01 December 2020

News Flash

नावात काय? : ‘पॉन्झी स्कीम’

सुरुवातीला जे गुंतवणूकदार अशा योजनेत पैसे गुंतवतात त्यांना त्यांचे पैसे वेळेवर मिळतात.

(संग्रहित छायाचित्र)

कौस्तुभ जोशी

गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविल्यानंतर ते वेळेत परत देणे त्यावरील व्याज ठरल्याप्रमाणे देणे ही गुंतवणूक स्वीकारणाऱ्या वित्त संस्थेची कायदेशीर जबाबदारी तर असतेच पण नैतिक जबाबदारीसुद्धा असते. मात्र काही काही योजना याला अपवाद असतात! अशाच योजनांना ‘पॉन्झी स्कीम’ असे म्हणतात.

अमेरिकेत चार्ल्स पॉन्झी या माणसाने १९२० मध्ये गुंतविलेल्या रकमेमध्ये दोन महिन्याच्या आत पन्नास टक्के वाढ करून देतो आणि तीन महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट करून देतो, असे सांगत हजारो लोकांना फसविले. यथावकाश त्याचा खोटेपणा उघड झाला आणि त्यानंतर फसव्या गुंतवणूक योजनांना ‘पॉन्झी स्कीम’ असे नाव सर्रास वापरण्यात येऊ लागले. या योजना एखाद्या पिरॅमिडसारख्या काम करतात. एखाद्या पिरॅमिडचा आकार बघितल्यास त्याचा पाया हा रुंद असतो आणि कळस अरुंद असतो. जसजसे पायाकडून वरवर जाऊ तसतसा गुंतवणुकीतला धोका वाढतो आणि आपण त्यात फसले जाण्याची शक्यतासुद्धा वाढते. सुरुवातीला जे गुंतवणूकदार अशा योजनेत पैसे गुंतवतात त्यांना त्यांचे पैसे वेळेवर मिळतात. कारण जसजसे नवनवीन गुंतवणूकदार या योजनेत येतात त्यांचे पैसे फिरवून आधीच्या गुंतवणूकदारांनासुद्धा दिले जातात. एक वेळ अशी येते की, गुंतवणूकदारांना देण्यासाठी पैसे उरत नाहीत. या योजना चालवणारे योजनेतून आलेले पैसे एखाद्या प्रकल्पामध्ये किंवा कर्जरोख्यात (सिक्युरिटी) सुद्धा गुंतवितात, मात्र हे सगळे अधिकृत असते. परिणामी एक वेळ अशी येते गुंतवणूकदारांना व्याज व आपले पैसे यापैकी काहीही मिळत नाही.

पॉन्झी स्कीम कशा ओळखाव्यात?

* या योजनांमध्ये अत्यंत कमी जोखीम व अत्यंत अविश्वसनीय परतावा सांगितला जातो.

*  या योजनांची कोणत्याही अधिकृत यंत्रणेकडे नोंदणी नसते.

*  तुमच्याकडून पैसे घेतले जातात ते कुठे गुंतवू? त्यातून नफा कसा कमवू? याविषयी कोणतेही खात्रीलायक तपशील आपल्याला दिले जात नाहीत, याउलट आधी गुंतवलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे कसे वाढले याची रसभरीत वर्णनसुद्धा ऐकायला मिळतात.

* तुमच्याकडून घेतलेल्या पशांचे पुढे काय झालं याविषयीची कोणतीही कागदपत्र तुम्हाला मिळत नाहीत.

पॉन्झी स्कीम धोकादायक का?

भारतातही अशा प्रकारच्या अनेक योजनांमध्ये पैसे गुंतवून लोकांनी आपली आयुष्यभराची पुंजी गमावलेली आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळालेले फंडातले पैसे, मुलाच्या/ मुलीच्या लग्नासाठी बाजूला काढून ठेवलेले पैसे, दररोजच्या खर्चातून थोडी का होईना केलेली बचत, काही प्रसंगी तर स्वतचे दागिने गहाण ठेवून व विकूनसुद्धा गुंतवणूकदार अशा प्रलोभनांना बळी पडतात. यातील बहुसंख्य गुंतवणूकदार हे कनिष्ठ मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय व बहुतांश वेळा आर्थिक दृष्टय़ा कमकुवत गटातले असतात. त्यामुळे अशी योजना फसली की त्याचा धक्का हा फक्त आर्थिक नसतो तर त्याच्या कुटुंबालासुद्धा जबर धक्का बसतो. काही प्रसंगी मन:स्वास्थ्यसुद्धा बिघडते.

अर्थसाक्षरता महत्त्वाची !

*   आपण गुंतवणूक विषयक योजनेत पैसे ठेवताना त्याच्या व्यवस्थापनाची व मालकांची माहिती घेतो का?

*   बँका, म्युच्युअल फंड, पोस्टाच्या योजना यातून किती व्याजदर मिळतो? त्याच्या तुलनेत आपल्याला विकल्या जाणाऱ्या योजनेतला व्याजदर हा खूपच अधिक असेल तर सावध राहायला नको का?

*   आपण गुंतवणूक करताना आपल्याला त्या विषयीची संपूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे का?

या प्रश्नाची उत्तरे आपल्याजवळ नसतील तर आपण अशा एखाद्या योजनेच्या हिट लिस्ट वर नक्की असाल! आपले श्रमाने कमावलेले  पैसे गुंतविताना आपणच काळजी घ्यायला पाहिजे हे नक्की!

(लेखक वित्तीय नियोजनकार, अर्थशास्त्राचे प्राध्यापक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 1:44 am

Web Title: article on ponzi scheme fraud lures investors abn 97
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : मुहूर्ताची खरेदी
2 नियोजन भान : सुविनियोगात समृद्धी
3 थेंबे थेंबे तळे साचे : डेट म्युच्युअल फंड निवडताना..
Just Now!
X