25 January 2021

News Flash

कर बोध : नवीन कररचनेचा विकल्प कधी व कसा निवडावा?

केवळ कर वाचविणे हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून काही करदात्यांकडून खर्च किंवा गुंतवणूका केल्या जातात

(संग्रहित छायाचित्र)

प्रवीण देशपांडे

केवळ कर वाचविणे हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून काही करदात्यांकडून खर्च किंवा गुंतवणूका केल्या जातात. त्याचा करदात्याला पुढील काळात फायदा होतोच असे नाही. काही करदाते त्यांच्या वयानुसार किंवा रोकडसुलभतेनुसार कर वाचविण्यासाठी गुंतवणूक करण्यास असमर्थ असतात. अशा वेळेला त्यांना कर भरण्याशिवाय पर्याय नसतो. या वजावटी घेण्यासाठीच्या तरतुदी क्लिष्ट आहेत. यासाठी करदात्याला कर सल्लागाराची मदत घ्यावी लागते. करदात्याचे अनुपालन कमी करण्यासाठी आणि प्रक्रिया सोपी करण्यासाठी करदात्यांना प्रथमच करदात्याला वजावटी न घेता सवलतीच्या दरात कर भरण्याचा विकल्प देण्यात आलेला आहे.

मागील वर्षांच्या अर्थसंकल्पात ‘कलम ११५ बीएसी’ नव्याने जोडण्यात आले. फक्त वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) करदात्यांना या कलमानुसार वजावटी न घेता सवलतीच्या दरात कर भरण्याची मुभा २०२०-२१ या आर्थिक वर्षांपासून देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने १ ऑक्टोबर, २०२० रोजी या बाबतीत नियम जाहीर केले आहेत. या कलमानुसार कोणत्या वजावटी घेता येणार नाहीत, कराची सवलत किती मिळणार, त्यासाठी काय अटी आहेत याची माहिती घेऊ या.

करदाते या वजावटी आणि सवलतींना मुकणार :

ज्या करदात्यांनी या नवीन कलमानुसार कर भरण्याचा पर्याय स्वीकारला असेल त्यांना साधारणत: ७० वजावटींना मुकावे लागेल. त्या वजावटी खालीलप्रमाणे :

*  प्रमाणित वजावट, व्यवसाय कर आणि करमणूक भत्त्याची वजावट : ज्या करदात्यांच्या उत्पन्नात पगाराचे किंवा निवृत्तीवेतनाचे उत्पन्न असेल त्यांना ५०,००० रुपयांपर्यंतची प्रमाणित वजावट मिळते. शिवाय व्यवसाय कराची आणि करमणूक भत्त्याची वजावट (फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना) मिळते, या तीनही वजावटी करदात्याला नवीन कलमानुसार घेता येणार नाहीत.

* पगारदारांना मिळणाऱ्या रजेच्या काळातील प्रवास सवलत (एलटीए), घरभाडे भत्ता (एचआरए) आणि मुलांच्या शिक्षणासाठी मिळणारा भत्ता, कलम १० (१४) नुसार खास भत्ते वगैरेंची वजावट घेता येणार नाही.

ल्ल अजाण मुलांच्या उत्पन्नावर मिळणारी वजावट : करदात्यांच्या उत्पन्नात जर अजाण मुलांच्या उत्पन्नाचा समावेश असेल तर करदात्याला एका मुलामागे दीड हजार रुपयांची वजावट (फक्त दोन मुलांसाठी) घेता येते, ती घेता येणार नाही.

* गृहकर्जावरील व्याज : करदात्याकडे राहाते घर असेल किंवा घर भाडय़ाने दिलेले नसेल आणि त्या घराच्या गृह कर्जावर व्याज भरले असेल तर त्याला मिळणारी २ लाख रुपयांची वजावट करदाता या नवीन कलमानुसार घेऊ शकत नाही आणि हा २ लाख रुपयांचा तोटा इतर उत्पन्नातून वजा देखील करता येणार नाही.

* ‘कलम ८०’च्या वजावटी : करदात्यांसाठी अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या कलम ८० क (जीवन विमा, भविष्य निर्वाह निधी, गृहकर्ज मुद्दल परतफेड, शैक्षणिक शुल्क, वगैरे), कलम ८० सीसीडी नुसार पेन्शन फंडात गुंतवणूक,  कलम ८० डी (मेडिक्लेम, वैद्य्कीय खर्च, वगैरे), ८० जी (देणग्या), ८० ई (शैक्षणिक कर्जावरील व्याज), वगैरे अशा अनेक कलमाद्वारे मिळणाऱ्या वजावटी करदात्याला घेता येणार नाहीत, याला अपवाद फक्त ८० सीसीडी (२) या कलमाचा, यामध्ये नोकरदारांच्या मालकाने कर्मचाऱ्याच्या पेन्शन खात्यात जमा केलेल्या रकमेची वजावट मिळते. ही वजावट पगाराच्या १० टक्के इतकी मिळू शकते. ही वजावट मात्र करदात्याला नवीन कलमाद्वारे घेऊन तो सवलतीच्या दरात कर भरू शकतो.

* कुटुंब निवृत्ती वेतनावर मिळणारी प्रमाणित वजावट : या कलमानुसार कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एक-तृतीयांश  किंवा १५,००० रुपयांपर्यंत रकमेची प्रमाणित वजावट मिळते, ती वजावट करदात्याला या कलमानुसार मिळणार नाही.

कर सवलत किती  मिळणार ?

करदात्याने या नवीन कलमानुसार कर भरावयाचा विकल्प निवडल्यास सवलतीच्या दराने कर भरावा लागेल यात किती कर भरावा लागेल आणि किती कर सवलत मिळेल हे खालील तक्त्यात दर्शविले आहे.

विकल्प कसा निवडावा :

करदात्याला आपला विकल्प निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. करदात्याने नव्या आणि जुन्या पद्धतीने कर किती भरावा लागेल याची गणना करून हा विकल्प निवडावा.

विकल्प कधी  निवडावा :

करदात्याला हा विकल्प त्या वर्षीचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी निवडावयाचा आहे. म्हणजेच २०२०—२१ या आर्थिक वर्षांसाठी हा निर्णय ३१ जुलै २०२१ पूर्वी घ्यावा लागेल.

जे करदाते नोकरी करणारे आहेत त्यांच्या पगाराच्या उत्पन्नावर भरावा लागणारा कर हा उद्गम कराच्या (टीडीएस) स्वरूपात त्यांच्या मालकाकडून कापला जातो. त्यामुळे  कर्मचाऱ्याने त्याच्या विकल्पाचा निर्णय एप्रिलमध्येच मालकाला द्यावा. या निर्णयानुसार मालक कर्मचाऱ्याचे करदायीत्व गणेल आणि त्यानुसार उद्गम कर कापेल. हा मालकाला कळविलेला निर्णय कर्मचाऱ्याला त्या वर्षांत बदलता येणार नाही. ही तरतूद फक्त मालकाला उद्गम कर कापण्यासाठीच आहे. परंतु विवरणपत्र भरतांना कर्मचाऱ्याला कररचनेचा पर्याय बदलायचा असेल तर तो बदलू शकतो. करदात्याने आपला निर्णय मालकाला न कळवल्यास, मालक जुन्या कररचनेनुसार करदायीत्व गणून उद्गम कर कापेल.

जे पगारदार करदाते आहेत आणि ज्या करदात्यांचे धंदा-व्यवसायाचे उत्पन्न नाही अशांना प्रत्येक वर्षी हा विकल्प निवडता येईल आणि तो पुढील वर्षी बदलता देखील येईल.

ज्या करदात्यांचे धंदा-व्यवसायाचे उत्पन्न आहे अशांनी एका आर्थिक वर्षांत हा नवीन कराचा विकल्प निवडल्यास आणि पुढील वर्षी या विकल्पातून बाहेर आल्यास, तो करदाता त्याच्या पुढील कोणत्याही वर्षांत हा विकल्प परत निवडू शकणार नाही.

या नवीन कररचनेचा पर्याय निवडल्यास करदात्याला ‘१०-आयई’ हा फॉर्म ऑनलाईन दाखल करावा लागेल.

करदात्याने आपला विकल्प निवडीचा निर्णय वेळेवर घेतल्यास अग्रिम कर अचूकपणे भरला जाईल आणि इतर अटींची पूर्तता करता येईल.

उत्पन्न जुन्या पद्धतीने नवीन पद्धतीने सवलत

वजावटी घेऊन कर वजावटी न घेता

प्रथम २.५ लाख रुपयांवर ०% ०% ०%

२.५ लाख ते ५ लाख रु.  ५% ५% ०%

५ लाख ते ७.५ रु.   २०%   १०%   १०%

७.५ लाख ते १० लाख रु. २०%   १५%   ५%

१० लाख ते १२.५ लाख रु.   ३०%   २०%   १०%

१२.५ लाख ते १५ लाख रु.   ३०%   २५%   ५%

१५ लाखांपेक्षा जास्त  ३०%   ३०%   ०%

  • लेखक सनदी लेखाकार आणि करविषयक सल्लागार

pravin3966@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 12:37 am

Web Title: article on when and how to choose a new tax structure abn 97
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : ताल आणि तोल
2 माझा पोर्टफोलियो : तांदळाची जागतिक नाममुद्रा
3 क.. कमॉडिटीचा : मेंथा ऑइल ठंडा ठंडा कूल कूल
Just Now!
X