वसंत कुलकर्णी

सध्या नव्याने गुंतवणुकीसाठी सुरू असलेला (एनएफओ), प्रिन्सिपल मिडकॅप फंड हा दखल घ्यावा असा फंड आहे. मिडकॅप फंडांना एकूण मालमत्तेच्या किमान ६५ टक्के मालमत्ता ‘सेबी’च्या व्याख्येनुसार मिडकॅप समभागांत गुंतवणूक करावे लागतात. म्युच्युअल फंड विश्लेषक या भूमिकेतून एखाद्या ‘एनएफओ’ची शिफारस करताना कमालीचा सावधानता बाळगावी लागते. परंतु फंड घराणे, आणि त्यांची गुंतवणूक व्यवस्थापन पाहणाऱ्या मंडळींवरील विश्वास या ‘एनएफओ’ची दखल घेण्यास भाग पाडत आहे. तुमच्या सध्याच्या गुंतवणुकीत नक्कीच एखादा फंड असा असा असेल की ज्याचा समाधानकारक परतावा नसेल. या फंडाच्या ऐवजी आपल्या विद्यमान एसआयपी पोर्टफोलिओमध्ये थोडीशी अधिक भर घालून आपल्या परताव्यास चालना देण्यासाठी हा ‘एनएफओ’ नक्कीच हातभार लावेल. या फंडासाठी ‘निफ्टी मिडकॅप १००’ हा मानदंड निश्चित करण्यात आला आहे.

‘निफ्टी मिडकॅप १००’ निर्देशांकाने जानेवारी २०१८ मध्ये गाठलेल्या शिखरानंतर निर्देशांकाचा प्रवास उलटय़ा दिशेने सुरू झाला. सरलेल्या ५ डिसेंबरला हा निर्देशांक शिखरापासून १७ टक्के कमी किमतीला उपलब्ध आहे. या घसरणीमुळे अनेक चांगले उच्च दर्जाचे मिडकॅप समभाग वाजवी मूल्यांकनावर उपलब्ध आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी समभाग प्रकारात मालमत्तेचे विभाजन करत नाहीत त्यांचा मिडकॅप गुंतवणुकीबद्दल फारसा चांगला अनुभव नाही. समभाग प्रकारातसुद्धा वर्षांतून एकदा मालमत्तेचा समतोल साधणे गरजेचे असते. मिडकॅप फंड गटाचा डिसेंबर २०१७, जानेवारी २०१८ मध्ये एका वर्षांचा परतावा १७ टक्के होता. तर मिडकॅप फंडाचा परतावा १४ ते ३५ टक्क्यांदरम्यान होता. या कालावधीत रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांचा एका वर्षांचा परतावा ६ टक्केसुद्धा नव्हता. मालमत्ता विभाजन या महत्त्वाच्या आणि मूलभूत संकल्पनेशी प्रतारणा करणाऱ्या उथळ गुंतवणूकदारांनी अन्य मालमत्ता प्रकारातून पैसे काढून मिडकॅप फंडात गुंतवणूक केली. खरे तर ती वेळ मिडकॅप फंडातून रक्कम अन्य कमी परतावा देणाऱ्या मालामत्तांकडे वळविण्याची होती. त्यानंतर मिडकॅप समभागांच्या झालेल्या घसरणीने या गुंतवणुकीवरील तोटा ८ ते २० टक्क्यांदरम्यान राहिल्याने हे गुंतवणूकदार मिडकॅप फंडाच्या वाटेला जाण्याचे धाडस करत नाहीत.

