वसंत माधव कुळकर्णी

‘‘मागील परतावा हा फंडाच्या भविष्यातील परताव्याची खात्री देऊ शकत नाही. म्हणून गुंतवणुकीसाठी फंड निवड करताना परताव्याकडे पाहू नका.’’ असा वैधानिक इशारा ‘सेबी’ नेहमीच देत असते, तरीसुद्धा बहुसंख्य गुंतवणूकदार फंडाच्या भूतकाळातील परताव्याच्या निकषावर फंडाची निवड करतात. निधी व्यवस्थापकाने घेतलेल्या जोखमीच्या तुलनेत कसा परतावा मिळविला आहे हे पाहून फंड निवड करण्याच्या निकषाला जगभरात मान्यता मिळाली आहे. निर्देशांकाच्या तुलनेत उत्तम जोखीम व्यवस्थापित केलेल्या निधी व्यवस्थापकांचा शोध घेणाऱ्या मालिकेतील कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक श्रीदत्त भांडवलदार हे जोखीम परतावा समतोल उत्तम सांभाळलेले निधी व्यवस्थापक ठरले.

सर्व निधी व्यवस्थापकांची १ जुलै २०१५ ते ३० जून २०२० या कालावधीतील कामगिरी ‘शार्प रेशो’च्या आधारे निश्चित करण्यासाठी ४१ निधी व्यवस्थापकांची कामागिरी तपासली. उपलब्ध आधार बिंदू वापरून पहिल्या टप्प्यात सर्वात उत्तम जोखीम परतावा संतुलन राखलेले १० निधी व्यवस्थापक निश्चित केले. या १० निधी व्यवस्थापकांच्या कामगिरीला आणखी कठोर निकषांची चाळणी लावत या मालिकेसाठी चार निधी व्यवस्थापकांची निवड केली. गुंतवणूकदारांना जोखीम समायोजित सर्वोत्तम परतावा दिलेल्या या चार निधी व्यवस्थापकांच्या कामगिरीची ओळख करून देण्याच्या मालिकेतील हा शेवटचा भाग आहे.

मागील पाच वर्षे बाजारासाठी सर्वाधिक अस्थिर राहिलेली वर्षे आहेत. या पाच वर्षांत गुंतवणूकदारांची जोखीम व्यवस्थापित करण्यात कॅनरा रोबेको हे सर्वात यशस्वी फंड घराणे ठरले. पाच वर्षांत नावाजलेले निधी व्यवस्थापक ‘अल्फा’ (मानदंडापेक्षा अधिक परतावा) निर्माण करण्यात अयशस्वी ठरले असताना कॅनरा रोबेको फंड घराण्याचे समभाग गुंतवणूक प्रमुख आणि निधी व्यवस्थापक म्हणून श्रीदत्त भांडवलदार यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करायचे तर त्यांना ‘निसरडय़ा धावपट्टीवरील शतकवीर’ असे म्हणणे योग्य ठरेल. परंतु एक गोष्ट आवर्जून नमूद करायला हवी ती म्हणजे श्रीदत्त भांडवलदार यांची निधी व्यवस्थापक म्हणून ५ जुलै २०१६ पासून नेमणूक झाली.

‘‘आम्ही नेहमीच मूल्यांकनापेक्षा व्यवसायातून निर्माण होणाऱ्या रोकडसुलभ नफ्याला अग्रक्रम देतो. याच कारणांनी कितीही मूल्यांकनाला तुलनेने कमी महत्त्व देतो. मूल्यांकन आकर्षक वाटले तरी एखादा अपवाद वगळता आम्ही धातू आणि खनिकर्म व्यवसायातील कंपन्यांत गुंतवणूक केलेली नाही. आमच्या दृष्टीने जे व्यवसाय ‘रिटर्न ऑन इक्विटी’ आणि ‘रिटर्न ऑन कॅपिटल’ निर्माण करू शकत नाहीत, ते संपत्तीची निर्मिती करू शकत नाहीत.’’ इतके स्पष्ट बोलणारे निधी व्यवस्थापक असलेल्या फंडांची मागील पाच वर्षांत कामगिरी चमकदार झाली नसती तरच नवल.

‘‘चांगले व्यवसाय जे गुंतवणूकदारांसाठी संपत्तीची निर्मिती करू शकतील अशा व्यवसायात आमची गुंतवणूक करायची तयारी असते. आमचे फंड घराणे कायम एखाद्या कंपनीपेक्षा व्यवसायाकडे अधिक लक्ष देते. उद्योग व्यवसाय निश्चित केल्यानंतर आम्ही कंपन्यांकडे वळतो. एखादा व्यवसाय चांगला असेल पण तो व्यवसाय सांभाळणाऱ्याची नियत चांगली नसेल तर त्या व्यवसायात सोने जरी पेरले तरी माती होते. ज्यांची नियत खराब आहे असे प्रवर्तक आम्ही टाळले आहेत. प्रत्येक व्यवसायासाठी चांगले-वाईट दिवस येतच असतात. चांगले दिवस आले म्हणून आम्ही गुंतवणूक वाढवत नाही किंवा वाईट दिवस आले म्हणून समभाग विकून टाकत नाही. चांगले समभाग हे चांगल्या मित्रासारखे असतात,’’ असे भांडवलदार यांचे म्हणणे आहे.

