13 August 2020

News Flash

अर्थ वल्लभ : आषाढस्य प्रथमदिवसे..

काही रोखे फंड घटत्या व्याजदरांवर मात करण्यासाठी एक रणनीती आचरणात आणत आहेत.

संग्रहित छायाचित्र

वसंत माधव कुळकर्णी

आजपासून आषाढ लागेल. आषाढाच्या पहिल्या दिवशी ‘आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानु वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।’ हा ‘मेघदूता’तील श्लोक हटकून आठवतोच. कालिदासाच्या ‘मेघदूता’ने अनेक प्रतिभावंतावर गारूड केले. कवी बा. भ. बोरकर यांनी ‘मेघदूता’चा मराठीतील केलेला अनुवाद तितकाच वाचनीय आहे. ‘आषाढाच्या प्रथम दिवशी, टेकला अद्रिरेखे दंताघाती समद गजसा, देखणा मेघ देखे.’ असा मूळ श्लोकाचा अनुवाद बोरकरांनी केला आहे. एकांतवास भोगणाऱ्या शापित यक्षाला आषाढ महिन्यातील काळा ढग पाहून आपल्या पत्नीची आठवण झाली. त्याने मेघाकरवी पत्नीला निरोप पाठविला. येथे मात्र आषाढ महिन्यातील काळा ढग पाहून, अर्थात घसरते व्याज दर पाहून अनेक मुख्यत्वे गुंतवणुकीवरील व्याजावर गुजराण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरील खिन्नता मला दिसते. एक गुंतवणूक मार्गदर्शक आणि म्युच्युअल फंड अभ्यासक या नात्याने एक उपाय सुचवासा वाटतो; परंतु हा उपाय सुचविण्यापूर्वी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मागील वर्ष-दोन वर्षांपूर्वीपासून रोखे गुंतवणूक करणाऱ्या (डेट फंड) फंडांबाबतच्या घटनांचा गुंतवणूकदारांच्या निर्णयक्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे सामान्यपणे डेट फंडात गुंतवणूक करा, असे म्हटले की नमनालाच विरोध करणारे अधिक असतात. मग सुरुवात होते ते आयएल अँड एफएस, क्रेडिट रिस्क फंड ते फ्रँकलिन टेम्पलटन यांसारख्या स्मरणात असलेल्या गोष्टींपर्यंतची आठवण काढली जाते. त्यापेक्षा बँकेत मुदत ठेव बरी, असा विचार करणारेही आहेत. यालाच ‘रिसेन्सी बायस’ असे म्हणतात.

काही रोखे फंड घटत्या व्याजदरांवर मात करण्यासाठी एक रणनीती आचरणात आणत आहेत. या रणनीतीला ‘रोल डाऊन स्ट्रॅटेजी’ असे म्हणतात. वास्तविक रोखे गुंतवणूक करणारे फंड अर्थात डेट फंड पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाले आहेत. सेबी आणि फंड घराणी यांनी आपापले गुंतवणूक निकष अधिक काटेकोर आणि पारदर्शी केले आहेत. काही फंड घराण्यांनी आपल्या गुंतवणुकींचा तपशील रोज जाहीर करायला सुरुवात केली आहे.

गुंतवणूकदारांना इंडेक्स फंडांमुळे समभाग फंडांचे निष्क्रिय व्यवस्थापन माहीत असेल; परंतु रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडाचे निष्क्रिय व्यवस्थापन म्हणजे ‘रोल डाऊन स्ट्रॅटेजी’. रोखे गुंतवणुकीचे सक्रिय व्यवस्थापन म्हणजे निधी व्यवस्थापक व्याजदरांच्या चढउतारानुसार गुंतवणूक असलेल्या रोख्यांची मुदतपूर्ती संतुलित करणे. व्याजदर कमी होत असतील तर दूरच्या मुदतीचे रोखे खरेदी करणे आणि चढय़ा व्याजदरात जवळची मुदत असलेले रोखे खरेदी केले जातात; परंतु ‘रोल डाऊन स्ट्रॅटेजी’ रणनीतीत रोख्यांच्या मुदतपूर्तीचा कालावधी महिन्यांगणिक कमी होतो. साहजिकच ‘डय़ुरेशन रिस्क’ किंवा व्याजदर वाढल्यामुळे रोख्यांच्या किमती कमी होण्याचा धोका निश्चितच कमी होतो.

गुंतवणुकीतील रोख्यांची मुदत तीन वर्षे असेल आणि रोखे मुदतपूर्तीपूर्वी विकणार नसल्याने जरी तीन वर्षांदरम्यान किंमत कमी झाली आणि (मार्क टू मार्केट) मुळे एनएव्हीत घसरण झाली तरी ती घसरण तीन वर्षांनंतर आभासी ठरते. परिणामी फंडाच्या एनएव्हीवर दरम्यानच्या काळात परिणाम झाला तरी सक्रिय व्यवस्थापन केले जाणाऱ्या फंडांपेक्षा अस्थिरतेचा धोका कमी असतो. म्हणून निष्क्रिय व्यवस्थापन (होल्ड टिल मॅच्युरिटी) असलेल्या रोखे फंडांचा गुंतवणूकदार विचार करू शकतात.

निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांच्या वेगवेगळ्या टप्प्यांतील गुंतवणूक गरजांचा विचार करून तीन फंडांसाठी ‘रोल डाऊन स्ट्रॅटेजी’ हे धोरण निश्चित केले आहे. तीन वर्षे मुदतीसाठी गुंतवणूक करणारा निप्पॉन इंडिया फ्लोटिंग रेट फंड, तीन ते दहा वर्षे दरम्यानसाठी निप्पॉन इंडिया डायनॅमिक बाँड फंड आणि दहा ते २५ दरम्यान वर्षांसाठी निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्य हे फंड म्हणूनच सुचवीत आहे. तथापि सजग गुंतवणूकदारांनी याआधीच तुलनेने सुरक्षित गुंतवणुकीचे असलेल्या जी-सेक/ अव्वल पत असलेल्या बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड तसेच कॉर्पोरेट बाँड फंड यामध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे दिसत आहे. या फंड गटात सर्वात जास्त गुंतवणूक झाल्याचे मासिक आकडेवारी सांगत असताना सामान्य गुंतवणूकदार मात्र ‘रिसेन्सी बायस’च्या भीतीमुळे अद्याप रोखे गुंतवणुकीपासून दूर आहे. अनेकांचा असा आक्षेप असतो की, मुदतीअंती किती पैसे मिळणार हे माहीत नसते; परंतु ‘रोल डाऊन स्ट्रॅटेजी’ प्रकारात चक्रवाढीचा दर स्पष्ट दिसतो. या दरांना रोखे गुंतवणुकीच्या परिभाषेत ‘वायटीएम’ अशी संज्ञा वापरतात. वर उल्लेल्ख असलेल्या फंडांपैकी निप्पॉन इंडिया फ्लोटिंग रेट फंडाचा ‘वायटीएम’ ६.३० टक्के असल्याने ३७ महिन्यांनतर मिळणारा भांडवली लाभ वार्षिक ६.३० टक्के असेल. निप्पॉन इंडिया फ्लोटिंग रेट फंड, हा फक्त ‘ट्रिपल ए’ पत असलेल्या रोख्यांत सध्या गुंतवणूक करीत आहे. गुंतवणूक मुख्यत्वे गृह वित्त कंपन्या, सार्वजनिक मालकीच्या वित्तीय कंपन्या वित्तीय कंपन्यांच्या रोख्यांत करीत असून हा फंड बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा अधिक नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी किंवा तीन वर्षांनंतर भांडवली लाभ मिळविण्यासाठी आदर्श पर्याय ठरेल. तीन ते दहा वर्षांसाठी निप्पॉन इंडिया डायनॅमिक बाँड फंडाचा ‘वायटीएम’ ६.२९ टक्के असल्याने १० वर्षे निधी गुंतविल्यास वार्षिक ६.२९ टक्कय़ांनी भांडवली वृद्धी शक्य आहे. या फंडाच्या गुंतवणुकीत असलेल्या रोख्यांची पत निप्पॉन इंडिया फ्लोटिंग रेट फंडासारखी आहे. निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्य या फंडाची यापूर्वी २५ जून २०१८ आणि १४ ऑक्टोबर २०१९ च्या लेखांतून शिफारस केली होती. समभाग गुंतवणूकदारांना हेवा वाटावा असा भांडवली लाभ या फंडाने दिला आहे. द्विरुक्तीचा दोष टाळून या फंडाबद्दल इतकेच सांगावेसे वाटते की, सध्या या फंडाचा ‘वायटीएम’ ६.६० टक्के असून ‘रन डाऊन मॅच्युरिटी’ २५ वर्षे आहे. हा फंड मुख्यत्वे २५ वर्षे आणि त्याहून अधिक मुदत असलेल्या सरकारी रोख्यांत गुंतवणूक करणारा फंड आहे.

प्रगल्भ गुंतवणूकदार बहुतेक वेळा उच्च कर कक्षेतील करदाते असतात. या प्रकारचे गुंतवणूकदारांची सरकार करमुक्त रोख्यांना परवानगी देत नसल्याबद्दल कुरकुरताना दिसतात. सरकारी मालकीच्या कंपन्या मुख्यत्वे करमुक्त रोखे विकून निधी उभारतात. करमुक्त रोख्यांत गुंतवणूक करू इच्छिणारे गुंतवणूकदार निप्पॉन इंडिया डायनॅमिक बाँड फंडात गुंतवणूक करून तीन वर्षांनंतर निर्देशांकनामुळे (इंडेक्सेशन) करमुक्त उत्पन्न मिळवू शकतात.

सध्याच्या घटत्या व्याजदरांवर अंशत: मात करण्यासाठी रणनीती आचरणात आणणाऱ्या फंडाचा म्हणूनच विचार करायला हवा; परंतु त्यापेक्षा बँकेच्या मुदत ठेव बरी, असा विचार काही करतात. ‘रिसेन्सी बायस’ तो हाच! कार्ल रिचर्डची ‘बिहेविअर गॅप’सारखी लोकप्रिय पुस्तके बाजारातील परतावा आणि वास्तविक गुंतवणूकदारांना मिळणारा परतावा यातील मोठे अंतर का निर्माण होते याचे विचेचन करतात. संशोधन आणि शिक्षण असूनही ‘बिहेविअर गॅप’ टाळून आणि ‘रिसेन्सी बायस’वर मात करून ‘रोल डाऊन’ रणनीती असलेल्या फंडांची निवड करण्याची ही शिफारस त्यासाठीच!!

shreeyachebaba@gmail.com

*  म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 12:09 am

Web Title: article on investing in a debt fund abn 97
Next Stories
1 घरांच्या बाजारभावाची लक्ष्मणरेषा!
2 अर्थ वल्लभ : उपभोगाचा लाभार्थी
3 बाजाराचा तंत्र कल : लाभ – लोभ!
Just Now!
X