News Flash

करावे कर-समाधान : गुंतवणूक लाभ आणि कर आकारणी

गुंतवणुकीचे अनेक पर्याय नागरिकांना उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या उद्देशांनुसार गुंतवणूक केली जाते.

(संग्रहित छायाचित्र)

प्रवीण देशपांडे

गुंतवणुकीच्या प्रकारानुसार, कालावधीनुसार, त्यावरील लाभाची करपात्रता ठरते. कराचा भाग मोठा व उत्पन्नाला कात्री लावणारा असल्यामुळे, गुंतवणूक करतेवेळीच कराच्या आकारणीचा पैलूचा विचार झाला पाहिजे.

गुंतवणुकीचे अनेक पर्याय नागरिकांना उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या उद्देशांनुसार गुंतवणूक केली जाते. काहींना नियमित उत्पन्न हवे असते तर काहींना गुंतवणुकीत वाढ हवी असते. गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न हे काही अपवाद वगळता करपात्र आहे. मागील दोन-तीन वर्षांत गुंतवणूक उत्पन्नाच्या कररचनेत अनेक मोठे बदल झाले. सूचीबद्ध कंपन्या आणि इक्विटी फंडातील युनिट्सच्या विक्रीवरील दीर्घ मुदतीचा नफा करमुक्त होता, तो आता करपात्र आहे. कंपनी आणि म्युच्युअल फंडावरील लाभांश आता गुंतवणूकदाराला करपात्र आहे. कंपनीने समभाग पुनर्खरेदी (बाय-बॅक) केल्यास गुंतवणूकदाराला त्या विक्रीवर होणाऱ्या नफ्यावर कर भरावा लागत नाही. गुंतवणुकीच्या प्रकारानुसार, कालावधीनुसार, त्यावरील उत्पन्नावरील करपात्रता ठरते. कराचा भाग मोठा असल्यामुळे करदात्याने गुंतवणूक करताना याचा विचार केला पाहिजे.

प्रश्न : मला २०२१-२१ या आर्थिक वर्षात विविध कंपन्यांकडून ८५,००० रुपयांचा लाभांश मिळाला आहे. या लाभांशावर काही कंपन्यांनी ५,५०० रुपयांचा उद्गम कर (टीडीएस) कापला आहे. मागील वर्षापर्यंत हे उत्पन्न करमुक्त होते. या वर्षीपासून या उत्पन्नावर मला कसा आणि किती कर भरावा लागेल?

– प्रथमेश शिर्के

उत्तर : गेल्या आर्थिक वर्षापासून, म्हणजे १ एप्रिल २०२० नंतर मिळालेला लाभांश गुंतवणूकदारांना करपात्र आहे. जर लाभांश ५,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर १० टक्के (३१ मार्च २०२१ पर्यंत ७.५० टक्के) उद्गम कर कापणे कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. हे उत्पन्न २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून करदात्याच्या उत्पन्नात धरले जाणार असल्यामुळे त्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे (स्लॅबनुसार) त्यावर कर भरावा लागेल. करदात्याचे उद्गम कर वजा जाता करदायित्व १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात. हा कर गणताना करदात्याला आर्थिक वर्षातील अंदाजित उत्पन्न विचारात घ्यावे लागते. या वर्षीच्या अर्थसंकल्पात लाभांश हे अंदाजित उत्पन्नात न गणता प्रत्यक्ष मिळाल्यानंतरच विचारात घेण्याचे सुचविले आहे. ही तरतूद १ एप्रिल २०२० पासून लागू असेल. जर आपल्याला अग्रिम कराच्या तरतुदी लागू असतील तर एकूण मिळालेला लाभांश विचारात घेऊन १५ मार्च, २०२१ पूर्वी अग्रिम कर भरावा लागेल.

प्रश्न : माझ्या वडिलांनी १९७० सालात खरेदी केलेले सोन्याचे दागिने मी फेब्रुवारी २०२१ मध्ये विकले. मला यावर कर भरावा लागेल का? हा कर वाचविण्यासाठी मला काय करता येईल?

– संध्या कुलकर्णी

उत्तर : सोन्याचे दागिने हे भांडवली संपत्तीच्या व्याख्येत येत असल्यामुळे त्याच्या विक्रीवर झालेला भांडवली नफा हा करपात्र आहे. हे दागिने १९७० साली खरेदी केले असल्यामुळे भांडवली नफा गणताना सोन्याचे १ एप्रिल २००१ रोजीचे बाजारी मूल्य आणि महागाई निर्देशांक विचारात घ्यावे लागेल. या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर २० टक्के (अधिक त्यावर ४ टक्के शैक्षणिक आणि आरोग्य कर) इतका कर भरावा लागेल. हा कर वाचविण्यासाठी आपण ‘कलम ५४ एफ’नुसार (अटींची पूर्तता केल्यास) नवीन घरात गुंतवणूक करू शकता.

प्रश्न : मी ऑक्टोबर २०१९ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या एका कंपनीचे ५०० समभाग प्रत्येकी १५५ रुपयांना खरेदी केले होते. कंपनीने मार्च २०२० मध्ये एकास एक या प्रमाणात बक्षीस (बोनस) समभाग जाहीर केले. मी फेब्रुवारी २०२१ मध्ये ८०० समभाग प्रत्येकी २२५ रुपयांना विकले. मला या विक्रीवर कर भरावा लागेल का? असल्यास किती?

– अरुण इनामदार

उत्तर  : आपण आपल्याकडील बक्षीस समभाग जमेस धरून असणाऱ्या एकूण १,००० समभागांपैकी ८०० समभाग विकले. ‘प्रथम खरेदी प्रथम विक्री’ या तत्त्वानुसार पहिले ऑक्टोबर २०१९ मध्ये खरेदी केलेले ५०० समभाग आणि ३०० बोनस समभाग असे ८०० समभाग आपण विक्री केले आहेत. ऑक्टोबर २०१९ मध्ये खरेदी केलेले, समभाग दीर्घ मुदतीचे आहेत (कारण ते खरेदी केल्या तारखेपासून १२ महिन्यांनंतर विकले आहेत) आणि ३०० बोनस समभाग, त्यावर होणारा भांडवली नफा अल्प मुदतीचा आहे (कारण ते बोनस जाहीर झालेल्या तारखेपासून १२ महिन्यांच्या आत विकले आहेत). आपल्याला ३५,००० रुपयांचा (विक्री किंमत २२५ रुपये गुणिले ५०० समभाग = १,१२,५०० वजा खरेदी किंमत १५५ रुपये गुणिले ५०० समभाग = ७७,५००)  दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला. आणि बोनस शेअर्समध्ये ६७,५०० रुपयांचा (विक्री किंमत २२५ रुपये गुणिले ३०० समभाग = ६७,५०० वजा खरेदी किंमत शून्य) अल्प मुदतीचा भांडवली नफा झाला. ‘कलम ११२ अ’नुसार प्रथम एक लाख रुपयांपर्यंतच्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नसल्यामुळे ३५,००० रुपयांच्या नफ्यावर कर भरावा लागणार नाही. ६७,५०० रुपयांच्या अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर १५ टक्के इतक्या दराने कर भरावा लागेल.

प्रश्न : मी इक्विटी फंडाचे काही युनिट्स ४ लाख रुपयांना जून २०१८ मध्ये खरेदी केले होते. आता त्यांची किंमत ६,००,००० रुपये इतकी झाली आहे. मी या युनिट्सची विक्री केल्यास मला किती कर भरावा लागेल?

– संजय जोशी

उत्तर : इक्विटी अर्थात समभागसंलग्न फंडाचे युनिट्स मार्च २०२१ मध्ये आपण विकल्यास आपल्याला २ लाख रुपयांचा (६ लाख वजा ४ लाख रुपये) दीर्घ मुदतीचा भांडवली नफा होईल. प्रथम १ लाख रुपयांवर कर भरावा लागणार नाही आणि बाकी रकमेवर म्हणजे १,००,००० रुपयांवर १०% या दराने म्हणजेच १०,००० रुपये इतका कर भरावा लागेल; परंतु आपण यातील अर्धे युनिट्स मार्च २०२१ मध्ये आणि बाकीचे एप्रिल २०२१ मध्ये विकल्यास आपल्याला कर भरावा लागणार नाही, कारण आपला २ लाख रुपयांचा भांडवली नफा दोन आर्थिक वर्षात (एक लाख रुपये प्रत्येकी) विभागला जाईल आणि प्रथम १ लाख रुपयांच्या नफ्यावर कर भरावा लागणार नसल्यामुळे आपल्याला दोन्ही वर्षी कर भरावा लागणार नाही.

लेखक सनदी लेखाकार आणिकर सल्लागार आहेत.

pravin3966@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2021 12:35 am

Web Title: article on investment benefits and taxation abn 97
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : ‘सदाहरित’ क्षेत्रातील अग्रेसर शिलेदार
2 रपेट बाजाराची  : अस्थिर, पण अभेद्य!
3 बाजाराचा तंत्र-कल : भोग सरेल, सुख येईल!
Just Now!
X