबचतीच्या विविध प्रकारांत गुंतवणूक केलेली असल्यास त्याला नवीन करपद्धतीचा फायदा होत नाही, त्यांना जास्त कर भरावा लागतो. जे करदाते करबचतीसाठी गुंतवणूक करीत नाहीत त्यांना मात्र नवीन करपद्धतीचा फायदा होतो.

जे करदाते ज्येष्ठ नागरिक आहेत (ज्यांचे वय ६० वर्षे ते ८० वर्षांपर्यत आहे) आणि अति-ज्येष्ठ नागरिक आहेत (वय ८० वर्षांपेक्षा जास्त) आणि जे गुंतवणूक करीत नाहीत ते सुद्धा या नवीन करपद्धतीचा लाभ घेऊ शकतात. परंतु त्यांनासुद्धा या कलमानुसार नमूद केलेल्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागेल.

ज्या करदात्यांचे उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशांना ‘कलम ८७ अ’ची करसवलत जुन्या पद्धतीत मिळत होती ती नवीन पद्धतीत सुद्धा मिळणार आहे त्यामुळे त्यांना कर भरावा लागणार नाही.

*   लाभांशावरील करआकारणी :

आर्थिक वर्ष २०१९-२० पर्यंत कंपन्यांकडून मिळणारा लाभांश १० लाख रुपयांपर्यंत करमुक्त होता आणि १० लाख रुपयांच्या पेक्षा जास्त रकमेवर १० टक्के इतक्या सवलतीच्या दराने कर भरावा लागत होता. तसेच म्युचुअल फंडावरील लाभांश पूर्णपणे करमुक्त होता. लाभांशावर कर भरण्याची जबाबदारी आतापर्यंत लाभांश देणाऱ्या कंपनीवर आणि म्युच्युअल फंडावर होती. कंपन्याना लाभांश वितरित करण्यापूर्वी २०.५६ टक्के इतका कर भरावा लागतो आणि डेट फंडाला २९.१२ टक्के आणि इक्विटी फंडाला ११.६५ टक्के (सर्व दर अन्य अधिभारासह) इतका भरावा लागतो. १ एप्रिल २०२० पासून कंपन्यांना भरावा लागणारा लाभांश वितरण कर रद्द करण्याचे आणि करदात्यांना मिळणारा लाभांश पूर्णपणे करपात्र करण्याचे अर्थसंकल्पात सुचविण्यात आले आहे. हे लाभांशाचे उत्पन्न करदात्याला ‘इतर उत्पन्न’ या सदरात गणावे लागेल आणि त्याच्या उत्पन्नाच्या स्लॅबप्रमाणे त्यावर कर भरावा लागेल. या तरतुदीमुळे सरकारकडे जास्त कर जमा होण्याची शक्यता आहे. शिवाय लाभांश ५,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर कंपन्यांना आणि म्युच्युअल फंडांना १० टक्के इतका उद्गम कर कापावा लागेल.

* लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

pravin3966@rediffmail.com

First Published on February 10, 2020 3:06 am

Web Title: article on how do you look at the income tax provisions abn 97
Next Stories
1 बंदा रुपया : रिक्षाचालक ते अडीचशे ट्रेलर-ट्रकचा मालक!
2 माझा पोर्टफोलियो : आयातपर्यायी क्षेत्रातील गुणवत्ता..
3 थेंबे थेंबे तळे साचे : गुंतवणूकदारांचे शुभचिंतक सल्लागार, वितरक, उत्पादक आणि कायदा!