भागधारकांना फायदे काय व कसे?

जुलै ते सप्टेंबर हा कंपन्यांसाठी भागधारकांना जोखणारा काळ असतो. कंपन्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा या महिन्यांमध्ये उरकल्या जातात. कंपन्या सकारात्मक दूरदृष्टी ठेवून कंपनी कॉर्पोरेट अ‍ॅक्शनचा निर्णय याच दरम्यान घेत असते. या अ‍ॅक्शनचे परिणाम कंपनीवर आणि गुंतवणूकदारांवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या होतात. कॉर्पोरेट अ‍ॅक्शन्स म्हणजे कंपनीने स्वत:हून केलेली कृती ज्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर आणि कर्जरोख्यांवर होतो.  कॉर्पोरेट अ‍ॅक्शनमुळे कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत, शेअर्सची संख्या, शेअर्सची मार्केटमधील किंमत, मार्केट कॅपिटलायझेशन, इ. अनेक घटकांवर परिणाम होतो. कोणत्याही निर्णयाआधी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये तो मंजूर केला जातो, नंतर भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये त्याला मंजुरी घेतली जाते. काही कॉर्पोरेट अ‍ॅक्शन्स बंधनकारक असतात तर काही ऐच्छिक. एक कंपनी विविध प्रकरच्या कॉर्पोरेट अ‍ॅक्शन्स घेत असते, जसे – बोनस, स्प्लिट, लाभांश, मर्जर, स्पिनऑफ, टेकओव्हर, बाय बॅक, ऑफर फॉर सेल, राइट इश्यू वगैरे.

अशाच काही कॉर्पोरेट अ‍ॅक्शन्स आजच्या लेखात विस्ताराने पाहू या.

स्प्लिट शेअर्स : स्प्लिट म्हणजे विभाजन आणि याच अर्थाने स्प्लिट शेअर्स म्हणजे समभागांचे विभाजन होय.

का केले जाते शेअर्स स्प्लिट? कंपनीच्या शेअर्सची किंमत जशी जशी वाढते तशी तशी त्या शेअर्सची शेअर बाजारात उलाढालसुद्धा वाढते. कंपनीचा विकास, वाढता व्यवसाय, नियमित होणारी नफ्यातील वाढ, असे अनेक घटक शेअर्सची बाजारातील किंमत वाढविण्यास मदत करतात. पण अशा वेळेला वाढलेल्या किमतीचा परिणाम त्या शेअरच्या उलाढालीवर होतो, शेअरची किंमत खूप वाढल्यामुळे लोकांना तो शेअर खरेदी करणे परवडत नाही जेणेकरून खरेदी वा विक्री मंदावते. अशा वेळेला कंपनी शेअर्सचे विभाजन/शेअर्स स्प्लिट करण्याचे जाहीर करते. स्प्लिट जाहीर झाल्यापासून स्प्लिट झालेले शेअर्स, डीमॅट खात्यात जवळपास ३ ते ६ महिन्यांत जमा होतात.

विभाजन कसे होते? कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स स्प्लिटचे गुणोत्तर ठरवितात आणि त्यानंतर गुंतवणूकदारांची मंजुरी घेतली जाते. जसे कंपनीने २:१ (दोनास एक) या प्रमाणात स्प्लिट/विभाजन जाहीर केल्यावर, ज्यांच्याजवळ कंपनीचा १ शेअर आहे त्याला २ शेअर्स मिळतात. जर शेअरची दर्शनी किंमत १० रुपये असेल तर तीसुद्धा स्प्लिट झाल्यावर विभाजन गुणोत्तर जर दोनास एक असेल, तर पाच रुपये होते. म्हणजे जर स्प्लिट शेअरच्या दिवशी शेअर्सचा बाजारभाव रु. १००० असेल तर विभाजनानंतर तो ५०० रुपये होतो.

स्प्लिट शेअर्समुळे कंपनीवर होणारा परिणाम? यामुळे कंपनीच्या निव्वळ मालमत्तेवर वा मार्केट कॅपिटलायझेशनवर काहीही परिणाम होत नाही. शेअर्सचा बाजारभाव कंपनीने स्वत:हून कमी केल्यामुळे शेअरची बाजारात उलाढाल मात्र वाढताना दिसून येते.

स्प्लिट शेअर्समुळे गुंतवणूकदारांवर होणारा परिणाम? अल्पमुदतीचा विचार केल्यास फारसा परिणाम होत नाही. शेअर्सची संख्या वाढल्यामुळे प्रति शेअर उत्पन्न कमी होताना दिसते. परंतु एकूण लाभांश समभागाच्या बदललेल्या दर्शनी मूल्याप्रमाणे वाढलेल्या शेअर्समध्ये विभागला जाऊन, होणारा फायदा समान राहतो. उदा.: कंपनीला झालेल्या नफ्याचा बऱ्यापैकी भाग गुंतवणूकदारांना लाभांशाच्या स्वरूपात वाटला जातो आणि एवढेच नव्हे तर वर्षांतून वेळोवेळी अंतरिम लाभांशही दिला जातो. जर कंपनीने प्रति शेअर २०० टक्के अर्थात २० रु. लाभांश जाहीर केला असेल (शेअर्स स्प्लिट जाहीर होण्याच्या आधी) आणि स्प्लिट शेअर्सनंतर (२:१) गुंतवणूकदाराला प्रतिशेअर लाभांशसुद्धा विभागून मिळतो. जसे गुंतवणूकदाराकडे विभाजनाच्या आधी १०० शेअर्स असतील तर त्याला मिळणारा लाभांश २० रुपयांप्रमाणे एकूण (१०० गुणिले रु. २०) २००० रुपये मिळणे अपेक्षित आहे. परंतु स्प्लिट नंतर २:१ चे गुणोत्तर लक्षात घेता आता गुंतवणूकदाराकडे २०० शेअर्स झाले आहेत तर मिळणारा लाभांश बदललेल्या ५ रुपये दर्शनी मूल्यावर २०० टक्क्यांप्रमाणे १० रुपये होईल. तो त्या प्रमाणात २०० शेअर्ससाठी २००० रुपये एवढाच राहील याची गुंतवणूकदाराने नोंद घेणे आवश्यक आहे.

  • स्प्लिट शेअर्सचे फायदे काय आणि कोणाला?

१. स्प्लिट झाल्यावर शेअर्सची किंमत कमी होते आणि त्यामुळे तो सर्वाना परवडतो. शेअर्सची मागणी वाढते आणि त्यामुळे परत स्थिर झालेल्या उलाढालीला चालना मिळते. वाढती मागणी त्या शेअर्सची हळूहळू किंमतही वाढविण्यास कारणीभूत ठरते आणि म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या गुंतवणूकदाराला आणि कंपनीला दोघांनाही फायदा होतो. एका चांगल्या कंपनीच्या शेअरचा बाजारभाव ५००० रुपये आहे. कंपनी चांगली असूनही आजकाल बाजारात त्यांच्या शेअर्समध्ये फारशी खरेदी-विक्री होत नाही. कारण बाजारभाव जास्त आहे. अशा वेळी स्प्लिट शेअर्समुळे (१०:१) त्या शेअर्सची किंमत ५०० रुपयांवर येते आणि आता तो शेअर्स आता प्रत्येकाला परवडतो. बाजारात उलाढाल वाढते, खरेदी-विक्री वाढते, मागणी वाढते आणि त्याची किंमतही हळूहळू पुन्हा वाढते.

२. शेअर्सची तरलता वाढणे हे गुंतवणूकदारांसाठी नेहमीच फायद्याचे असते आणि स्प्लिट शेअर्स तरलता वाढविण्यास मदतीचे ठरतात. जसे वरील उदाहरणात स्प्लिट शेअर्समुळे ५०० रुपयांचा शेअर्स आता प्रत्येकाला विकत घेणे परवडते. आणि त्याची तरलता वाढते. गुंतवणूकदाराला जर २००० रुपयांची गरज असेल तर केवळ ४ शेअर विकून त्याला गरज भागवता येते. पण स्प्लिट अ‍ॅक्शनच्या आधी त्याच्या किमान गरजेसाठी, पूर्ण ५००० रुपयांचा शेअर विकावा लागला असता. शिवाय किंमत जास्त असल्याकारणाने त्याला त्या शेअर्सच्या मागणीसाठी उदासीनता दिसून आली असती आणि शेअर विकणे जरासे अवघड बनले असते. या दृष्टिकोनातून बघितल्यास स्प्लिट फायदेशीर ठरते.

बंधनकारक / ऐच्छिक : स्प्लिट शेअर्स ही कॉर्पोरेट अ‍ॅक्शन बंधनकारक आहे. जर गुंतवणूकदाराला यांचा परिणाम नको असेल, तर असलेले शेअर्स स्प्लिट डेटच्या आधीच विकून टाकणे हा एकच मार्ग आहे.

रिव्हर्स स्प्लिट : स्प्लिटच्या नेमकी उलट ही अ‍ॅक्शन आहे.

का करते कंपनी रिव्हर्स स्प्लिट?  बाजार मंदीत असताना शेअरची किंमत फारच कमी झाली तर काही लोक शेअरच्या किमतीवरून शेअरची गुणवत्ता ठरवणारे असतात, शेअर डीलिस्ट होण्याची भीती असते, तो ‘पेनी स्टॉक’ म्हणून गणला जाऊ  शकतो आणि हे सारे टाळण्यासाठी कंपन्यांकडून रिव्हर्स स्प्लिट जाहीर केले जाते.

काय परिणाम होतो? रिव्हर्स स्प्लिटमुळे शेअरची संख्या कमी होते. जर रिव्हर्स स्प्लिट १:१० या प्रमाणात जाहीर झाले तर ज्यांच्याजवळ १० शेअर्स असतील त्यांना एक शेअर मिळतो. आणि तसेच शेअरची किंमतही (दर्शनी मूल्य तसेच बाजारभाव) त्या प्रमाणात वाढते.

बंधनकारक / ऐच्छिक : रिव्हर्स स्प्लिट शेअर्स ही कॉर्पोरेट अ‍ॅक्शन बंधनकारक आहे. जर गुंतवणूकदाराला यांचा परिणाम नको असेल, तर असलेले शेअर्स स्प्लिट डेटच्या आधीच विकून टाकणे हा एकच मार्ग आहे.

बाय बॅक : गुंतवणूकदाराला खरेदी केलेला शेअर बाजारामध्ये केव्हाही विकता येतो, पण कंपनीच जेव्हा ते शेअर परत विकत घ्यावयाचे ठरविते त्याला बाय बॅकम्हणतात. 

कसे केले जाते बाय बॅक? कंपनी एका विशिष्ट किंमतीला, ठरावीक प्रमाणात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका विशिष्ट मुदतीत समभाग विकत घायचे ठरविते. जी किंमत ठरलेली असते ती किंमत इच्छुक गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होते आणि त्यांच्या डीमॅट खात्यातून ठरलेले शेअर्स वजा होतात.

बंधनकारक / ऐच्छिक :  गुंतवणूकदारांनी सर्व शेअर्स बाय बॅक केलेच (परत दिलेच) पाहिजेत असे बंधन नाही. परंतु जर या योजनेखाली शेअर्स विकायचे नसतील तर तसे स्पष्ट कळविले पाहिजे आणि अशी सूचना काही कंपन्या देतात. कंपनीकडून गुंतवणूकदारांना फॉर्म पाठविले जातात. फॉर्म व्यवस्थितरीत्या भरून गुंतवणूकदाराने ठरलेल्या मुदतीत, उल्लेख केलेल्या ठिकाणी ते जमा करणे आवश्यक असते. फॉर्म मिळाला नसेल तर हल्ली फॉर्म कंपनीच्या वेबस्थळावरून डाउनलोड करून भरता येतो.

का करते कंपनी बाय बॅक?

  • व्यवस्थापनाचा / प्रवर्तकांचा भागभांडवलातील हिस्सा वाढवण्याकरता
  • दुसऱ्या कंपनीकडून अधिग्रहण (टेकओव्हर) केले जाण्याचा धोका टाळण्यासाठी
  • एखाद्या देशातून कंपनीला बाहेर पडायचे असेल तर
  • कंपनी बंद करायची असेल तर
  • ‘डीलिस्टिंग’च्या कायदेशीर बाबीतून सुटका करून घेण्यासाठी
  • कंपनीचे राष्ट्रीयीकरण होत असेल तर
  • कंपनीच्या कर्मचाऱ्यांना भागधारक करून घेण्यासाठी (इसॉप) किंवा पेन्शन प्लानसाठी शेअर्स उपलब्ध करावयाचे असल्यास ‘बाय बॅक’चे परिणाम? शेअरची किमत वाढणे/ कमी होणे/ स्थिर राहणे – बाय बॅकमुळे बाजारात शिल्लक असणारी तरल शेअर्सची संख्या कमी होऊन, वर्षांशेवटी एकूण नफा कमी गुंतवणूकदारांमध्ये विभागला जाईल, त्यामुळे तो वाढेल. या आशेवर गुंतवणूकदार त्या कंपनीचे शेअर्स अजून घेण्याची इच्छा ठेवतात. मागणी वाढते आणि त्यामुळे किंमतही वाढते. तसेच कंपनीने बाय बॅक करण्याचा निर्णय घेतला म्हणजे कंपनीचे काम, वृद्धी, इ. खाजगी स्तरावर घसरत चालले आहे असे समजून शेअर्स लगेच विकण्याचा प्रयत्न केला जातो आणि बाजारभाव घसरण्याची शक्यता तयार होते. त्यामुळे एकीकडे बाजारभावात वाढ तरी किंवा घसरण आणि यात अनेक वेळा शेअर्सचा बाजारभाव स्थिरावतो.

परतावा वाढणे – बाय बॅक केल्यामुळे बाजारातील शेअर्सची संख्या कमी होते. त्यामुळे प्रति शेअर मिळकत (ईपीएस) वाढण्याची शक्यता असते.

भागभांडवल कमी होणे – एकूण भांडवलामधील भरणा झालेल्या भागभांडवलाचा वाटा कमी होतो.

कंपनी व्यवसाय वृद्धीसाठी भांडवल गोळा करते, तीच कंपनी जर आता ते बाय बॅकद्वारे परत देऊ करत असेल तर याचा सखोल अभ्यास करणे गुंतवणूदारासाठी आवश्यक आहे.

बोनस शेअर : हे शेअर फक्त कंपनीच्या गुंतवणूकदारांना, म्हणजेच सध्याच्या भागधारकांना बक्षीस स्वरूपात दिले जातात.

बोनस शेअर वाटण्यासाठी कंपनी रक्कम कोठून आणते? कंपनी आपल्या राखीव गंगाजळीमधून (फ्री  रिझव्‍‌र्ह फंड) बोनस शेअरचे वाटप करत असते. गुंतवणूकदारांकडून गोळा भागभांडवल हे दोन खात्यात जमा होते १) भागभांडवल २) रिझव्‍‌र्ह फंड.  जर एका कंपनीकडे १०० कोटींचे भागभांडवल आणि रिझव्‍‌र्ह फंड २०० कोटींचे असेल आणि जर कंपनीने (१:१)  एकास एक अशा गुणोत्तराने बोनस शेअर्स द्यायचे ठरविले तर भागभांडवल २०० कोटींचे होते तर फ्री  रिझव्‍‌र्ह १०० करोडचे होते.

कंपनी का देते बोनस शेअर? बोनस हा शब्दच मुळात आपल्या आवडीचा. एक तर गुंतवणूकदाराची मर्जी, मानसिकता जोपासण्यासाठी हा नजराणा असतो. त्यामुळे सर्वसाधारण अनुभव सांगतो की त्या कंपनीच्या शेअर्सच्या खरेदी-विक्रीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे तरलता वाढते. शेअरची भांडवल बाजारातील संख्या वाढल्यामुळे नवीन गुंतवणूकदार आकर्षित होतात.

बोनस शेअरनंतर कंपनीच्या एकूण देणी किंवा मालमत्तेत बदल होतो का? नाही, बोनस शेअरमुळे फारसा बदल होत नाही. कंपनीची एकूण मालमत्ता / देणी आहे त्याच राहतात.

जसे बोनस शेअर देण्याआधी भागभांडवल १०० कोटी + रिझव्‍‌र्ह फंड २०० कोटी  = एकूण भागभांडवल ३०० कोटी आणि बोनस शेअरनंतर  भागभांडवल २०० कोटी + रिझव्‍‌र्ह फंड १०० कोटी = एकूण भागभांडवल ३०० कोटी. बोनस शेअरनंतर शेअरच्या बाजारभावात फरक पडतो का? सर्वसाधारणपणे बोनस शेअर वाटल्यानंतर शेअरचा बाजारभाव कमी होतो. उदाहरणार्थ, १:१ या गुणोत्तरानुसार जर आधी शेअरचा बाजारभाव प्रति समभाग रु. १०० असेल तर बोनसनंतर तो रु. ५० होतो. तथापि बोनस शेअर जाहीर होताच त्या शेअरची किंमत हळूहळू वाढू लागते.

बोनस शेअर मिळण्याचा कालावधी ठरलेला असतो का? मुळीच नाही. कंपनी सोयीप्रमाणे आणि आर्थिक परिस्थिती पडताळून मगच बोनस शेअरची घोषणा करते.

बंधनकारक/ ऐच्छिक : बोनस दिलाच पाहिजे असे कंपनीवर मुळीच बंधन नसते. द्यावा की नाही, किती द्यावा आणि केव्हा द्यावा हे सर्व निर्णय संपूर्णपणे कंपनीचेच असतात.

जर गुंतवणूकदाराने अभ्यास केला तर बोनस शेअर ही फक्त एक कागदोपत्री (बुक एन्ट्री) बदललेली रचना असते. जसे १:१ बोनस शेअर मिळणार असेल तेव्हा शेअर्सची संख्या दुप्पट होते पण किंमतही अर्धी होते. प्रति समभाग मिळणाऱ्या परताव्याचे तसेच लाभांशाचे प्रमाणही त्याच प्रमाणात कमी होते. गुंतवणूकदाराने बोनस या शब्दाला हुरळून न जाता कंपनीला योग्य दीर्घ मुदतीचा पर्याय म्हणून अभ्यासणे आवश्यक आहे.

कॉर्पोरेट अ‍ॅक्शन्सबद्दल असलेल्या अपुऱ्या माहितीमुळे बऱ्याच वेळा गुंतवणूकदाराला फसवणूक झाली असे वाटते, पण तसा आरडाओरडा न करता त्याबद्दल नीट माहिती करून घ्यावी आणी त्यानंतर मात्र फसवणूक झाली असेल तर कंपनीकडे तक्रार करावी.

– दीपाली चांडक

arthasanvad@gmail.com