‘मॅन इज नोन बाय कंपनी ही कीप्स’ अशी इंग्रजी म्हण आहे तसेच ‘द पोर्टफोलिओ मॅनेजर नोन बाय द बिझनेसेस ही ओन्स’ असे त्यांचे सांगणे असते. ‘‘आखूड शिंगी आणि बहुदुधी गाय बाजारात मिळत नाही. तुम्हाला एफएमसीजी क्षेत्रातील व्यवसायातून भरघोस नफा कमावणारी कंपनी कधीच स्वस्त मिळणार नाही. या व्यवसायातील एका बहुराष्ट्रीय कंपनीचा सर्वात कमी ‘पी/ई’ २५ होता आणि तो सुद्धा २००८ च्या वैश्विक वित्तीय संकटाच्या काळात. हा अपवाद वगळता आमच्या गुंतवणुकीत दीर्घकाल असलेल्या या कंपनीचे मूल्यांकन सरासरी ५० ते ७० पी/ई दरम्यान राहिलेले आहे. या मूल्यांकनाला गुंतवणूक करून देखील गुंतवणूकदारांना नफा झाला आहे. भांडवली वस्तू उद्योगांच्या बाबतीत बोलायचे तर या कंपन्यांचे मूल्यांकन कमी असते, परंतु ते गुंतवणूकदारांना चकवा देणारे ठरते. व्याजदर कमी झाले, खेळत्या भांडवलाच्या खर्चात बचत झाली म्हणून आम्ही भांडवली वस्तू उद्योगातील कंपन्या खरेदी करत नाही. आमच्यासाठी व्यवसायातील रोख नफ्याची टक्केवारी किती हे महत्त्वाचे आहे. आम्ही ‘एनबीएफसी’मध्ये कधीच अवास्तव गुंतवणूक केली नाही. वेळीच आम्ही आमच्या गुंतवणुका काढून घेतल्या. औषध निर्मिती आणि आरोग्य निगा क्षेत्रात आम्ही आमच्या गुंतवणुकीचा परीघ महाग मूल्यांकन असलेल्या परंतु एकाधिकारशाही असल्याने नफाक्षम उत्पादने असणाऱ्या कंपन्यांना महत्त्व देणारे राखले. या क्षेत्रातील आमची गुंतवणूक असलेल्या कंपन्यांची संख्या पाचपेक्षा अधिक नाही. आम्ही मागील पाच वर्षांत अनेक गुंतवणूक केलेल्या कंपन्यांतून वेळीच नफावसुली केली. शेवटी हा गुंतवणूकदारांच्या कष्टाचा पैसा असल्याने अवास्तव जोखीम आम्ही कधीही घेतली नाही आणि मला वाटते हेच आमच्या यशाचे गमक आहे.’’ कॅनरा रोबेको फंड घराण्याच्या यशाचे गमक भांडवलदार यांनी यातून विशद केले.

निधी व्यवस्थापक अतिरिक्त जोखीम स्वीकारून अधिक परतावा मिळविण्यापेक्षा कमी जोखीम घेऊन कमी परतावा देतो तेव्हा त्या निधी व्यवस्थापकाने भांडवलाच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष दिलेले असते. एखाद्या निधी व्यवस्थापकाची कामगिरी त्याने मिळविलेल्या परताव्यावर न ठरता त्याच्या कामगिरीचे मूल्यमापन निधी व्यवस्थापकाच्या वेगवेगळ्या कालखंडातील प्रमाणित विचलनावर (जोखमीनुसार) ठरायला हवे. ‘शार्प रेशो’ हे  जोखीम-समायोजनाचे मानक आहे. एक एकक परतावा मिळविण्यासाठी किती एकक जोखीम स्वीकारली हे ‘शार्प रेशो’ सांगतो. कायम चांगला (अधिक परतावा) देणाऱ्या फंडांच्या शोधात असणारे गुंतवणूकदार आपल्या सल्लागाराला फंड घराण्यापेक्षा इथून पुढे फंडाचे निधी व्यवस्थापक कोण आणि त्यांनी जोखमीचे व्यवस्थापन कसे केले हे सांगा, असा प्रश्न विचारला तर ते या लेखमालिकेचे यश ठरेल. निधी व्यवस्थापकांच्या जोखीम व्यवस्थापनाची ओळख करून देणाऱ्या या मालिकेने केवळ परतावा महत्त्वाचा नाही तर जोखीम व्यवस्थापित करणाऱ्या समायोजित परताव्याचे महत्त्व गुंतवणूकदारांच्या मनात नक्कीच अधोरेखित केले असेल अशी आशा वाटते.

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर