दत्तात्रय काळे

घराचं एकूण व्यवस्थापन करण्याची तसेच महिन्याच्या अंदाजपत्रकानुरूप घरखर्च चालवण्याची कला आणि योग्य दृष्टी प्रत्येक महिलेमध्ये उपजतच असते. पण ज्या वेळेला मुद्दा पैशाच्या गुंतवणुकीबद्दल अथवा प्राप्तिकर कायद्यातील विविध तरतुदींविषयी उपस्थित होतो त्यावेळेला वेगळं चित्र समोर येतं. आज महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवला आहे. ही खरोखरच आनंदाची बाब आहे. गुंतवणूक नियोजन, शेअर बाजार, म्युचुअल फंड, प्राप्तिकर नियोजन या आर्थिक विषयांतही अनेक महिला माहिती घेतानाही दिसतात आणि त्यानुसार गुंतवणूक/ कर नियोजन करतानाही दिसतात. पण ही टक्केवारी खूप कमी आहे. अगदी नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये सुद्धा हे प्रमाण खूप कमी आहे. स्त्री, मग ती नोकरी करणारी असो, व्यवसाय करणारी असो किंवा अगदी गृहिणी असो तिने या विषयांत रुची घेऊन माहिती घ्यायलाच हवी.

चालू काळात महिला सक्षमीकरण या विषयावर खूप काही बोललं जातं, लिहिलं जातं. अगदी या विषयावर परिसंवादसुद्धा आयोजित केले जातात. पण महिला सक्षमीकरणाशी संबंधित शिक्षण, आरोग्य, रोजगार, सुरक्षितता या विषयांबरोबरच गुंतवणूक, म्युचुअल फंड, आयुर्विमा, आरोग्यविमा, कर्ज, प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी या विषयांवर जास्तीत जास्त महिलांनी अर्थसाक्षर होणे ही काळाची गरज आहे असे वाटते.

गुंतवणूक व्यवस्थापनासारखा विषय जो अत्यंत महत्त्वाचा आहे त्याबद्दल तिच्या घरातून तिला माहिती द्यायला, त्याविषयी तिला साक्षर करायला किती महिलांना संधी दिली जाते? आणि त्याचबरोबर अशी संधी उपलब्ध असतानाही किती महिला त्यात आपणहून लक्ष घालतात? बँक, विमा कंपन्या, म्युचुअल फंड कंपन्या अशा आर्थिक व्यवहारांशी संबंधित कार्यालयांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. पण त्यापैकी किती महिला त्यांच्या स्वत:च्या आयुष्यचक्रातील आर्थिक उद्दिष्टांबद्दल जागरूक आहेत?

विविध गुंतवणूक योजना, त्यांचे फायद-तोटे, आरोग्यविमा योजना, आयुर्विमा योजना, पेन्शन योजना, प्राप्तिकर बचत योजना, कर्ज इत्यादी विषयांबद्दल स्त्रियांनी माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

आर्थिक व्यवहारांबाबत, गुंतवणुकीबाबत तसेच प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींबाबत महिलांनी (मग ती महिला नोकरी करणारी असो, व्यवसाय करणारी असो अथवा गृहिणी असो) उदासीनता सोडून सतत माहिती घ्यायलाच हवी. गुंतवणूक आणि कर नियोजन हे फक्त घरातल्या पुरुषाचेच काम ही मानसिकता सोडून दिली पाहिजे. आणि आपले वय, कौटुंबिक पार्श्वभूमी, आपल्या कामाचे स्वरूप, आपले उत्पन्न आणि जोखीम घेण्याची क्षमता हे लक्षात घेऊन गुंतवणूक आणि प्राप्तिकर नियोजन केले पाहिजे. सुदैवाने आजच्या काळात आयुष्यचक्रातील आर्थिक उद्दिष्टे साध्य करायला विविध प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत. आपल्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता होण्यासाठी विविध गुंतवणूक योजनांची माहिती घेऊन प्रत्यक्षात गुंतवणूक झाली तर आर्थिक समस्या निर्माण होणार नाही.

महिलांच्या वयोमानानुसार विविध गुंतवणूक योजनांचा एक ढोबळ आराखडा सोबतच्या तक्त्यात दिला आहे.

वयोगट

१८ ते २३ वर्षे

शिक्षण कालावधी

२४ ते ३५ वर्षे

नोकरी/व्यवसाय/ गृहिणी

३६ ते ४५ वर्षे

नोकरी/व्यवसाय/ गृहिणी

४६ ते ६० वर्षे

नोकरी / व्यवसाय/ गृहिणी / निवृत्ती काळ (६० वर्षांनंतर)

उत्पन्नाचा स्रोत

पॉकेट-मनी, वाढदिवसाला आई-बाबा, आजी-आजोबा, नातेवाईक यांनी दिलेले पैसे.

पगार, व्यवसायातून येणारे उत्पन्न.

गृहिणींच्या बाबतीत घर-खर्चासाठी दिलेल्या पैशांतून बचत केलेला ‘पिन-मनी’

पगार, व्यवसायातून येणारे उत्पन्न.

गृहिणींच्या बाबतीत घर-खर्चासाठी दिलेल्या पैशांतून बचत केलेला ‘पिन-मनी’

पगार/पेन्शन आणि व्यवसायातून येणारे उत्पन्न. गृहिणींच्या बाबतीत घर-खर्चासाठी दिलेल्या पैशांतून बचत केलेला ‘पिन-मनी’

गुंतवणूक योजना

पोस्ट ऑफिस मुदत ठेव, किसान विकास पत्र

शेअर्स, इक्विटी म्युचुअल फंड, म्युचुअल फंड एसआयपी, पीपीएफ, आरोग्यविमा, आयुर्विमा, मुलगी असेल तर सुकन्या समृद्धी योजना, लिक्विड फंड योजना

राष्ट्रीय पेन्शन योजना, गोल्ड ईटीएफ, प्राप्तिकर बचत योजना उदा. इक्विटी-लिंक्ड बचत योजना, शेअर्स, इक्विटी म्युचुअल फंड, डेट म्युचुअल फंड, हायब्रीड बचत योजना

पोस्टाची दरमहा व्याज योजना, इक्विटी म्युचुअल फंड, बँकेच्या मुदत ठेवी, वरिष्ठ नागरिक बचत योजना, डेट फंड योजना, करमुक्त व्याज रोखे

महिन्यासाठी आखलेल्या अंदाजपत्रकात जर स्त्री घर चालवू शकते तर तेच नैपुण्य ती गुंतवणूक व्यवस्थापनातही दाखवून आपण एक उत्तम अर्थमंत्री म्हणून भूमिका पार पडू शकतो हे दाखवून देऊ शकते. त्यासाठी गरज आहे ती थोडय़ा अभ्यासाची आणि गुंतवणूक व्यवस्थापनसुद्धा मी यशस्वीरीत्या करू शकते या आत्मविश्वासाची! आणि त्यादृष्टीने तिने पाऊल उचललं तर तिच्या आयुष्यात आर्थिक समस्या निर्माण न होता आर्थिक समृद्धीचा झोका कायम उंचच राहील. हीच आजच्या जागतिक महिलादिनानिमित्त महिला वर्गाला मनापासून शुभेछा!

dattatrayakale9@yahoo.in

(लेखक गुंतवणूकदार जागरूकतेसाठी कार्यरत व आर्थिक साक्षरता प्रशिक्षक)