07 April 2020

News Flash

अर्थ वल्लभ : गुंतवणुकीवरील कमी परताव्याचे निदान!

जुलै ते डिसेंबर २०१९ दरम्यान म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीसाठी कायम खुल्या असलेल्या फंडातील मालमत्ता १२ अब्जावरून २५ अब्जापर्यंत पोहोचली.

(संग्रहित छायाचित्र)

वसंत माधव कुळकर्णी

जानेवारी २०१८ पासूनच म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीवरील परतावा घटण्यास सुरुवात झाली. समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या सर्वच फंड गटांनी एकाद-दुसरा अपवाद वगळता मागील पाच वर्षांत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)पेक्षा कमी परतावा दिला आहे. दर वर्षी आधीच्या पाच वर्षांचा परतावा अगदी वेगळा दिसत आहे. निफ्टीने २०१२ ते २०१७ आणि २०१३ ते २०१८ या कालावधीत अनुक्रमे १५ टक्के आणि १८ टक्के परतावा दिला असला तरी बहुसंख्य फंडांनी अधिक परतावा दिल्याने अधिकाधिक लोक गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाची निवड केली. जुलै ते डिसेंबर २०१९ दरम्यान म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीसाठी कायम खुल्या असलेल्या फंडातील मालमत्ता १२ अब्जावरून २५ अब्जापर्यंत पोहोचली. पण मालमत्ता वाढूनही वैयक्तिक गुंतवणूकदारांना मिळणारा परतावा कमी झाला. गुंतवणुकीवर अपेक्षित परतावा मिळत नसल्याने व्याकूळ गुंतवणूकदार ठायीठायी भेटत असतात. असेच एक गुंतवणूकदार विशाल साळवी यांनी ई-मेल लिहिली होती. त्यांच्या फंड गुंतवणुकीवर कमी परतावा असल्याची कारणे आणि परतावा वाढविण्याचे उपाय खालीलप्रमाणे आहेत.

१. पोर्टफोलिओचा एक्स रे

समभाग गुंतवणुकीतील वैविध्य हा म्युच्युअल फंड गुंतवणूक करण्यामागील एक उद्देश असतो. बऱ्याच गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ मालमत्ता आणि फंडांची संख्या यात विसंगती आढळते. अनेकदा फंडांची संख्या इतकी असते की अनेकदा या वैविध्यामुळे गुंतवणुकीवरील परतावा कमी होतो. विशाल यांच्या पोर्टफोलिओत दोन स्मॉल कॅप फंड आणि कुटुंबाच्या गुंतवणुकीचा विचार केल्यास सहा स्मॉल कॅप फंड आहेत – दोन फोकस्ड, तीन ईएलएसएस फंड. ही संख्या मर्यादित राखल्यास गुंतवणुकीवरील परतावा वाढेल. ३.८० लाखांच्या गुंतवणुकीसाठी फंडांची संख्या १८ वरून ५ वर आणली असता परताव्यात सुधारणा होईल.

२. जोखीम-परतावा गुणोत्तराचा कल जोखिमेच्या बाजूचा

‘मॉडर्न पोर्टफोलिओ थिअरी’मध्ये गुंतवणुकीच्या कामगिरीची कार्यक्षमता मोजण्यासाठी ‘एफिशिएंट फ्रंटियर’ या साधनाचा अवलंब केला जातो. जोखीम / परतावा गुणोत्तर गुंतवणूकदाराला मिळू शकेल. संभाव्य लाभ मोजण्याचे हे साधन आहे. प्रत्येक रुपया कमावण्यासाठी तो /ती गुंतवणुकीवर (निधी व्यवस्थापक) किती जोखीम घेतो हे मोजण्याचे हे साधन आहे. बरेच विश्लेषक १: ३ हे आदर्श प्रमाण मानतात.

विशाल यांचे जोखीम परतावा गुणोत्तर १: ७ असे आहे. याचा अर्थ एक रुपया कमावण्यासाठी ते सात रुपये इतकी जोखीम घेतात. ज्या प्रमाणात ते जोखीम स्वीकारत आहेत त्या प्रमाणात परतावा मिळत नाही. ‘क्ष’ अक्षावर जोखीम आणि ‘य’ अक्षावर परतावा असा आलेख काढला जातो. विशाल यांच्या बहुसंख्य गुंतवणुका ‘य’ अक्षाच्या किंचित वर आहेत. परंतु दोन अक्षांच्या छेद-बिंदूपासून लांब असल्याने पोर्टफोलिओचे बहुसंख्य संदर्भबिंदू ‘हाय रिस्क – लो रिटर्न’ या चौकटीत आहेत. अक्षाच्या खाली असलेल्या फंडातून गुंतवणूक काढून घेऊन ‘य’ अक्षापासून दूर ज्या फंडांचे संदर्भ बिंदू आहेत त्या फंडात गुंतवणूक करावी.

