News Flash

बंदा रुपया : सूर्यप्रकाशाभोवती उद्योगाची नवी बांधणी

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

(संग्रहित छायाचित्र)

खामखेडा तसं छोटसंच गाव. आडवळणी, डोंगरकुशीत वसलेलं. मोजकीच घरं, सर्वार्थानं रेंजच्या बाहेरची. कोणत्याच कंपनीचा मोबाइल जेथे नीटसा चालत नाही, अशी स्थिती. घराच्या अंगणात दोन यंत्रं. एका जाळीदार पोत्यात ओली हळद ठेवलेली. त्याचे बारीक काप करणारे यंत्र आणि ठरावीक आकारात कापलेले हळदीचे तुकडे पुन्हा वाळविण्यासाठी आणखी एक यंत्र. घराच्या छतावर सहा फूट रुंदी आणि लांबीचे सौर ऊर्जेवरील एक वाळवण यंत्र. इंग्रजीत सोलार ड्रायर. सौरपटलावर ओल्या हळदीचे तुकडे. सूर्य किरणांमधील अतिनील किरणे म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट आणि अवरक्त म्हणजे इन्फ्रारेड किरणे थेट पडली तर वाळविल्या जाणाऱ्या पदार्थावर त्याचे परिणाम जाणवू नयेत म्हणून सौर पटलाभोवती एक प्रकारचे प्लास्टिक्सचे आवरण. पोषक सूर्यकिरणेच पदार्थावर पडावी तसेच हवा खेळती राहील अशा पद्धतीने त्याची बांधणी. पॉलिकाबरेनेटपासून ते बनविलेले. पदार्थ सुकला की त्याचे आयुष्य वाढते, ही शहाणीव मानवाला कधी झाली काय माहीत? पण त्याचा शास्त्र म्हणून उपयोग करणारे हे गाव. खामखेडय़ातील छोटय़ाशा गावात कधी हळद, कधी भेंडी, कधी गाजर, कांदा, लसूण असे किती तरी पदार्थ वाळवून देण्याच्या कार्यपद्धतीत अनेक महिलांना सहा हजार रुपयांपर्यंतचा रोजगार मिळतो. केवळ खामखेडा गावात नाही तर ११ गावांमध्ये असं काम सुरू आहे. हे कसं घडलं?

मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेत विद्यार्थी म्हणून शिकत असताना अंबाजोगाईच्या वैभव तिडके नावाच्या तरुणाला एक शेतकरी बाजार संपताना कमी किमतीत उरलेली भाजी विकताना दिसला. तसे त्या शेतकऱ्यानं केलं नसतं तर त्याला ती भाजी टाकून द्यावी लागली असती. आपणही हे दृश्य नेहमी पाहतो. पण उत्तर शोधणारी माणसे वेगळीच असतात. वैभव तिडकेआणि त्याच्या मित्रांनी मग सोलार ड्रायर बनविण्याचे ठरविले. हे यंत्र बनविण्यासाठी त्यांनी दोन वर्षे खर्ची घातली. फुलंब्री तालुक्यातील खामखेडा गावातील अनेक घरांवर तो ड्रायर दिसतो आहे. त्यातून अनेक जणींना घरबसल्या रोजगारही मिळतो आहे. वैभव तिडकेबरोबर गणेश बेरे, अश्वीन पावडे, तुषार गवारे, शीतल सोमानी, निधी पंत आणि स्वप्निल कोकाटे ही मंडळी होती. ते पदार्थ वाळवून त्याचा उपयोग वाढविण्यासाठी झटताहेत. हे सगळे तरुण उच्चविद्याविभूषित. ‘टेक्नोक्रॅट’ म्हणा त्यांना! कोणी एम.टेक.पर्यंत शिकलेले तर कोणी आयआयटीमधून उत्तीर्ण. सोलार ड्रायर तयार करून विकणे हे काम तर ते करतातच. पण तेवढेच आता या कंपनीचे काम राहिले नाही. कारण यंत्र वापरणारी ग्रामीण भागातील महिला त्यात जे बदल सुचविते तसे बदल करत जाणे असे घडत गेले. शिक्षण घेत असताना केलेल्या या यंत्राला २०१३ मध्ये एक पुरस्कार मिळाला. डेल फाऊंडेशनच्या या पुरस्काराचे स्वरूप ३६ लाख रुपये होते. तत्पूर्वी ही यंत्र बनविणारी मंडळी स्वत:ची संशोधन संस्था असावी, अशा विचारात होती. पण ‘संशोधन संस्था’ अशी नोंदणी देशात होत नाही. त्यामुळे त्याचं स्वरूप स्वयंसेवी संस्था म्हणूनच राहिलं. पुढे सायन्स फॉर सोसायटी टेक्नो सर्व्हिसेस प्रा. लि. (एस फोर एस) या कंपनीची स्थापना २०१३ मध्ये करण्यात आली. आता या कंपनीमार्फत १६ देशात ‘सोलार ड्रायर’ विकले जातात. या संशोधक उद्योजकांनी मग तीन पेटंट मिळविली. ती याच क्षेत्रातील यंत्रसामग्री विकासाची आहेत. अजूनही सात पेटंटसाठी या कंपनीच्या संचालकांनी अर्ज केलेले आहेत. आपण जे काही करतो आहोत त्याचा भोवताल किंवा त्या यंत्राच्या अनुषंगाने निर्माण होणारी ‘इकोसिस्टीम’ विकसित व्हायला हवी असं या कंपनीतील प्रत्येकाला वाटत होतं. केवळ यंत्र विकून सहजपणे मोठा उद्योजक होता येणं सहज शक्य होतं. पण ज्या ध्येयानं म्हणजे ग्रामीण भागातील महिला, शेतकरी यांच्या आयुष्यात बदल व्हायला हवा असं वाटत होतं, तो करणे यासाठी मग जे आवश्यक ते करायचं असं ठरवून या कंपनीने औरंगाबादच्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीचा कारभार सुरू केला. असे करताना काम करणारी माणसे आणि त्यांची निकड याची सांगड घालत उभा केलेला हा उद्योग आता कोटय़वधींची उलाढाल करतो आहे.

कोणत्याही हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला चक्कर मारा. एक माणूस सतत कांदा कापताना दिसतो. क्विंटलभर कांदा कापला तर त्याच्या डोळ्याचे काय हाल होत असतील? कांदा, लसूण, आलेअसे पदार्थ वाळवून भाज्यांमध्ये वापरले तर? चवीत बदल होऊ नये याची काळजी घेत अशा प्रत्येक पदार्थाची विक्री करण्यासाठी या कंपनीतील एक संचालक बाजारपेठ शोधत असतो आणि आता पुणे आणि मुंबईतील अनेक मोठय़ा हॉटेलमध्ये असे वाळविलेले कांदा, लसूण, गाजर असे पदार्थ ही कंपनी पुरवत आहे. अगदी भरलेल्या मसाल्यासह वाळलेली भेंडीही अशा प्रकारे देता येते, यावर विचार झाला. नुसता विचार करून नाही तर तशी काप करणारी यंत्रे बनविण्यात आली. साधारणत: सोलार ड्रायरची किंमत लाख-दीड लाखाच्या घरात आहे. पण वेगवेगळी काप करणारी यंत्रे ग्रामीण भागातील अनेक महिलांनी घरात बसवून घेतली आहेत. स्वयंपाक करता-करता सहजपणे त्या हे काम करतात. या मशीन चालविण्यासाठी लागणारं विजेचे देयक हे कंपनीकडूनच अदा केलं जातं. परिणाम असा झाला आहे की आता १०-११ गावांतील लोक पीक पद्धती बदलण्याच्या मानसिकतेमध्ये आले आहेत. करार पद्धतीने शेतीचा प्रयोगही कंपनीमार्फत सुरू आहे. त्यामुळे येणारा कच्चा माल कोणत्या दर्जाचा असावा. तो कसा पिकवावा, याचाही विचार केला जात आहे. घेतलेल्या कच्च्या मालाचा दर्जा राखणे, त्याची योग्य ती वर्गवारी करणे, तो माल सुकविणे, सुकलेला पदार्थ खाण्यायोग्य आहे की नाही याची प्रयोगशाळेत तपासणी करणे, त्याचा दर्जा राखणे यासाठी अन्न आणि औषधी प्रशासनाचे सर्व नियम पाळून केले जाणारे हे काम आता अधिक व्यापक व्हावे असे या कंपनीतील प्रत्येक संचालकास वाटते. सध्या सहा हजार टन प्रतिवर्षी एवढा कच्चा माल घेतला जातो.

एका बाजूला राज्य सरकारनं अलीकडेच ५०० एकरावर अन्न प्रक्रिया उद्योग करण्याचं ठरविलं आहे. पण हे प्रकल्प उभे करताना ग्रामीण भागात उद्योजक तयार व्हायला हवेत अशी रचना सायन्स फॉर सोसायटी टेक्नो सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीमार्फत केली जात आहे. उद्योगाचं एक नव्याच  पद्धतीचं जाळं विकसित होत आहे. त्याला शासनाचं सहकार्य मिळालं तर बरंच, पण ते नसेल तरी तो उद्योग टिकला पाहिजे, अशी रचना या कंपनीच्या संचालकांनी केली आहे. भागीदारीतील व्यवसायाकडे बाजारपेठेत फारसे गंभीरपणे पाहिले जात नाही. कधी तरी ते वेगळे होतील, अशी धारणा असते. पण यातील प्रत्येकाने आपले क्षेत्र निवडले आहे. कोणी यंत्रसामग्रीच्या संशोधनात अधिक लक्ष घालतो, तर कोणी तरी मुंबईत बाजारपेठ शोधत असतो.

सुहास सरदेशमुख

सायन्स फॉर सोसायटी टेक्नो सर्व्हिसेस प्रा. लि.

सात संचालक : ’ वैभव तिडके (बी.टेक., एम.टेक., रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई) ’ डॉ. तुषार गवारे (एम.टेक., रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई) ’ स्वप्निल कोकाटे (एम.टेक. रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई) ’  डॉ. शीतल सोमानी (एमबीए, वेलिंगकर इन्स्टिटय़ूट) ’ निधी पंत (बी.टेक., रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई) ’  अश्विन पावडे (अभियंता, यांत्रिकी, एम.टेक., रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई) ’ गणेश बेहरे (एम.टेक., रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई)

* उत्पादन : सोलार ड्रायर

* मूळ गुंतवणूक  :  ३६ लाख रु.

* उलाढाल : २२ ते २५ कोटी रु. (चालू वर्षांत)

* कर्मचारी व कामगार : १००

* ग्रामीण स्तरावर २०० उद्योजक, ओरिसा राज्यातही विस्तार

* लेखक ‘लोकसत्ता’चे औरंगाबाद प्रतिनिधी

suhas.sardeshmukh@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 3:02 am

Web Title: article on science for society techno services pvt ltd abn 97
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : उत्कृष्ट गुणवत्तेची कर्जरहित कंपनी
2 नावात काय : आर्ब्रिटाज
3 बाजाराचा तंत्र कल : तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी..
Just Now!
X