उद्योग किंवा व्यवसायात जशी जीवघेणी स्पर्धा असते, तशीच मक्तेदारीही असते. ही मक्तेदारी वस्तूच्या, उत्पादनाच्या किंवा अगदी एखाद्या उपकरणाच्या निर्मितीचीही असते. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी अभियांत्रिकी उद्योग किंवा वस्त्रोद्योग क्षेत्रात परंपरागत ‘मेटल पुलीज’ला प्लास्टिकचा यशस्वी पर्याय देऊन या प्रकारच्या उत्पादनात आपला ठसा, मक्तेदारी देशात उमटवली आहे ती पुण्यातील यशवंत कर्वे यांच्या ‘टफ प्लास्ट’ या कंपनीने! पदवीचा कोणताही शिक्का मागे नसतानाही यशवंत कर्वे यांनी प्लास्टिक टायमिंग पुलीज्वरील आपली मक्तेदारी सिद्ध केली आहे.

कोणताही उद्योग किंवा व्यावसायिक म्हटले की, जोखीम ही ओघाने येतेच. जोखमींनाही वेगवेगळे पैलू किंवा कंगोरे असतात. त्यामुळे कॉर्पोरेट कंपनीतील चांगली नोकरी सोडून केवळ वडिलांच्या इच्छेसाठी कोणतीही पाश्र्वभूमी नसताना व्यवसायात उतरण्याची जोखीम यशवंत कर्वे यांनी पत्करली, इतकेच नाही तर जिद्द, चिकाटी आणि कष्टाळूपणाच्या जोरावर या क्षेत्रात देशभरात नाव कमावले. अभियांत्रिकी उद्योग आणि वस्त्रोद्योगातील अनेक नामवंत कंपन्यांसह छोटय़ा-छोटय़ा उपकरणांना आवश्यक असलेली प्लास्टिक टायमिंग पुलीची निर्मिती ही त्यांच्या व्यवसायाची ओळख झाली आहे. पुण्यात तशी झपाटलेली अनेक व्यक्तिमत्त्वे सापडू शकतात. मात्र उत्पादन क्षेत्रात आपले नाव असावे, आपल्या विशेष उत्पादनाला देशभर ओळखले जावे, या हेतूने झपाटलेल्या यशवंत कर्वे यांच्या उद्योगविस्ताराची कहाणीही तशी रंजक आहे.

कर्वे मूळचे पेण येथील. आई-वडील, सहा भाऊ, तीन बहिणी असे त्यांचे कुटुंब. घरची परिस्थिती तशी हलाखीची. त्यामुळे मॅट्रिक होताच स्वस्त धान्य दुकानात कर्वे यांनी नोकरी सुरू केली. तेव्हा त्यांना पगार होता ४५ रुपये. किराणा दुकानात काही काळ नोकरी केल्यानंतर राजस्थानमधील एका वस्त्रोद्योग कंपनीत त्यांना नोकरी करण्याची संधी मिळाली. येथे पाच वर्षे त्यांनी काम केले आणि व्यवसायाची, उद्योजक होण्याची बीजे येथूनच पुढे त्यांच्यात रुजण्यास सुरुवात झाली. वडील आजारी असल्यामुळे राजस्थानमधील नोकरी त्यांना सोडावी लागली. मात्र मुलाने उद्योजक व्हावे, विशेषत: उत्पादन क्षेत्रात नावलौकिक कमवावा, असा वडिलांचा आग्रह होता. या दरम्यान वडिलांच्या निधनानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. पुण्यातील एका कंपनीत त्यांनी नोकरीला सुरुवात केली. कंपनीत काम करत असताना त्यांची बदली प्लास्टिक विभागात झाली आणि येथूनच त्यांच्यातील उद्योजकाला बळ मिळाले. वडिलांची इच्छा, प्लास्टिकबाबत प्रत्यक्ष मिळालेले ज्ञान या आधारे उद्योग सुरू करण्याचा निर्णय यशवंत कर्वे यांनी घेतला आणि अभियांत्रिकी तसेच औद्योगिक क्षेत्रातील शाश्वत उत्पादनाला पर्याय देणाऱ्या उत्पादनाची निर्मिती करून त्यांनी या क्षेत्रातील त्यांचे योगदानही सिद्ध केले. प्लास्टिक टायमिंग पुलीज या उपकरणाचे, उत्पादनाचे व्यापारचिन्ह त्यांच्या नावावर आहे.

‘व्यवसाय करावा, असे सातत्याने वाटत होते. तेव्हा भांडवलाचा प्रश्न मोठा होता. नोकरी सोडल्यानंतर बचत झालेले दहा हजार रुपये हाती होते. या कालावधीत प्लास्टिकबाबत माझी जिज्ञासा सातत्याने वाढत होती. प्लास्टिकबाबतीत मला काही माहिती झाली होती. वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी उद्योगातील प्लास्टिकची गरज लक्षात घेऊन मेटल पुलीजला पर्याय देणारे उत्पादन करावे, असा निर्णय मी घेतला. मात्र त्यासाठी प्रारंभी मोठे भांडवल नव्हते. त्यामुळे बॉलपेनच्या निर्मितीपासून डिर्टजट तयार करण्यापर्यंत अनेक लहान-मोठे उद्योग केले, मात्र त्यात फारसे यश आले नाही,’ असे कर्वे सांगतात.

