03 December 2020

News Flash

निफ्टी निर्देशांकाची स्थितप्रज्ञता

निफ्टी निर्देशांकावर १२,४०० च्या स्तरावर ४०० अंश मिळवले असता १२,८०० चा स्तर दृष्टिपथात आला

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या लेखात निफ्टीच्या भविष्यकालीन वाटचालीचे आलेखन १२,४०० चा स्तर केंद्रबिंदू ठेवून ४०० अंशांच्या वाटचालीतून केलेले होते. त्याचे प्रत्यंतरही सरलेल्या आठवडय़ात आले. निफ्टी निर्देशांकावर १२,४०० च्या स्तरावर ४०० अंश मिळवले असता १२,८०० चा स्तर दृष्टिपथात आला. सरलेल्या सप्ताहात तेजी-मंदीचे हाकारे घातले जात असताना, निफ्टीने साप्ताहिक बंद नेमका १२,८०० वर दिला. तेजी-मंदीच्या हाकाऱ्यांना बळी न पडता निफ्टीने आपली स्थितप्रज्ञता तर दाखवलीच, पण निफ्टी निर्देशांकाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बँण्ड) हा ४०० अंशांचाच असेल हे आपल्या कृतीतून अधोरेखितही केले. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४३,८८२.२५

निफ्टी : १२,८५९.००

सरलेल्या सप्ताहातील निफ्टी निर्देशांकाची वाटचाल ही दिवसांतर्गत कधी १२,९५० तर कधी १२,७४५ अशी वर-खाली सुरू असे. पण गोळाबेरीज ही १२,८०० ची स्थितप्रज्ञताच दर्शविणारी होती.

आता ४०० अंशांचे अर्धे हे २०० अंश येतात आणि या सप्ताहातील १२,९५० व १२,७५० च्या उच्चांकात व नीचांकात बरोबर दोनशे अंशांचा फरक येतो जो आपल्याला निफ्टी निर्देशांकाच्या भविष्यकालीन अचूक वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरेल. सरलेल्या सप्ताहातील गुरुवारच्या नीचांकात, म्हणजे १२,७५० अधिक २०० अंश १२,९५०.. पुढे १३,१५०..१३,३५० ही निफ्टी निर्देशांकाची वरची लक्ष्ये असतील. मंदीच्या बाबतीत १२,७५० उणे २०० अंश १२,५५०.. १२,३५० ही निफ्टी निर्देशांकाची खालची लक्ष्ये असतील.

निफ्टी निर्देशांकावर ४०० अंशांचा विशाल आणि २०० अंशांचा संक्षिप्त सामान्य मार्गक्रमण पट्टा (बँड) वाचकांना अवगत करण्यामागचा हेतू..  अनोळखी प्रांतात गेल्यावर, नवीन शहर,अनोळखी भाषा यामुळे आपली जशी स्थिती होते तशीच आताची बाजाराची स्थिती आहे. सध्या निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकावर असल्याने जुन्या गृहीत गोष्टींचा (जुना डेटा, आलेख) आधार नसतो. त्यात बाजारातील तज्ज्ञांची निर्देशांकावरील वरच्या लक्ष्यांची नयनरम्य आरास,म्हणून खरेदी करावे म्हटले तर सरलेल्या सप्ताहातील गुरुवारचा आपटीबार, तर पुन्हा शुक्रवारी फटाक्यांची आतषबाजी अशा या गोंधळावर निफ्टी निर्देशांकावरील ४०० आणि २०० अंशांची जीपीएस ट्रॅकिंग व्यवस्था गुंतवणूकदारांना भविष्यात उपयोगी पडेल हीच सदिच्छा.

जाहीर झालेले कंपन्यांचे वित्तीय निकाल व त्यांचे विश्लेषण..

आज आपण निराळी बाजू पाहू. तिमाही वित्तीय निकाल बाजाराच्या पसंतीस उतरले नाहीत तर? या दृष्टीने आपण या स्तंभातील १२ ऑक्टोबरच्या लेखात सामावलेल्या हिंदुस्तान युनिलीव्हर या समभागाचा विचार करूया. तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख ही २० ऑक्टोबर होती. ९ ऑक्टोबरचा बंद भाव २,१३८ रुपये होता. निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर २,१५० रुपये होता. तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरावर टिकला, तर तिमाही निकाल चांगला, अन्यथा वाईट असे त्या निकालपूर्व लेखात सुचविले गेले होते.

आता असा विचार करा- निर्देशांक नवनवीन उच्चांकाला गवसणी घालत असताना, खरेतर हिंदुस्तान युनिलीव्हरनेदेखील ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ म्हणत नवीन उच्चांकाला साद घालायला हवी. पण वित्तीय निकाल जाहीर झाल्यापासून २,१५०च सीमोल्लंघन करणे समभागाला कठीण झाले. याची परिणीती ३ नोव्हेंबरला समभागाची किंमत २,०४३ पर्यंत खाली घसरली. जी आपल्या निकालपूर्व विश्लेषणात सूचित केलेल्या २,००० च्या खालच्या लक्ष्यासमीप आहे. निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकावर असताना हिंदुस्थान युनिलीव्हरचा बाजारभाव नाजूक स्थितीत. येणाऱ्या दिवसात हिंदुस्थान युनिलीव्हरने आपला २,१५० चा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखण्याची नितांत गरज आहे. कारण शुक्रवार २० नोव्हेंबरचा बंद भाव हा २,१२० रुपये आहे.

या लेखातील दुसरा समभाग होता एचडीएफसी बँक. तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख १७ ऑक्टोबर होती. ९ ऑक्टोबरचा बंद भाव १,२३३ रुपये होता. निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर १,१५० रुपये होता. जर निकाल उत्कृष्ट असेल तर १,१५० रुपयांचा स्तर राखत १,३०० रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरच विश्लेषण होते. एचडीएफसी बँकेने निकालापश्चात १,१५० रुपयांचा स्तर राखत ११ नोव्हेंबरला १,४१४ रुपयांचा उच्चांक नोंदवला. शुक्रवार २० नोव्हेंबरचा तिचा बंद भाव १,४०३ रुपये आहे.

ashishthakur1966@gmail.com

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 12:32 am

Web Title: article on nifty index stability abn 97
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : सद्य:कालीन फायद्याचे गुंतवणूक रसायन
2 क.. कमॉडिटीचा : ‘आधी विका, मग पिकवा’चे ऑप्शन
3 बंदा रुपया : यशाच्या क्षितिजावर कर्तृत्वाची पताका!
Just Now!
X