वसंत माधव कुळकर्णी

देशातील पहिला म्युच्युअल फंड असलेल्या युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे सध्याचे रूप ‘यूटीआय एएमसी’ची मंगळवारपासून प्राथमिक भागविक्री सुरू होत आहे. या भागविक्रीपश्चात कंपनीचे बाजार मूल्य ७ हजार कोटी रुपयांवर जाणे अपेक्षित आहे. या भागविक्रीची नोंद घेणारा हा लेख..

युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना १९६३ मध्ये सामान्य गुंतवणूकदारांकडून निधी संकलन करण्याच्या उद्देशाने झाली. तत्कालीन परिस्थितीत औद्योगिक आणि पायाभूत सुविधा विकासासाठी ज्या अर्थसंस्थांची स्थापना झाली त्यात युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया एक प्रमुख अर्थसंस्था होती. मातृकंपनीचे विभाजन दोन कंपन्यांत करून सध्याच्या रूपातील मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (एएमसी) १४ नोव्हेंबर २००२ रोजी अस्तित्वात आली. म्युच्युअल फंड मालमत्तेच्या व्यवस्थापनाव्यतिरिक्त संस्थात्मक गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओ व्यवस्थापन (पीएमएस), कर्मचारी भविष्य निधी, राष्ट्रीय कौशल्य विकास निधी, पोस्टाच्या विमा योजना, एनपीएस, ऑफशोअर फंड, यांसारख्या प्रत्येकी काही हजार कोटींच्या निधीचे व्यवस्थापन ही कंपनी करते. एप्रिल-जून तिमाहीतील मालमत्ता क्रमवारीत ही कंपनी सातव्या क्रमांकावर आहे.

सध्या जरी १.५४ लाख कोटी रुपयांच्या म्युच्युअल फंड मालमत्तेचे व्यवस्थापन यूटीआय करीत असली तरी म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेत तळाच्या ३० शहरातील (बी-३०) मालमत्तेमध्ये सर्वाधिक वाटा असलेली ही कंपनी आहे. केशरी आणि निळ्या रंगातील कलशाचा अंतर्भाव असलेल्या यूटीआयचे व्यापारचिन्ह भारतीय गुंतवणूकदारांना मागील अनेक वर्षांपासून परिचित आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी ७२.७ टक्के वाटा मालमत्ता व्यवस्थापन शुल्काच्या माध्यमातून येतो. १.०९ कोटींपेक्षा अधिक गुंतवणूकदार खात्यांसह (फोलिओ) भारतीय म्युच्युअल फंड बाजारपेठेत १२.८ टक्के हिस्सेदारी कंपनीची आहे. तालुक्यात आणि खेडेगांवात म्युच्युअल फंड म्हणजे यूटीआय हे समीकरण गुंतवणूकदारांच्या मनात पक्के ठसले आहे. देशातील ५१ हजार विक्रेत्यांनी (एआरएन होल्डर्स) यूटीआयकडे नोंद केली असून ही संख्या अन्य फंड घराण्यांकडे नोंद असलेल्या संख्येत सर्वाधिक आहे. या सर्वाना व्यवहार करण्यासाठी यूटीआय ताज्या आकडेवारीनुसार, १६३ शाखा (यूटीआय फायनान्शियल सेंटर), २७३ व्यवसाय विस्तार प्रतिनिधी (बिझिनेस डेव्हलपमेंट असोसिएट्स) आणि मुख्य व्यवसाय प्रतिनिधी व ३३ अधिकृत विक्री सेवा स्थानके (पॉइंट ऑफ सेल्स) उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त यूटीआय एएमसीच्या वेगवेगळ्या व्यवसायांसाठी चार उपकंपन्या आहेत.

