03 December 2020

News Flash

अर्थ वल्लभ : स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय

हल्ली अनेक गुंतवणूकदार एक्स्चेंज ट्रेडेड (ईटीएफ) फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात.

(संग्रहित छायाचित्र)

वसंत माधव कुळकर्णी

कोणत्याही एका फंडाची शिफारस आजच्या लेखातून नाही. म्युच्युअल फंड विश्लेषक या नात्याने गुंतवणूकदारांच्या वर्तनाचे २५ वर्षे केलेल्या निरीक्षणाचे सार मांडायचा प्रयत्न आहे. मागील अनेक वर्षांत वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांशी संबंध आला. नोकरीत असताना, कंपनीच्या संचालकांची गुंतवणूकविषयक निर्णय घेणारी समिती असो एखादा वाचक किंवा पहिल्यांदा म्युच्युअल फंड या साधनाचा अनुभव घेऊ इच्छिणारा नवगुंतवणूकदार असो, गुंतवणूकदार सहसा नवख्या वाटेवर चालणे पसंत करीत नाही. अशा पूर्वग्रहांमुळे चांगल्या उत्पादनांना तो कसा मुकतो याचा अनेकदा अनुभव घेतला आहे. अनेकदा गुंतवणूकदारांच्या फंड निवडीचा परीघ बँकांनी प्रवर्तित केलेल्या फंड घराण्यांपुरता मर्यादित असतो. हल्ली अनेक गुंतवणूकदार एक्स्चेंज ट्रेडेड (ईटीएफ) फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात. मागील एका वर्षांत ईटीएफने दिलेला सर्वाधिक अव्वल परतावा ८.८७ टक्के आहे. यापेक्षा पाच लार्जकॅप फंडांनी अधिक परतावा दिलेला आहे. सर्वाधिक परतावा, कॅनरा रोबेको, ब्लूचीप, यूटीआय मास्टर शेअर, अ‍ॅक्सिस ब्लूचीप, आयडीएफसी लार्ज कॅप या फंडांनी दिला आहे.

अनेक बँका त्यांनी प्रवर्तित केलेल्या फंड घराण्यांचे फंड विकतात. स्टेट बँकवगळता अन्य राष्ट्रीयीकृत बँका म्युच्युअल फंड वितरणात फार सक्रिय असल्याचे आढळत नाही. स्टेट बँक ही एसबीआय म्युच्युअल फंडाची शिफारस करते. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युनियन बँक या सारख्या बँकांचे म्युच्युअल फंड असले तरी या फंड घराण्यांच्या मालमत्ता पाहता बँका आपल्या ग्राहकांना त्यांच्या फंड घराण्यांच्या फंडात गुंतवणूक करण्यास ग्राहकांना प्रवृत्त करीत असतील असे वाटत नाही. कॅनरा रोबेकोचे सर्वच फंड अव्वलस्थानी असून देखील हे फंड घराणे मालमत्ता क्रमवारीत मागे पडलेले दिसते. एलआयसी एमएफ या फंड घराण्याचे फंड क्रिसिल क्रमवारीत अव्वल स्थानी असून देखील डोळ्यावर झापड ओढलेले सल्लागार या फंडाची शिफारस करीत नाहीत. फंड घराणी नसलेल्या खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँका फंड वितरणात शीर्ष पाच फंड घराण्यांपलीकडे जात नाहीत. म्युच्युअल फंड वितरणात ‘वेल्थ मॅनेजर्स’सुद्धा ते विकत असलेल्या फंड घराण्यांच्या पलीकडे जाण्यास फार उत्सुक नसतात. वर उल्लेख केलेल्या चांगली कामगिरी असलेल्या फंडांना बँकांनी किंवा ‘वेल्थ मॅनेजर्स’नी सुद्धा आपल्या शिफारसप्राप्त फंडात स्थान दिलेले नाही. प्रत्येक बँक किंवा ‘वेल्थ मॅनेजर्स’ची कोणते फंड विकायचे हे ठरविण्याची एक पद्धत असते. एकदा का एखादा फंड बँकेच्या ग्राहकांना विकण्याची मान्यता परवानगी मिळाली की फंडाची कामगिरी कितीही खालावली तरी या फंडाला ‘मान्यताप्राप्त’ फंडांच्या यादीतून डच्चू मिळत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एचडीएफसी  टॉप १००! या फंडाने मागील पाच वर्षांत एकाही वर्षांत निर्देशांकापेक्षा अधिक परतावा दिलेला नसूनही हा फंड एचडीएफसी बँकेच्या शिफारसप्राप्त फंडांच्या यादीत अव्वलस्थानी असलेला फंड आहे.

गुंतवणुकीबाबत सल्ला घेण्यासाठी आमच्याकडे आलेल्या बऱ्याच गुंतवणूकदारांकडे एक कर-बचत फंड, एक हायब्रीड इक्विटी फंड आणि एखादा लार्जकॅप (बहुदा शीर्ष पाच घराण्यांपैकी एक) फंड असतो.  या पोर्टफोलिओचे उद्दिष्ट काय आहे हे फंड का आहेत या बाबत गुंतवणूकदार अंधारात असतात. सर्वसाधारण असा समज आहे की म्युच्युअल फंड गुंतवणूक सुरू करण्यासाठी हे फंड पुरेसे आहेत. परंतु संपत्ती निर्मितीबरोबर रोकड सुलभता आणि पोर्टफोलिओच्या संरक्षणासाठी (हेजिंग) रणनीतीचा अभाव असल्याचे दिसले. बँकेच्या ‘आरएम’नी आपल्या ग्राहकांना विकलेल्या गुंतवणुकांची फेररचना करीत असताना गुंतवणूकदारांच्या गरजांची विशेष काळजी घेण्यात आल्याचे दिसत नाही. अनेकदा गुंतवणूकदार त्यांच्या गरजांबाबत स्वत:च अनभिज्ञ असतात. गुंतवणूकदारांच्या गरजा गुंतवणूकदाराशी केलेल्या औपचारिक आणि अनौपचारिक चर्चेतून जाणून घेता येतात. साहसी गुंतवणूक रणनीतीचा वापर करताना, पराग पारिख लॉंग टर्म इक्विटी सारखा, ३० टक्के अमेरिकेतील कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणाऱ्या फंडाची शिफारस सुरक्षितता म्हणून करण्यात येते. पोर्टफोलिओच्या ढाच्यानुसार पीजीआयएम ग्लोबल इक्विटी अपॉच्र्युनिटीज फंडासारख्या एखाद्या आंतरराष्ट्रीय फंडाचा समावेश गरजेनुसार केलेला आहे. अनेक गुंतवणूकदारांना हे माहित नव्हते की बहुतेक उच्च बीटा असलेल्या इतर फंडांमध्ये संरक्षणात्मक रणनीतीचा अभाव असल्याने संतुलन राखण्यासाठी अशा संरक्षणात्मक रणनीतीची गरज असते. डॉक्टर रोग्याला प्रतिजैवकाच्या जोडीला एखादी जीवनसत्त्वाची गोळी देतात तसे गुंतवणुकीतसुद्धा अशी रणनीती आवश्यक असते. अनेक गुंतवणूकदारांच्या वित्तीय ध्येयांच्या यादीत मुलांच्या परदेशातील शिक्षणासाठी तरतूद हे वित्तीय ध्येय असते. अशा वित्तीय ध्येयासाठी केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत एक लार्जकॅप आणि एखादा हायब्रीड इक्विटी फंड बहुदा दिसून येतो. हे फंड पुरेसे नसल्याने परदेशातील शिक्षणाचा खर्च डॉलरबरोबरच्या विनिमय दरावर निर्धारित असल्याने रुपयाच्या विनिमय मूल्यात घसरणीच्या परिणामाची झळ सुसह्य़ असावी यासाठी मध्यम ते अल्प प्रमाणात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणारे फंड गुंतवणुकीत गरजेचे असतात. सप्टेंबर २०२० मध्ये परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या एका मुलाच्या पालकांच्या गुंतवणुकीत मागील दोन वर्षांपासून टप्प्याटप्प्याने वाढविलेले आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणाऱ्या फंडामुळे बाजार आणि चलन घसरणीची झळ बसली नसल्याचे दिसून येत आहे. परंतु महामारीमुळे बहुदा या वर्षीसाठी परदेशात जाणे रहित केले हा भाग निराळा.

अनुभवासारखा गुरू नाही असे म्हणतात ते खरे आहे. ज्या गोष्टी आपण स्वानुभवातून शिकतो त्या कधी विसरत नाही. विश्लेषक होण्यापूर्वी मी चांगला गुंतवणूकदार होतो. केव्हा काय करावे हे माहीत होते, का करावे हे माहीत नव्हते. जेव्हा बाजारात मोठी घसरण होते तेव्हा आणखी खरेदी करायला हवी याबद्दल माहिती होती. परंतु नेमक्या कोणत्या फंडात गुंतवणूक करावी याबद्दल आम्हा मित्रांच्यात एकवाक्यता होत नव्हती. मी पहिल्यांदा (बेंचमार्क) ईटीएफबद्दल ऐकले होते. माझ्यासारख्या छोटय़ा गुंतवणूकदारासाठी रोकड सुलभतेअभावी थोडी थोडी गुंतवणूक करणे शक्य झाले. आणि ते पुरेसे होते. यावेळी निर्देशांक, ज्युनिअर निफ्टी याबद्दलसुद्धा ऐकले होते. त्यावेळेपासून जेव्हा जेव्हा बाजारात १० टक्कय़ांपेक्षा अधिक घसरण होते तेव्हा इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करणे ही सगळ्यात चांगली गोष्ट असते. हा चांगला धडा एका अनुभवातून शिकायला मिळाला. लोकसत्ता अर्थवृत्तान्तमध्ये १० जून २०१३ रोजी ‘निफ्टी बीझ एक परिपूर्ण गुंतवणूक पर्याय’ हा लेख आणि २०१४ मध्ये वित्तीय नियोजनाचे सदर लिहिताना हा अनुभव कामी आला. आजच्या सारखा इंडेक्स फंडांचा प्रचार २०१३ मध्ये नक्कीच नव्हता. म्हणून त्या काळी जेव्हा गुंतवणुकीसाठी इंडेक्स फंडांचा पर्याय सुचविला तेव्हा ही सूचना अनेकांच्या पचनी पडली नाही. अनेकांना अशा परिस्थितीत थेट समभागात गुंतवणूक करावे असे वाटत असे. ज्या कोणी थेट समभागात गुंतवणूक केली असेल त्यांना समभागातील टोकाच्या ध्रुवीकरणामुळे किती नफा झाला असेल ते तेच सांगू शकतील. परंतु ज्या कोणी इंडेक्स फंडांचा पर्याय स्वीकारला असेल त्यांना नक्कीच नफा झाला असल्याचे खात्रीपूर्वक सांगता येईल.

अनेकदा जे लोकप्रिय असते ते आपल्यासाठी चांगले असतेच असे नाही. म्हणूनच गुंतवणुकीबाबत सार्वजनिक मंचावर किंवा समाजमाध्यमातून सल्ला घेणे टाळायला हवे. ज्या कोणाला गुंतवणूक करायची असेल त्यांनी कुठे गुंतवणूक करावी या ऐवजी कोणाचा सल्ला घ्यावा यात अधिक वेळ खर्च करायला हवा. चांगला सल्लागार तुम्हाला नेहमीच गुणवत्तेची खात्री असलेली आणि तुमच्या गरजांची पूर्तता करणारी उत्पादने सुचवेल. या लेखनामागचा तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा वित्त जगतात नेहमीच नवीन सेवा आणि उत्पादनांचा उदय होत असतो. व्यावसायिक गुंतवणूक सल्लागार चौकटीच्या बाहेरचा विचार करू शकतो. तुमचा सल्लागार व्यावसायिक आहे की हौशी (पूर्णवेळ की अर्धवेळ) यावर गुंतवणूकदारांचा परतावा ठरत असतो. ‘लोकसत्ताकर्ते म्युच्युअल फंड’ किंवा अन्य शिफारसप्राप्त फंडांची गुणवत्ता तपासल्यानंतरच त्यांची शिफारस होते. सखोल संशोधनावर आधारित निवडीची प्रक्रिया असून ढोबळमानाने त्यात फारसा बदल होत नसला तरी निर्देशांकाच्या पातळीनुसार मिडकॅप, लार्जकॅप समभाग आणि रोखे यांचे प्रमाण आपआपल्या जोखमांकानुसार निश्चित होत असते. गुंतवणुकीत एखाद्या फंड घराण्याचे, नाममुद्रेचे किंवा निधी व्यवस्थापकाचे अंधभक्त होण्यापेक्षा गुंतवणूक निवडीच्या मूलतत्त्वांचा भक्त होणे कधीही हिताचे असते. समाधानकारक परतावा मिळाला नाही म्हणून सल्लागार, निधी व्यवस्थापक, यांना दोष देण्यापेक्षा आपल्या गुंतवणूक वर्तनाचे पुनरावलोकन केल्यास सरलेल्या वर्षांतील चुका कळून येतील. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या सणादिवशी यापेक्षा अधिक चांगला संकल्प नसेल.

*   सुनील सुब्रमण्यम

व्यवस्थापकीय संचालक

सुंदरम म्युच्युअल फंड

ही दिवाळी ही ‘थँक्सगिव्हिंग दिवाळी’ आहे. कारण भयानक साथीच्या सर्वात वाईट परिस्थितीतून आपण वाचलो आहोत. भाग्यवान आहोत आणि नवीन आशावादासोबत नवीन वर्षांचे स्वागत करू या!! म्हणूनच ‘दुसऱ्याला काही देण्याच्या’ या भावनेचे आपले विचारांवर कृतीत आणू या. मार्च महिन्यातील तीव्र घसरणीनंतर, ‘व्ही’ आकाराची उसळी घेतलेला बाजारामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्या नफ्यातील १ टक्का बाजूला काढून आपल्या पसंतीच्या एखाद्या गरजू व्यक्तीची दिवाळी उजळूया. दिवाळीचा उजेड  समाजातील उदासीन भागात पोहचेल यासाठी आपले योगदानाच्या रूपाने शुभेच्छा देऊ.

*   रजनीश नरुला

मुख्य कार्यकारी अधिकारी,

कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना दिवाळीच्या शुभेच्छा. भारताच्या दीर्घकालीन अर्थवृद्धीत करोना संकटाने आणलेली बाधा तात्पुरती आहे. परिणामी भारतीय कंपनी जगतात कार्यक्षमता वाढली आणि उत्पादनाच्या व सेवांच्या डिजिटल वापरात वाढ झाली. आपली अर्थव्यवस्था दीर्घ मुदतीच्या वाढीच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. म्युच्युअल फंड हे  एक दीर्घकालीन ध्येय साध्य करण्यास आदर्श साधन आहे. सगळ्यांच्या जीवनात दिवाळीचा सण आशा आणि आत्मविश्वास परत आणणारा ठरावा यासाठी शुभेच्छा.

*   कल्पेन पारेख

डीएसपी म्युच्युअल फंड 

बाजारातील अस्थिरतेचा समभाग गुंतवणुकीवर परिणाम तात्पुरता असतो. समभाग गुंतवणुकीचा दीर्घ कालावधीत परतावा सर्व मालमत्तांपेक्षा अधिक असतो. विवेकी गुंतवणूकदार मालमत्तेचे विभाजन करताना हायब्रीड फंडांवर विचार करू शकतात. या फंडात समभाग आणि कर्जरोख्यांत गुंतवणूक असते. ज्यामुळे बाजारातील अस्थिरतेचा कमी परिणाम होतो.

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 12:45 am

Web Title: article on mutual fund analysts abn 97
Next Stories
1 कर बोध : प्राप्तिकर विवरणपत्र कोणी, कसे भरावे?
2 माझा पोर्टफोलियो : वित्तीय क्षेत्रात मूल्यात्मक गुंतवणूक संधी
3 बंदा रुपया : व्यावसायिकता-समाजभानाची ‘युनिटी’
Just Now!
X