तृप्ती राणे

लेख लिहायला जेव्हा सुरू केला, तेव्हा फेब्रुवारी महिन्याची चार वर्षांतून एकदा येणारी तारीख उजाडली होती आणि या नवीन वर्षांचे दोन महिने उलटूनसुद्धा गेले होते. महिन्याची सुरुवात अर्थसंकल्पाकडून झाली आणि महिन्याचा शेवट हा शेअर बाजाराच्या आपटीने झाला. करोना विषाणूच्या थैमानाच्या भीतीने संपूर्ण जगाला ग्रासले आणि जागतिक बाजार हादरले. एका आठवडय़ात अमेरिकी आणि युरोपिय शेअर बाजाराचे निर्देशांक १० टक्क्य़ांपेक्षा जास्त उतरले, तर आशियाई बाजारातील निर्देशांक ३.५ टक्के ते ९.५ टक्क्य़ांइतके पडले. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही साधारणपणे ७ टक्के खाली आले आणि गुंतवणूकदार घाबरले की, आता अजून पुढे काय? बाजार अजून किती खाली जाणार? मागे विषाणू हल्ल्यामध्ये किती नुकसान झाले होते आणि हे संकट नैसर्गिक आहे जाणूनबुजून पसरवले गेले, अशा अनेक प्रकारचे संदेश व्हॉट्स अ‍ॅप विद्यापीठामार्फत सर्वाच्या चर्चेत आलेले असून, त्यावर विचारमंथन सतत सुरू आहे. त्यात करून सर्वात जास्त ते लोक घाबरले आहेत, ज्यांनी मागील काही वर्षांत समभाग गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि आता काय करायचे हे त्यांना समजत नाही.

तर या करोना विषाणूमुळे नक्की काय होत आहे यासाठी आजचा लेख. ‘न्यूयॉर्क टाइम्स’नुसार साधारणपणे ५६ देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे जागतिक पातळीवर कंपन्या त्यांचे येणाऱ्या वर्षांतील नफ्याचे अंदाज कमी करत आहेत. जगभरातील मध्यवर्ती बँका आपापल्या देशातील अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी निरनिराळे प्रयत्न करत आहेत. या विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची तुलना २००८ सालच्या आर्थिक संकटाशी करण्यात येत आहे. चीनमधून सुरू झालेल्या या गंभीर प्रकरणाला जागतिक आरोग्य संघटनेने ‘आंतरराष्ट्रीयदृष्टय़ा चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची स्थिती’  असा दर्जा मागील महिन्यात दिला. या संकटामुळे असा अंदाज बांधला जातोय की, चीनची अर्थव्यवस्था या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचा वाढीचा दर हा २००८ नंतरचा सर्वात कमी वाढीचा दर असेल. जागतिक पातळीवर तेलाची मागणी कमी झाल्यामुळे त्याचे भावसुद्धा खाली आले आहेत आणि हे देश आता किमती टिकवण्यासाठी उत्पादन कमी करत आहेत. पर्यटन व्यवसायालासुद्धा या आजारसाथीचा चांगलाच फटका बसला आहे. आधी फक्त चीन आणि दक्षिण-पूर्व आशियाई देश बाधित होते. परंतु आता इराण आणि इटलीसारख्या देशांनासुद्धा याची लागणीची बातमी आलेली आहे. तेव्हा ऐन हंगामात युरोपातील पर्यटनाचे जबरदस्त नुकसान होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. चीनवर मालासाठी अवलंबून असलेले देशांना सर्वात जास्त आर्थिक नुकसान सहन करावे लागेल आणि त्याचबरोबर जे देश चीनची भव्य बाजारपेठ वापरत आहेत, त्यांनाही त्यांच्या वस्तूंसाठी आता दुसऱ्या बाजारपेठा शोधाव्या लागणार. विमान कंपन्यांच्या कामगिरीवरही वाईट परिणाम होताना दिसत आहेत. ज्या वाहन कंपन्या आणि रसायन उद्योग, चीनमधून आयात करत होते, त्या सर्वाचा येणाऱ्या काळातील परतावा हा फारसा चांगला नसणार. जागतिक पातळीवर महागाई वाढणार, उत्पादन कमी होणार आणि सगळ्याच अर्थव्यवस्थांवर गंभीर पडसाद उमटणार, असे वर्तविले जात आहे.

