कौस्तुभ जोशी

चलनवाढ म्हणजे एखाद्या वस्तूच्या किंवा सेवेच्या मूल्यामध्ये झालेली वाढ आणि तितक्याच प्रमाणात चलनाच्या मूल्यात झालेली घट. संकल्पना सुलभपणे सांगायची तर मार्च २०1९ मध्ये एक वस्तू दोनशे रुपयाला उपलब्ध असेल आणि तीच वस्तू मार्च २०२० मध्ये दोनशे पन्नास रुपयाची झाली. याचा अर्थ वस्तूच्या मूल्यामध्ये वाढ झाली आणि पैशाच्या मूल्यामध्ये घट झाली. म्हणजेच वस्तूची किंमत वाढली. अशाप्रकारची चलनवाढ दोन प्रमुख कारणामुळे अस्तित्वात येते. यातील एक म्हणजे डिमांड अर्थात मागणीतील वाढीस कारणीभूत घटक आणि दुसरी कॉस्ट पुश म्हणजेच खर्च वाढल्यामुळे निर्माण होणारी चलनवाढ.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

जेव्हा वस्तू व सेवांच्या निर्मिती मूल्यात (प्रॉडक्शन कॉस्ट) वाढ होते तेव्हा ती वाढ भरून काढण्यासाठी वस्तूच्या किमती वाढवल्या जातात. म्हणजेच एखादी वस्तू तयार करण्याचा उत्पादन खर्च पाचशे रुपये आहे व ती वस्तू सहाशे रुपयाला विकली जाते. काही कारणास्तव ती वस्तू तयार करण्यासाठी ५५० रुपये लागायला लागले तर नफा घटू नये म्हणून वाढलेल्या उत्पादन खर्चाचा भार ग्राहकांवर टाकण्यात येतो आणि वस्तूची किंमत ६५० केली जाते. कधी सगळा वाढलेला भार हा ग्राहकांवर टाकला जात नाही, कंपन्या तो सहन करतात व थोडा भार ग्राहकांवर टाकतात. मात्र या दोन्ही वेळी वस्तूंच्या किमती वाढून चलनवाढ अनुभवास येते यालाच उत्पादन खर्चामुळे निर्माण झालेली चलनवाढ असे म्हणतात.

येथे एक गोष्ट समजून घ्यायला हवी की जेव्हा फक्त उत्पादन खर्चाचा विचार केला जातो तेव्हा वस्तूची मागणी तेवढीच आहे हे सुद्धा महत्त्वाचे असते.कारण अचानक वस्तूची मागणीसुद्धा वाढली तरीही किंमत वाढते होते पण ती मागणीमुळे तयार झालेली चलनवाढ !

उत्पादन खर्च वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. दरवर्षी कामगारांचे पगार व अन्य कार्यालयीन खर्च वाढत असतात, कच्च्या मालाच्या किमती वाढत असतात. यामुळे एका ठराविक प्रमाणात उत्पादन खर्च वाढतोच व तो भरून काढण्यासाठी किंमत वाढवावी लागते काहीवेळा उत्पादन करताना वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात अचानक वाढ दिसून येते. कच्चा माल महाग होऊ लागतो. उदाहरण म्हणून लोह/ पोलाद कारखान्याचे उदाहरण घेऊ. पोलाद बनवण्यासाठी दगडी कोळसा किंवा तेल, लोहखनिज अशी साधने लागतात. समजा एखाद्या कारखान्याने दुसऱ्या देशातून कोळसा आयात करून तो वापरण्याचे ठरवले असेल आणि आणि कोळशाच्या दरात वाढ झाली तर नाईलाजास्तव त्याला आपले उत्पादनाचे गणित सांभाळण्यासाठी आपल्या तयार मालाची किंमत वाढवावी लागते. काही वेळेला आपल्याला आवश्यक असणारे तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळ स्वस्तात मिळत नाही त्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात. यावेळी पगारवाढ म्हणजेच खर्चात झालेली वाढ असते. त्यामुळे कंपनीला आपल्या वस्तूंचा पुरवठा जादा दराने करावा लागतो. कधीकाळी नैसर्गिक आपत्तीमुळे वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल पटकन उपलब्ध होत नाही.

त्याची टंचाई तयार होते व या टंचाईमुळे कच्चा माल महाग मिळतो अशा वेळी कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने तयार मालाची किंमत सुद्धा वाढते. सरकारला आणि रिझव्‍‌र्ह बँकेला मागणी आणि पुरवठा ही दोन्ही तंत्र सांभाळून चलनवाढ होणार नाही या दृष्टीने आपली धोरणे आखावी लागतात.

* लेखक वित्तीय नियोजनकार व अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

joshikd28@gmail.com