News Flash

बाजाराचा तंत्र कल : मन मनास उमगत नाही..!

भविष्यकालीन तेजीचा पाया हा सेन्सेक्सवर ३९,२०० आणि निफ्टीवर ११,५०० हा असेल.

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे ‘सेन्सेक्स’वर ४०,८५० आणि ‘निफ्टी’वर १२,०५०चा आधार राखण्यात अपयशी ठरल्यास निर्देशांकाचे खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४०,३५० आणि निफ्टीवर ११,९०० असे असेल, जे सरलेल्या सप्ताहातील मंगळवारी सेन्सेक्सवर ४०,६१० आणि निफ्टीवर ११,९०८ चा नीचांक मारत साध्य केले गेले. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

गुरुवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ४१,१७०.१२ /

निफ्टी : १२,०८०.९०

वर्षांरंभापासून आजतागायत विविध लेखांतील निफ्टी निर्देशांकाच्या भाकितांचा आढावा घेता.. फेबुनासी कालमापन पद्धतीप्रमाणे जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात निफ्टीने आपले पहिले लक्ष्य १२,३०० साध्य केले, त्यानंतर निफ्टी निर्देशांकावर १२,००० ते ११,९०० पर्यंतची हलकीशी घसरण अपेक्षित असेल, बरोबर २ जानेवारीला निफ्टीने १२,२८२ चा ऐतिहासिक उच्चांकी बंद भाव नोंदवून, अमेरिका-इराण युद्धाचे कारण पुढे करत निफ्टीने ११,९२९ पर्यंतची घसरण नोंदविली. गेल्या मंगळवारी पुन्हा निफ्टीने याच ११,९०० च्या आधार घेत पुन्हा सुधारणा झाली.

अर्थव्यवस्थेवरील मळभ, नराश्य, त्यात करोना विषाणूंची भर, यामुळे मन विषण्ण होऊन ..‘मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा’ असे जरी आपल्याला वाटत असले, तरी काळ्या ढगांना रुपेरी किनारही आहे. सध्याच्या या अनिश्चित वातावरणात, तीन दिवसांच्या प्रदीर्घ रजेत निफ्टीने आपल्या कृतीतून ११,९००चा आधार सातत्याने राखत वेगळाच संदेश दिला आहे. इशारा केला जाता जाता.. असा हा निफ्टीचा संदेश समजून घेण्याचा आज प्रयत्न करूया.

गेला दीड महिना हा नाटय़पूर्ण घडामोडींचा, प्रस्थापित तेजीच्या धारणेला कलाटणी देणाऱ्या ज्ञात, अज्ञात घटनांनी ओतप्रोत भरलेला होता. त्यात ज्ञात, अज्ञात घटनांची वर्गवारी करता ज्ञात घटनांमध्ये अर्थसंकल्प, रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण, कंपन्यांचे तिमाही निकाल, तर एका रात्रीत जन्मलेल्या अज्ञात घटना अमेरिकेने इराणवर केलेला हल्ला, करोना विषाणूच्या साथीने धारण केलेले उग्र रूप या प्रत्येक घटनांनी प्रस्थापित तेजीच्या धारणेला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला व तशी क्षणिक मंदीदेखील आली. अर्थसंकल्प सादर केल्यावर अपेक्षित असलेली निफ्टीवरील ११,५०० पर्यंतची घसरण, ही प्रत्यक्षात ११,६१५ पर्यंत येऊनदेखील गेली. त्यानंतर प्रत्येक निराशाजनक बातमीत निफ्टीने सातत्याने ११,९००चा स्तर राखला, जो तांत्रिक विश्लेषणाच्या परिभाषेत चढत्या श्रेणीतील नीचांक (हायर बॉटम) दर्शवत आहे.

प्रत्येक वेळेला मंदी येते पण ती क्षणिक – अवघी दोन-तीन दिवस टिकून पुन्हा भरीव सुधारणा होत आहे, त्यात आता सुखद घटना घडत आहे. सामान्य गुंतवणूकदारांच्या आवडत्या अशा ‘ब’ गटातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक उच्चांकासमीप आहेत. या सर्व घटना काळाच्या उदरात दडलेल्या नवीन उंच्चाकी स्तराची तेजी तर दर्शवीत नाहीत ना?

भविष्यकालीन तेजीचा पाया हा सेन्सेक्सवर ३९,२०० आणि निफ्टीवर ११,५०० हा असेल. भविष्यातील एखाद्या तीव्र घसरणीत निर्देशांक या स्तरापर्यंत घरंगळत आला व उपरोक्त स्तर राखण्यात निर्देशांक यशस्वी ठरला, तर तेजी कायम आहे हे गृहीत धरायला हवे. त्या स्तरावरून तेजीचे प्रथम वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४२,५०० आणि निफ्टीवर १२,५०० आणि अंतिम लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४३,३०० ते ४४,००० आणि निफ्टीवर १२,७५० ते १३,००० असे असेल.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 3:08 am

Web Title: article on share market trends abn 97
Next Stories
1 अर्थ वल्लभ : ‘कर्त्यां’चे प्रगतीपुस्तक
2 क.. कमॉडिटीचा : करोना, ट्रम्प आणि विक्रमी उत्पादनाच्या विळख्यात कृषिक्षेत्र 
3 बंदा रुपया : सूर्यप्रकाशाभोवती उद्योगाची नवी बांधणी