अपंगत्व असलेल्या तरुणाकडून कुटुंबीय फारशी अपेक्षा करत नाहीत, परंतु हीच गोष्ट ‘त्याला’ मान्य नव्हती. ‘शरीराने अपंग असलो तर काय झाले? यश मिळवण्यासाठी जी क्षमता आणि प्रतिभा लागते ती माझ्याकडे आहे. मग मी का आधार शोधावा?’ असा ‘त्याचा’ स्वत:शीच सवाल होता. त्याच्याच उत्तरासाठी त्याने स्वत:ला प्रयत्नांच्या यज्ञकुंडात झोकून दिले आणि एका छोटय़ा उद्योगाची उलाढाल कोटय़वधींच्या घरात नेली. अशा या कर्तृत्ववान उद्योजकाचे नाव आहे जयसिंग चव्हाण.

जयसिंग यांनी जिद्द, कठोर मेहनत घेण्याची तयारी, चिकाटी आणि व्यवसायातील प्रामाणिकपणाच्या बळावर उद्योगाला मोठे केले. शेकडो बेरोजगारांना रोजगार दिला आणि राज्याच्या बाहेरही आपले उत्पादन पोहचविले. रंजना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आज मोठय़ा दिमाखाने सुरू असून येथे पर्यावरणपूरक पद्धतीने तेल शुद्धीकरण केले जाते. आज मध्य भारतातील उद्योगासाठी लागणारे शुद्ध तेल तयार करणारा नागपुरातील कारखाना म्हणून रंजना ग्रुप इंडस्ट्रीजला ओळखले जाते.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
ग्रामविकासाची कहाणी
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

डॉक्टरने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे जयसिंग यांना १८व्या महिन्यातच कायमचे अपंगत्व आले. मुलाचे दोन्ही पाय निकामी झाल्याचे कळताच आई रंजना व वडील कृष्णकांत यांनी नागपूर तसेच जयपूर येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून अनेकवेळा शस्त्रक्रिया करवून घेतल्या, मात्र जयसिंग यांना त्यांच्या पायावर उभे करण्यात त्यांना यश आले नाही.   जयसिंग यांना ८७ टक्के कायमचे अपंगत्व आले. अपंगत्वामुळे त्यांचे पूर्ण जीवन अधांतरी झाले. ते पालकांवर अबलंबून होते. अशात जयसिंग यांनी शाळेत जाण्यास नकार दिला. घरीच राहून लहान भावांची पुस्तके वाचायचे.

जयसिंग यांच्या वडिलांचा घरीच दंतमंजनाचा लघुउद्योग होता. यावरच कुटुंबाची उपजीविका अवलंबून होती. एक दिवस त्यांच्या घराला आग लागली. त्यात सगळेच जळून खाक झाले. कुटुंबाचा आर्थिक कणा तर मोडलाच, पण जयसिंग यांच्या वडिलांचा आत्मविश्वासही खचला. घरची परिस्थिती गंभीर होती. आर्थिक संकट आले तर नातेवाईकही पाठ फिरवतात. तेच यांच्याबाबतीत झाले. कोणीही मदत करण्यास तयार नसल्याचे पाहून जयसिंग जिद्दीला पेटले आणि मोडलेला आर्थिक कणा पुन्हा उभारण्याचा संकल्प केला. नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे जयसिंग यांना तीनचाकी भेट मिळाली अन् ते पहिल्यांदा चार भिंतीबाहेर पडले. वडिलांपासून मिळालेले व्यवसायाचे बाळकडू आत्मसात करून वॉशिंग पावडर उत्पादनाचे प्रशिक्षण घेतले आणि आईने खाऊसाठी दिलेले चारआणे- पन्नास पैसे साठवून जमा झालेल्या दोनशे रुपयांच्या बळावर आईच्या नावानेच उद्योगाला सुरुवात केली. घरीच साबण, डिर्टजट पावडर, फिनाइल, टाइल्स क्लिनर तयार करण्यास त्यांनी प्रारंभ केला. सकाळी उत्पादन घ्यायचे आणि दुपारनंतर दिवसभर ग्राहकांकडे विक्रीसाठी फिरायचे. मालाच्या गुणवत्तेमुळे स्वाभाविकच मागणी वाढली. जयसिंग यांनी सुवर्ण जयंती कर्ज योजनेंतर्गत ७० हजारांची मागणी केली, पण केवळ २० हजार मंजूर झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याने तो पैसा घरीच खर्च झाला अन् बँकेने हप्त्यासाठी एकच तगादा लावला. स्वाभिमानी जयसिंग यांनी एका वर्षांत कर्ज फेडले.

