प्रवीण देशपांडे

ज्येष्ठ नागरिकांना योग्य सन्मान देणे आणि त्यांची काळजी घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात कष्ट केलेले असतात, अनेकांचे जीवन घडविलेले असते. त्यांनी या काळात आपले जीवन सुखकर आणि चिंतामुक्त जगावे अशी अपेक्षा राखली पाहिजे. प्राप्तिकर कायद्याने ज्येष्ठ नागरिकांना काही सवलती दिलेल्या आहेत जेणेकरून त्यांचा त्रास कमी होईल. या कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिक दोन प्रकारात विभागले आहेत. एक म्हणजे ज्या नागरिकांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ८० वर्षांपेक्षा कमी आहे, आणि दुसरे म्हणजे ज्या नागरिकांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे असे अतिज्येष्ठ नागरिक. कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख रुपये आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख रुपये आहे. ही सवलत फक्त निवासी भारतीयांसाठीच आहे. वैद्यकीय खर्चाची वजावट, ठरावीक रोगांच्या उपचारासाठीच्या खर्चाची वाढीव वजावट, व्याजाच्या उत्पन्नावर वाढीव वजावट, अग्रिम कर भरण्यापासून सुटका, वगैरे सवलती आहेत. अर्थसंकल्पात ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना आणि निवृत्तिवेतन आणि व्याजाचे उत्पन्न असणाऱ्यांना विवरणपत्र भरण्याचा भार कमी करण्याचे सुचविण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी विवरणपत्र भरताना या तरतुदींचा विचार अवश्य केला पाहिजे.

प्रश्न : मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि मी काही पैसे कंपनीच्या मुदत ठेवीत गुंतविले आहेत. या रकमेवर मला व्याज मिळते. या व्याजाची वजावट मला ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या ‘कलम ८० टीटीबी’नुसार मिळेल का?

– प्रज्ञा काळे

उत्तर : ‘कलम ८० टीटीबी’नुसार ज्येष्ठ नागरिकांना (फक्त निवासी भारतीय आणि ज्याचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे) व्याजाच्या उत्पन्नावर ५०,००० रुपयांची वजावट मिळते. हे व्याज बँक, सहकारी बँक आणि पोस्ट ऑफिस यांच्याकडून मिळाले असले पाहिजे. या व्यतिरिक्त संस्थांकडून व्याज मिळाले असेल तर ते या कलमानुसार वजावटीस पात्र नाही. त्यामुळे कंपन्यांच्या मुदत ठेवींच्या व्याजावर या कलमानुसार वजावट मिळत नाही. अनिवासी भारतीय या कलमानुसार वजावट घेऊ शकत नाहीत.

 

प्रश्न : माझी जन्मतारीख १ एप्रिल १९६१ आहे, मी २०२०-२१ या आर्थिक वर्षांत ज्येष्ठ नागरिक म्हणून गृहीत धरला जाऊ शकेन काय?

– सदाशिव देशमुख

उत्तर : करदात्याने आर्थिक वर्षांत (त्या वर्षांत कोणत्याही दिवशी) ६० वर्षे पूर्ण केली असतील तर तो त्या वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक होतो. या नुसार आपल्या वयाची ६० वर्षे ही २०२१-२२ या म्हणजे विद्यमान आर्थिक वर्षांत पूर्ण होतात आणि त्यामुळे आपण २०२१-२२ या वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक समजले जाल. परंतु केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जुलै २०१६ मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार ज्यांचा ६०वा वाढदिवस १ एप्रिल रोजी येतो त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण आदल्या दिवशी म्हणजे ३१ मार्च रोजी पूर्ण झाल्यामुळे त्या करदात्याला ज्येष्ठ नागरिकाचा दर्जा ३१ मार्च रोजी संपलेल्या वर्षांत मिळेल. यानुसार आपण २०२०-२१ या आर्थिक वर्षांपासूनच आपण ज्येष्ठ नागरिक समजले जाल.

 

प्रश्न : मी ज्येष्ठ नागरिक आहे. माझ्या वेगवेगळ्या बँकेत मुदत ठेवी आहेत. उद्गम कर (टीडीएस) कापला जाऊ नये यासाठी मी ‘फॉर्म १५ एच’ देऊ शकतो का? त्यासाठी काय अटी आहेत?

– संजय सावंत

उत्तर : ‘फॉम १५ एच’ हा ज्येष्ठ नागरिकांना (ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे) देता येतो. ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या बँकेतील मुदत आणि आवर्त ठेवींवरील व्याज एका वर्षांत ५०,००० रुपयांपेक्षा जास्त मिळत असल्यास आणि त्याने ‘फॉर्म १५ एच’ बँकेला सादर केल्यास बँक त्यावर उद्गम कर (टीडीएस) कापत नाही. ही ५०,००० रुपयांची मर्यादा बँकेतील एक किंवा एकापेक्षा जास्त शाखेतील मुदत आणि आवर्त ठेवींवरील व्याजासाठी आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या एकूण उत्पन्नावर देय कर शून्य असेल तरच हा फॉर्म देता येतो. जर करदात्याच्या उत्पन्नावर कर देय असेल तर त्याला हा फॉर्म देता येत नाही.

 

प्रश्न : मी दरवर्षी नियमित विवरणपत्र भरतो. परंतु या आर्थिक वर्षांचे (२०१९-२०) विवरणपत्र मी काही वैयक्तिक कारणाने अद्याप भरू शकलो नाही. मला आता हे विवरणपत्र भरता येईल का? मला दंड भरावा लागेल का?

– प्रशांत कुलकर्णी

उत्तर : २०१९-२० या आर्थिक वर्षांचे विवरणपत्र भरण्याची वाढीव मुदत १० जानेवारी २०२१ रोजी संपली. आता आपण ३१ मार्च २०२१ पर्यंत १०,००० रुपये (आपले उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास) किंवा १,००० रुपये (उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास) विलंब शुल्क भरून विवरणपत्र दाखल करू शकता. आपला कर देय असेल तर त्यावर व्याज भरावे लागेल. आपले उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असेल आणि आपल्याला विवरणपत्र भरणे बंधनकारक नसेल तर विलंब शुल्क भरावे लागणार नाही.

वाचकांनी आपले प्रश्न खाली दिलेल्या ई-मेलवर किंवा ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’च्या arthmanas@expressindia.com ई-मेलवर शक्यतो मराठीत युनिकोडमध्ये टाइप करून पाठवावेत.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

pravin3966@rediffmail.com