अजय वाळिंबे

सुमारे २५ वर्षांपूर्वी म्हणजे मार्च १९९५ मध्ये स्थापन झालेली पॉली मेडीक्युअर आज भारतातील जलद गतीने वाढणारी वैद्यकीय उपकरणे तयार करणारी एक आघाडीची कंपनी आहे. भारत सरकारच्या रसायन व खते मंत्रालयाच्या औषध विभागाने या कंपनीला ‘मेडिकल डिव्हाइसेस कंपनी ऑफ द इयर २०१८’ म्हणून मान्यता देऊन गौरविले आहे. गेली सहा वर्षे सुमारे १०५ देशांमध्ये सातत्याने प्लास्टिक मेडिकल उपकरणांची सर्वात मोठी निर्यातदार म्हणूनही ओळखली जाते.

कंपनीच्या जगभरात आठ अत्याधुनिक उत्पादन सुविधा असून त्यात उच्च दर्जाची वैद्यकीय उपकरणे तयार करण्याचा कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. यापैकी भारतात पाच उत्पादन सुविधा (फरिदाबादमध्ये तीन आणि जयपूर व हरिद्वारमध्ये प्रत्येकी एक सुविधा) आहेत तर परदेशातील प्रकल्पांपैकी इटली आणि चीनमधील प्रकल्प संपूर्ण मालकीच्या उपकंपनीत आहेत तर एक इजिप्तमध्ये संयुक्त उद्यमात आहे. पॉली मेडीक्युअर दर्जेदार डिस्पोजेबल मेडिकल डिव्हाइसेसच्या विकास, उत्पादन आणि विपणनामध्ये कार्यरत असून त्यामध्ये फ्युजन थेरपी, रक्त व्यवस्थापन, गॅस्ट्रो-एन्टेरोलॉजी, शस्त्रक्रिया आणि जखमेचा निचरा, भूल आणि मूत्रिपडाशी संबंधित उत्पादने तयार करते. या वर्षी कंपनी व्हॅस्क्युलर /  क्सेस / इन्फ्युजन थेरपीमध्ये नवीन उत्पादने आणत आहे.

कंपनीचे भारतात व्यापक विक्री आणि वितरण नेटवर्क आहे. कंपनीच्या वितरण जाळ्यामध्ये २५ हून अधिक सुपर वितरक, दहाहून अधिक अधिकृत एजंट आणि १,३०० पेक्षा जास्त डीलर समाविष्ट आहेत. कंपनीकडे विक्री, विपणन आणि उत्पादन व्यवस्थापन टीममधील २५० हून अधिक कर्मचारी आहेत. जागतिक स्तरावर कंपनीने आपले वितरकांच्या जाळ्याद्वारे युरोप, दक्षिण-पूर्व आशिया, मध्य पूर्व, अमेरिका आणि आफ्रिका यांसह १०० हून अधिक देशांमधील प्रमुख वितरकांसह सेल्स नेटवर्क आणि टायअप केले आहे.

कंपनीचे आतापर्यंत उत्तम संशोधनाच्या जोरावर अनेक नवीन उत्पादने विकसित करून, गुणवत्तेच्या आधारे उत्तम कामगिरी करत आहे. दोनच वर्षांपूर्वी बोनस समभाग देणाऱ्या पॉलिमेडीक्युअरचे आर्थिक निष्कर्ष नुकतेच जाहीर झाले आहेत. डिसेंबर २०१९ साठी संपलेल्या तिमाहीत कंपनीने १८०.४४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २५.०२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात तब्बल ५६ टक्के वाढ झाली आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर, वैद्यकीय उपकरणांच्या आयात शुल्कात वाढ सुचविल्यानंतर, गेल्या आठवडय़ाभरात या शेअरमध्ये तब्बल ९० रुपये वाढ झाली आहे. सध्या ३०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर मध्यम ते दीर्घकालात उत्तम फायदा मिळवून देऊ शकेल.

पॉली मेडीक्युअर लिमिटेड

(बीएसई कोड – ५३१७६८)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ३२३

स्मॉल कॅप

व्यवसाय : वैद्यकीय उपकरणे

बाजार भांडवल : रु. २,३७१ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु.  ३१३ / १६७

भागभांडवल : रु. ४४.१२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    ४८.७६

परदेशी गुंतवणूकदार  ३.६८

बँक/ म्यु. फंड/ सरकार    ०.१५

इतर/ जनता    ४७.४३

पुस्तकी मूल्य :    रु. ४६.२४

दर्शनी मूल्य :           रु. ५/-

लाभांश :      ४०%

प्रति समभाग उत्पन्न :       रु. १०.४८

पी/ई गुणोत्तर :     २५

समग्र पी/ई गुणोत्तर :         २८

डेट इक्विटी गुणोत्तर :        ०.३७

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ११.३

रिटर्न ऑन कॅपिटल :         २२.२२

बीटा :        ०.४