News Flash

बाजाराचा तंत्र कल : बस एक बार मेरा कहा मान लीजिये!

बाजार हा केवळ आणि केवळ तांत्रिक विश्लेषणाच्या प्रमेयांवर चालत आहे

संग्रहित छायाचित्र

आशीष ठाकूर

भारत-चीन सीमेवरील तणाव, करोनामुळे रुतलेले अर्थचक्र, त्यातल्या त्यात दिलासादायक म्हणजे करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या; पण हा आनंददेखील निर्भेळ नाही. कारण नवनवीन करोना रुग्णांची लक्षणीय संख्येने भर पडतेच आहे. अशा सामाजिक, आर्थिक निराशाजनक परिस्थितीत बाजारात मात्र तेजी कायम; किंबहुना सामान्य गुंतवणूकदारांना सतत प्रश्न पडत आहे बाजार एवढा अलिप्त कसा काय राहू शकतो? बाजार या घटनांची का दखल घेत नाही?

आज प्रांजळपणे नमूद करावेसे वाटते, बाजार हा केवळ आणि केवळ तांत्रिक विश्लेषणाच्या प्रमेयांवर चालत आहे. आज या प्रमेयांचीदेखील वरची उद्दिष्टे आता हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे आता सावध व्हायची गरज आहे. कारण अर्थतज्ज्ञ, मूलभूत संशोधकांच्या दृष्टीने गेल्या सहा महिन्यांतील अर्थव्यवस्थेची परिस्थिती ही तोळामासा, निराशाजनकच आहे. केवळ तांत्रिक विश्लेषणातील इलियट वेव्ह, निओ वेव्ह, फेबुनाची फॅक्टर, फेबुनाची कालमापन, (टाइम सायकल) गॅन कालमापन पद्धतीचा आधार घेत निर्देशांकांवर तेजीची कमान कायम आहे; पण आता वरील तांत्रिक विश्लेषणांच्या प्रमेयांवरून एकच निष्कर्ष येत आहे.. ६ ते १८ जुलै या दरम्यान निर्देशांकांच्या पातळ्यांवर करडी नजर हवी. या काळात सेन्सेक्स ३७,००० ते ३८,३०० आणि निफ्टी १०,८५० ते ११,२०० या दरम्यान उच्चांक नोंदवेल. त्यानंतर ऑगस्टअखेर ते सप्टेंबरच्या पूर्वार्धापर्यंत सेन्सेक्स ३०,५०० आणि निफ्टी ९,००० पर्यंत खाली घसरण्याची दाट शक्यता आहे. म्हणून अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना ‘बस एक बार मेरा कहा मान लीजिये’ हे आर्जव! ते मनावर घेऊन त्यांनी सध्या चालू असलेल्या तेजीत समभागाची नफारूपी विक्री करून मुद्दल सुरक्षित करावे.

आता वर उल्लेख केलेल्या, तांत्रिक विश्लेषणातील विविध प्रमेय विस्ताराने समजून घेऊ या.

फेबुनाची कालमापन पद्धत :

येता ६ ते १८ जुलै हा काळ निर्देशांकाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा कालावधी आहे. या कालावधीत बाजारात चालू असलेल्या तेजीच्या धारणेला कलाटणी मिळू शकते.

आता गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्न येऊ शकेल की, ज्योतिषशास्त्राचा आधार घेत या तारखा दिल्या आहेत का? ‘कुडमुडय़ा ज्योतिषाच्या पिंजऱ्यातील पोपटाने’ या तारखा तर काढून दिल्या नाहीत ना? तर तसे नाही, इटलीचे महान भौतिकशास्त्र संशोधक प्रा. फेबुनाची यांनी ही कालमापन पद्धत विकसित केली आहे. आजही महाविद्यालयात विज्ञान शाखेत फेबुनाची यांची विविध प्रमेये शिकवली जातात. त्यातील फेबुनाची कालमापन पद्धतीचा आधार घेत वरील तारखा काढल्या आहेत. या तारखा संदिग्ध स्वरूपात असतात. त्याचे नेमके विश्लेषण करणे ही कला आहे. आता ६ ते १८ जुलै या तारखांदरम्यान तीन प्रकारच्या शक्यतांना वाव दिसून येतो – १) या दिवसात निर्देशांक उच्चांक प्रस्थापित करतो २) या दिवसात निर्देशांक नीचांक प्रस्थापित करतो ३) निर्देशांक आपली ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका संपवून तेजी अथवा मंदीचे स्पष्ट दिशानिर्देशन करतो.

वरील तीन शक्यतांतील पर्याय नंबर दोन व तीन आताच्या घडीला व्यवहार्य नाहीत. कारण निर्देशांकांनी सरलेल्या २४ मार्चला सेन्सेक्सवर २५,६३८ आणि निफ्टीवर ७,५११ चा नीचांक नोंदविला आहे आणि आतापर्यंत सेन्सेक्सने १०,३५० आणि निफ्टीने ३,१०० अंशांची तेजी साधली आहे. त्यामुळे आता वरील तारखांना निर्देशांक उच्चांक मारणार ही एकच शक्यता उरते आणि हा उच्चांक सेन्सेक्सवर ३७,००० ते ३८,३०० आणि निफ्टीवर १०,८५० ते ११,२०० असा असेल.

आता गुंतवणूकदारांची ‘दुखरी नस’असलेल्या समस्येकडे वळूया.

तोटय़ात समभाग विकायचे काय?

या लेखातील वरील परिच्छेदात एक वाक्य आहे – गुंतवणूकदारांनी या तेजीत समभागांची नफारूपी विक्री करून मुद्दल सुरक्षित करावे; पण हे कसे शक्य आहे? नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच बाजार कोसळला. उदाहरण घ्यायचे तर जानेवारीमध्ये १०० रुपयाला खरेदी केलेले १०० समभाग मार्चमध्ये ५० रुपयांपर्यंत घसरले. आता चालू असलेल्या तेजीत या समभाग मूल्यात ५० वरून ७५ रुपयांपर्यंत सुधारणा झाली; पण अजूनही २५ रुपयांचा तोटाच आहे. मग काय तोटय़ात समभाग विकायचे?

आता या प्रश्नातच याचे उत्तर दडलेले आहे. सेन्सेक्सवर दहा हजार आणि निफ्टीवर तीन हजार अंशांची तेजी/सुधारणा झाली, पण या तेजीतदेखील तुमच्या समभागाला १०० रुपयांची मूळ खरेदीची किंमत येऊ शकली नाही, मग भविष्यात बाजार कोसळत असताना १०० रुपयांची मूळ खरेदी किंमत येणे शक्य आहे का? निश्चितच नाही म्हणूनच हे सांगणे. मग या तोटय़ात असलेल्या समभागांची समस्या कशा प्रकारे हाताळावी.

आता चालू असलेल्या तेजीत ७५ रुपयांना १०० समभाग विकावेत. यातून जे ७,५०० रुपये मिळतील त्याचा विनियोग, उपरोक्त मंदीत जेव्हा निर्देशांकांवर –  सेन्सेक्सवर ३०,५०० आणि निफ्टीवर ९,००० – स्तर येईल तेव्हा हा समभाग ३५ रुपयांपर्यंत खाली आल्यास, त्या वेळेला २०० समभाग खरेदी करा. मग पुढच्या तेजीत १०० रुपयांच्या जुन्या खरेदी किमतीची वाट न पाहतादेखील, हा समभाग ५० रुपयांना ‘ना नफा-ना तोटा’ संकल्पनेचा आधार घेत २०० समभाग विकून टाका व मूळ रक्कम/मुद्दल परत मिळवा.

आपण सेन्सेक्सवरील ३७,००० ते ३८,३०० आणि निफ्टीवरील १०,८५० ते ११,२०० ची वरची लक्ष्ये काढण्यासाठी कुठल्या तांत्रिक विश्लेषणातील प्रमेयांचा आधार घेतला, तसेच जानेवारी २०२१ पर्यंतची निर्देशांकाची वाटचाल कशी असेल याचा आढावा पुढील लेखात घेऊया.  (क्रमश:)

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:56 am

Web Title: article on market technique trend abn 97 2
Next Stories
1 अर्थ वल्लभ : अस्थिर काळातील भरवशाचा सोबती
2 क.. कमॉडिटीचा : विक्रमी खरीप पेरण्या धोकादायक वळणावर
3 बंदा रुपया : संरक्षण सज्जतेत खारीचा वाटा
Just Now!
X