24 October 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : निर्देशांकाची लक्ष्यपूर्ती!

गेल्या १५ दिवसांपासून नमूद केलेला निर्देशांकाचा नवीन उच्चांक हा सेन्सेक्स ४०,१५० व निफ्टी १२,०५० चे लक्ष्य हे गेल्या सोमवारी साध्य झाले

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

गेल्या १५ दिवसांपासून नमूद केलेला निर्देशांकाचा नवीन उच्चांक हा सेन्सेक्स ४०,१५० व निफ्टी १२,०५० चे लक्ष्य हे गेल्या सोमवारी साध्य झाले. व त्यानंतर अपेक्षित असलेली एक संक्षिप्त घसरण ही गुरुवारी सेन्सेक्स ३९,००० व निफ्टी ११,८०० पर्यंत आली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३९,६१५.९०

निफ्टी : ११,८७०.७०

येणाऱ्या दिवसात निर्देशांकात सुधारणा होऊन निर्देशांक पुन्हा उच्चांकासमीप जाण्याचा प्रयत्न करेल. या प्रक्रियेत निर्देशांक – सेन्सेक्स ४०,१५० व निफ्टी १२,०५० चा स्तर ओलांडण्यास अयशस्वी ठरला तर निर्देशांक पुन्हा सेन्सेक्स ३९,००० ते ३८,५०० व निफ्टी ११,७०० ते ११,५५० पर्यंत खाली घसरू शकतो. या स्तरावर ज्या गुंतवणूकदारांची तेजीत सहभागी होण्याची संधी हुकली आहे त्यांनी या स्तरावर चांगल्या प्रतीचे समभाग खरेदी करण्याचा विचार करावा.

तिमाही निकालांचे विश्लेषण

प्रथम उत्कृष्ट निकालाकडे वळूया –

या स्तंभातील २२ एप्रिलच्या लेखातील टाटा ग्लोबल बिव्हरेजेसचा बंद भाव २०८ रुपये होता. वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा २०० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे, जर वित्तीय निकाल उत्कृष्ट असेल तर २०० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य २२० व त्यानंतर २५० रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. टाटा ग्लोबल बिव्हरेजेसचा प्रत्यक्ष निकाल हा उत्कृष्ट होता व त्यात टाटा केमिकल्सच्या व्यापारी कराराची साथ मिळून समभागाने २०० रुपयांचा स्तर राखत ४ जूनला २५८ रुपयांचा उच्चांक नोंदवला.

याचा फायदा गुंतवणूकदारांनाही झाला. हा समभाग ज्या गुंतवणूकदारांचा दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेअंतर्गत आहे त्यांनी तो राखून ठेवला व अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना (शॉर्ट टर्म ट्रेडर) अल्पावधीत २४ टक्के परतावा मिळविला. आजही (१ महिन्यानंतर) टाटा ग्लोबल बिव्हरेजेस २०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखून आहे.

दुसरा समभाग हा १५ एप्रिलच्या लेखातील टाटा स्पाँज अँड आयर्न. समभागाचा महत्वाचा केंद्रबिंदू स्तर ७३० रुपये होता. निकालाअगोदर १२ एप्रिलचा बंद भाव ७६७ रुपये होता. निकाल निराशादायक असल्यास ७३० रुपयाचा केंद्रबिंदू स्तर तोडत समभागाची ६६० रुपयेपर्यंत घसरण होईल. प्रत्यक्ष निकाल निराशादायक असल्याने १४ मे रोजी ६६१ रुपयांचा नीचांक नोंदवला व आज दिड महिन्यानंतरही, बाजार नवीन उच्चांकासमीप असताना, टाटा स्पाँज अँड आयर्न ७३० रुपयांच्या महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तराखालीच आहे.

थोडक्यात, ‘महत्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना काळाच्या कसोटीवर तर उतरलीच; पण त्याचबरोबरच वित्तीय निष्कर्ष वाढीव नफ्याचे असेल तर वरचे लक्ष्य हे टीसीएस व टाटा ग्लोबल बिव्हरेजेसने साध्य करून दाखवेल. तर निराशादायक निकाल असेल तर खालचे लक्ष्य हे टाटा स्पाँज अँड आयर्नद्नारे साध्य होईल.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 2:08 am

Web Title: article on target of the index
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : दीर्घकालीन गुंतवणुकीचा फायदा!
2 भेट आणि प्राप्तिकर
3 व्यापारचक्र
Just Now!
X