आशीष ठाकूर

वैशाखमासाअगोदरच मंदीच्या उष्ण लाटेने गुंतवणूकदारांचा आर्थिक, मानसिक दाह होत आहे. मंदीच्या उष्ण लाटेने त्रासलेल्या गुंतवणूकदारांवर हळुवार फुंकर मारून, मनाला उभारी देण्याचा प्रयत्न असेल. विषयाच्या खोलात शिरण्यापूर्वी सरलेल्या सप्ताहातील निर्देशांकाचा साप्ताहिक बंद जाणून घेऊया.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : २९,८१५.५९

निफ्टी : ८,६६०.२५

गेल्या लेखात उल्लेख केलेल्या ‘अनन्यसाधारण महत्त्व’ असलेल्या सेन्सेक्सवरील २८,८७५ आणि निफ्टीवरील ८,३००च्या स्तरावर निर्देशांक टिकल्याने बाजारात तेजी अवतरली. त्यात सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी रिझव्‍‌र्ह बँकेने विविध आर्थिक सवलती व त्यातही प्रामुख्याने कर्जावरील व्याजदरात पाऊण टक्कय़ांच्या दर कपातीच्या सुखद घोषणेवर निर्देशांकांनी – सेन्सेक्स ३१,१२६ आणि निफ्टी ९,०३८ असा दिवसांतर्गत उच्चांक मारला.

आज आपण निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल, या मंदीतील समभाग खरेदीची संधी, हे निर्णय घेताना प्रामुख्याने करावयाच्या गोष्टी व कटाक्षाने टाळावयाच्या गोष्टी (करावे अथवा टाळावे) अशा गोष्टींचा आजच्या आणि पुढील लेखात आढावा घेणार आहोत.

गुंतवणूक धोरण आखताना तेजीचा पाया अथवा आता चालू असलेली तेजी ही क्षणिक की शाश्वत यातील फरक जाणून घेणे नितांत गरजेचे आहे. शाश्वत तेजीसाठी सेन्सेक्सवर ३३,३०० आणि निफ्टीवर १०,००० च्या स्तराला ‘अनन्यसाधारण महत्त्व’आहे. कसे ते जाणून घेऊया.

जानेवारीपर्यंत चालू असलेल्या तेजीच्या मनोऱ्याचा पाया हा सेन्सेक्सवर ३३,३०० आणि निफ्टीवर १०,००० होता. गेल्या दोन वर्षांतील प्रत्येक उच्चांकांच्या वाटचालीत तर जी मंदी यायची ती उपरोक्त स्तराचा आधार घेऊन, फिरून नवीन तेजीचा पाया रचला जायचा. जसे की २९ जानेवारी २०१८ ला सेन्सेक्सवर ३६,४४३ आणि निफ्टीवर ११,१७१ उच्चांक नोंदविला गेला. तर २३ मार्चला ३२,५१५ आणि निफ्टीवर ९,९५१ चा नीचांक नोंदवत, पुन्हा तेजी सुरू झाली. २८ ऑगस्टला २०१८ ला सेन्सेक्सवर ३८,९३८ आणि निफ्टीवर ११,७६० चा उच्चांक पुढे नोंदविला गेला. या स्तरावरून फिरून मंदी अवतरून २६ ऑक्टोबर २०१८ ला सेन्सेक्सवर ३३,२९१ आणि निफ्टीवर १०,००४ चा नीचांक नोंदविण्यात आला. या स्तराचा आधार घेत जानेवारी २०२० च्या उच्चांकाला निर्देशांकांनी पुन्हा गवसणी घातली. वरील तेजी-मंदी चक्राचा भरभक्कम आधार हा सेन्सेक्सवर ३३,३०० आणि निफ्टीवर १०,००० होता. आताच्या मंदीत हा भरभक्कम आधारच तुटल्यामुळे मंदीची दाहकता आपण सरलेल्या सप्ताहातील पूर्वार्धात सोमवार, मंगळवारपर्यंत अनुभवत होतो. त्यानंतर मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक सुरू झाली व शुक्रवारी दिवसांतर्गत सेन्सेक्सवर ३१,१२६ आणि निफ्टीवर ९,०३८ चा उच्चांक मारला गेला.

आता चालू असलेल्या तेजीत सेन्सेक्सवर २८,८७५ आणि निफ्टीवर ८,३०० स्तर राखल्यास तेजीचे प्रथम लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३१,७०० ते ३२,५०० आणि निफ्टीवर ९,३०० ते ९,५०० असे असेल. हा स्तर ओलांडण्यास निर्देशांक अपयशी ठरल्यास ती क्षणिक मंदी असेल. शाश्वत तेजी ही सेन्सेक्सवर ३३,३०० आणि निफ्टीवर १०,००० च्या स्तरावर निर्देशांक सातत्याने एक महिना टिकल्यावरच येईल.

या वर्षांत गुंतवणूकदारांना खरेदीसाठी असंख्य संधी येतील, तेव्हा ‘आय मिस द बस’ हे कधीही न म्हणता येणार नाही. असे समजा..बसचा जिथून प्रारंभ होतो, त्या बस आगारातच आपण उभे आहोत.

संधी आल्यावर, बस पकडल्यावर ऐन वेळेला सुटय़ा पैशांची टंचाई भासू नये, यासाठी पुढील लेखांच्या श्रृखलांमधून मंदीत खरेदीयोग्य समभाग, उदयोन्मुख क्षेत्रे ते समभाग निर्देशांकाच्या कुठल्या स्तरावर खरेदी करावेत याचा विस्तृत आढावा घेऊ या.

(क्रमश:)

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com