29 March 2020

News Flash

बंदा रुपया : तंत्रज्ञानाच्या सर्वदूर सुकरतेचे तरंग

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

(संग्रहित छायाचित्र)

आत्मप्रेरणा, आवड आणि जिद्दीला कल्पकता आणि परिश्रमाची जोड दिल्यास अनेक अशक्यप्राय गोष्टीही शक्य होतात. वीरेंद्र जमदाडे यांनी व्रित्ती सोल्यूशन्स लिमिटेड ही कंपनी उभी करून हे दाखवून दिले. कंपनीची उलाढाल आज ५० कोटींच्या घरात आहे. व्यवसायवाढीसाठी प्रसंगी घरावर कर्ज काढणाऱ्या वीरेंद्र यांच्या कंपनीचे आज देशविदेशात ग्राहक आहेत. तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना जेव्हा अनेक आस्थापने-कंपन्या चाचपडत होत्या तेव्हा व्रित्तीने त्यांना आधार दिला. अर्थात कंपनीची ही वाटचाल तशी सहजासहजी झालेली नाही.

बालपण सातारा जिल्ह्य़ातील वाईलगतच्या फुलेनगर परिसरातले. कुटुंब मध्यमवर्गीयच होते. तरी शालेय जीवनापासूनच वीरेंद्र जमदाडे यांचा ध्यास काही तरी वेगळे करण्याचा. अर्थात हे काही तरी म्हणजे काय एवढी उमज त्या वयात नव्हती. त्यामुळे पुण्यातून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी नोकरी केली. तेरा वर्षांच्या या नोकरीतून देशविदेशात जाण्याचा योग आला. या अनुभवातून विचारांचा पाया भक्कम झाला. व्यवसायाची वाट निवडून ती चोखळण्याचे धैर्य व धमकही अंगी आली. त्यातूनच पुण्यात ‘व्रित्ती’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. चांगली नोकरी सोडून, सगळे उत्तम चाललेले असताना असा निर्णय स्वत:सह, इतरांच्या पचनी पडणे थोडे अवघडच; पण व्यावसायिक ऊर्मी इतकी दांडगी की, त्या क्षणी फेरविचाराची शक्यता त्यांना शिवलीही नाही. केवळ व्यवसाय नव्हे तर या क्षेत्रात काही तरी वेगळे करण्याची त्यांनी खूणगाठ बांधली. सुरुवातीच्या काळातील संगणकाबाबत असलेले अपसमज आणि गैरधारणा या आणखी एका आव्हानाला जमेस धरत वीरेंद्र यांची व्यवसायातील वाटचाल सुरू झाली.

पहिली संगणक खरेदी

साधारणत: ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात देशवासीयांना संगणकाचे नाव कानावर पडत होते. जीवनाच्या सर्व क्षेत्रांचा ताबा अजून संगणकाने घ्यायचा होता. उलट संगणकाशी निगडित गैरधारणांचाच बोलबाला अधिक होता. ‘संगणक आल्यावर आमच्या नोकऱ्यांचे काय होणार?’ अशी एक धास्ती त्या वेळी शिकल्या-सवरलेल्यांमध्ये काही प्रमाणात होती. या स्थितीत १९८९ मध्ये पहिली संगणक खरेदी केल्याची वीरेंद्र यांची आठवण आहे. संगणकाच्या मदतीने समाजजीवन अधिक सुसह्य़ करता येईल या ध्यासासाठी प्रयत्नांनी त्यातून मूळ धरले. त्या दिशेने निरंतर संशोधन करत राहण्याची चिकाटी हवी आणि हे सारे मोठय़ा सबुरीने सुरू राहणार असल्याचेही त्या समयी त्यांना जाणवले.

आज संगणक नसलेली बँक सापडणे कठीण आहे. मात्र साधारणत: ९० च्या मागेपुढे वाईतील एका स्थानिक बँकेत संगणक प्रणाली वीरेंद्र यांनी विकसित केली. त्यांच्या व्यावसायिक प्रवासाची ती पहिली पायरी होती. पुढच्या पायऱ्यांवर काही अडथळे जरूर आले, पण भागीदार व पुरवठादारांच्या मदतीने त्यावर मात केल्याचे वीरेंद्र यांनी सांगितले. आज पुण्यात त्यांच्या व्रित्ती सोल्यूशनचे मुख्यालय आहे. याखेरीज राज्यात तसेच परराज्यातही कार्यालये आहेत. पत्नी संगीता यांनीच विक्री विभाग सांभाळला आहे. विशेषत: १९९३ पासून जोडले गेलेले ग्राहक आजही कायम आहेत हे ते अभिमानाने सांगतात.

व्रित्तीच्या नावातच अभिनवता, सृजनाचे तरंग आहेत. काही तरी वेगळे करण्याची जिद्द आणि प्रेरणा हे नावच दर्शविते. कंपनीची वाटचालही याच बळावर सुरू आहे. आजवर कंपनीचे पाच हजार ग्राहक आहेत. त्यातील बहुतांश हे गत दहा वर्षांपासून कंपनीसोबत आहेत.