त्यामुळे प्लास्टिकचे मोल्ड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र सुरुवात कोठून करायची, काय उद्दिष्टे ठेवायची आणि त्यातून साध्य काय करायचे हे प्रश्न त्यांच्या डोक्यात होते. यातून टफ प्लास्ट या कंपनीची स्थापना झाली आणि अंगभूत चिकाटी, उद्यमी तळमळीच्या जोरावर त्यांनी यशाची एक-एक शिखरे पादाक्रांत करण्यास सुरुवात केली. ते नोकरी करत असलेल्या कंपन्यांमधील मेटल पार्टला प्लास्टिकचा पर्याय देऊन त्यांनी प्लास्टिक टायमिंग पुली या उत्पादनाची निर्मिती करण्यास प्रारंभ केला. पुण्यातील नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील माणिकबाग पसिरात टूलरूम घेतली.

टफ प्लास्ट या त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल तब्बल सवा कोटींपर्यंत पोहोचली असून सध्या १७ कामगार त्यांच्याकडे कार्यरत आहेत. कंपन्यांच्या मागणीनुसार प्लास्टिकचे मोल्ड आणि त्यातील उत्पादननिर्मिती त्यांच्याकडून केली जात आहे. प्लास्टिक टायमिंग पुलीज्बरोबर गिअर बॉक्स हेही त्यांचे उत्पादन वाखाणले गेले आहे.

वस्तूची निर्मिती, उपकरणाचा शोध, असाधारण व्यावसायिक कुशलता ही कोणत्याही व्यवसायातील मक्तेदारीची प्रमुख कारणे असतात. प्लास्टिकमधील पुलीज्ची निर्मिती सुरू केल्यानंतर, या उपकरणाला, शोधाला निर्मितीचे श्रेय मिळावे, व्यावसायिकाचे हित जपले जावे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. प्लास्टिक टायमिंग पुलीज्चा ट्रेडमार्कही त्यांनी घेतला. प्लास्टिकचे युनिट सुरू केल्यानंतर प्रथम एक पुलीज् करण्यासाठी वर्षभराची प्रतीक्षा त्यांना करावी लागत होती. अन्य ठिकाणी जाऊन कामे करावी लागत होती. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली टूलरूम तयार करून त्यांनी वर्षांला मागणीनुसार उत्पादनांची निर्मिती सुरू केली.

पदवीचा शिक्का नसतानाही केवळ व्यावहारिक ज्ञानाच्या जोरावर या क्षेत्रात यशस्वी झेप त्यांनी घेतली आहे. देशभरातील अनेक वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी उद्योगाला आवश्यक असलेल्या सुटय़ा यंत्र घटकांची निर्मिती त्यांच्याकडून होत आहे. त्यांना अर्थात, त्यांच्या कंपनीला मिळालेले अनेक पुरस्कार याची साक्ष देतात. त्यामुळे प्लास्टिकच्या उत्पादनात कर्वे यांची स्वतंत्र ओळख झाली आहे.

– अविनाश कवठेकर

पुलीज् काय आहेत?

हे एक खोबणीसह चाक असलेले एक साधे यंत्र-उत्पादन आहे. सोपे उदाहरण द्यायचे झाल्यास झेंडावंदन करताना, झेंडय़ाची दोरी ज्या चरकीवरून फिरते, तिला पुली म्हटले जाते. तथापि औद्योगिक वापराच्या पुलीज् या कमाल अचूकतेसह कामगिरी करणाऱ्या असणे खूप महत्त्वाचे असते.  वस्त्रोद्योगात पुलीज्ला मोठी मागणी आहे. ही मागणी काही कोटींमध्ये आहे. त्यातही गुजरात आणि गुजरातमध्येही सुरत या शहरातही वर्षांला काही कोटी पुलीज्ची आवश्यकता असते. हीच बाब हेरून यशवंत कर्वे यांनी वस्त्रोद्योगाला आवश्यक असलेली पुलीज् तेही प्लास्टिकमध्ये तयार करण्यास सुरुवात केली. जिद्द, चिकाटी याबरोबरच त्यांना यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरला होता व्यावहारिक जीवनातील अनुभव! सध्या धातूला किफायतशीर पर्याय देणारे प्लास्टिक टायमर पुलीज्ची निर्मिती करणारे कर्वे हे देशातील एकमेव उद्योजक आहेत.

यशवंत कर्वे

टफ प्लास्ट पुणे प्रायव्हेट लिमिटेड

* व्यवसाय -प्लास्टिक टायमर पुलीज् निर्मिती

* कार्यान्वयन : सन १९८६

* मूळ गुंतवणूक  :  साधारण १० हजार रु.

* सध्याची उलाढाल : सुमारे १.२५ कोटी रु.

* कर्मचारी संख्या  : १७

* कर्जभार : शून्य

* डिजिटल अस्तित्व :  http://www.tuffplast.com

* लेखक ‘लोकसत्ता’चे पुण्याचे प्रतिनिधी avinash.kavthekar@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.