नवीन काही बघणे, अनुभवणे ही प्रत्येकाची एक स्वाभाविक उत्कट भावना. मन रिझवण्यासाठी, क्षणभर आनंद, रोमांचासाठी असे नवे काही अनुभवण्याची आस प्रत्येकात असतेच. लोकांच्या जगण्याच्या या रंजनसूत्राला एका पूर्ण प्रक्रिया अन् प्रकल्पाचे रूपही देता येते. याच गरजेतून सहनिर्मितीची नवोन्मेषी प्रयत्न आकाराला आला. नागपूरच्या काटोलमधील खाणगांवच्या शेतकरी कुटुंबातील तरुणांनी तो करू घातला. सुरुवातीच्या स्वयंसेवी तळमळीचे पुढे मग ओघानेच व्यवसायात रूपांतर झाले. बघताबघता साहसी क्रीडा प्रकाराच्या संपूर्ण साखळीत कार्यरत नेल इंडिया अ‍ॅडव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या देशस्तरावर नाव गाजवणाऱ्या कंपनीचे रूप त्याने धारण केले. खेळातील सवंगडीच ते, पण आता त्यांच्याकडून लोकांसाठी विकसित शरीराला जोम, कृतिशील रंजन देणाऱ्या साधनांच्या बहरलेल्या व्यवसायाचे ते भागीदार बनले आहेत. पंकज कुमेरिया आणि नितीन बराय्या या तरुणांचा हा येथवरचा प्रवास खरेच थक्क करणारा आहे.

वयानुसार माणसाचा, त्याच्या जीवनाचा एक उपयुक्त पोत तयार होत असतो. हातावर पोट असणाऱ्या अनेकांसाठी तर रोजचं जगणंच जिकिरीचं, हेही खरेच. त्यांच्या दृष्टीने दिवस निभावून नेणे इतकंच त्याचं महत्त्व. तर ठरावीक चाकोरीतील त्याच त्या जगण्याचा अनेकांना वीट आलेला असतो. विरंगुळा, मनोरंजन, खेळ, मौजमजेची साधने, क्षणिक आनंद मग अशांची एक न टाळता येणारी आवश्यकताच असते. जगणे सुकर करणारी फुरसत, रूटीन रटाळतेपासून दूर नेणारी हटके अनुभूती आजच्या समाजजीवनाची गरज बनली आहे. ही गरजच नेल इंडिया अ‍ॅडव्हेंचर्सची जननी ठरली. तिचा हा जन्म शहरापासून दूर विदर्भाच्या शिवारातील मातीतून झाला. तिने बाळसे धरले पुणे जिल्ह्य़ातील कोरेगाव-भीमानजीकच्या वढू गावातील गोदामवजा जागेत. आता सबंध देशच तिचे खेळण्या-बागडण्याचे अंगण बनले आहे.

पंकज आणि नितीन यांच्याकडे काही खास कसब नव्हते. उपयुक्त शिक्षण-प्रशिक्षणाच्या सोयी तर नव्हत्याच नव्हत्या. केवळ तग, तळमळ आणि वेड ठरविली जाईल अशी जिज्ञासू वृत्ती होती. तेच त्यांचे मोठे भांडवलही ठरले आणि त्यापायीच ध्यास-छंदाचेच व्यवसायात रूपांतरणाचे ते आज जागता नमुना ठरले आहेत. मळलेली वाट सोडण्याची ऊर्मी, पाहिलेल्या स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी वाटय़ाला येईल ती मेहनत करण्याची रग त्यांनी दाखविली. मुळात जागेपणी पाहिलेली स्वप्नं साकारता येऊ शकतात ही आशा नव्हे तर ठाम विश्वास त्यांच्या ठायी होता. २०१२ साली या ‘वेडे’पणाला सुरुवात झाली. सकाळी शाळेला जाण्यापूर्वी शेतात पिकाला पाणी देणं, गुरं चारायला सोडायची आणि शाळेतून परतल्यावर गुरं बांधून घेतली की, यांची शोध-अभ्यास मोहीम सुरू व्हायची. शहरात जाऊन सायबर कॅफेतील तास-दोन तासांची ‘गुगल गुरूं’ची शिकवणी हाच त्यांचा १२वीपर्यंतचा नित्यक्रम बनला होता. नितीन सांगतात – ‘माहिती-फोटो गोळा करीत गेलो. ते पाहून काही वस्तू घडवण्याला सुरुवात केली. काही घडल्या, अनेक बिघडल्या. त्या मोडून पुन्हा नव्याने काही घडविण्यासाठी जोडकाम हेच आमचे काही काळ सुरू होते.’