माहिती तंत्रज्ञान, माध्यम तसेच विपणन अशा तीन व्यवसाय क्षेत्रांत प्रामुख्याने कंपनी कार्यरत आहे. आगामी संकेत देताना, माध्यम व्यवसायावरच पुढील काळात भर राहणार असल्याचे वीरेंद्र यांनी सांगितले. जाहिरात क्षेत्रात आता व्रित्ती देशभर काम करत आहे.  राज्याबाहेरही त्यांची कार्यालये आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या व्यावसायिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी कंपनी अविरत काम करत असल्याचे वीरेंद्र यांनी नमूद केले. सातत्याने नवनवीन प्रयोग करणे ही कंपनीची खासियत आहे. सतत नावीन्याचा शोध घेत राहून त्यातून ग्राहकांना उत्तम उपाययोजना ते पुरवत आले आहेत. यामुळेच जे जोडले गेले त्यांच्याशी नाते अनेक वर्षे लोटली तरी आजही घट्ट जुळलेले आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन, त्यांना भेडसावणाऱ्या समस्येवर तंत्रज्ञानसमर्थ तत्पर उत्तर शोधून देणे हे व्रितीचे वैशिष्टय़ आहे. पर्यटन असो वा बँका किंवा खाद्यान्न अथवा वैद्यकीय व आरोग्यनिगा क्षेत्र, या साऱ्यांमध्ये कंपनी तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीची वाटचाल करता येईल, याचे दिशादर्शन करते. त्यामुळेच ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेत बिकट प्रश्नांची उत्तरे तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडविण्यासाठी कंपनी नवनवे प्रयोग करून सेवानावीन्यासह आपले ग्राहक सांभाळून आहे.

कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना वीरेंद्र जमदाडे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने ‘व्रित्ती’चा व्याप वाढविला आहे. माफक भांडवलावर सुरू केलेल्या या कंपनीत आज अडीचशे कर्मचारी-तंत्रज्ञ कार्यरत आहेत. देश-परदेशात सेवा विस्तारली आहे. अजूनही मोठा पल्ला गाठण्याची वीरेंद्र यांची जिद्द आहे. व्यवसायाबरोबरच वीरेंद्र यांनी सामाजिक बांधिलकीतून सुसज्ज अशी व्यायामशाळा फुलेनगर येथे उभारली आहे. वाईसारख्या छोटय़ा गावातून वाटचाल करत, मेहनत आणि कल्पकतेतून त्यांनी तंत्रज्ञान हे अनेकांसाठी सुकरतेचे साधन बनविले आणि स्वत:साठीही इच्छित ते साध्य करून दाखविले.

आडत व्यवसायासाठी संगणक प्रणाली

संगणकाच्या वापरातून जीवन अधिकाधिक सुसह्य़ कसे करता येईल? याचा विचार वीरेंद्र यांनी सातत्याने केला. त्यातून विविध संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याही. आडत व्यवसायासाठी १९९३ मध्ये पहिल्यांदा मराठीत संगणक प्रणाली त्यांनी विकसित केली. त्यानंतर वृत्तपत्र वितरणासाठी त्यांनी प्रणाली विकसित केली. अर्थात हा सारा प्रवास सहज नव्हता. २००५ मध्ये व्यवसायात एका टप्प्यावर अडचणी निर्माण झाल्या. मात्र त्यातून सावरत भरारी घेतल्याचे सांगताना, माणसे जोडण्याचे जे संस्कार आई-वडिलांकडून मिळाले ते कठीण प्रसंगी कामी आल्याचे वीरेंद्र नमूद करतात. आजही कंपनीने मोठी वाटचाल करूनही वीरेंद्र यांच्याशी बोलताना त्यांच्यातील नम्रतेची ओळख होतेच. आजवरच्या या यशाचे श्रेय ते पुरवठादार आणि ग्राहकांनाही देतात. गेली जवळपास २५ वर्षे ते एका कुटुंबासारखे जोडले गेलेले आहेत. यातच कंपनीच्या सेवेचे गमक दडले आहे. तसेच संघभावनेने काम करणारे सहकारी लाभल्याचे ते आवर्जून सांगतात.

एसटीसाठी जाहिरात उद्घोषणा

राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानकावर गेल्यावर, त्या परिसरात जाहिराती क्रमाने कानावर पडत असतात. ही अभिनवताही वीरेंद्र यांच्याच कल्पनेचा परिणाम आहे. २००७ सालात एसटी स्थानकांवर संगणकीकृत उद्घोषणांचा सुरू झालेला नवप्रवाह त्यांच्याच कामाचे फलित आहे. अलीकडे मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून त्यावर देखरेखी सुविधा जाहिरातदारांना दिली गेली आहे. जाहिरातदारांना मोबाइलवरून त्यांची प्रत्यक्ष जाहिरात होते की नाही हे ऐकता येते. विशेष म्हणजे आज जवळपास सात राज्यांमध्ये ४५० बस स्थानकांवर ही यंत्रणा सुरूआहे.

वीरेंद्र जमदाडे (व्रित्ती सोल्यूशन्स लि.)

* व्यवसाय -उद्योग : माहिती-तंत्रज्ञान सेवा

* गुंतवणूकदार : नाही

* मूळ गुंतवणूक  : ३ हजार रु.

* सध्याची उलाढाल : ५० कोटी रु.

* कोणत्या सरकारी योजनेचा फायदा : नाही

* कर्मचारी संख्या  : २५० कर्मचारी

* संकेत स्थळ : www.vritti.co.in/

हृषिकेश देशपांडे

* लेखक ‘लोकसत्ता’चे मुंबईचे प्रतिनिधी hrishikesh.deshpande@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2020 3:02 am

Web Title: article on vritti solutions limited abn 97
Next Stories
1 अर्थ वल्लभ : मोठी सागर निळाई थोडे शंख नी शिंपले
2 कर बोध : अर्थसंकल्प आणि गुंतवणूक रणनीती
3 बाजाराचा तंत्र कल : मन मनास उमगत नाही..!
Just Now!
X