आशीष ठाकूर

वधू-वर सूचक मंडळातून विवाहोत्सुक वराची माहिती मिळते. चौकशी करता – मध्यस्थ सांगतात – ‘मुलाचं चारित्र्य तेवढं चांगल नाही, पण त्याची चाल चांगली आहे.’ असं होऊ शकतं का हो? तर नाही. पण आमच्या भांडवली बाजारात मात्र हेच घडतं आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नाही पण निर्देशांकाची चाल मात्र चांगली आहे. याला काय म्हणावं? सद्य:स्थितीने घातलेल्या या कोडय़ाच्या पार्श्वभूमीवर आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३९,४६७.३१/

निफ्टी : ११,६४७.६०

सुदृढ अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब म्हणजे तेजाळलेला भांडवली बाजाराचा निर्देशांक. क्रियेवर प्रतिक्रिया अवलंबून असते. येणाऱ्या दिवसांत सरकारने अर्थव्यवस्था सुधारणेचा कार्यक्रम युद्ध पातळीवर हाती घेऊन, तो त्वरेने कार्यान्वित केला पाहिजे. म्हणजेच नोकरदार वर्गाची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविणे, दीर्घ मुदतीच्या समभाग विक्रीवरील भांडवली नफा कराचे निर्मूलन, खासगी उद्योगांना नवीन उद्योग स्थापनेसाठी अथवा विस्तारासाठी आकर्षक, उद्योगस्नेही धोरण, या सरकारी क्रिया त्वरेने घडल्यास, निर्देशांकाची प्रतिक्रिया म्हणजे निफ्टी निर्देशांक १२,००० च्या पल्याड झेपावून त्याने १२,४००च्या पूर्वस्थापित सार्वकालिक उच्चांकाला गवसणी घालणे. वरील प्रक्रियेच्या परिणामी अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत जाईल आणि निर्देशांकाची चाल चांगली आहे असे आपण म्हणू शकतो.

येणाऱ्या दिवसातील सरकारच्या उपाययोजना जर संथ गतीने सुरू राहिल्यास सेन्सेक्सवर ४०,३०० आणि निफ्टीवर ११,८०० चा भरभक्कम अडथळा असेल. हा स्तर पार करण्यास निर्देशांक अपयशी ठरल्यास निर्देशांक सेन्सेक्सवर ३८,००० ते ३७,३०० आणि निफ्टी निर्देशांक ११,००० ते १०,८०० पर्यंत खाली घसरू शकतो.

जाहीर झालेले कंपन्यांचे वित्तीय निकाल  आणि त्यांचे विश्लेषण..

हल्ली कंपन्यांचे जे वित्तीय निकाल जाहीर होतात त्याबद्दल गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत असतात. केपनीचा जाहीर झालेला तिमाही निकाल चांगला असतो, पण निकालापश्चात त्या कंपनीचा भाव भांडवली बाजारात कोसळतो. तर अगदी बरोबर उलट वित्तीय तिमाही निकाल निराशादायक पण भांडवली बाजारात समभागाच्या भावात तेजी. मग खरं काय? यासाठी मूलभूत व तांत्रिक विश्लेषणातील महत्त्वाच्या संकल्पना एकत्र करून, त्यावर अभ्यास करून ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना विकसित केली गेली आहे. गुंतवणूकदारांनी फक्त एकच गोष्ट करायची, निकालापश्चात समभागाचा बाजारभाव ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ राखण्यात यशस्वी ठरल्यास, समभागाची चाल चांगली आहे असे मानायचे. लेखात नमूद केलेले वरचे लक्ष्य साध्य होणार हे गृहीत धरले जावे. या संकल्पनेमुळे गुंतवणूकदारांचा संभ्रम दूर होण्यास मदत होईल.

आता ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना काळाच्या कसोटीवर उतरली का? यासाठी आपण या स्तंभातील २० जुलैच्या लेखातील बजाज ऑटो समभागाचा आधार घेऊया.

६ बजाज ऑटो : तिमाही निकालाची नियोजित तारीख ही २२ जुलै होती. १७ जुलैचा बंद भाव २,९९५ रुपये होता. निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर २,८०० रुपये होता. तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरावर टिकला, तर तिमाही निकाल चांगला, अन्यथा वाईट. लेखात म्हटल्याप्रमाणे जर निकाल उत्कृष्ट असेल तर २,८०० रुपयांचा स्तर राखत ३,१५० रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. बजाज ऑटोने निकालापश्चत २,८०० रुपयांचा स्तर राखत १९ ऑगस्टला बरोबर ३,१५८ रुपयांचा उच्चांक नोंदविला. ज्यांच्याकडे दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेअंतर्गत बजाज ऑटो आहे त्यांनी समभाग राखून ठेवले, व अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत पाच टक्कय़ांचा परतावा मिळविला. आजही बजाज ऑटो २,८०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखून आहे आणि २८ ऑगस्टचा समभागाचा बंद भाव हा ३००० रुपये आहे.

६ आयसीआयसीआय बँक : २० जुलैच्या लेखातील दुसरा समभाग होता आयसीआयसीआय बँक. या समभागाचा १७ जुलैचा बंद भाव ३५४ रुपये होता, निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ३४० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे, जर वित्तीय निकाल उत्कृष्ट असेल तर ३४० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ३८० रुपये असेल. हे निकालाअगोदरचे विश्लेषण होते. आयसीआयसीआय बँकेने निकालापश्चात ३४० रुपयांचा स्तर राखत, २७ जुलैला ३८५ चा उच्चांक मारून वरचे लक्ष्य साध्य केले. अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत सात टक्यांचा परतावा मिळविला. आजही आयसीआयसीआय बँक ३४० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखून आहे आणि २८ ऑगस्टचा तिचा बंद भाव हा ४०९ रुपये आहे.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com