सध्या मिडकॅप समभागांचे भांडवली मूल्य ८,८०० ते २७,४०० कोटी रुपयांदरम्यान आहे. मिडकॅप समभाग हे अफाट वृद्धीदर राखण्याची क्षमता असणारे असतात. आणि म्हणूनच अधिक अस्थिरही असतात. सेबीच्या मिडकॅप व्याख्येत बसणाऱ्या म्हणजे भांडवली मूल्यांकनानुसार १०१ ते २५० व्या क्रमांकापर्यंतच्या १५० समभागांचा मागील १० वर्षांचा आढावा घेतल्यास असे आढळून आले की ४६ समभागांचे भांडवली मूल्य तिप्पट झाले. ४७ समभागांचे भांडवली मूल्य दुप्पट झाले. उर्वरित २७ समभागांच्या भांडवली मूल्यात ५० ते १०० टक्के यांदरम्यान वाढ झाली तर ८ समभागांच्या भांडवली मूल्यात १० टक्क्यांपेक्षा कमी वाढ झाली, २० समभागांच्या भांडवली मूल्यात घट झाली, तर २ समभाग १० वर्षांचा इतिहास नसलेले आढळले. इतका वृद्धीदर असलेल्या मिडकॅपची भुरळ न पडलेला गुंतवणूकदार विरळाच.

या फंडाच्या ‘एनएफओ’साठी तयार केलेल्या सादरीकरणानुसार, निधी व्यवस्थापक तुलनेने विविधता असलेला पोर्टफोलिओ ठेवणे आणि प्रत्येक समभाग गुंतवणुकीला ४ टक्क्यांची मर्यादा राखणे हे निश्चित करण्यात आले आहे. फंडाच्या गुंतवणुकीत ५५ ते ६० समभागांचा समावेश राहील आणि हे समभाग खरेदी केल्यावर किमान २-३ वर्षे राखून ठेवण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. वाढीकडे लक्ष केंद्रित करताना ‘ग्रोथ अ‍ॅट रिझनेबल व्हॅल्यू’ या गुंतवणूक तत्त्वज्ञानाचे अनुसरण केले जाईल. एखाद्या नवीन फंडाची शिफारस करताना इतर बाबींचा विचार करावा लागतो. जसे की खर्च, ज्यामध्ये मालमत्ता व्यवस्थापन खर्च जो आवर्ती रूपात असतो. प्रारंभिक खर्च, जो मुख्यत्वे जाहिरात आणि प्रचारासाठी वापरला जातो. गुंतवणूकदारांना आकारले जाणारे शुल्क इत्यादींचा समावेश आहे, जर पूर्वीच्या योजनेतील अंदाजित खर्चामध्ये आणि इतर तत्सम योजनांसाठीच्या प्रत्यक्ष खर्चामध्ये काही तफावत असल्यास, या तफावतीच्या कारणांची फंड घराण्यांकडून केली जाणारी स्पष्टता. योजनेसाठी होणारे खर्च परताव्याचा मोठा हिस्सा व्यापतात. म्हणूनच होणाऱ्या खर्चाचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक असते. ‘एनएफओ’ घेऊन येणाऱ्या फंड घराण्याचा आणि फंड व्यवस्थापकाचा इतिहास तपासणेदेखील आवश्यक आहे. फंडांच्या सुसूत्रीकरणाआधी अव्वल कामगिरी करणारे जे मिडकॅप फंड होते त्या फंडात कॅनरा रोबेको इमìजग इक्विटीज आणि प्रिन्सिपल इमर्जिंग ब्लूचीप या फंडांचा समावेश होता. या पैकी कॅनरा रोबेको इमìजग इक्विटीज या फंडाचे यशस्वी व्यवस्थापन केलेले रवि गोपालकृष्णन हे आता प्रिन्सिपल फंड घराण्यात समभाग गुंतवणुकीचे प्रमुख म्हणून दाखल झाले आहेत. निधी व्यवस्थापकाची योग्यता आणि अनुभव फंडाच्या कामगिरीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. नवीन फंड असल्याने फंड व्यवस्थापकाच्या अन्य फंडाच्या कामगिरीचे विश्लेषण करणे आवश्यक असते. या फंडाचे निधी व्यवस्थापक रवि गोपालकृष्णन आणि सुधीर केडिया यांच्या अन्य फंडाची कामगिरी समाधानकारक असल्याने या फंडाच्या माध्यमातून संपत्तीची निर्मिती करण्यात ही जोडी यशस्वी होईल असे मानण्यास वाव असल्याने या फंडाची नव्याने गुंतवणुकीसाठी शिफारस करावीशी वाटली.

shreeyachebaba@gmail.com