19 September 2020

News Flash

गुंतवणुकीतील तोटय़ाचे कृष्णविवर टाळायचे तर!

विद्यमान २०२० हे अस्थिरतेचे वर्ष म्हणून कैक वर्षे लक्षात राहील. लोकांनी कशाकशाचा सामना केला पाहा

(संग्रहित छायाचित्र)

राधिका गुप्ता

विद्यमान २०२० हे अस्थिरतेचे वर्ष म्हणून कैक वर्षे लक्षात राहील. लोकांनी कशाकशाचा सामना केला पाहा. चक्रीवादळ, पूर, टोळधाड आणि अर्थात कोविड-१९ची महासाथ.. गुंतवणूकदारांना भांडवली बाजारातील तीव्र स्वरूपाची पडझड, कोरड पडलेले बाँड मार्केट आणि नंतर एप्रिलपासून पुढे अकल्पितपणे सुरू झालेली दमदार बाजार तेजी अनुभवता आली. अशा वध-घटींचा सामना करणे सोपे नसते. सध्याच्या माहितीचा महापूर असलेल्या जगतासाठी अशी अस्थिरता पचवता येणे अधिकच अवघड. दुर्दैवाने, अस्थिरता हे गुंतवणुकीतील न टाळता येणारे वास्तवदेखील आहे. सॉफ्टवेअरच्या परिभाषेत म्हणतो तसा तो वेचून ठेचता अथवा दूर करता येणारा ‘बग’ (किडा) नव्हे. म्हणूनच चांगले गुंतवणूकदार हे बाजार-अस्थिरतेचा माग घेत बसण्यापेक्षा आपले गुंतवणूक-भांडार (पोर्टफोलिओ) अस्थिरता-रोधक बनेल, असा प्रयत्न करतात. असे करण्याचे अनेकविध मार्ग आहेत; परंतु मला विचाराल तर म्युच्युअल फंडातील बॅलेन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड – बीएएफ (अथवा डायनॅमिक अ‍ॅसेट अलोकेशन फंड – डीएएएफ) हा माझ्या पसंतीचा फंड पर्याय आहे. याची तीन प्रमुख कारणे आहेत.

पहिले कारण म्हणजे, घसरणीपासून गुंतवणूक मूल्याचे संरक्षण हे या फंडाचे उद्दिष्ट असते. पैसा बनविण्याऐवजी तो गमावला जाणे खूपच वेदनादायी असते, कारण जर तुम्हाला २० टक्कय़ांचे नुकसान झाले तर त्याची भरपाई ही २५ टक्के फायदा करूनच होऊ शकते. यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे ५० टक्के नुकसानीच्या स्थितीत, भरपाईसाठी पुढे १०० टक्के फायदा कमावणे भाग ठरते. गुंतवणुकीत नुकसानीची तुलना कृष्णविवराशी करता येईल. तोटा जितका जास्त वाढत जाईल तितके आपण अधिकच गर्तेत लोटले जातो आणि त्यातून बाहेर पडणे मग आणखीच कठीण होते. तोटय़ाला बांध घालण्याचे काम बॅलेन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड – बीएएफ करतात. समभाग (इक्विटी) आणि रोखे (डेट) अशी दोन्ही पर्यायांत बीएएफची गुंतवणूक धारणा असते आणि ठरलेल्या मॉडेलनुसार दोहोंतील गुंतवणुकीत संतुलन हे फंड साधत असतात. हे मॉडेल बाजारप्रवाह आधारित असू शकते. म्हणजे घसरणीसमयी गुंतवणुकीचे पारडे त्वरेने दुसऱ्या बाजूने झुकते अथवा मूल्याधारित मॉडेल, ज्यात मूल्यांकन उच्च शिखराला असताना समभागसंलग्न गुंतवणुकीला लक्षणीय स्वरूपात कात्री लावली जाते. असे समभाग गुंतवणुकीचे गतिमान व्यवस्थापन घसरणीपासून बचावासाठी उपयुक्त ठरते. याचा प्रत्यय अलीकडच्या मार्चमधील भांडवली बाजारातील तीव्र घसरणीनेही दिला. निर्देशांकांची सरासरी घसरण २३ टक्कय़ांची असताना, बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज अथवा डायनॅमिक अ‍ॅसेट अलोकेशन फंड वर्गवारीची सरासरी घसरणीची मात्रा -१३.१ टक्के अशी होती. (स्रोत : ‘एस एमएफ’च्या सौजन्याने आणि संपूर्ण मार्च २०२० च्या फंडाच्या एनएव्हीवर आधारित)

अस्थिरतेची दीर्घावधीतील परताव्यात असणारी भूमिका आपण कायम कमी लेखत असतो. बीएएफची माझ्या लेखी महत्ता वाढविणारे दुसरे प्रमुख कारण आहे. पावसाळ्यात खड्डेयुक्त रस्त्यावरील प्रवासाने आपली चिडचिड होते. एखाद वेळेला तो सहन करण्यासारखा कदाचित ठरूही शकतो, परंतु नित्य याच तऱ्हेचा प्रवास हे वाहनाच्या आणि आपल्या शरीराच्या दृष्टीनेही मोठे नुकसानकारक ठरू शकते. अस्थिरतादेखील आपल्या परताव्याच्या प्रवासातील खड्डेयुक्त रस्ता ठरते. उदाहरणादाखल १० वर्षांकरिता तीन प्रकारच्या शक्यतांच्या पुनरावृत्तीचा परिणाम पाहू या.

१) एका वर्षांत २० टक्कय़ांची वाढ, दुसऱ्या वर्षांत १० टक्के घसरण

२) एका वर्षांत ३० टक्कय़ांची वाढ, दुसऱ्या वर्षांत २० टक्के घसरण

३) एका वर्षांत ५० टक्कय़ांची वाढ, दुसऱ्या वर्षांत ४० टक्के घसरण

या तिन्ही शक्यता एकसारख्या वाटत असल्या तरी त्या सारख्या नाहीत. १० वर्षांतील एकत्रित (कम्पाऊंडेड) परतावा हा पहिल्या परिस्थितीत ३.९ टक्के, दुसरीत २.० टक्के आणि तिसऱ्या शक्यतेत -५.१ टक्के असा असेल. अस्थिरता परताव्याचा घात करते आणि बीएएफ हे परताव्यातील अस्थिरतेला बांध घालतात. हा अस्थिरतेचा घटक मोजण्याचे परिणाम म्हणजे प्रमाणित विचलन (स्टँडर्ड डिव्हिएशन) जे या फंड वर्गवारीसाठी पाच वर्षे कालावधीसाठी १२.६२ टक्के आहे, त्याच वेळी निफ्टी निर्देशांकातील अस्थिरतेची मात्रा १८.५६ टक्के आहे. (संदर्भ – ‘एस एमएफ’ने मार्च महिन्यातील बीएफएफच्या परताव्याच्या आकडेवारीच्या आधारे काढलेला निष्कर्ष). अस्थिरतेचा पैलू किमानतम राखल्याने बीएएफ वर्गवारीने मागील पाच वर्षांत समभागसंलग्न गुंतवणूक सरासरी ५० ते ६० टक्के राखूनही गुंतवणूकदारांना उल्लेखनीय परतावा दिला आहे.

तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे बीएएफ हे गुंतवणूकदारांच्या वर्तनाचेही व्यवस्थापन करतात. वेगवेगळ्या पाहण्यांमधून दिसून आले आहे की, वर्तणुकीतील फरकामुळे बहुतांश गुंतवणूकदारांच्या पदरी पडणारे परताव्याचे माप हे एकूण बाजार परताव्याच्या तुलनेत अनेकदा कमी असते. बाजारात वादळी वध-घटी सुरू असताना तर ही बाब आणखीच गडद होते. कळप मानसिकता, भयशंकेने खालच्या स्तरावर विकून बाहेर पडणे अथवा शिखर स्तरावर खरेदीचा मोह वगैरे गुंतवणूकदारांच्या वर्तनातील चुका या टोकाच्या आणि अस्थिर बाजाराच्या काळातच घडतात. अ‍ॅसेट अलोकेशन महत्त्वाचेच, पण ते स्वत:हून करता येणे शक्य असताना, त्यासाठी बीएएफमध्येच गुंतवणूकच का, असा प्रश्नही केला जातो. माझे त्यावर साधे उत्तर आहे – स्वत:हून अ‍ॅसेट अलोकेशन जरूर करता येईल, तथापि जे कळते ते वळतेच असे नाही. कारण निर्णयाला भावनेचा पदर जुळलेला असतो. म्हणूनच भावनेच्या आहारी जाणाऱ्या निर्णयापासून आपोआपच बचाव करणारी गुंतवणूक मालमत्तेच्या स्वयंचलित वितरणाची या फंडातील सुविधा महत्त्वाची ठरते.

गुंतवणुकीचे धर्मपालन खरेच जसे भासवले जाते तितके अवघड नक्कीच नाही. काही मूलभूत गोष्टींशी निष्ठा आणि विविध बाजारचक्रांत गुंतवणुकीत राहणे हे अत्यधिक महत्त्वाचे आहे. २००८ मधील मंदीच्या तडाख्याने दिलेला सर्वात मोठा धडा हाच की, अत्यल्प अस्थिरतेमुळे मला गुंतवणुकीत टिकाव धरून राहता आले आणि बीएएफने त्यासमयी दिलेली साथ मी आजही कैक वर्षे जपून ठेवली आहे. आशा इतकीच आहे की, आज जागतिक स्तरावर सर्वात मोठे आकारमान असलेली ही बीएएफ वर्गवारी भारतातही सध्याच्या समभागसंलग्न म्युच्युअल फंड मालमत्तेच्या आकाराची लवकरच बनेल. केवळ मालमत्तेत विस्तार नव्हे, तर गुंतवणूकदाराची त्यातील गुंतवणुकीत राहण्याचा कालावधीही वाढविण्याचेही म्युच्युअल फंड उद्योगाचे उद्दिष्ट आहे आणि बीएएफ हे त्या दिशेने मदतकारक पाऊल निश्चितच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 12:43 am

Web Title: article on want to avoid black holes in investment losses abn 97
Next Stories
1 अर्थ वल्लभ : निष्पक्ष विश्लेषक
2 बंदा रुपया : कृषीमाल प्रक्रियेतील व्यवसाय पताका!
3 माझा पोर्टफोलियो : देशाच्या ऊर्जा-स्वयंपूर्णतेची शिलेदार
Just Now!
X