पोर्टफोलिओ ओव्हरलॅप निकष

पोर्टफोलिओ ओव्हरलॅप हे साधन वेगवेगळ्या फंडातील समान समभागांची संख्या अधोरेखित करणारे साधन आहे. तुमच्या गुंतवणुकीत दोन फंडांतील सर्वाधिक ९४ टक्के गुंतवणुका समान आहेत. असे असण्यास फंडांची आवश्यकतेपेक्षा अधिक संख्या हे एक संभाव्य कारण असू शकेल. जर दोन फंडामध्ये मालमत्तांमध्ये अपेक्षित परतावा १.०० असेल तर याचा अर्थ असा की त्यांचा परिपूर्ण संबंध आहे. जेव्हा एखाद्याला पाच टक्के नफा होतो, तर दुसरा फंडसुद्धा पाच टक्केच नफा देईल. दोन फंडांचा परस्पर संबंध (को-रिलेशन) शून्य असल्यास गुंतवणुकीतील वैविध्य परतावा वाढविण्यास मदत करते. गुंतवणूकदारांनी जोखीम मर्यादित करण्यासाठी फंडामधील परस्पर संबंध शून्याच्या आसपास आणणे गरजेचे असते. तुमच्या गुंतवणुकीचा वार्षिक आढावा घेताना पोर्टफोलिओ संतुलित करून घेतल्यास परतावा वाढू शकेल.

भूतकाळात दोन फंडांचे मूल्य (एनएव्ही) एकमेकांच्या तुलनेत कशा हलल्या आहेत हे शोधण्यासाठी सांख्यिकी शास्त्रज्ञ त्या फंडांच्या मूल्याचा आधार घेतात. फंडांच्या प्रत्येक जोडीत काही संबंध असतो. त्यांच्या किमतीच्या हालचालींमधील परस्परसंबंधाच्या नात्याचे प्रतिनिधित्व करतो. ही संख्या भिन्न मालमत्तांसाठी ‘परस्पर संबंध मॅट्रिक्स’ (को-रिलेशन मॅट्रिक्स) म्हणून ओळखली जाते. चित्र क्रमांक-२, परस्पर संबंध मॅट्रिक्स वेगवेगळ्या मालमत्ता निवडण्याचे कार्य आवर्त सारणीच्या स्वरूपात एकमेकांशी त्यांचे परस्परसंबंधांचे सादरीकरण करते. याचा वापर आदर्श पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी केला जातो. एका फंड घराण्याच्या दोन फंडात हा परस्पर संबंध साधारणपणे ५० टक्क्यादरम्यान असतो. उदारणार्थ, एल अँण्ड टीच्या कोणत्याही दोन फंडाचा पोर्टफोलिओ ओव्हरलॅप ४० टक्क्यांच्या दरम्यान आहे. उदाहरणादाखल सांगायचे तर ‘लोकसत्ता कत्रे म्युच्युअल फंडां’च्या यादीतील एल अँण्ड टी मिडकॅप आणि एसबीआय ब्लूचिप ही जोडी पोर्टफोलिओ ओव्हरलॅप निकषावर आदर्श जोडी ठरते. गुंतवणुकीसाठी फंड निवडताना आपल्याला विस्तृत क्रमवारी आणि संयोजनामधून निवड करावी लागते. दोन फंड सकारात्मक परस्परसंबंधित होतील, की नकारात्मक हे सहज सांगता येते. फंड गट आणि नंतर उपश्रेणींमध्ये (असे की ग्राहकोपयोगी वस्तू, औषधनिर्माण तंत्रज्ञान इत्यादी) परस्पर संबंध जास्त असतो. लार्ज कॅप समभागांची संख्या १०० असल्याने लार्ज कॅप फंडात पोर्टफोलिओ ओव्हरलॅप नेहमीच ६५ टक्क्यांहून अधिक असतो. पण मिड कॅप समभागांची संख्या १५० असल्याने लार्ज कॅपपेक्षा कमी असतो. हे तंत्र हे पोर्टफोलिओ बुलेटप्रुफ करण्याचे काम करते.

‘मॉडर्न पोर्टफोलिओ थिअरी’चा वापर फंड परतावा वाढविण्यासाठी कसा करतात हे सांगण्यासाठी विशाल साळवी यांच्या पोर्टफोलिओचा वापर केला. आगामी काळात शक्य असेल तेव्हा थिअरीची उपयुक्तता ठसविण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. अनेकांना निर्देशांक शिखरावर असूनदेखील आपल्या पोर्टफोलिओच्या परताव्यात त्याचे प्रतिबिंब का दिसत नाही या कोडय़ाचे उत्तर देण्याचा हा लहानसा प्रयत्न.

shreeyachebaba@gmail.com

*   म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 4:06 am

Web Title: article on low investment return diagnosis abn 97
Next Stories
1 थेंबे थेंबे तळे साचे : P 2 P लेंडिंग आहे तरी काय
2 बंदा रुपया : यांत्रिकीत भारी कोल्हापुरी
3 माझा पोर्टफोलियो : कंपनी कर कपातीची ‘स्मॉलकॅप’ लाभार्थी
Just Now!
X