घरामध्ये उद्योगाची पार्श्वभूमी नसली तरी इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर अनेक अडथळे आले तरी औद्योगिक क्षेत्रात यश मिळवून स्वत:ची ओळख कशी निर्माण करता येऊ शकते याचे उदाहरण म्हणजे जालना येथील सुनील रायठठ्ठा. १९७७ मध्ये यांत्रिकी विभागात अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर जवळपास दोन दशके त्यांनी स्वत:चा उद्योग असावा यासाठी धडपड केली आणि अनेक प्रयोगही केले. १९९४ मध्ये विनोदराय इन्कॉर्पोरेट हा अन्य उद्योगांना यंत्रसामग्रीचे रेखाचित्र तयार करणारा स्वत:चा उद्योग सुरू केला. परंतु उद्योग क्षेत्रातील त्यांच्या यशस्वी मार्गक्रमणाची सुरुवात सन २००० मध्ये त्यांच्या विनोदराय इंजिनीअर्स प्रा. लि. या उद्योगास पहिल्यांदा फिजी देशातून यंत्रसामग्रीसाठी आलेल्या मागणीमुळे. पाण्याच्या साठवणुकीसाठी प्लास्टिक टाकीची यंत्रसामग्री तयार करणारा रायठठ्ठा यांचा उद्योग तेव्हापासून वर्धिष्णू राहिला. जगातील ५०पेक्षा अधिक देशांमध्ये त्यांनी ही यंत्रसामग्री आतापर्यंत निर्यात केली आहे. त्यांच्या या रोटेशनल मोल्डिंग मशीन्सची उलाढाल २००१-२००२ मध्ये जवळपास ६०-७० लाखांच्या आसपास होती. २०१८-२०१९ मध्ये ही उलाढाल १८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

रायठठ्ठा यांचे प्राथमिक, शालेय आणि महाविद्यालयातील पीयूसीपर्यंतचे (म्हणजे आजची अकरावी) शिक्षण जालना शहरातच झाले. त्यानंतर औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधून यांत्रिकी विभागातून पदवी संपादन केल्यावर पुढील चार वर्षे त्यांनी मुंबईत लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोमध्ये नोकरी केली. स्वत:चा काही तरी उद्योग असावा, असा विचार मनात घोळत असल्याने १९८२ मध्ये त्यांनी औरंगाबाद येथे येऊन भागीदारीत टाईम इंजिनीअरिंग हा उद्योग सुरू केला. पुढे तेथून जालना शहरात येऊन १९८४ मध्ये भागीदारीत ‘इलेक्टो मॅग्नेटिक रिले’ उद्योग सुरू केला. नंतर ट्रॉपिकल नावाने एअर कुलर आणि वॉटर हीटरचे उत्पादन सुरू केले. पुढच्या टप्प्यात एअर कंडशिनरचे उत्पादन सुरू केले. हे सर्व प्रयोग करीत असताना रायठठ्ठा पूर्ण समाधानी नव्हते. कारण त्यांना स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण होईल, अशा उद्योगाचा शोध सुरू होता.

वर्ष १९९४ मध्ये विनोदराय इन्कॉर्पोरेट सुरू केल्यानंतर, विनोदराय इंजिनीअर्स प्रा. लि.च्या माध्यमातून पाण्याच्या टाक्या तयार करणाऱ्या यंत्रसामग्रीमुळे त्यांना उद्योग क्षेत्रात मनासारखा सूर गवसला. १५ वर्षांपेक्षा अधिक काळातील त्यांच्या या संघर्षांस वळण देण्यास निमित्त ठरले ते २००० मध्ये दिल्ली येथे भरलेले ‘प्लास्ट इंडिया’ औद्योगिक प्रदर्शन. उसनवारी करून रायठठ्ठा यांनी या प्रदर्शनात स्वत:च्या उद्योगाचा स्टॉल लावला होता. त्यांना यंत्रसामग्रीची पहिली ऑर्डर या प्रदर्शनामुळे मिळाली. आज भारतातील अनेक राज्यांत आणि जगातील ५०पेक्षा अधिक देशांत ३० हजार लिटपर्यंत क्षमतेच्या टाक्या तयार करणारी यंत्रसामग्री त्यांनी पोहोचवली आहे.

लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोमध्ये १९७७ साली नोकरी करताना पाण्याच्या साठवणुकीसाठी लागणाऱ्या टाक्या तयार करणाऱ्या ‘साचा’ची जाहिरात रायठठ्ठा यांच्या वाचनात आली होती. तेव्हापासून असा उद्योग सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळत होता. औरंगाबादसारखे औद्योगिक शहर जवळ असतानाही त्यांना उद्योगासाठी जालना शहर निवडले आणि स्थानिक कामगार प्रशिक्षित करून त्यांना कामावर घेतले. रायठठ्ठा यांच्या मते आपण उत्पादन कशाचे आणि किती दर्जेदार करतो तसेच त्यासाठी ग्राहकांचा शोध कसा घेतो हे महत्त्वाचे असते. नियोजनबद्ध मार्केटिंग महत्त्वाची असते. विदेशातून आलेल्या पहिल्या मागणीनंतर यंत्रसामग्री निर्यात करताना आलेल्या अडचणी आणि त्यातून काढलेले मार्ग आजही आठवतात, असे रायठठ्ठा सांगतात.

लहानपणी प्लास्टिक खेळण्यांची मोडतोड करून ते पुन्हा जोडण्याचा छंद असल्यामुळे कुटुंबीय इतरांना सांगायचे की, सुनील पुढे इंजिनीअर होणार आहे. पुढे झालेही तसेच. गुजराती, हिंदी, इंग्रजी, मराठी या भाषांमध्ये शिक्षण झालेल्या रायठठ्ठांना आठवीपर्यंत कधी ३५ टक्क्य़ांपेक्षा अधिक  गुण मिळाले नव्हते. परंतु शालेय आणि अभियांत्रिकी शिक्षण घेताना गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळत गेली. त्यामुळेच पुढील काळात स्वत:चा उद्योग स्थापन करून यशस्वी होण्यापर्यंत त्यांनी जिद्दीने वाटचाल केली. गुणवत्ता आणि कौशल्य शोधले तर स्थानिक पातळीवर चांगले कामगार-कर्मचारी उपलब्ध होऊ शकतात या विश्वासातून त्यांनी आपले सहकारी उभे केले. यंत्रसामग्री बसविण्यासाठी आणि ती कार्यान्वित करवून देण्यासाठी त्यापैकी अनेकांचा विदेशी प्रवासही झाला.

सुनील रायठठ्ठा यांनी सांगितले की, औरंगाबाद येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकताना त्या वेळचे प्राचार्य गणेशराव यांच्या तोंडून मी पहिल्यांदा आंत्रप्रीन्युअर्स हा शब्द  ऐकला. खरे तर आपण उद्योजक व्हावे ही भावना त्यामुळेच बळकट झाली. त्यांच्यामुळेच मी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोमध्ये नोकरीस लागलो. तोपर्यंत मी मुंबईही पाहिली नव्हती. सुरुवातीला तेथे राहण्याची व्यवस्थाही त्यांच्याच पत्रामुळे झाली होती. तेथील नोकरी सोडून स्वत:च्या उद्योगाचे स्वप्न साकारताना अनेक अडचणी आल्या, परंतु मार्गही निघत गेला. तसे पहिली अपेक्षित यशाच्या प्रतीक्षेत १५ वर्षे गेली. कुटुंबीय आणि मित्रमंडळींचा पाठिंबा मिळाल्याने पुढे जाता आले. उद्योग क्षेत्रात आपली उद्दिष्टे स्पष्ट असली पाहिजेत आणि कष्टपूर्वक यशाकडे मार्गक्रमण करण्याची जिद्द असली पाहिजे.

जालना शहरातील विविध सामाजिक क्षेत्रांतही रायठठ्ठा यांचा सहभाग असतो. ‘यंग इन्व्हेंटर्स’ची उभारणी करणारे रायठठ्ठा जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा तयार होईल यासाठी विविध उपक्रम राबवतात. छायाचित्रण कार्यशाळा, विद्यार्थ्यांसाठी यंत्रमानव कार्यशाळा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सुविधा, विज्ञान प्रदर्शन, अन्य उद्योजकांना मार्गदर्शन, ग्रंथालय, स्थानिक पातळीवर तलावांतील गाळ काढणे इत्यादी अनेक उपक्रमांत त्यांचा उत्साही सहभाग असतो. व्यापार-उद्योग क्षेत्रात स्थानिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा सांगणारे ‘जालना आयकॉन’ हे पुस्तकही त्यांनी प्रकाशित केलेले आहे.

– लक्ष्मण राऊत

लेखक ‘लोकसत्ता’चे जालन्याचे प्रतिनिधी

सुनील रायठठ्ठा

विनोदराय इंजिनीअर्स प्रा. लि., जालना

* व्यवसाय – प्लास्टिक टाक्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या रोटेशनल मोल्डिंग मशीनची निर्मिती

* कार्यान्वयन : सन १९९४ (विनोदराय इन्कॉर्पोरेट नावाने)

* वार्षिक उलाढाल :    २००१-०२ मध्ये ६० ते ७० लाख

२०१८-१९ मध्ये १८ कोटी

* कर्मचारी संख्या  : ५२

* कर्जभार : शून्य

* डिजिटल अस्तित्व :  http://www.vinodrai.com

* आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.