अजय वाळिंबे

पूर्वी अॅबव्हेंटिस फार्मा (एपीएल) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सनोफी इंडियाचा इतिहास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, ही आपली पूर्वीची हेक्स्ट फार्मा. इतर बहुराष्ट्रीय कंपन्याप्रमाणे मर्जर आणि अमाल्ग्मेशनमुळे प्रथम हेक्स्ट फेडको फार्मा, नंतर हे नाव बदलून हेक्स्ट फार्मास्युटिकल्स आणि हेक्स्ट मॅरियन रौसल असे करण्यात आले.

आज सनोफी-अॅणव्हेंटिस ही बहुराष्ट्रीय कंपनी जगातील आघाडीच्या औषध कंपन्यांपैकी एक आहे आणि हेक्स्ट जीएमबीएच या कंपनीची उपकंपनी आहे. भारतात सनोफी समूहाच्या विविध व्यवसायात पाच कंपन्या असून त्या सनोफी इंडिया लिमिटेड, सनोफी-सिंथेलाबो (इंडिया) लिमिटेड, सनोफी पाश्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, शांथा बायोटेक्निक्स लिमिटेड आणि जेन्झाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने व्यवसाय करतात.

सनोफी इंडिया ही औषध व्यवसायातील कंपनी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, थ्रोम्बोटिक रोग, चयापचय विकार, ऑन्कोलॉजी, मध्यवर्ती मज्जासंस्थेचे विकार, अंतर्गत औषध आणि लस यांसारख्या उपचारात्मक क्षेत्रात विकसित करते. अंकलेश्वर आणि गोवा येथे उत्पादन प्रकल्प असलेल्या या कंपनीच्या उत्पादनाच्या पोर्टफोलिओमध्ये क्लेक्साइन, काडॅस, डाओनिल, लॅन्टस, टॅक्सोटरे, सोफ्रामाइसिन, कॉम्बीफ्लॅम, अराव, लॅसिक्स इ. अनेक औषधांचा समावेश होतो. भारतातील मुलांमध्ये मधुमेहाविरुद्ध लढण्यासाठी सनोफीने आयडीएफ, पीएचएफआयशी करार केला आहे.

गेली काही वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्या या कंपनीने डिसेंबर २०१९ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी ३,०७०.६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४५१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो १८ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच डिसेंबर २०१९ अखेर तिमाहीत कंपनीने ८२६.३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १०८.३७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत तो तब्बल ३७ टक्क्यांनी अधिक आहे. केवळ ०.४ बिटा असलेल्या सनोफीचे भरणा झालेले भागभांडवल फक्त २३ कोटी रुपये असून कंपनीवर कुठलेही कर्ज नाही. उत्कृष्ट व्यवस्थापन, अनुभवी प्रवर्तक असलेली आणि जगातील एक आघाडीची औषधी कंपनी म्हणून सनोफी इंडिया तुमच्या पोर्टफोलिओला सुरक्षित ठेवेल.

सुचविलेले शेअर्स सद्य बाजार परिस्थितीत कमी भावात मिळू शकतात. म्हणून खरेदी करते वेळी बाजाराचा कल पाहून कटाक्षाने टप्प्याटप्प्यानेच खरेदी करावेत.

सनोफी इंडिया लि.

(बीएसई कोड – ५००६७४)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ६,२८५

लार्ज कॅप

प्रवर्तक : सनोफी एसए/ हेक्स्ट जीएमबीएच

उद्योग क्षेत्र : औषध निर्माण- बहुराष्ट्रीय

बाजार भांडवल : रु. १४,४९७ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु.  ७,६६०/ ५,३००

भागभांडवल : रु. २३.०३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक   ६०.४०

परदेशी गुंतवणूकदार    १३.३८

बँक/ म्यु. फंड/ सरकार  ६.२६

इतर/ जनता  ९.९६

पुस्तकी मूल्य :    रु.१०६०

दर्शनी मूल्य : रु. १०/-

लाभांश : ३४९०%

प्रति समभाग उत्पन्न : रु. १९५.८

पी/ई गुणोत्तर :   ३२.१

समग्र पी/ई गुणोत्तर :  ४६

डेट इक्विटी गुणोत्तर :  ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :  २१९८

रिटर्न ऑन कॅपिटल :   २८.८४

बीटा :   ०.४