कौशल्य विकासाच्या ध्यासातून जयसिंग यांनी पॅकेजिंगचे प्रशिक्षण घेतले आणि विपणनाचे कसबही शिकून घेतले. शिक्षण कमी असल्याने व्यवसायात अनेक अडचणी येत असल्याचे बघून इंग्रजीच्या खासगी वर्गात प्रवेश मिळवला. अभ्यास करत नॅशनल ओपन स्कूलमधून थेट दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर स्मॉल फॅक्टरी एरिया, भंडारा मार्ग, वर्धमाननगर येथे ‘रंजना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’ची स्थापना केली. तब्बल १५० लोकांना तेथे रोजगार मिळाला. व्यवसाय वेगात असतानाच ५ मे २०१० रोजी कारखान्याला मोठी आग लागली, अन् क्षणातच होत्याचे नव्हते झाले. गुंतलेले लाखो रुपये आणि आशाही आगीत भस्म झाली. बँकेकडे विम्यासाठी गेल्यावर विमा नूतनीकरण न केल्याचा फटकाही जयसिंग यांना सहन करावा लागला. आधी वडिलांचा उद्योग आगीत गिळला आणि आता त्यांचा स्वत:चाही उद्योग आगीतच संपला. मात्र जयसिंग खचले नाहीत. संयमाने त्यांनी ही बिकट परिस्थिती हाताळली. ‘अगर पुरा घर ही जल गया हैं तो बचा क्या है और अगर मैं बच गया हूं तो फिर जला ही क्या हैं,’ असा विचार करून जयसिंग यांनी पुन्हा नव्या उद्योगाकडे वाटचाल केली.

बुटीबोरी भागात पूर्वी घेतलेल्या एक एकर जमिनीवर नवीन ऑइल रिफायनिंग आणि रिसायकलिंग ऑफ युज्ड ऑइलचा कारखाना सुरू केला. त्यासाठी बँक, नातेवाईक व मित्रांनी मदत केली. यात दोन्ही लहान भाऊ  विजयसिंग आणि विक्रमसिंग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आज त्यांच्या कारखान्यात तीनशेहून अधिक कामगार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारावर आहेत. जयसिंग यांचा केवळ व्यावसायिक दृष्टिकोन नसून ते सामाजिक बांधिलकीदेखील जोपासत आहेत. बुटीबोरी औद्योगिक परिसरात शून्यातून विश्व निर्माण करणारे एकमेव यशस्वी उद्योजक म्हणून ख्यातकीर्त जयसिंग हे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीसाठी ते प्राधान्य देतात.

या नवीन व्यवसायातही त्यांना सहज यश मिळालेले नाही. सुरुवातीच्या काळात फार कमी प्रमाणात तेलाची आवक असायची. त्यात भागायचे नाही. कंपनीच्या कामाच्या गुणवत्तेबद्दल खात्री पटवून देण्यासाठी जयसिंग यांची धडपड सुरू झाली. हळूहळू ग्राहकांना त्यांच्या गुणात्मक उत्पादनाची खात्री झाली. त्यामुळे नोंदणीत काही प्रमाणात आणि त्यांनी बनविलेल्या शुद्ध तेलाच्या मागणीत वाढ झाली. परिणामी, कारखान्यातील रोजगारही वाढला. तसेच याच कामात त्यांचे छोटे बंधू विजयसिंग आणि विक्रमसिंग यांचा हातभार लागला. आज महाराष्ट्रासह दिल्ली, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आदी राज्यांत त्यांच्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. कारखाना पाच हजार किलोलिटर क्षमतेचा आहे. येथे तेलावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते. भविष्यात जयसिंग यांनी उद्योग विस्तार करायचे ठरवले असून काही कोटींची गुंतवणूक करण्याचा निश्चय केला आहे. या नव्या कारखान्यात हजारो अपंगांना रोजगार देण्याचा त्यांचा मानस आहे.

जयसिंग कृष्णराव चव्हाण

रंजना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज

* व्यवसाय     : तेल शुद्धीकरण प्रकल्प

* प्राथमिक गुंतवणूक : २०० रुपये

* सरकारी योजनेचा फायदा : नाही

* रोजगार निर्मिती      :  ३००

* शिक्षण       :  बी.कॉम. पदवीधर

* डिजिटल सक्षमता : संकेतस्थळ http://www.ranjanaindustry.com

-अविष्कार देशमुख

लेखक ‘लोकसत्ता’चे नागपूर प्रतिनिधी avishkar.deshmukh@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल: arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.