सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

गेल्या सप्ताहाच्या सुरुवातीला बाजाराचा सावध पवित्रा होता. दिवसभराच्या सत्रात वर जाणारे निर्देशांक सत्रअखेर खाली बंद होत होते. बुधवारी रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पायाभूत आरोग्य सुविधांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून व्यक्ती तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांना दिलासा देण्यासाठी हप्ते स्थगितीची सुविधा जाहीर केली. या अचानक केलेल्या दिलासादायक घोषणांनी व जागतिक बाजारांतील संकेतांनी बाजाराला बळ मिळाले. धातू क्षेत्राच्या निर्देशांकानी १० टक्के कमाई करून गेल्या सप्ताहाप्रमाणे आपली आगेकूच सुरू ठेवली.

टाटा स्टीलने अपेक्षेप्रमाणे बुलंद निकाल जाहीर केले. मार्चअखेर संपलेल्या तिमाहीमधील कामगिरीमुळे वार्षिक तुलनेत कंपनीची प्रती समभाग मिळकत ११.८६ रुपयांवरून ६३.७८ रुपयांवर गेली आहे. व्यापारचक्राशी निगडित (सायक्लिकल) असणाऱ्या या कंपनीच्या नव्या उत्कर्ष काळाची ही सुरुवात आहे. हातातील समभाग राखून ठेवत घसरणीमध्ये केलेली नवीन गुंतवणूक देखील फायद्याची ठरेल. व्यापारचक्र वर जाण्याची क्रिया थांबल्यावरच यामध्ये नफावसुली करावी.

टाटा केमिकल्सच्या निकालांनी बाजाराची निराशा केली. मार्चअखेरच्या तिमाहीत विक्रीमध्ये ११ टक्के वाढ होऊनही कंपनीला नाममात्र नफा झाला. टाटा ग्लोबलच्या विलगीकरणामुळे झालेला फायदा सोडला तर काही ना काही कारणाने गेली दहा वर्षे कंपनीने गुंतवणूकदारांची निराशाच केली आहे. कंपनीच्या घसरलेल्या समभागाची आताच विक्री न करता कंपनीच्या लिथियम आयन बॅटरीसारख्या योजना, तसेच सोडा अ‍ॅश, कॉस्टिक सोडा सारख्या उत्पादनांच्या विक्रीत संचालकांना अपेक्षित असलेली वाढ ध्यानात घेऊन पुढील तिमाहीच्या निकालांनंतर गुंतवणूक कमी करण्याचा निर्णय घेता येईल.

कोटक महिंद्र बँकेने वार्षिक तुलनेत नफ्यामध्ये १७ टक्के वाढ जाहीर केली. बँकेचा ‘कासा रेशो’ ६० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. बँकेकडे भांडवल उपलब्धता चांगली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमाप्रमाणे बँकेचे मुख्याधिकारी उदय कोटक यांना निवृत्त व्हावे लागणार असले तरी त्याला अजून दीड वर्षे अवकाश आहे. ही एक उत्तम व्यवस्थापित बँक असल्यामुळे बँकेची धुरा सांभाळण्यासाठी योग्य व्यक्ती निवडली जाईलच. कर्ज देण्याबाबत सावधगिरी बाळगत असल्यामुळे बँकेची प्रगती धीम्या गतीने होत आहे. दीर्घ मुदतीसाठी टप्प्याटप्प्याने बँकेच्या समभागात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल.

बाजाराच्या नजीकच्या काळासाठी थोडे परस्परविरोधी संकेत सध्या मिळत आहेत. एप्रिलचे जीएसटी संकलन वाढले आहे पण वाहन विक्रीत मोठी घट झाली आहे. पुढील महिन्यात त्यामध्ये आणखी घट अपेक्षित आहे. एप्रिलमध्ये कारखानदारी क्षेत्राचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) ५५ आणि सेवा क्षेत्रासाठी तो ५४ मोजला गेला. ५० च्या वर तो समाधानकारक मानला जातो. मार्चच्या तुलनेत त्यात फारशी घट झाली नाही. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांनी म्हटल्याप्रमाणे टाळेबंदी स्थानिक पातळीवर होत असल्यामुळे उद्योगांवर मोठे परिणाम अपेक्षित नाहीत. उद्योग क्षेत्र बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकत आहे. पण सध्याची टाळेबंदी उद्योगप्रधान राज्यातच झाली आहे व इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशातही ती टप्प्याटप्प्याने लागू केली जात आहे. ‘सीएमआयई’च्या अंदाजानुसार एप्रिलमध्ये ७० लाखांवर लोकांनी रोजगार गमावला आहे. मार्चमधील बेरोजगारीचा असलेला ६.५ टक्के दर एप्रिलमध्ये ७.९७ टक्के झाला आहे. आधीच नाजूक अवस्थेत असणारी अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट होणार आहे. करोनाची दुसरी लाट किती दिवस लांबते यावर पुढील भवितव्य ठरेल. लसीकरणाचा वेगच करोना संकटातून उद्योगांना बाहेर येण्यास मदत करेल. अशा परिस्थितीत नव्या गुंतवणुकीवर जरा सावधपणेच पाऊल पडायला हवे.