04 December 2020

News Flash

नावात काय : रोजमेळ

सर्वसाधारणपणे वित्त नियोजन, भविष्यातील गरजा ओळखून पैशाचे केले जाणारे नियोजन याबाबतीत सर्वसामान्य भारतीय थोडेसे पिछाडीवर आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

कौस्तुभ जोशी

आजचा दिवस दिवाळीचा! या मुहूर्तावर व्यापाऱ्यांचे नवे वर्ष सुरू होते. वही पूजन करून हिशेबाची नव्याने सुरुवात होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हा-आम्हा सर्वासाठी एक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते ती म्हणजे रोजमेळ. यात नेमकं काय समजायचं असं वाटू शकतं! म्हणूनच हा लेखनप्रपंच.

सर्वसाधारणपणे वित्त नियोजन, भविष्यातील गरजा ओळखून पैशाचे केले जाणारे नियोजन याबाबतीत सर्वसामान्य भारतीय थोडेसे पिछाडीवर आहेत. मराठी माणसाची या बाबतीतील परिस्थितीसुद्धा वाखाणण्याजोगी नाही. ज्यांना सरकारी नोकरी वा पेन्शन या माध्यमातून तहहयात उत्पन्नाची सोय आहे त्यांची स्थिती थोडीशी उजवी ठरते. मात्र स्वयंरोजगार करणारे, खासगी क्षेत्रात काम करणारे, असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्यासाठी आपला रोजमेळ विचारात घेणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. करोना महामारीने हे सिद्ध केले की ज्यांची आर्थिक नियोजनाची पाटी भरलेली आहे त्यांना कठीण परिस्थितीतसुद्धा आपले व्यवहार चोखपणे पार पाडता येतात. बघून घेऊ ! वेळ येईल तेव्हा करू प्लानिंग! असा विचार करणाऱ्यांचे हाल हाल होतात.

यासाठीच रोजमेळ ही संकल्पना नव्याने समजून घेऊया.

रोजचा दिवस महत्त्वाचा 

आपण दिवसभरात जो काही खर्च करतो त्या खर्चाचा आपल्या नियोजनाशी काहीतरी थेट संबंध असायला हवा हा दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे. जसे भारत सरकारचे वर्षांचे नियोजन अर्थसंकल्पामधून मांडले जाते तशी तुमच्या जमा-खर्चाची तरतूद तुम्हाला मांडता यायला हवी. आपल्याला कोणकोणत्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत? याचा ढोबळ अंदाज लावता यायला हवा आणि त्या तुलनेत आपण कसे खर्च करणार आहोत? याचासुद्धा विचार करायला पाहिजे.

खर्च का गुंतवणूक?

आपण जे पैसे खर्च करतोय तो खर्च आहे? का ती गुंतवणूक? याचासुद्धा विचार करता यायला हवा. शिक्षणासाठी संगणक विकत घेणे हा खर्च आहे का गुंतवणूक? हे बऱ्याच शिकल्या-सवरल्या पालकांनासुद्धा कळत नाही. वस्त्रप्रावरणे, दागिने यावर हौस म्हणून जसे पैसे खर्च केले जातात तसेच आपल्याला भविष्यात काहीतरी फायदा होईल म्हणून आपण ठरवून पैसे खर्च करतो का? अगदी एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी पैसे खर्च करणं हा खर्च नसून ही भविष्यातील गुंतवणूक आहे हे आपल्याला समजले पाहिजे.

खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवणे:प्रमुख आव्हान

एखादी गोष्ट विकत घेताना ती आवडते का? त्याची गरज आहे का? ती विकत घेणे खरोखरच सध्या परवडू शकते का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरं अनुकूल आली तरच खर्च करावा. प्रत्येक वेळेला असा सारासार विचार करणे व्यवहारात शक्य होत नाही हे शंभर टक्के सत्य आहे. पण आपल्याच सुखी आणि समृद्ध भविष्यासाठी हे करायलाच हवं.

महिन्याचं लक्ष्य

दर महिन्याला काटेकोरपणे थोडेसे पैसे बाजूला पडायला हवेत. सगळ्यांनाच म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) करायला जमेल काय? अजिबात नाही! पण बँकेमध्ये जेवढे जमेल तेवढय़ा रुपयाची एखादी आवर्ती ठेव योजना सुरू करायला काय हरकत आहे? थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण आपण ऐकली आहे, व्यवहारात कधी वापरली का?

ऐकावे जनाचे..

बऱ्याचदा अनेक वस्तूंची खरेदी सामाजिक व मैत्र दबावापोटी होते. अमुक एक गोष्ट घरात असणं हे सन्मानाचं लक्षण समजलं जातं. मात्र त्याची खरोखरच गरज आहे का? याचा विचार करायला हवा. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा या एकत्रितरीत्या बसून विचारविनिमय करून कोणती गरज आज आधी भागवणे महत्त्वाचे आहे? याचा एक कुटुंब म्हणून विचार व्हायला हवा. वित्त नियोजनामध्ये हुकूमशाहीला यश येत नाही.

सक्तीच्या टाळेबंदीमुळे सुमारे अर्धे वर्ष घरात बसल्यामुळे आपल्याला हे निश्चित समजलं असेल की नेमक्या माझ्या गरजा काय आहेत! अगदी रोज ऑफिसमधून येता येता एखादा फास्ट फूडचा पदार्थ खाणे गेल्या सहा महिन्यांत न जमल्यामुळे लोकांना फास्टफूड नसलं तरी आपण जगू शकतो हे उमगले. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील, पण हा सर्वस्वी वैयक्तिक मुद्दा आहे!

गरज आणि जीवनशैली

मग यानिमित्ताने अशा अनावश्यक गरजा हळूहळू आपल्या जीवनशैलीचा भाग नसतील अशी मानसिक तयारी करायला काय हरकत आहे. यामुळे होणारे नाहक खर्च थांबतील व तोच पैसा तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतर एक सुखी आयुष्य जगण्यासाठी वापरता येईल.

तुमचा रोजमेळ तुम्हालाच मांडायचा आहे. बऱ्याचदा गुंतवणूकविषयक उत्पादने ज्यांच्याकडून विकत घेतली जातात त्यांनाच आपण आपल्या आयुष्याचे नियोजन करायला सांगतो. हे अयोग्य आहे. तुमची स्वप्नं, तुमच्या इच्छा-आकांक्षा व तुमचे विचार यातूनच तुमचे वित्त नियोजन झाले पाहिजे. रोज सकाळी उठल्यानंतर स्मार्ट फोनचे दर्शन आपण घेतो, त्याप्रमाणे रोज झोपताना दिवसभराचा जमाखर्चाचा रोजमेळ आपण साधला आहे का ही सवय लागणे महत्त्वाचे आहे.

या दीपावलीला एका नव्या उमेदीने आपल्या आर्थिक आयुष्याचा रोजमेळ नव्याने मांडायची सुरुवात करूया!

लेखक वित्तीय नियोजनकार व अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

joshikd28@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 12:46 am

Web Title: article on new account book worship abn 97
Next Stories
1 अर्थ वल्लभ : स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
2 कर बोध : प्राप्तिकर विवरणपत्र कोणी, कसे भरावे?
3 माझा पोर्टफोलियो : वित्तीय क्षेत्रात मूल्यात्मक गुंतवणूक संधी
Just Now!
X