|| कौस्तुभ जोशी

मागील आठवडय़ात आपण अमेरिकेत आलेल्या महामंदीची बीजे बँकिंग क्षेत्रातील अनिर्बंध व्यवहारात कशी होती हे समजावून घेतले. आता या अरिष्टाची सुरुवात कशी झाली पाहू या.

बँकांनी ज्यांची ऐपत नाही त्यांना भरमसाठ कर्जवाटप केले, पण हे तेवढय़ावरच नाही भागलं की काय म्हणून या वाटप केलेल्या कर्जाचे रोखे म्हणजेच बाँड बनवून त्यांनी अन्य वित्तसंस्थांना विकले. थोडक्यात आपली ‘बॅलन्स शीट’ स्वच्छ दिसावी म्हणून आजचे मरणच उद्यावर ढकलले! हे अजून सोपे करून सांगायचे झाल्यास, जर त्या कर्जाची परतफेड झाली नाही, तर ते कर्ज ज्या बाँड्स स्वरूपात विकलेले आहे ते बाँड्स सुद्धा गडगडणार!! हे बाँड विकत घेणाऱ्या वित्तसंस्था आणि गुंतवणूकदार यांना या संभाव्य धोक्याची कल्पना सुद्धा आली नाही, अमेरिकेत या कर्जरोख्यांना ‘क्रेडिट रेटिंग’ म्हणजेच पतमानांकन देणाऱ्या कंपन्यांनीदेखील ‘उत्तम’ अशी श्रेणी दिल्यामुळे लोक विश्वास ठेवत राहिले आणि  व्यवहार अधिक फुगत राहिले. काही वर्षांनंतर गृह कर्ज घेण्यासाठी जी घरे तारण ठेवली होती त्या घरांचे मूल्य कमी आणि दिलेल्या कर्जाचे मूल्य अधिक! अशी परिस्थिती तयार झाली.

वर्ष २००७ पासून हळूहळू घरांच्या किमती खाली येऊ लागल्या, ज्यांना कर्जफेड झेपत नव्हती त्यांनी कर्जफेड करणार नाही किंवा ती वेळेवर करणार नाही असे कृतीतून दाखवण्यास सुरुवात केली. वेळेवर पैसे परत न आल्यामुळे बँकांचे नुकसान होऊ लागले आणि ‘बुडबुडा’ फुटायला सुरुवात झाली. बँकांच्या रोख्यांवरही याचा परिणाम होणे स्वाभाविक होते, बँका आर्थिकदृष्टय़ा सुस्थितीत नाहीत हे समजायला लागल्यावर गुंतवणूकदारांनी आपल्याकडचे रोखे विकण्यास सुरुवात केली आणि बाजारपेठेला हादरे बसायला सुरुवात झाली.

आतापर्यंत फक्त अमेरिकेत मर्यादित असलेले हे संकट आता वैश्विक होऊ लागले. युरोप खंडातील प्रतिष्ठित अशा बीएनपीपासून अमेरिकेतील लेहमन ब्रदर्सपर्यंत सगळ्याच बडय़ा वित्तसंस्था गोत्यात आल्या. अमेरिकेत खाजगी क्षेत्रातील कंपन्या जशा बुडायला लागल्या तशाच फॅनी मे आणि फ्रेडी मॅक यासारख्या सरकारी नियंत्रण असलेल्या वित्तसंस्थासुद्धा डबघाईला आल्या.

सप्टेंबर १५, २००८ या दिवशी लेहमन ब्रदर्सने आपली दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे मोठय़ा, मध्यम, लहान अशा सर्वच वित्तसंस्था, बँका, विमा कंपन्या यांच्यातील फॉल्ट लाइन्स अर्थात भगदाडे उघडकीस आली.

आता त्या अरिष्टाकडे कालानुक्रमाने पाहू या.

  •  वर्ष २००३ ते २००६ या वर्षांत जागांच्या किमती भरमसाठ वाढत होत्या.
  •  वर्ष २००५ मध्ये ‘आयएमएफ’ने धोक्याचा इशारा दिला
  •  सप्टेंबर २००६ मध्ये १० वर्षांत पहिल्यांदाच घरांच्या किमती कमी होऊ लागल्या
  •  वर्ष २००६ अखेरीस नवीन घरांची मागणी २५ टक्क्य़ांनी कमी झाली
  •  फेब्रुवारी २००७ मध्ये फॅनी मे आणि फ्रेडी मॅक यांनी धोकादायक कर्जाची जबाबदारी घेण्यास नकार दिला
  •  सप्टेंबर २००८ लेहमन ब्रदर्स दिवाळखोरीत
  •  पुढे बँक ऑफ अमेरिकाने मेरील लिंच समूह विकत घेतला
  •  एआयजी या बलाढय़ विमा कंपनीने अरिष्टातून वाचण्यासाठी अमेरिकी सरकारची मदत घेतली
  •  वर्ष २००८ अखेरीस फोर्ड, जनरल मोटर्स अशा निवडक कंपन्यांना मदत करण्यासाठी अमेरिकी सरकारला आपल्या तिजोरीतील निधी वापरावा लागला

या अरिष्टातून आपण नक्की शिकलो काय? आपल्या वित्तीय संस्था अधिकाधिक पारदर्शक व्यवहार करतात का? हे आणि असे अनेक प्रश्न आज अनुत्तरित आहेत!

joshikd28@gmail.com

(लेखक वित्तीय नियोजनकार, अर्थशास्त्राचे प्राध्यापक)