सुधीर जोशी

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जोरकस निकालानंतर सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी मोठय़ा अपेक्षेने बाजारात सुरुवात झाली खरी! मात्र दिवसअखेपर्यंत रिलायन्सच्या समभागात पाच टक्क्यांची घसरण होऊन गुंतवणूकदारांमध्ये नैराश्य आले. यामागे अमेरिकेतील टेस्ला कंपनीच्या दूरसंचार क्षेत्रातील पदार्पणाची कथित बातमी, तेल शुद्धीकरणातील नफ्याची आकडेवारी वेगळी जाहीर न करणे आदी घटकांमुळे गुंतवूणकदारांमध्ये भविष्याबाबत निर्माण झालेली साशंकता अशी काही कारणे होती. परंतु नंतरच्या तीन दिवसांत भारत-चीन सीमेवरील संघर्षांची बातमी, अर्थसंकल्पामुळे येणारी व्यवहारातील सावधानता, जागतिक बाजारातील घसरण व परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली नफावसुली यामुळे बाजारात चौफर विक्रीचा मारा होऊन सेन्सेक्स व निफ्टी हे बाजाराचे प्रमुख निर्देशांक पाच टक्कय़ांहून जास्त घसरणीने बंद झाले. सप्ताहातील विक्रीची झळ सर्वात जास्त माहिती तंत्रज्ञान, वाहन व ऊर्जा क्षेत्राला बसली.

लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोच्या तिमाही नफ्यातील पाच टक्क्यांच्या वाढीत इतर उत्पन्नांचा मोठा वाटा होता. कंपनीला मिळालेल्या नवीन कंत्राटांमध्ये ७६ टक्के अशी दमदार वाढ झाली आहे. डिसेंबरअखेपर्यंत कंपनीने मागणी पुस्तकात सव्वा लाख कोटींच्या मागण्याची बेगमी केलेली आहे. हाती घेतलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची कंपनीची ख्याती आहे. कंपनीच्या उत्पन्न स्रोतांत पायाभूत सुविधांचा वाटा ४५ टक्के आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी जर विशेष तरतूद झाली तर कंपनीला फायदाच होईल. हिंदुस्तान युनिलिव्हरचा तिमाही नफा ३०० कोटींनी (१९ टक्के) वाढला. करोनाकाळातील स्वच्छतेच्या सवयी, जीएसके कन्झ्युमरचे अधिग्रहण याचा कंपनीला लाभ झाला. कंपनीच्या समभागात आधीपासूनच त्याचे परिणाम दिसत होते. बाजारातील नफावसुलीच्या लाटेमध्ये संधी मिळताच दीर्घ मुदतीमध्ये संपत्ती मिळवून देणारे हे दोन्ही समभाग घेण्यासारखे आहेत.

अ‍ॅक्सिस बँकेच्या तिमाही नफ्यात ३६ टक्के घसरण झाली. पण करोनाजन्य परिस्थितीमुळे बुडीत होऊ शकणाऱ्या कर्जावर जबाबदारपणे केलेल्या तरतुदीची बाजाराने दखल घेतली आणि निकालानंतरही बाजारात नकारात्मक प्रतिक्रिया आली नाही. मारुती सुझुकीला तिमाहीमध्ये संचित मागणी व उत्सवी खरेदीचा फायदा झाला, पण वाढत्या कच्च्या मालाच्या किमतींमुळे नफ्याचे प्रमाण टिकविता आले नाही. त्यामुळे कंपनीच्या समभागात मोठी घसरण झाली. कंपनीने जानेवारीमध्ये किमतवाढ केली आहे तरीही नफ्यावरील ताण कायम राहील. वाहन क्षेत्रातील कंपनीची अग्रेसर भूमिका पाहता समभागातील सात हजारांच्या आसपासची पातळी खरेदीची संधी ठरेल. डाबर व मॅरिकोचा अपेक्षेप्रमाणे टाळेबंदी काळातील ग्राहकांच्या बदललेल्या सवयींचा फायदा झाला. दोन्ही कंपन्या उत्पादनांमध्ये विविधता आणत प्रगतिपथावर आहेत.

पॉलिकॅब इंडिया ही कंपनी विद्युत उपकरणे व विद्युत प्रवाहासाठी वापरण्यात येणाऱ्या वायर व केबल्सचे उत्पादन करते. कंपनीच्या पहिल्या तिमाही निकालांवर टाळेबंदीचा परिणाम झाला तरीही कंपनीला आपली नफा क्षमता टिकवून ठेवता आली. तिसऱ्या तिमाहीचा निकाल बघता या करोनाग्रस्त वर्षांतही कंपनीची कामगिरी अबाधित राहण्याचा अंदाज आहे. वायर व केबलच्या व्यवसायात अग्रभागी असलेली कंपनी विद्युत उपकरणांच्या उत्पादनात पाय रोवत आहे. आयओटी तंत्रज्ञानावर आधारित मोबाइल अथवा लॅपटॉपने नियंत्रित करता येणारी उत्पादने कंपनी बाजारात आणत आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञानावर वाटचाल करणाऱ्या या कंपनीत योग्य संधी मिळेल तेव्हा केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल.

अर्थव्यवस्थेपासून फारकत घेत वर जाणाऱ्या बाजाराने अर्थसंकल्पाची दखल घ्यावी का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. भविष्यावर नजर ठेवून आतापर्यंत झालेल्या बाजाराच्या वाटचालीत रोकडसुलभता हादेखील एक महत्त्वाचा घटक होता. अर्थसंकल्पात पुढील काळासाठी उद्योगांसाठी पूरक काही ठोस घोषणा झाल्या तर बाजाराने गेल्या सप्ताहात गमावलेली पातळी काही अंशी भरून निघेल. मात्र वित्तीय तूट भरून काढण्यासाठी जर काही जालीम उपाय योजले तर त्याचा बाजारावर विपरीत परिणाम लगेचच होईल. आज अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात काहीही व्यवहार करणे धोक्याचे ठरू शकते. नंतरच्या दिवसांत धोरणांबाबत स्पष्टता आल्यावरच गुंतवणुकीची दिशा ठरविता येईल.

sudhirjoshi23@gmail.com