वसंत माधव कुळकर्णी

फंड संशोधनाची एक सिद्ध पद्धत आहे. ‘क्वारटाइल मेथड’ या नावाने जगभरात मान्यता असलेल्या या पद्धतीनुसार त्या फंड गटातील फंडांना कामगिरीनुसार उतरत्या क्रमवारीतील पहिले दहा टक्के ‘टॉप क्वारटाइल’मध्ये, उर्वरित २२ टक्के फंड ‘अपर मिडल क्वारटाइल’मध्ये, ३५ टक्के फंड ‘मिडल क्वारटाइल’ उरलेल्यांपैकी २२ टक्के ‘लोअर मिडल क्वारटाइल’मध्ये आणि तळाचे १० टक्के फंड ‘बॉटम क्वारटाइल’मध्ये असतात. आज ज्या फंडाची माहिती आहे त्या फंडाने १२ नोव्हेंबर रोजी तेराव्या वर्षांत पदार्पण केलेला हा फंड ‘टॉप क्वारटाइल’मध्ये आहे.

‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडां’च्या यादीत या फंडाचा समावेश सर्वप्रथम २०१४ साली झाला. सुरुवातीची चार वर्षे मिडकॅप फंड म्हणून तर फंड सुसूत्रीकरणानंतर दोन वर्षे लार्ज अ‍ॅण्ड मिड-कॅप प्रकारात या फंडाचा अधूनमधून समावेश होत होता. मागील दहा वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास टोकाच्या अस्थिरतेमुळे फंडाची कामगिरी कॅलेंडर वर्ष २०१६, २०१८ आणि २०१९ मध्ये समाधानकारक नसल्याने हा फंड या यादीचा भाग नव्हता. परंतु त्या पुढील वर्षांत फंडाने जोरदार मुसंडी मारत सहा वर्षांपैकी तीन वर्षे हा फंड या यादीत होता, तर तीन वर्षे हा फंड या यादीत नव्हता. मागील तीन वर्षे तीन मानदंडापेक्षा थोडा अधिक परतावा देणाऱ्या फंडाने मार्चनंतर कामगिरीत झेप घेतलेली दिसते. जानेवारी २०२० पासून सर्व स्पर्धकांना मागे सारून हा फंड त्याच्या फंड वर्गवारीत अव्वलस्थानी पोहोचला आहे. संशोधनाच्या परिघात, ‘मॉर्निंगस्टार इंडिया ओपन एन्डेड इक्विटी फंड’ म्हणजे पाच वर्षे पूर्ण केलेले आणि गुंतवणुकीसाठी कायम खुले असलेल्या फंडापैकी हा फंड पाच वर्षे कालावधीत सर्वोत्तम ‘एसआयपी’ परतावा दिलेल्या फंडाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. तर १० वर्षे कालावाधीत या फंडाचे क्रमवारीतील स्थान पाचवे होते.

रवी गोपालकृष्णन या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. समभाग संशोधन आणि निधी व्यवस्थापनाचा २७ वर्षांचा अनुभव पाठीशी असलेले गोपालकृष्णन या फंड घराण्याचे समभाग गुंतवणूक प्रमुखही आहेत. मागील आठ वर्षांंपासून त्यांच्याशी नियमित भेट होत असते. या भेटीत ते त्यांची बाजाराबाबतची मते नेहमीच मांडत असतात. समभाग गुंतवणुकीसाठी निवड प्रक्रियेची चौकट ठरल्यावर गुंतवणूक करणे सोपे असते असे ते मानतात. गुंतवणुकीतील सर्वात आव्हानात्मक भाग म्हणजे बाजाराच्या परिस्थितीचा आढावा घेत समभागाची विक्री कधी हे ठरविणे. तथापि, अनुभवाने आणि एकापेक्षा अधिक व्यापार चक्रे अनुभवल्यानंतर हे काम सोपे होत जाते असे त्यांचे सांगणे असते.

