आशीष ठाकूर

या  स्तंभातील १५ फेब्रुवारीच्या ‘लक्ष्यपूर्ती’ या लेखात सर्वात प्रथम सेन्सेक्सचा ५२,१९६ आणि निफ्टीचा १५,३३१चा येणाऱ्या दिवसातील उच्चांक असेल हे भाकीत केले होते. हा उच्चांक वाचकांना अवगत करून देण्यासाठी तांत्रिक विश्लेषणातील ‘फेबुनाची फॅक्टर’ या संकल्पनेचा आधार घेत उच्चांकाचे शास्त्रोक्त पद्धतीने आलेखन केले होते. या उच्चांकावरून सेन्सेक्सवर ५०,१०० आणि निफ्टीवर १४,७०० पर्यंतची घसरण अपेक्षित होती आणि घडलेही तसेच!

१६ फेब्रुवारीला उपरोक्त वरचे लक्ष्य तर गाठलेच गेले. मात्र बरोब्बर २२ फेब्रुवारीला निर्देशांकाचे खालचे लक्ष्यदेखील साध्य झाले. याच स्तराचा सेन्सेक्सवर ५०,१०० आणि निफ्टीवर १४,७०० आधार घेत निर्देशांकांनी उतरत्या नीचांकासाठी (लोअर टॉपसाठी) फेरउभारणी करत लेखात उल्लेख केलेला सेन्सेक्सवरचा ५१,५०० आणि निफ्टीवरचा १५,१५०चा उच्चांक २५ फेब्रुवारीला नोंदवला. आता बाजाराला उतरत्या नीचांकाचा संकेत मिळाल्याने सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी बाजाराने सर्वांनाच जबरदस्त ‘दे धक्का’ देत, उच्चांक साधल्यानंतर घातक उताराची दाहकता काय असते ते निर्देशांकांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४९,०९९.९९

निफ्टी : १४,५२९.१५

आता कळीचा प्रश्न – उच्चांकावरून बाजारात किती घसरण संभवते याचा आढावा दोन पद्धतीने घेऊ या.

१) साधी सोपी, इतिहासाचा संदर्भ घेत नीचांकाचा आढावा.

२) तांत्रिक विश्लेषणातील चलत सरासरी (मूव्हिंग अ‍ॅव्हरेज) संकल्पना

प्रथम सोप्या पद्धतीचा आधार घेऊ या.

वर्षभरातील बाजारातील घातक उतारांची व्याप्ती ही सेन्सेक्सवर ३,५०० ते ४,००० अंशांची आणि निफ्टीवर १,००० ते १,१५० अंशांची होती.

३१ ऑगस्ट २०२० ला सेन्सेक्स ४०,०१० वरून ३६,४९५ (३,५१५ अंशांची घसरण)आणि निफ्टी ११,७९४ वरून १०,७९० (१,००४ अंशांची घसरण)

दुसरी घटना – २१ जानेवारी २०२१ ला सेन्सेक्स ५०,१८४ वरून ४६,१६० (४,०२४ अंशांची घसरण) आणि निफ्टी १४,७५३ वरून १३,५९६ (१,१५७ अंशांची घसरण)

दोन वेगवेगळ्या घसरणींमधील साधर्म्य हे सेन्सेक्सवर ३,५०० ते ४,००० अंशांचे आणि निफ्टीवर १,००० ते १,१५० अंशांचे येते. बाजारात नेहमीच इतिहासाची पुनरावृत्ती घडत असल्याने १६ फेब्रुवारीचा सेन्सेक्सचा उच्चांक ५२,५१६ मधून प्रथम ३,५०० अंश उणे करता ४९,०१६ आणि ५२,५१६ मधून ४,००० अंश उणे करता ४८,५१६ चा नीचांक येतो. हेच कोष्टक निफ्टी निर्देशांकासाठी वापरता १६ फेब्रुवारीच्या १५,४३१ उच्चांकामधून १,००० अंश उणे करता १४,४३१ आणि १५,४३१ मधून १,१५० उणे करता १४,२८१चा नीचांक दृष्टिपथात येतो.

घसरणीत सेन्सेक्सवर ४९,०१६ ते ४८,५१६ आणि निफ्टीवर १४,४३१ ते १४,२८१ स्तराला महत्त्व आहे.

जसे पूर्वी सेन्सेक्सवर ५१,००० आणि निफ्टीवर १५,००० या महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तराला होते तसे! हा स्तर तुटल्यावर बाजारात जी काही वाताहात झाली ती सरलेल्या सप्ताहात अनुभवली आहे.

आता तांत्रिक विश्लेषणातील दुसरी महत्त्वाची संकल्पना चलत सरासरी (मूव्हिंग अ‍ॅव्हरेज) या संकल्पनेनुसार, तेजीच्या बाजारात, निर्देशांकावर जी काही घसरण होते तिला ५० दिवसांच्या चलत सरासरीचा भरभक्कम आधार असतो व आताच्या घडीला सेन्सेक्सवर ५० दिवसांची चलत सरासरी ही ४९,०८२ आणि निफ्टीवर १४,४४५ येते आहे.

सेन्सेक्सवरील ५० दिवसांची चलत सरासरी ही ४९,०८२ आहे जी सेन्सेक्सवरील ३,५०० अंशांच्या घसरणीशी (४९,०१६) साधर्म्य साधत आहे. तर निफ्टीवरील ५० दिवसांची चलत सरासरी ही १४,४४५ येत आहे, जी निफ्टीवरील १,००० अंशांच्या घसरणीशी (१४,४३१) मेळ खात आहे.

येणाऱ्या दिवसातील घसरणीत निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ४९,००० ते ४८,५१६ आणि निफ्टीवर १४,४०० ते १४,२८१चा स्तर राखणे नितांत गरजेचे आहे. हा स्तर राखल्यास निर्देशांकावर सुधारणा होऊन निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५०,०८१ आणि निफ्टीवर १४,७३२ असेल.

मंदीचे दिवस सरतील असा स्तर म्हणजे ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ जो सेन्सेक्सवर ५१,००० आणि निफ्टीवर १५,००० असेल. या स्तरावर निर्देशांक सातत्याने टिकल्यास मंदीचे ‘भोग’ आणि ‘दिस’ सरल्यात जमा होतील..

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.