13 July 2020

News Flash

नावात काय? : अ‍ॅसेट बबल

अनैसर्गिक वाढ किंवा अचानक घडून आलेली किमतीतील वाढ ‘अ‍ॅसेट बबल’ म्हणजे संपत्तीचा बुडबुडा असू शकतो.

(संग्रहित छायाचित्र)

कौस्तुभ जोशी

अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्यास जे घटक कारणीभूत ठरतात त्यात ‘अ‍ॅसेट बबल’ या घटकाचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. एखाद्या राज्यात/शहरात स्थावर मालमत्तेच्या किमती अस्मानाला भिडतात, तर शेजारच्या राज्यात विकत घेतलेल्या सदनिका कोणतीच वाढीव किंमत दाखवत नाहीत. अथवा शेअर बाजारात एखाद्या उद्योग क्षेत्रातील शेअर्स हे इतरांपेक्षा दुपटीने परतावे दर्शवतात, तर दुसरीकडे काहीच हालचाल नसते. एखादेवेळी सेवा क्षेत्र, सॉफ्टवेअर, तंत्रज्ञान किंवा असा एखादा व्यवसाय असतो ज्यात इतक्या मोठय़ा प्रमाणावर परतावा मिळतो की बाकीच्या व्यवसायांशी त्याची तुलनाच होऊ शकत नाही! असं का होत असेल?

अशी अनैसर्गिक वाढ किंवा अचानक घडून आलेली किमतीतील वाढ ‘अ‍ॅसेट बबल’ म्हणजे संपत्तीचा बुडबुडा असू शकतो.

जत्रेतील साबणाच्या पाण्याचे फुगे आठवा! आपण त्यात जेवढी हवा भरू ते मोठे होत जातात. मात्र एक वेळ परिस्थिती हाताबाहेर गेली की तो बुडबुडा हवेतच विरतो. असाच काहीसा धक्का अर्थव्यवस्थेला बसतो.

एखाद्या मालमत्तेचे (अ‍ॅसेटचे) मूल्य ठरवायचं कसं याचे काही निकष आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याचे फंडामेंटल किती प्रबळ आहेत यावरून ते ठरतं. एखाद्या अ‍ॅसेटला भविष्यात किती किंमत येणार आहे? एखाद्या बिल्डरच्या गृहउद्योग प्रकल्पाच्या आजूबाजूला भविष्यात कुठले नवे उद्योग व्यवसाय, औद्योगिक प्रकल्प आकारात येत असतील तर सुरुवातीलाच गुंतवणूक करणाऱ्यांना त्यात भरघोस परतावे मिळतात.

एखाद्या ठिकाणी एखादा व्यवसाय फळफळतोय असे लक्षात यायला लागल्यानंतर अनेक जण त्यात पैसे गुंतवू लागतात आणि त्या संपत्तीचे मूल्य हे त्याच्या वास्तविक मूल्यापेक्षा खूपच फुगवले जाते.

एक वेळ अशी येते की विकत घेणारा कोणी नाही आणि सगळे विक्रेते अशी वेळ आली की हा संपत्तीचा बुडबुडा फुटतो.

या संपत्तीच्या बुडबुडय़ात तरणारे आणि उद्ध्वस्त होणारे असे दोन गट असतात. जे संपत्तीचा बुडबुडा छोटा असताना त्यात पैसे गुंतवतात ते योग्य वेळी त्यातून पैसे बाहेर काढून घेतले तर तरतात. बुडबडा जसजसा वाढतो तसतशी नफ्याची हावसुद्धा वाढते आणि ज्यांना त्यातलं काहीच समजत नाही असे नवखे गुंतवणूकदारसुद्धा त्यात उडी घेतात. परिणामी, मागणी वाढून पुरवठा तितकाच असल्याने किमतीत झटकन वाढ दिसते आणि ज्यांनी सुरुवातीच्या काळात संपत्ती विकत घेतलेली आहे त्यांना ती विकायची संधी मिळते.

एक काळ असा येतो की, त्यातील हवा पूर्ण निघून जाते, उरतात ते फक्त उद्ध्वस्त झालेले गुंतवणूकदार!

संपत्तीचा बुडबुडा शेअर बाजार, सोने, स्थावर मालमत्ता, कर्जरोखे या सर्वामध्ये दिसून येतो.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आणि विसाव्या शतकाच्या शेवटाला असे दोन जबर धक्के जागतिक अर्थव्यवस्थेला बसले व या दोन्ही धक्क्याचे मूळ हे अमेरिकेतच होतं.

पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेतील शेअर बाजारामध्ये आलेली जबरदस्त तेजी अशाच संपत्तीच्या बुडबुडय़ामध्ये परावर्तित झाली आणि १९२९ साली तो बुडबुडा फुटला व पहिली जागतिक महामंदी अनुभवली गेली. आताच्या पिढीच्या लोकांना आठवत असेल ती विसाव्या शतकाच्या शेवटी आलेली डॉट कॉम बूम. १९९० नंतर इंटरनेटने बाळसे धरायला सुरुवात केली. इंटरनेटच्या अवतीभोवती बिझनेस मॉडेल असलेल्या कंपन्यांना चांगलेच भरभराटीचे दिवस येऊ लागले आणि ‘नॅसडॅक’ हा माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांचा शेअर बाजाराचा निर्देशांक झपाटय़ाने वधारू लागला. यथावकाश शतकाच्या शेवटी हा बुडबुडा फुटला आणि पुन्हा एकदा आर्थिक अस्थिरतेला जग सामोरं गेलं.

या मोठय़ा संपत्ती बुडबुडय़ासारखे अनेक छोटे छोटे बुडबुडे हे येतच असतात. संपत्ती निर्मितीमागील हाव आणि कमी अभ्यास असतानाही गुंतवणूक करायची चुकीची वृत्ती ही दोन प्रमुख कारणे त्यामागे आहेत.

या संपत्तीच्या बुडबुडय़ांनी धोका निर्माण होतो तो सामान्य गुंतवणूकदारांच्या विश्वासार्हतेला. मोठाल्या अर्थव्यवस्था कदाचित लवकर सावरू शकतात, पण विकसनशील व अविकसित देशांना त्याचा मोठा धक्का बसतो.

(लेखक वित्तीय नियोजनकार, अर्थशास्त्राचे प्राध्यापक)

joshikd28@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2019 1:45 am

Web Title: asset bubble price increase housing stocks %e2%80%8bgold abn 97
Next Stories
1 अर्थ वल्लभ : आश्वासक वर्षपूर्ती
2 बाजाराचा तंत्र कल : शिट्टी मारली..
3 नावात काय? : ‘पॉन्झी स्कीम’
Just Now!
X