मालमत्ता व्यवस्थापन हा भारतात वेगाने वाढणारा व्यवसाय असला तरी या व्यवसायावर कमालीची नियंत्रणे असून आणि उच्च अनुपालन जरुरीचे ठरते. यूटीआय एएमसी ही स्थापन झाल्यापासून नफ्यात असलेली कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये व्यवस्थापन खर्चावर (टीईआर) बाजार नियंत्रकांनी मर्यादा आणल्याने सतत वाढणाऱ्या नफ्याचा वृद्धीदर घटला. साधारणपणे मानदंडापेक्षा सरस कामगिरी करणाऱ्या फंडांना अधिक निधी मिळतो आणि वाढीव निधीमुळे कंपन्या व्यवस्थापन शुल्क कमी लावू शकतात. ‘सेबी’कडे दाखल केलेल्या विक्री प्रस्तावानुसार, ३१ मार्च २०१४ ते ३० जून २०२० या कालावधीत यूटीआय एएमसीची मालमत्ता ७४ हजार कोटींवरून १.३३ लाख कोटी होऊनदेखील बाजारपेठेतील हिस्सा ८.२ टक्क्यांवरून ५.४ टक्क्यांवर आला. यूटीआय म्युच्युअल फंडाच्या विविध फंडांची कामगिरी स्पर्धक फंड घराण्यांच्या फंडांच्या तुलनेत विशेष दखल घ्यावी अशी नसल्याने म्युच्युअल फंडांच्या मालमत्ता वाढीच्या दरात आणि बाजार हिश्शात घसरण झाली. मालमत्ता वाढीचा वृद्धीदर घसरल्याने कंपनीच्या नफाक्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे. बाजार नियंत्रक ‘सेबी’चा व्यवस्थापन शुल्कात कपात हा एककलमी कार्यक्रम राहिल्याने, कंपनीच्या नफा क्षमतेवर परिणाम झाला आहे. भविष्यात निष्क्रिय व्यवस्थापन असलेल्या फंडांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे यूटीआयची नफा क्षमता आणखी घटेल. विक्रेत्यांच्या मोबदल्यात कपात केल्यास मालमत्तेचा ओघ आटेल. यूटीआय फंड घराण्याची ओळख तंत्रस्नेही नाही. करोनापश्चात यूटीआय फंड घराण्याने परिचालन पद्धतीत सुधारणा केल्या तरी बाजार हिस्सा टिकविण्यासाठी तंत्रज्ञान सुधारणा विक्री आणि विपणन खर्च आणि शाखा व कार्यालये यासारख्या परिचालन सुविधांवर वाढीव भांडवली खर्च, मोठय़ा प्रमाणावर करावा लागेल. प्रवर्तक विक्रीतून समभाग विकणार असल्याने आणि नवीन समभाग विक्रीसाठी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे या समभाग विक्रीचा भांडवली लाभ कंपनीला होणार नाही.

स्टेट बँकेच्या पाठबळामुळे एसबीआय म्युच्युअल फंडाची मालमत्ता ३.०८ लाख कोटींवर पोहोचली आहे. मागील वर्षी एसबीआय एएमसीचा नफा वर्ष ४३० कोटी रुपये, तर यूटीआयचा याच वर्षी नफा ३४८ कोटी रुपये होता. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांच्या परिचालन गुणोत्तरात यूटीआय एएमसी, निप्पॉन लाइफ अ‍ॅसेट मॅनेजमेंट आणि एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट या दोन सूचिबद्ध स्पर्धकांपेक्षा उजवी असली तरी नफा-खर्च पत्रकाच्या गुणोत्तरात निप्पॉन लाइफ अ‍ॅसेट मॅनेजमेंटच्या तुलनेत यूटीआय एएमसी कोसो मैल दूर आहे. अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांची नफा क्षमता त्यांच्या मालमत्तेत असलेले समभाग आणि रोखे यांचे प्रमाण ठरवत असते. व्यवस्थापन शुल्क अधिक असल्याने समभाग गुंतवणूक रोख्यांपेक्षा अधिक नफा देणारी असते. यूटीआयच्या मालमत्तेत रोखे मालमत्तेचे प्रमाण अधिक असल्याने स्पर्धकांपेक्षा यूटीआयच्या मालमत्तेशी नफ्याचे प्रमाण कमी आहे. मालमत्ता व्यवस्थापन शुल्काचा मोठा वाटा विक्रेत्यांचा मोबदला देण्यात खर्च होतो. एचडीएफसी म्युच्युअल फंडाने आपली नफा क्षमता टिकविण्यासाठी विक्रेत्यांच्या मोबदल्यात मोठय़ा प्रमाणात कपात केली. यूटीआयच्या मागे शाखांचे विस्तृत जाळे असलेल्या एखाद्या बँकेचे पाठबळ नसल्याने विक्रेत्यांच्या मोबदल्यात कपात केल्यास निधीचा ओघ आटेल. साहजिकच बाजारपेठेतील वाटा टिकविण्यासाठी यूटीआय म्युच्युअल फंड एचडीएफसी म्युच्युअल फंडासाराखे विक्रेत्यांच्या मोबदल्याचे निष्ठुरपणे पुनर्मूल्यांकन करू शकणार नाही.

नफा क्षमता कमी असल्याने व्यावसायिक निधी व्यवस्थापक म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी यूटीआयचा लगेच विचार करण्याची शक्यता कमी असल्याने सूचिबद्धतेला स्पर्धक कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना जसा मूल्यवृद्धीचा लाभ मिळाला, तशी वृद्धी यूटीआय एएमसीच्या गुंतवणुकीतून लगेच मिळण्याची शक्यता नाही. किरकोळ गुंतवणूकदार एका लॉटसाठी १४,९५८ रुपये तर कमाल गुंतवणूक म्हणून १३ लॉटसाठी १.९४ लाख रुपयांची ‘आस्बा’ पद्धतीने अर्ज करू शकतील. यूटीआय एएमसीने समभाग विक्रीसाठी चढे मूल्यांकन राखले नसल्याचा लाभ सूचिबद्धतेपश्चात १० ते १५ टक्के अधिमूल्य देऊ शकेल. थोडक्यात, सूचिबद्धतेनंतर मिळणारा प्रति समभाग लाभ १२० ते १३५ रुपयांदरम्यान असेल. हे लक्षात घेऊन आणि जोखिमांक लक्षात ठेवून अर्ज करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घ्यावा.

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर