23 February 2020

News Flash

थेंबे थेंबे तळे साचे : गुंतवणूकदारांचे शुभचिंतक सल्लागार, वितरक, उत्पादक आणि कायदा!

ज्या प्रकारे आपण वस्तू घेताना तिचा दर्जा पारखतो, तसंच गुंतवणूक पर्याय निवडताना सुद्धा क्वालिटी पारखावी लागते

(संग्रहित छायाचित्र)

तृप्ती राणे

गेले काही महिने शेअर बाजारातील गुंतवणूक करण्यासाठी मला फोन येत होते. साधारणपणे संवाद असा काही असायचा – ‘मॅडम, नमस्कार. मी ‘अबक’मधून बोलतेय. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवता असं आमच्या लक्षात आलं आहे. तेव्हा तुम्हाला चांगला फायदा होईल अशा काही योजना आमच्याकडे आहेत. तुम्हाला किती रक्कम गुंतवता येईल, सांगता का?’

सुरुवातीला मी सभ्यपणे नाही म्हणून सांगायचे. तेव्हा, का नाही करत, किती फायदा होतो त्यातून, वगैरे सांगून मला सतवायचे. शेवटी एक दिवस मी त्यांचा पिच्छा पुरवायचा असं ठरवलं आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली – ‘तुम्ही कोण लोक आहात? काय काय काम करता? तुमचं ऑफिस कुठे आहे? सल्लागार आहात कीवितरक आहात? तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मला द्या. आणि मुळात म्हणजे तुमचा फोन मी रेकॉर्ड करतेय. तेव्हा सगळं नीट सांगा,’ असं म्हटल्याबरोबर दुसऱ्या बाजूने खटाक करून फोन ठेवला गेला आणि मी या सगळ्या त्रासातून मुक्त झाले. ही गोष्ट जेव्हा मी घरातील इतर मंडळींना सांगितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की, जवळपास सर्वानाच असे बरेच जण फोन करतात, भेटतात, सल्ले देतात, गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे काढून घेतात आणि बऱ्याच प्रसंगी फसवतात देखील. तेव्हा आजचा लेख हा अशा सगळ्या व्यक्तींना समजून घेऊन त्यांचा योग्य पद्धतीने आपल्या आर्थिक प्रगतीसाठी वापर करण्यासाठी म्हणून आहे.

सर्वात पहिला नंबर येतो उत्पादक व त्यांच्या प्रतिनिधींचा. उत्पादक आपल्याला गुंतवणूक पर्याय पुरवतो. जसं बँक आपल्याला बचत आणि मुदत खाते देते, म्युच्युअल फंड घराण्यांकडून आपण इक्विटी, डेट, हायब्रीड, इंटरनॅशनल शेअर्स वगैरे घेतो, कंपन्यांकडून रोखे घेता येतात. या उत्पादकांचं काम असतं जिथे पैसा वाचतोय तिथून तो ज्याला हवा आहे त्याला द्यायचा. मग घेणारा त्यावर कधी व्याज देतो (कर्ज), किंवा किंमत बदलून परत देतो (शेअर्स), किंवा डिव्हीडंड देतो. आज आपण जेवढय़ा ठिकाणी पैसे गुंतवलेले आहेत ते सगळे ज्यांच्या नावाखाली विकले जातात ते असतात उत्पादक. उदाहरणार्थ, एसबीआय हौसिंग लोन, एचडीएफसी म्युच्युअल फंड, बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट इ. उत्पादकांचा फायदा जास्तीत जास्त वितरणामुळे होतो हे इथे लक्षात घ्या. आपण जेव्हा कर्ज घेतो तेव्हा व्याज हे बँकेला मिळून त्यातून ठेवीदारांना दिलेल्या व्याज वजा करून जे उरतं, तो असतो त्यांचा फायदा (नेट इंटरेस्ट मार्जिन). आपण म्युच्युअल फंडामध्ये जेव्हा पैसे घालतो, तेव्हा तो म्युच्युअल फंड चालवणाऱ्या कंपनीला फंड मॅनेजमेंट फी मिळते. जेव्हा थेट समभाग खरेदी-विक्री होते तेव्हा नफा होतो तो कंपनीचा किंवा ब्रोकरचा.

ज्या प्रकारे आपण वस्तू घेताना तिचा दर्जा पारखतो, तसंच गुंतवणूक पर्याय निवडताना सुद्धा क्वालिटी पारखावी लागते. आपण पैसा गुंतवतो तो परत वाढ होऊन मिळवण्यासाठी. इथे जोखीम असते ती परतफेड कमी किंवा न होण्याची, वेळेवर पैसे न मिळण्याची, वाढ न होण्याची किंवा अपेक्षेपेक्षा कमी असण्याची. एखाद्या उत्पादकाकडून थेट गुंतवणूक पर्यायसुद्धा घेता येतो. उदाहरणार्थ, म्युच्युअल फंडातील डायरेक्ट प्लॅन्स. परंतु अशी थेट गुंतवणूक करताना त्यातील जोखीम समजून मग पैसे घातले तर ते फायद्याचं ठरतं.

आता वळूया वितरकाकडे. उत्पादक त्याचा गुंतवणूक पर्याय प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येकापर्यंत पोहोचवू शकत नसल्यामुळे तो वितरकाची मदत घेतो. या वितरकाकडे पर्यायाची माहिती असते आणि त्याचं काम असतं जास्तीत जास्त पैसे उत्पादकापर्यंत पोहोचविणे. विमा एजंट, म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर (यात बँकासुद्धा येतात), शेअर ब्रोकर हे सगळे वितरक असतात. यांना वितरणातून कमिशन मिळतं. आजच्या घडीला या वितरकांच्या प्रसरणामुळे गुंतवणूकदाराची सोय झालेली असून बचतीचं रूपांतर गुंतवणुकीत झालेलं आहे. परंतु जिथे वितरकाचं लक्ष हे गुंतवणूदारांच्या गरजेपेक्षा त्याला मिळणाऱ्या कमिशनकडे असतं, तिथे कदाचित गणितं चुकायची शक्यता जास्त आहे. ज्या गुंतवणूकदाराला कोणता पर्याय घ्यायचा आहे हे समजतं पण ऑनलाईन व्यवहार जमत नाही, तो वितरकाकडून गुंतवणूक करू शकतो.

आता येऊया सल्लागाराकडे. तसं पाहायला गेलं तर जो कुणी आपल्याला सल्ला देतो तो सल्लागार असतो. बऱ्याचदा आपण घरातील मंडळींच्या किंवा नातेवाईकांच्या किंवा वितरकांच्या सल्लय़ाने गुंतवणूक करतो. परंतु, कधी कधी असं होतं की, आपली खरी गरज काय आहे, किंवा नक्की कुठला गुंतवणूक पर्याय आपल्यासाठी योग्य आहे हे नीट लक्षात न आल्यामुळे पुढे हवे तसे परतावे, पुरेसं विमा कवच, गरजेला रोकडसुलभता मिळत नाही. म्हणून अशा वेळी उपयोग होतो तो सल्लागाराचा. या सल्लागाराचं काम असतं ते तुमच्या गरजा आणि जोखीम क्षमता समजून घेणं, तुमच्या आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी उपयुक्त पर्याय सुचवणं, त्यानुसार पुढे योजना मांडून तुमच्याकडून गुंतवणूक करून घेणं. या शिवाय वेळोवेळी तुमच्या ज्ञानात भर घालून तुमची आर्थिक प्रगती करणं. त्यासाठी हा सल्लागार तुमच्याकडून फी घेतो. तसं बघायला गेलं तर सल्लागाराचा दुसरा कोणताही स्वार्थ नसावा, अन्यथा ते विश्वास ढळण्याचे कारण बनू शकते. म्हणून गुंतवणूदाराने शक्यतो सल्लागार निवडताना या बाबतीत जागरूक असणे गरजेचे आहे.