आपल्या देशामध्ये आपण आधीच मंदीसदृश वातावरणाचा अनुभव घेत आहोत. अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर हा प्रत्येक तिमाहीत खाली येताना दिसत आहे, त्यात आता हे संकट. जर हे संकट वेळीच आटोक्यात नाही आले तर आपण मंदीच्या विळख्यात लवकरच सापडू असे वाटणे चुकीचे नाही. आज आपल्या शेअर बाजाराने मागील आठवडय़ाभरात जरी सात- साडेसात टक्के नुकसान करून घेतले आहे तरी, ते अजून होऊ शकेल अशी दाट शक्यता आहे. बऱ्याच भारतीय कंपन्या फारशी चांगली कामगिरी दाखवत नव्हत्या, परंतु सरकारने कराचे दर कमी केल्यामुळे त्यांना थोडा फायदा झाला. पण आपल्या देशातील ऑटो, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा आणि ग्राहकोपयोगी वस्तू बनविणाऱ्या कंपन्या ज्या प्रमाणात चीनवर विसंबून आहेत, त्या प्रमाणात चीनकडे निर्यात होणाऱ्या वस्तू कमी आहेत. तरीही देशातील ३४ टक्के पेट्रोकेमिकल हे चीनला विकले जातात. एकूणच आपल्या देशातील कंपन्यांच्या नफ्यावर आणि त्यात करून चालू आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीच्या कामगिरीवर नक्कीच नकारात्मक परिणाम होतील. तेव्हा येणाऱ्या काळात शेअर बाजाराकडे जास्त लक्ष ठेवून गुंतवणूक करावी लागणार.

एका बाजूला संकट म्हटले की दुसऱ्या बाजूला संधीसुद्धा असतेच. तेव्हा एक गुंतवणूकदार म्हणून जेव्हा मी या सगळ्या पडझडीकडे बघते तेव्हा मला दोन गोष्टी प्रकर्षांने जाणवतात – पहिली, पोर्टफोलिओमध्ये झालेल्या फायदा काढून घेऊन रक्कम सुरक्षित करणे आणि दुसरी जेव्हा संधी मिळेल तेव्हा निवडक भरवशाच्या कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे. म्हणून मी माझ्या संपूर्ण पोर्टफोलिओचे विश्लेषण करून, कोणत्या गुंतवणुकीतून बाहेर पडायचं, कुठल्या शेअरवर नजर ठेवून कमी किमतीत गुंतवणूक करायची आणि नव्याने पुन्हा एकदा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा हे ठरविले आहे. माझ्या आवडीच्या म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’मध्ये मी गुंतवणूक चालू ठेवणार. कारण ती माझ्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आहे. परंतु ज्या गुंतवणूकदारांना येत्या काळाची भीती झेपत नसेल, त्यांनी गुंतवणुकीतून बाहेर पडावे. अर्थात हे सर्व करताना कर दायीत्व आणि एग्झिट लोड यांसारख्या गोष्टींवरसुद्धा लक्ष ठेवायला हवे. नजीकच्या काळातील खर्चाची तरतूद जर योग्यप्रमाणे झालेली असेल तर मग बाजारातील पडझडीचा फारसा त्रास होत नाही. आणि मागील १५-२० वर्षांचा काळ पाहिला तर अशी अनेक संकटे या आधीसुद्धा आली होती आणि त्यातून पुढे शेअर बाजार वधारले. तेव्हा योग्य आर्थिक नियोजन करून अशा संकटातून मिळणाऱ्या संधींचा नक्कीच उपयोग करून घेता येतो. अर्थात यात जोखीम घटक आहेच आणि तशी जोखीम घ्यायची क्षमता असेल तरच करून पाहावे.

* लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.

trupti_vrane@yahoo.com