प्रवीण देशपांडे

करोना संसर्ग आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर कायद्यानुसार कराव्या लागणाऱ्या अनुपालनाच्या मुदतीत या वर्षी  वाढ करण्यात आली आहे. ज्या करदात्यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षांचे (करनिर्धारण वर्ष २०१९-२०) विवरणपत्र अद्याप भरलेले नाही ते करदाते आता ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत विवरणपत्र दाखल करू शकतात. तसेच २०१९-२० या आर्थिक वर्षांचे (करनिर्धारण वर्ष २०२०-२१) विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदतदेखील ३० नोव्हेंबर २०२० हीच आहे. लेख्यांचे लेखापरीक्षण बंधनकारक असणाऱ्या आणि नसणाऱ्या करदात्यांनाही ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत विवरणपत्र दाखल करता येईल. लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२० ही आहे. मागील वर्षांपर्यंत लेखापरीक्षण अहवाल आणि विवरणपत्र एकाच वेळेला सादर करता येत होते. परंतु या वर्षीपासून विवरणपत्र दाखल करण्याच्या एक महिन्यापूर्वी लेखापरीक्षण अहवाल दाखल करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

लेखे आणि लेखापरीक्षणाच्या तरतुदीत या वर्षी काही बदल करण्यात आले आहेत. छोटा धंदा किंवा व्यवसाय करणाऱ्यांना यापासून काही सूट दिली आहे. परंतु ठरावीक प्रमाणात नफा न दाखविणाऱ्यांनासुद्धा लेखापरीक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. हे लेखापरीक्षण कोणाला बंधनकारक आहे? कोणत्या करदात्यांना यातून सूट देण्यात आली आहे? हे जाणून घेणे हे करदात्यांसाठी महत्त्वाचे आहे. लेखापरीक्षण अहवाल वेळेत दाखल न केल्यास मोठा दंड आकारला जाऊ शकतो.

ज्या करदात्यांचे उत्पन्न धंदा-व्यवसायापासून आहे अशांसाठी लेखे आणि लेखापरीक्षणाच्या तरतुदी असतात. याव्यतिरिक्त अन्य स्रोतातून उत्पन्न असेल तर त्यांना लेखे ठेवणे आणि त्याचे परीक्षण करून घेणे बंधनकारक नाही. लेखा आणि परीक्षणासाठी करदाते दोन प्रकारांत विभागले आहेत. एक ठरावीक व्यवसाय करणारे आणि इतर धंदा-व्यवसाय करणारे. या दोन्हीसाठी या तरतुदी वेगवेगळ्या आहेत.

’ ठरावीक व्यवसाय करणारे : या ठरावीक व्यवसायामध्ये वैद्यकीय, कायदाविषयक, इंजिनीअरिंग, स्थापत्य, अकाउंटिंग, तांत्रिक सल्लागार, अंतर्गत सजावटकार, चित्रपट कलाकार, अधिकृत प्रतिनिधी, कंपनी सेक्रेटरी या व्यावसायिकांचा समावेश होतो. ज्या करदात्यांची ठरावीक व्यवसायापासून एकूण जमा मागील तीन वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षांत दीड लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि व्यवसाय जर या वर्षी सुरू केला असेल आणि या वर्षीची अपेक्षित जमा दीड लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर लेखे ठेवणे बंधनकारक आहे. ज्या करदात्यांचे व्यवसायापासून उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशांना कलम ४४ एबीनुसार लेखापरीक्षण करून त्याचे अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.

’ अनुमानित कर कलम ४४ एडीए : जे निवासी करदाते ठरावीक व्यवसाय करतात आणि त्याच्या व्यवसायातील एकूण वार्षिक जमा ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशांसाठी अनुमानित कराच्या तरतुदी लागू होतात. या तरतुदीनुसार अशा व्यवसायिकांनी व्यवसायापासून नफा, एकूण जमा रकमेच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी दाखविल्यास त्यांना लेखे ठेवणे आणि त्याचे परीक्षण करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असेल तर त्यांना अनुमानित कराच्या तरतुदी लागू होत नाहीत.

’  इतर धंदा-व्यवसाय करणारे : ठरावीक व्यावसायिकांच्या व्यतिरिक्त धंदा किंवा व्यवसाय करणाऱ्या करदात्यांना खालील मर्यादेपेक्षा उलाढाल आणि उत्पन्न असल्यास लेखे ठेवणे बंधनकारक आहे :

अ. धंदा किंवा व्यवसायाचे उत्पन्न १,२०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे (वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी ही मर्यादा २,५०,००० रुपये) किंवा एकूण उलाढाल मागील तीन वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षांत १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे (वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी ही मर्यादा २५ लाख रुपये),

आ. या वर्षांत धंदा किंवा व्यवसाय नव्याने सुरू केला असल्यास या वर्षीचे अपेक्षित उत्पन्न १,२०,००० रुपयांपेक्षा (वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी ही मर्यादा २,५०,००० रुपये) जास्त आहे किंवा या वर्षीची अपेक्षित उलाढाल १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे (वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी ही मर्यादा २५ लाख रुपये),

इ. करदात्याचे प्रत्यक्ष उत्पन्न, कलम ४४ एडी (अनुमानित कर) नुसार नमूद केलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असल्यास आणि करदात्याचे उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नापेक्षा जास्त असल्यास.

ज्या करदात्याच्या धंद्याची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशांना त्यांच्या लेख्यांचे परीक्षण करून घेणे बंधनकारक आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी या वर्षीपासून ही मर्यादा खालील अटींची पूर्तता केल्यास पाच कोटी रुपये असेल :

१. एकूण विक्रीच्या, जमेच्या किंवा उलाढालीच्या, पाच टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम रोखीने मिळालेली नसल्यास, आणि

२. एकूण देणी, खर्चाच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम रोखीने खर्च किंवा दिलेली नसल्यास.

या दोन्ही अटींची पूर्तता केल्यास आणि पाच को टी रुपयांर्पयची उलाढाल असल्यास लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक नाही.

’  अनुमानित कर कलम ४४ एडी : अनुमानित कराच्या कलम ४४ एडीच्या तरतुदी फक्त निवासी भारतीय जे वैयक्तिक करदाते, हिंदू अविभक्त कुटुंब आणि भागीदारी संस्था (एलएलपी सोडून) यांनाच लागू होतात.

याशिवाय या तरतुदी कमिशन किंवा दलालीचा धंदा करणारे, एजन्सीचा धंदा करणारे किंवा इतर अनुमानित कराच्या तरतुदी लागू होणाऱ्या धंदा करणाऱ्या करदात्यांना लागू होत नाहीत. या कलमानुसार जे करदाते पात्र धंदा करतात आणि त्यांच्या धंद्यातील एकूण उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे अशांना या तरतुदी लागू होतात. ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असेल तर त्यांना अनुमानित कराच्या तरतुदी लागू होत नाहीत. ज्या करदात्यांची अशा पात्र धंद्यातील उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांचे उत्पन्न ८ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशांना (कलम ४४ एडी नुसार) लेखे ठेवणे आणि लेखा परीक्षण करणे बंधनकारक नाही. डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी धंद्यातील उलाढाल चेक, बँक ट्रान्स्फर किंवा क्रेडिट कार्डद्वारे झाली असेल तर ही उत्पन्नाची मर्यादा ६ टक्के इतकी असेल. ज्या करदात्यांची अशा पात्र धंद्यातील उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांनी उत्पन्न ८ टक्के किंवा ६ टक्के (जे लागू असेल ते)  किंवा त्यापेक्षा कमी दाखविले आहे अशांना (कलम ४४ एडीनुसार) लेखे ठेवणे आणि लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे.

मागील काही वर्षांत झालेल्या बदलांमुळे या तरतुदी क्लिष्ट झाल्या आहेत. तरी करदात्यांनी वेळोवेळी या तरतुदी तपासून घेतल्या पाहिजेत आणि गरज पडल्यास सल्लागाराची मदत घेतली पाहिजे.

लेखक सनदी लेखाकार व कर सल्लागार

pravin3966@rediffmail.com