ओपन एन्डेड लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप फंड गटात तीन वर्षे पूर्ण झालेले २३, तर पाच वर्षे पूर्ण झालेले २२ फंड आहेत. या फंडाच्या गुंतवणूक परिघात बाजार भांडवली मूल्यांनुसार पहिल्या २५० कंपन्या असतात. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की लार्जकॅप स्थैर्य तर मिडकॅप वृद्धी देतात. ढोबळपणे लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप म्युच्युअल फंडामध्ये दोन प्रकारच्या योजना आहेत – पहिल्या प्रकारात लार्जकॅपची मात्रा अधिक असलेल्या आणि दुसऱ्या प्रकारात मिडकॅपकडे झुकलेले फंड. जागतिक आणि देशी रोकड सुलभतेमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी रोज नव्या शिखराकडे कूच करीत आहेत. जागतिक बाजारातील कल अनुसरून तेजीचे नवे उच्चांक भारतीय निर्देशांक नोंदवत आहेत. या तेजीला मुख्यत्वे लार्जकॅप समभागांची उसळी कारण ठरत आहे. या तेजीत देखील समभागांचे ध्रुवीकरण झालेले दिसत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांनी अजून तेजीत तितका सहभाग नोंदविलेला दिसत नाही. अस्थिर असतात म्हणून मिड-कॅप फंड नको अशा गुंतवणूकदारांसाठी लार्जकॅपचे स्थैर्य आणि मिडकॅपचा परतावा देणाऱ्या फंडाची ही शिफारस आहे.

‘सेबी’ने म्युच्युअल फंडांचे सुसूत्रीकरण केल्यानंतर प्रिन्सिपल इमर्जिंग ब्लूचिप जो आधी मिडकॅप म्हणून विकला जात होता त्याचा लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप प्रकारात समावेश केला. ऑक्टोबरअखेरीस फंड मालमत्ता २,११९ कोटी असून एकूण मालमत्तेपैकी ५१ टक्के लार्जकॅप, ३५ टक्के मिडकॅप आणि १०.५ टक्के स्मॉलकॅप धाटणीच्या समभागांत आहे. या फंडाच्या गुंतवणुकीत वैविध्य जपणाऱ्या ६४ कंपन्यांचे समभाग असून पहिल्या पाच समभागांचा एकूण गुंतवणुकीत २२ टक्के हिस्सा आहे आणि पहिल्या तीन क्षेत्रांत (वित्तीय सेवा, रसायने आणि आरोग्यसेवा) मिळून ४७ टक्के हिस्सा राखतात. ‘निफ्टी लार्ज अ‍ॅण्ड मिड-कॅप २५०’ हा फंडाचा मानदंड आहे. निधी व्यवस्थापक- रवी गोपालकृष्णन यांनी बँकिंग आणि आर्थिक सेवा, रसायने, अभियांत्रिकी उद्योग आणि आरोग्य, यामध्ये मानदंडाच्या तुलनेत अधिक गुंतवणूक केली आहे. तर निर्देशांकाच्या तुलनेत सॉफ्टवेअर, ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तू यांच्यात गुंतवणुकीचे कमी प्रमाण आहे. निधी व्यवस्थापक गुंतवणूक सक्रिय व्यवस्थापित करतात. उदाहरणादाखल सप्टेंबर महिन्यात फंडाच्या गुंतवणुकीत पाच टक्के रोकड सममूल्य गुंतवणूक होती. ऑक्टोबर महिन्यात रोकडसुलभ साधनांचे प्रमाण कमी करून समभाग गुंतवणूक वाढविली. सर्वाधिक १४.८ टक्के गुंतवणूक बँकिंग क्षेत्रात असून एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँक यांना सर्वोच्च स्थान दिले आहे. मागील वर्षभरात फंडाने रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि टीसीएससारख्या ब्ल्यूचिप समभागांमध्ये गुंतवणूक वाढविली आहे. तर मिडकॅप प्रकारात डिक्सन टेक्नोलॉजीज, नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल, बालकृष्ण इंडस्ट्रीज आणि अतुल या मिडकॅप समभागांनी गेल्या वर्षभरात आपली कामगिरी चोख बजावल्याने फंडाला कामगिरी क्रमवारीत आघाडी राखणे शक्य झाले. फंडाने एक, तीन, पाच, सात आणि दहा वर्षे कालावधीत मानदंडापेक्षा सरस कामगिरी केली आहे. या फंडाच्या ‘रेग्युलर ग्रोथ’ प्लानच्या एनएव्हीने मागील शुक्रवारी १२० रुपयांची पातळी ओलांडलेली असल्याने मागील बारा वर्षांत बारा पट वृद्धी देणाऱ्या या फंडाचा दीर्घकालीन वित्तीय ध्येयांच्या पूर्ततेसाठी वाचक आपल्या गुंतवणुकीत समावेश करू शकतात.

shreeyachebaba@gmail.com

*   म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर