16 October 2019

News Flash

अर्थसाक्षरतेचे मानसशास्त्र

गुंतवणूकविषयक निर्णयप्रक्रियेचे संक्रमण हृदयाकडून डोक्याकडे होणे गरजेचे आहे

गुंतवणूकविषयक निर्णयप्रक्रियेचे संक्रमण हृदयाकडून डोक्याकडे होणे गरजेचे आहे, हे समजावणारे व त्यासाठी मनाची बैठक तयार करणारे मासिक सदर..
अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटवरील अनेक यशस्वी पोर्टफोलिओ मॅनेजर हे मानसशास्त्राचे अभ्यासक आहेत. भारतातही असे वारे वाहू लागले आहेत.
भारताचे माजी बॅडिमटन खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक प्रकाश पदुकोण यांचे वक्तव्य असलेली एक बातमी १४ डिसेंबरच्या ‘लोकसत्ता’च्या ‘क्रीडा’ पानावर ठळकपणे प्रसिद्ध झाली होती. ब्राझील शहरातील रिओ द जनेरिओ येथे या वर्षी ५ ते २१ ऑगस्टदरम्यान रंगणाऱ्या ऑलिम्पिक स्पध्रेत सुवर्णपदक प्राप्त करण्यासाठी भारताची ‘फुलराणी’ असलेल्या सायना नेहवाल हिने क्रीडा मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्यावी, असे वक्तव्य प्रकाश पदुकोण यांनी केले होते. ऑलिम्पिकसारख्या स्पध्रेत शरीरासोबत मनाचाही कस पणाला लावावा लागतो. केवळ ऑलिम्पिकसारख्या स्पध्रेतच नव्हे तर पुण्यात कोथरूडहून स्वारगेट बस स्थानकात एसटी पकडण्यासाठी जात असताना वाहतूक कोंडीत अडकल्यावर आपले आरक्षण असलेली एसटी चुकेल का, या विचाराने या वाहतूक कोंडीवर मात करताना आपल्या मनाचा कस न जाणतेपणे आपण पणाला लावत असतो. यासाठी सरळसोट शास्त्री रस्त्याने जावे, की सदाशिव पेठेतल्या गल्लीबोळातून, हा विचार करून पुण्यातील रिक्षावाल्याला आपण सूचना करीत असतो. या सूचना मागील अनुभवावर व त्या त्या व्यक्तीच्या विचार करण्याच्या क्षमतेप्रमाणे असतात. साध्या सरळ भाषेत याला विचार करणे असे म्हणतात.
माणूस अन्य पशुपक्ष्यांपेक्षा वेगळा आहे, कारण तो कृती करण्याआधी विचार करू शकतो. माणसाच्या पशुपक्ष्यांहून असलेल्या या भिन्नत्वामुळे एका विज्ञान शाखेचा जन्म झाला व ती विज्ञान शाखा म्हणजे मानसशास्त्र. वॉटसन या मनोवैज्ञानिकाच्या मते ‘मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र (Behavioral Science) आहे’. तर विल्हेम वूंट यांच्या मते मानसशास्त्र हे बोधात्मक जाणिवेचे शास्त्र आहे. बोधात्मक म्हणजे भावना किंवा जागरूकता. डॉ. सिग्मंड फ्रॉईड यांच्या मते सर्वच व्यक्तींचे वर्तन बोधात्मक नसते. अबोध पातळीवर प्रेरणांना महत्त्व आहे. याचा अर्थ बोधात्मक व अबोधात्मक पातळीवरील प्रेरणांचा वर्तनावर खोल परिणाम असतो. मानवी वर्तनाचा आíथक बाबींशी संबंध असून अर्थशास्त्रात मानवी वर्तन व आíथक बाबी यांचा अभ्यास करणारी – बीहेव्हेरियल फायनान्स (Behavioral Finance) ही विद्याशाखा अस्तित्वात असून महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणाऱ्या या मासिक सदरातून या विद्याशाखेची ओळख करून घेणार आहोत.
अर्थसाक्षरतेचा विचार करताना व मानवी वर्तनाच्या आíथक बाजूचा संबंधित परिणाम आपण १२ भागांतून जाणून घेणार आहोत. प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचे Mr. Market is smartest investor हे वाक्य प्रसिद्ध आहे. याचा अर्थ आíथक निर्णय हे चातुर्याने घ्यायचे असतात. त्यात भावनेला थारा असता कामा नये. अनेकदा असे दिसते की, एखादा कमी शिकलेला माणूसदेखील आíथक विवंचनामुक्त असतो, तर एखाद्या उच्चशिक्षितालादेखील आíथक समस्यांनी ग्रासलेले असते. याचे कारण या दोघांच्या विचारसरणीत सामावलेले आहे. प्रत्येक जण श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहात असतो. गरिबी ही एक संकल्पना असली तरी गरिबीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करीत असतो. यापकी फारच कमी जणांना त्यातून बाहेर पडणे जमते. त्यांना हे का जमते? ज्यांना जमत नाही त्यांना ते का जमत नाही? सर्वसामान्य झटपट श्रीमंत होण्याच्या मागे का लागतात? वेगवेळ्या परिस्थितींत माणसांची मानसिकता काय असते व कशी असायला हवी? त्या त्या अनुषंगाने त्यांचे वर्तन व विचार करण्याची पद्धती याचा अभ्यास या सदरातून केला जाणार आहे.
गुंतवणुकीच्या संदर्भातले तांत्रिक ज्ञान सर्वानाच असते असे नाही व त्याची आवश्यकतादेखील नाही, कारण तांत्रिक सल्ल्लागाराची मदत घेता येते; परंतु ही मदत घेण्यासाठी मोजावे लागणारे मोल मोजण्याची तयारी असणे अथवा नसणे, ही एक मानसिकता झाली. मानसिकता, विचारवर्तन आणि याची अनुभूती हा सर्वाच्याच आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. या सर्वाचाच अभ्यास आपण या सदरातून करणार आहोत.
अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटवरील अनेक यशस्वी पोर्टफोलिओ मॅनेजर हे मानसशास्त्राचे अभ्यासक आहेत. भारतातही असे वारे वाहू लागले आहेत. शेअर बाजारातून पसे कसे कमवावे याचे मार्गदर्शन करणाऱ्या ‘टाइम युवर ट्रेड’ या पुस्तकाच्या लेखकत्रयींपकी डॉ. श्रीरंग हे मनोविकारतज्ज्ञ आहेत. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी निर्णयप्रक्रियेचे संक्रमण हृदयाकडून डोक्याकडे होणे गरजेचे आहे आणि हे संक्रमण होण्यास आवश्यक असलेली मनाची बठक तयार करण्याचे काम हे सदर करणार आहे.

– किरण लाळसंगी
kiranslalsangi@gmail.com

लेखक पुणेस्थित समुपदेशक आहेत.

First Published on January 4, 2016 3:28 am

Web Title: awareness about investment
टॅग Share Market