सुरुवात एका क्लाइिम्बग वॉलपासून झाली. फॅब्रिकेशनद्वारे ४० फुटांचा कृत्रिम मनोरा उभा केला गेला. ‘आमच्या दृष्टीने ती मोठी कर्तबगारी होती. अर्थात आमच्या क्रीडा शिक्षकांनी त्याकामी मोलाचे मार्गदर्शन केले,’ असे नितीन यांनी सांगितले. पुढे त्यायोगे नागपुरातील मुलांसाठी साहसी क्रीडा शिबिरांचे आयोजन एका एनजीओच्या स्थापनेतून सुरू झाले. ना-नफा तत्त्वावरच्या या कामासाठी पदरमोड करून बऱ्याच साजसामानांची जुळवाजुळव केली. निवासी शिबीर असल्याने टेन्ट्स, टॉयलेट्स बनविले गेले. पण नागपूरपासून दूर खाणगावात कुणाला आपल्या मुलांना पाठवावेसे वाटेल आणि कितीशी मुलं येतील, हे लागलीच ध्यानात आले. पंकज म्हणाले, ‘लवकरच हा मोह आवरता घेणे मग भाग पडले. त्या काळातील जड गेलेल्या या निर्णयाच्या व्यावहारिक शहाणपणाचे मोल आज आमच्या ध्यानात येते.’

कंपनी सुरू करून त्याला व्यवसायाचे रूप देण्याचा निर्णय तडक झाला. या उद्यम साहसाची चाचपणी म्हणून दिल्लीवारीही केली. हाती फारसे काही लागले नाही. पण हा खर्च वाया जाऊ नये म्हणून गाठीशी असलेल्या सर्व पशातून, दिल्लीच्या सदर बाजारातून घाऊक किमतीत पर्स, सँडल, गॉगल्स, शर्ट्स-पँट्स खरेदी करून, त्या वस्तू गावात आणून विकल्या. त्यातून आलेल्या मुद्दल-नफ्यातून एक पसाही स्वत:साठी खर्च केला नाही. जमा १५ हजार रुपयांच्या बीज भांडवलातून १० सप्टेंबर २०१५ ला नेल इंडियाने जन्म घेतला. दोन हजारांहून अधिक वर्षांच्या नगर संस्कृतीचा वारसा असलेल्या छत्तीसगड-रायपूरमधील त्रेता युगातील स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूरमध्ये साहसी क्रीडा शिबिरासंबंधी जाहिरात आली. हे कंपनीचे पहिले काम बरीच मेहनत व घासाघीस करून हाती आले. पुढे बिहारमधील ख्यातनाम दशरथ मांझी पहाडानजीकच्या पांडू पोखर येथे, कान्हा राष्ट्रीय उद्यानात एक कायमस्वरूपी साहसी शिबीरस्थळ बनविण्याची कामे आली. पंकज सांगतात, ‘कान्हातील ते काम म्हणजे आमच्या अयुष्यातील पहिले १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले काम होते. ठरलेल्या वेळेपेक्षा कितीतरी कमी वेळेत आम्ही ते पूर्ण केले. त्या गुडविलमधून त्यांच्याचकरवी आम्हाला इतरत्र आणखी दोन-तीन कामे मिळाली. त्यानंतर मागे वळून पाहण्याची वेळच आली नाही.’