गुंतवणूकदारांच्या दृष्टीने कायदा काय करू शकतो, हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे कुठलीही गुंतवणूक ही कुठल्या कायद्याखाली आहे हे उत्पादकानुसार ठरतं. उदाहरणार्थ, बँक ही रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमांनुसार काम करते, म्युच्युअल फंड हे अ‍ॅम्फी/ सेबीखाली येतात, विमा आयआरडीएआयच्या अधिपत्याखाली आहे. कोणते नियम पाळावेत हे प्रत्येक उत्पादकाला जाणून मग त्यानुसार गुंतवणूक पर्याय बनवून बाजारात आणावा लागतो. बारीक अक्षरात का होईना पण त्या गुंतवणुकीशी निगडित सगळी माहीती (छापील) गुंतवणूदाराला देणं हे कायद्याने बंधनकारक आहे. शिवाय, वितरक कोण असू शकतो, त्याने काय प्रशिक्षण घ्यावं, कुठला परवाना त्याच्याकडे असला पाहिजे हे सुद्धा कायद्यात नमूद असतं. जसे, विमा एजंटकडे आयआरडीएआयचे सर्टिफिकेशन तर म्युच्युअल फंड वितरकाकडे अ‍ॅम्फीचे सर्टिफिकेशन असावं लागतं. गुतंवणूक सल्लागार हा सेबीच्या नियमांखाली येत असल्यामुळे त्याला सुद्धा आरआयए – रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर हे सर्टिफिकेशन लागतं. या सर्वाकडे विशिष्ट शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता आणि/किंवा कार्यानुभव असावा लागतो. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कायदा गुंतवणूकदाराच्या संरक्षणासाठी असतो. एखाद्या गुंतवणूकदाराला जर चुकीचा पर्याय दिला, किंवा संपूर्ण जोखीम न समजावता पैसे गुंतविले गेले, तर प्रत्येक कायद्यामध्ये अशा प्रकारच्या वितरक किंवा सल्लागाराविरुद्ध तक्रार सुद्धा करता येते आणि न्याय मिळवता येतो. उदाहरणार्थ, सेबीने ६६६.२ू१ी२.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावर शेअर बाजाराशी निगडित गुंतवणूकदारांना स्वत:ची तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.

प्रत्येक निर्णयाचे जसे वेगवेगळे पैलू असतात, तसंच गुंतवणूक कशी करावी, कोणामार्फत करावी या निर्णयाशी निगडित फायदे, तोटे व खर्च आहेत. सल्लागार तुमच्या हिताचा असला तरी तुम्हाला त्याला फी द्यवी लागते, तर वितरकाला जरी तुमच्या खिशामधून फी जात नसली तरी गुंतवणुकीतून कमिशन मिळतं. उत्पादकाने नक्की काय दिलं पाहिजे, हे समजण्यासाठी सगळी माहिती नीट वाचावी लागते. आता ‘गुगल’वर शिकलेल्या डॉक्टरकडे जायचं की शिस्तीत अभ्यास करून डिग्री मिळविलेल्या डॉक्टर कडे जायचं हे गुंतवणूकदाराने ठरवायचं आहे. कारण कायदा सुद्धा तेव्हाच तुमची मदत करू शकतो जेव्हा तुम्ही स्वत: जागरूकपणे सर्व व्यवहार केलेले असतील. तेव्हा आपल्या पैशाची काळजी स्वत: घ्यायला शिका, अनियंत्रित व्यक्ती किंवा कंपन्यांकडून गुंतवणूक पर्याय घेऊ नका आणि गरजेनुसार तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा!

* लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.

trupti_vrane@yahoo.com

First Published on February 3, 2020 4:11 am

Web Title: article on investor well wishers distributors manufacturers and law firms abn 97
Next Stories
1 बंदा रुपया : पूल जोडला ध्येयासक्तीचा
2 फायद्यातील ‘एपीएल’ फॉर्म्युलेशन..
3 कुटुंबाचा अर्थसंकल्प
Just Now!
X