खाणगावमध्ये राज्य महामार्गानजीक असलेल्या कुटुंबाच्या मालकीच्या शेतजमिनीत छोटेखानी वर्कशॉप थाटून काम सुरू झाले. बीज रुजून कोंब फुटण्याचे ते सुरुवातीचे दिवस होते. व्यवसाय वाढायचा तर दृश्यमानता वाढली पाहिजे. या गरजेतून मग नागपूरमध्ये ४,००० चौरस फुटांच्या जागेत काम सुरू झाले. वेगवेगळ्या ठिकाणी वाढत गेलेला कामाचा व्याप हाच लाभांश-नफा आणि व्यवसाय वाढविण्याचे भांडवलही. अडवणूक, फसवणुकीचे प्रसंगही आले आणि सुधारणेच्या दिशेने शिकवण देऊन गेले. पुढे एक एक पाऊल तोलून-मापून आणि चोख हिशेबी पडत गेले. पुण्यात वढूमध्ये फॅक्टरीसाठी २२ हजार चौरस फुटांच्या जागेच्या खरेदीचा निर्णयही याच हिशेबातून झाला. शेजारीच नेल इंडियाने विकसित केलेल्या पार्कची जागा, कंपनीकडे येणाऱ्या ग्राहकांना दाखविण्यासाठी आयते प्रात्यक्षिकच म्हणून कामाला येईल, असा त्या निर्णयामागील तर्क खरेच उपयुक्त सिद्ध झाला. पुण्यात औंधमध्ये कार्यालय सुरू झाले. नेल इंडिया परिवारात आशीष यांची गुणात्मक भर पडली. आमच्या हिकमती कारागिरीला पेशाने आर्किटेक्ट असलेले आशीष यांच्या अचूक वास्तुआरेखनाची जोड मिळाली. वेतनासाठी फारशी कटकट न करणाऱ्या, काटोलमधील गावातूनच आलेली जीव लावणारी पोरं कामगार म्हणून मदतीला आले. यातील बरेचसे गावाने ओवाळून टाकलेले, शेतीसाठी बिनकामाचे आणि व्यसनांच्या आहारी गेलेली होती. त्यांना कामा-धंद्याला लावल्याबद्दल गावकऱ्यांकडून अधिकचे दुआ-आशीर्वाद मिळाले.

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये कुफरी, सिमला येथील भारतातील पहिल्यावहिल्या केबल टू रेल प्रकारातील रोलर-कोस्टर झिपलाइनचे काम नेल इंडियाने पूर्णत्वास नेले. देशातील नव्हे संपूर्ण आशियातील ही अजोड कामगिरी ठरली आहे. वेगवेगळ्या राइड्स, रोप कोस्रेस, रॉकेट इजेक्शन, बन्जी ट्रॅम्पोलिन, ह्य़ुमन गायरो, झॉर्ब बॉल ही कंपनीची वैशिष्टय़े ठरली आहेत. या एक एक विकसित उत्पादनाची स्वतंत्र जन्मकथा आहे. पंकज आणि नितीन त्यांना ‘अ‍ॅक्टिव्हिटीज’ म्हणतात. लोकांसाठी असलेल्या या अ‍ॅक्टिव्हिटीज हीच त्यांची उत्पादन रेखा, संरचनाप्रक्रिया आणि अर्थप्रक्रियाही! नवनव्या कल्पनांचे चक्र डोक्यात सतत सुरू असते. अनुभव, निरीक्षणाचा अँटेनाही सतत ऑन असतोच. काही नवीन सुचलं, दिसलं तर मित्रही कळवत असतातच, असे पंकज सांगतात. देशभरातील सनिक शाळा, निवासी महाविद्यालये,  तारांकित रिसॉर्ट्स, वॉटर पार्क्‍स, साहसी उद्याने अशी दीडशेच्या घरातील समाधानी ग्राहकांची पुंजी त्यातून उत्तरोत्तर वाढतच चालली आहे.

वयाच्या १७ व्या वर्षी खेळावाटेच सुरू झालेल्या या उद्यम साहसातून, गद्धेपंचविशीतच यशस्वी उद्योगाची कमान उभारली गेली आहे. लोकांना जगणे सुकर करण्याच्या या यत्नातून या तरुणांच्या जगण्यालाही आकार मिळत गेला. जगण्याला भिडणे शिकविणारा हा त्यांचा जोमदार प्रवास विरळाच.

– सचिन रोहेकर

पंकज कुमेरिया, नितीन बराय्या

नेल इंडिया अ‍ॅडव्हेंचर्स प्रा. लि.

* व्यवसाय -साहसी क्रीडा सामग्री निर्मिती

* कार्यान्वयन : सन २०१५

* मूळ गुंतवणूक  :  साधारण १५ हजार रु.

* सध्याची उलाढाल : सुमारे १८ कोटी रु.

* कर्मचारी संख्या  : ७८

* कर्जभार : शून्य

* डिजिटल अस्तित्व :  https://nailtrades.com

sachin.rohekar@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.